सुमारे १५ वर्षांपूर्वीची घटना. भारताचे राष्ट्रपती म्हणून श्री. अब्दुल कलाम यांची निवड झाली होती. भारतीयांच्या दृष्टीने ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट होती. कलाम यांनी ते पदग्रहण करताना एक अतिशय चांगला पायंडा पाडला तो म्हणजे, आपल्या पदाची कारकीर्द सुरू करण्यासाठी ते मुहूर्त बघण्याच्या अजिबात फंदात पडले नाहीत. त्यांना नेमणूकीचे पत्र मिळाल्यानंतरचा पहिला शासकीय कामाचा दिवस हाच त्यांच्या दृष्टीने ‘मुहूर्त’ होता. त्या प्रसंगी त्यांनी हा मुद्दा स्पष्ट करताना पुढील उद्गार काढले होते, ‘’पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला जो कालखंड लागतो, त्याला एक वर्ष म्हणतात आणि त्या वर्षाचे ३६५ दिवस हे सर्व समान हिस्से असतात. त्यामुळे कोणताच दिवस हा शुभ किंवा अशुभ नसतो.’’
त्यांचे हे उद्गार खरे तर आपल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. परंतु, आपल्यातील बहुसंख्य लोकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असणार यात शंका नाही. मला स्वतःला तर ते उद्गार वाचून खूप समाधान वाटले होते. एखाद्या रूढ समजुतीला ‘थोतांड’ म्हणून फटकारण्याऐवजी ती कशी अनावश्यक आहे याचे त्यांनी वैज्ञानिक स्पष्टीकरण किती छान केले होते.
माणूस हा मुलुखाचा आळशी असतो. कुठलेही नवे काम सुरू करण्याबाबत त्याची चालढकल करण्याची प्रवृत्ती असते. बरीच कामे ही ‘उद्या बघू’ म्हणून कायम ‘उद्यावरच’ ढकलली जात असतात आणि तो ‘उद्या’ कधी उगवतच नाही ! म्हणून, कुठल्याही कामास सुरवात कधी करावी या प्रश्नाचे साधे सरळ उत्तर असे असते की, ‘उद्याचे काम आज व आजचे काम आता लगेच’. एवढे साधे तत्व जरी आपण आचरणात आणले तरी असंख्य महत्वाची कामे ही वेळच्यावेळी होत राहतील. पण, वास्तव मात्र तसे नाही.
कुठलेही नवे काम करायचे म्हटले की बहुसंख्य लोक हे ज्योतीषावर आधारित मुहूर्त बघतात. मग त्यातूनच शुभ व अशुभ दिवस या खुळचट कल्पनेला जन्म दिला जातो. काम सुरू करण्यासाठी जर ‘मुहूर्त’ उपलब्ध नसेल तर ते कितीही पुढे ढकलायची आपली तयारी असते. नमुन्यादाखल काही कामांची उदाहरणे देतो. इमारतीच्या बांधकामाची सुरवात, प्रकल्पाचे उद्घाटन, मोठी खरेदी, कामाचा पदभार स्वीकारणे, नाटकाचा पहिला प्रयोग, चित्रपटाच्या चित्रीकरणाचा प्रारंभ वगैरे. अशा कितीतरी प्रसंगी मुहूर्त बघून नक्की काय साध्य होते? कोणत्याही कामाचे यशापयश हे त्याच्या दर्जावरच ठरणार असते हे सत्य आपण का नाकारतो? अमुक एका दिवशी कामास प्रारंभ केल्याने त्यात यश मिळेल ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. त्याऐवजी एखाद्या कामात स्वतःला झोकून देउन त्याचा दर्जा वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेणे अधिक महत्वाचे नाही का?
आयुष्यातील वैयक्तिक व कौटुंबिक गोष्टी करण्यासाठी तर आपले मुहूर्ताविना पान हलत नाही. याबाबतीत विवाहाचे मुहूर्त हा तर एक कोड्यात टाकणारा विषय आहे.
आपल्या देशात संपूर्ण वर्षात एप्रिल व मे मध्ये लग्नाचे भरपूर मुहूर्त असतात. वास्तविक या काळात पाण्याचे दुर्भिक्ष असते. तसेच गंभीर संसर्गजन्य आजारांच्या साथी फैलावत असतात. लग्नाच्या मांडवातील मंडळीना भाजून काढण्याचे काम उष्णता चोखपणे बजावत असते. बाकी या वातावरणात वधूवर तर त्यांच्या भरजरी पोशाखात किती उबून निघत असतील याची कल्पनाच केलेली बरी. याच्या जोडीला अजून एक त्रास असतो तो परगावहून उन्हाचा त्रास सोसत येणाऱ्या पाहुण्यांना. अशा बेसुमार वाढलेल्या प्रवाशांमुळे वाहतूक यंत्रणांवरील ताणही वाढतो, हा अजून एक मुद्दा.
तरीसुद्धा याच काळात हौसेने विवाह करण्याचा सामाजिक अट्टहास का असतो हा प्रश्न मला नेहेमी पडतो. आपण ‘मुहूर्त’ याचा अर्थ ‘सर्वाना सुखकारक वेळ’ असा का नाही घेत? बऱ्याचदा वर्षातील इतर काही महिने ‘मुहूर्त नाहीत’ या कारणांसाठी भाकड जात असतात. त्याऐवजी जर आपण एप्रिल-मे यांना ‘मुहूर्तबाद’ करून टाकले व इतर सर्व महिन्यांमध्ये समारंभ ठेवले तर ते योग्य आणि सर्वाना सुखकारक ठरेल.
माझ्या काही मित्रांनी त्यांची लग्ने ही ठरवून १५ ऑगस्ट वा २६ जानेवारीला केली आहेत. मला त्यांचा हा अभिनव दृष्टीकोन आवडला.
विवाह-मुहूर्ता बाबत अजून एक मुद्दा. पारंपारिक मुहूर्तावर केलेली सगळेच लग्ने पुढे यशस्वी होतात का? नीट विचार करून बघा, याचे उत्तर काहीसे नकारार्थी आहे. म्हणजेच, वैवाहिक जीवनाचे यशापयश हे त्या दोन व्यक्तींच्या सामंजस्यावर अवलंबून असते, लग्नमुहूर्तावर नक्कीच नाही !
समाजव्यवहारातील इतर अनेक प्रसंगीही मुहूर्तांचे प्रस्थ जाणवते. विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमासाठी ‘शुभ दिवशी’ प्रवेश अर्ज भरणारा विद्यार्थी किंवा निवडणुकीसाठी अर्ज भरणारा उमेदवार, निरनिराळे करारनामे करणारे नागरिक, एखाद्या संस्थेची स्थापना, अंतराळात यान पाठवण्यासाठी मुहूर्त बघणारे शास्त्रज्ञ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आपण कुठलेही कार्य हाती घेताना आपला स्वतःच्या क्षमतेपेक्षा दैवावर अधिक विश्वास असतो हेच यांतून ध्वनित होते. खुद्द आपल्या देशाचा स्वातन्त्र्यदिन हा मध्यरात्री का जाहीर करण्यात आला? तर म्हणे की १५ ऑगस्ट १९४७ ची सकाळ ही ‘शुभ’ नव्हती ! ( हे विधान वृत्तपत्रातील माहितीवर आधारित).
अनेक सार्वजनिक लोकहिताची कामे व योजना मुहूर्तावर सुरू होतात. त्यांच्या उद्घाटनाचा झगमगाट जरा जास्तच असतो. नंतर मात्र त्यांचे काम अतिशय संथ गतीने होते. ठरलेल्या कालावधीत त्या पूर्ण कराव्यात याबाबत आपण बिलकूल आग्रही नसतो. अखेर कसेबसे ते काम पूर्ण केले जाते आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळण्यासाठी पुन्हा एकदा मुहूर्ताची प्रतिक्षा करावी लागते !
एकंदरीत पाहता समाजमनावरील पारंपरिक ज्योतिषवादी भूमिकेचा पगडा अद्यापही जबरदस्त असल्याचे जाणवते. त्यामुळेच मुहूर्तांचे प्रस्थ आजही कायम आहे.
जगभरातील काही मोजक्या विचारवंतांनी अशा रूढींना नाकारून आपापली कारकीर्द यशस्वी करून दाखवली आहे.त्यांच्यापैकी काहींनी तर दैदिप्यमान यश मिळवून दाखवले आहे. परंतु, त्यांच्या पाउलवाटेने जाण्यास समाज अजूनही कचरतो. लोकांच्या मनातील कुठली तरी अनामिक भीती त्यांना अंधश्रद्धांमध्ये जखडून ठेवते हेच खरे. त्यातील फोलपणा समजून घेऊन कालानुरूप वास्तववादी भूमिका घेण्याची आज नितांत गरज आहे. असे जेव्हा केव्हा घडेल तो सुदिन.
*****************************************************
प्रतिक्रिया
24 Aug 2017 - 11:30 am | अत्रे
मे व जून म्हणायचे आहे का?
अवांतर: तुमचे लग्न झाले असल्यास मुहूर्त बघून झाले का?
24 Aug 2017 - 6:54 pm | रमेश आठवले
मुहूर्त काढून लग्न तिथी ठरवण्याची पद्धत फार जुनी आहे. पावसाळ्यात बहुसंख्य लोक जुन्या काळात शेती सम्बथित कामा मध्ये व्यस्त असत. तसेच पावसाळ्यात नदया, ओढे ओलांडून दुसऱ्या गावात जाणे विशेष सोपे नसे. त्यामुळे पावसाळ्या आधीचा मुहूर्त काढून बार उडवण्याचा खटाटोप लोक करत असावेत.
24 Aug 2017 - 7:32 pm | कुमार१
बरोबर,पण आता शहरी लोकां नी त्या रुढीला चिकटून राहणे ही अंधश्रद्धा च म्हणावी लागेल
25 Aug 2017 - 2:50 am | रमेश आठवले
मूळात मुहूर्त पाहून कार्य समारंभाची काळवेळ ठरवणे हीच अंधश्रद्धा नाही का ?
24 Aug 2017 - 11:52 am | सतिश गावडे
पुणेकरांसाठी मटाची एक योजना होता होती, 499 रुपयांत एक वर्षभर मटा मिळवा. मी या योजनेत नोंदणी केली आहे. योजनेची सुरुवात 21 ऑगस्टपासून होणार होती. मात्र तीन चार दिवस होऊनही मटा येत नाही म्हणून त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रास दुरध्वनी केला. तर त्यांची ग्राहक सेविका म्हणे आम्ही ही योजना 25 ऑगस्ट अर्थात गणेश चतुर्थी पासून सुरु करणार आहोत.
24 Aug 2017 - 11:53 am | सतिश गावडे
पुणेकरांसाठी मटाची एक योजना होता होती, 499 रुपयांत एक वर्षभर मटा मिळवा. मी या योजनेत नोंदणी केली आहे. योजनेची सुरुवात 21 ऑगस्टपासून होणार होती. मात्र तीन चार दिवस होऊनही मटा येत नाही म्हणून त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रास दुरध्वनी केला. तर त्यांची ग्राहक सेविका म्हणे आम्ही ही योजना 25 ऑगस्ट अर्थात गणेश चतुर्थी पासून सुरु करणार आहोत.
24 Aug 2017 - 11:56 am | सतिश गावडे
पुणेकरांसाठी मटाची एक योजना होता होती, 499 रुपयांत एक वर्षभर मटा मिळवा. मी या योजनेत नोंदणी केली आहे. योजनेची सुरुवात 21 ऑगस्टपासून होणार होती. मात्र तीन चार दिवस होऊनही मटा येत नाही म्हणून त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रास दुरध्वनी केला. तर त्यांची ग्राहक सेविका म्हणे आम्ही ही योजना 25 ऑगस्ट अर्थात गणेश चतुर्थी पासून सुरु करणार आहोत.
24 Aug 2017 - 11:58 am | माम्लेदारचा पन्खा
चान चान !
24 Aug 2017 - 12:01 pm | सतिश गावडे
अजाणतेपणी का होईना, मी माझा प्रतिसाद शुभ मुहूर्तावर प्रकाशित केला असावा. त्यामुळे तो तीन वेळा प्रकाशित झाला.
लोक आपली कामे मुहूर्त पाहून करतात ते काही उगाच नाही.
24 Aug 2017 - 1:31 pm | माम्लेदारचा पन्खा
चांगले आहे . . . .
24 Aug 2017 - 12:31 pm | कुमार१
तुमचे लग्न झाले असल्यास मुहूर्त बघून झाले का? >> नाही. रविवार निवडला होता कारण त्या दिवशी बहुतांश लोकाना सुट्टी असते. जुलैमधे केले. त्यामुळे कार्यालय लगेच मिळाले.
24 Aug 2017 - 2:15 pm | अभ्या..
अभिनव बिभिनव कै नै. पक्का हिशोबीपणा आहे. लग्नाच्या प्रत्येक आनवर्सरीला हक्काची सुट्टी मिळण्यासाठी.
दोघापैकी एकाच्या (शक्यतो बैकोच्या) बड्डेला लग्न करावे, तेवढेच एक गिफ्ट वाचते. ;)
24 Aug 2017 - 7:20 pm | सूड
टीप विचार करण्यासारखी आहे.
24 Aug 2017 - 7:43 pm | अभ्या..
सुडक्या लेका मग माझे कौतुक करच. मी सोडला तर घरात सगळे ड्राय डे बड्डे आहेत. १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर आणि २६ जानेवारी ;)
आता तर गिफ्टासोबत पार्ट्यापण वाचवायचा विचार चालुय.
24 Aug 2017 - 7:40 pm | सुबोध खरे
आजकाल हॉल मिळेल तो दिवस मुहूर्ताचा धरतात.
रविवारच्या दिवशी चांगले लग्नाचे मंगल कार्यालय हे एक ते दीड वर्षे अगोदरच बुक होते.
24 Aug 2017 - 7:46 pm | आदूबाळ
आणि
या दोन वाक्यांत विरोधाभास नाही वाटत का? की मुहूर्तांना विरोध फक्त सिलेक्टिव्ह आहे?
प्रस्तुत मित्र खरे मुहूर्तविरोधी असते तर रँडम दिवशी लग्न करायला पाहिजे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी का म्हणून?
24 Aug 2017 - 8:03 pm | कुमार१
पाहिले विचार मा. कलाम यांचे आहेत. ते चिंतनीय आहेत.
मित्रांचा हेतू पत्रिका धारीत मुहूर्ताना विरोध आणि राष्ट्रीय दिन हे आनंद दिन मानणे, असा असावा.
24 Aug 2017 - 9:18 pm | आदूबाळ
हां! म्हणजे मुहूर्तांना विरोध नसून पत्रिकांना विरोध आहे.
24 Aug 2017 - 9:26 pm | कुमार१
15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे निव्वळ राष्ट्रीय दिन आहेत. कोणताही ज्योतिषी त्यांना 'मुहूर्त' म्हणणार नाही
24 Aug 2017 - 10:16 pm | धर्मराजमुटके
मस्त लेख ! आवडला.
माझ्यासारखे दुटप्पी मात्र वारंवार नाही मात्र चांगल्या गोष्टींसाठी मुहुर्त बघतात. उदा. घर खरेदी करणे, गाडी खरेदी करणे, घरातले शुभ कार्य करणे वगैरे.
मात्र जर एखादी गोष्ट माझ्या नियंत्रणाखाली नसेल तर मात्र कोणताही दिवस चांगलाच आहे असे समजतो. उदा. नात्यातले / ओळखीतले कुणीतरी मृत्यु पावणे, बालकाचा जन्म होणे इत्यादी.
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी इज जस्ट अनादर डे फॉर अस !
अॅक्च्युअली मुहुर्त न पाळणार्यांनी जाणीवपुर्वक काही गोष्टी केल्या पाहिजेत. विशेषकरुन अमावास्येच्या दिवशी किंवा सुर्यग्रहणाच्या दिवशी, पितृपक्षात, लग्न, बारसे, घर खरेदी, गाडीची खरेदी वगैरे.
त्यामुळे आमच्यासारख्या अंधश्रद्धाळू व्यक्तींच्या वागणूकीत कदाचित काही बदल होऊ शकतील. समाजाचे काही प्रमाणात शिक्षण होऊ शकेल.
25 Aug 2017 - 10:47 am | कुमार१
धर्मराज, आभार. ज्या गोष्टी माझ्या एकट्या च्या नियंत्रणात असतात, त्यात मी तुम्ही सुचविल्याप्रमाणे वागतो