Cool देवी

मंगेश पंचाक्षरी's picture
मंगेश पंचाक्षरी in जनातलं, मनातलं
20 Aug 2017 - 11:22 pm

मंगेश पंचाक्षरी, नासिक.
दै सकाळ मध्ये 6 ऑगस्ट ला प्रसिद्ध झालेला माझा लेख.

गुगल, जी पी एस यासारखी साधने वापरून जगात कुठेही काहीही शोधून काढणाऱ्या पुरुषाना त्यांची बायको 'तिखटमीठाचा' डबा आणा हो आतून" असं जेव्हा सांगते तेव्हा मात्र तो नेहमीच कावरा बावरा होतो. तिखटमीठाचा डबा आणि पोळ्यांचा डबा सारखाच दिसत असल्याने तो हमखास चुकीचा डबा आणतो. एकदा अंगाला 'हळद' लागली की पुरुषांना तेल- मसाल्याचे भाव समजायला सुरुवात होते. पण स्वयंपाकघर ही मात्र खास बायकांची मक्तेदारी. तिथे त्यांचं राज्य असतं. अर्थात यास काही अपवाद ही असतीलच म्हणा. पण एकूणच डाळी, पीठ, साखर, पोहे ,रवा यांचे डबे तिला बरोबर सापडत असतात. एकदा मला सौ ने मिठाचा डबा आणायला सांगितला आणि मला तो काही केल्या सापडेना. "तुम्ही एवढे इंजिनिअर आणि साधा मिठाचा डबा सापडत नाही?" तिने माझ्या शिक्षणाचा उध्दार केला. बायकांनी डिवचले की पुरुषांना अजिबात सहन होत नाही. रात्रभर त्या अपमानाने माझा डोळ्याला डोळा लागला नाही. मी उगाचच त्या (न) खाल्लेल्या मिठाला जागलो. एरवी बायको ने माहेरहून फोनवर अर्धी 'वाटी' भात लावा असं सांगितल्यावर किचन ट्रॉलीमध्ये दाटी'वाटी'ने ठेवलेल्या वाटीतील नेमकी कोणती 'वाटी' वापरायची हे मला कधीच समजत नाही, हा भाग वेगळा.

"कुकरच्या तीन शिट्या झाल्या की कुकर बंद करा!" हे काम सुद्धा पुरुषांना असेच टेन्शन देणारे असते. मॅच बघताना किती बॉल, किती रन शिल्लक आहेत हे अचूक सांगणाऱ्या महाभागांना कुकरच्या नक्की तीन शिट्या झाल्या की चार याबाबत मी कधीही 'कॉन्फिडेंट' पाहिलं नाहीये. खरं तर हल्ली बायका ऑफिस मध्ये ही काम करतात आणि किचनही समर्थ पणे सांभाळतात. याबद्दल त्यांचं कौतुक करावे तितके थोडेच आहे. आलं- गेलं, मुलांचं शिक्षण, घर सफाई, कपडे लत्ते असं चौफेर काम सांभाळून वर त्या उत्साहाने किटी पार्टी, सणवार सांभाळत असतात. (भारतीय) पुरुष त्या मानाने बरेच नशीबवान म्हंटले पाहिजेत. कामावरून घरी (डायरेक्ट आले) तर त्यांना कांदे -पोहे, भजी असं काहीबाही तयार हवं असतं आणि मग चहा आणि नंतर रात्रीचं चमचमीत जेवण. काही महाभाग संध्याकाळी ७ ते ११मित्रांसोबत बाहेर च जेवायला असतात. असे लोक मग मुकाट्याने 'दाल-खीचडा' खाऊन येतात आणि शांतपणे झोपून जातात. संध्याकाळी घरी जेवायला असतील तर मात्र त्यांचे नखरे असतात. नुसता पापड तळलेला नसेल तरी त्यांचा 'तिळपापड' होतो. दिवसभर ऑफिस मध्ये घडलेल्या गोष्टींच्या 'वडाचं तेल' ते घरात 'वांग्यावर' काढत असतात. बायका मात्र हे सर्व तणाव झेलूनही कुटुंबाचा गाडा शांतपणे ओढत असतात. न कंटाळता नवनवीन पदार्थ करून नवऱ्याला खाऊ घालत असतात. सकाळी अंघोळीला गेल्यावर टॉवेल विसरणं, आंघोळ झाल्यावर टॉवेल तसाच टाकणे , टूथ ब्रश, दाढीचे ब्लेड जागेवर न ठेवणं अशा बेशिस्त नवऱ्याना कपडे तयार ठेवणं, डबा करून देणे, पाकीट- रुमाल- गाडीची किल्ली शोधून देणं यासारखी असंख्य कामं बायका सकाळी करून देत असतात. हे सुख फ़क्त भारतातच आहे. नेमकं उपासाच्या दिवशी खिचडी करताना लाईट नसल्याने मिक्सर काम करत नाही, अशा वेळी दाण्याचा कूट कसा करायचा असा (कूट) प्रश्न बायकाच सोडवू शकतात. कधी घरी पाहुणे येतात त्याच वेळी नेमके सिलेंडर संपल्याने ती 'गॅस' वर असते तर कधी अचानक नळाला पाणी न आल्याने तिच्या तोंडचं 'पाणी' पळते... भांडेवालीने घोळ घातल्यावर आपलेच चमचे, वाट्या, डिश ओळखणे, नवऱ्याला छत्री न विसरता परत आणायला भाग पाडणे, वेळच्या वेळी औषध घेण्याची नवऱ्याला आठवण करणं, पापड- कुरडया- लोणची घालणं, कपड्यांची इस्त्री, मुलांचा होमवर्क आणि प्रोजेक्ट करणं, त्याच वेळी सासू, सासरे, मुलं यांचे ही ताल सांभाळणं आणि इतकं सर्व करूनही सासूबाई ना काय वाटेल म्हणून पूजेला बसताना पंजाबी ड्रेस न घालता साडी नेसणं अशी कितीतरी व्यवधानं बायका सांभाळत असतात. एवढं सर्व सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही. त्या वेळी नवरे मंडळी टीव्ही वर बातम्या बघणं, फेसबुक, व्हाट्स अँप वर बिनकामच्या पोस्ट करणं, अमेरिकेकतील निवडणूक या विषयावर मित्रांशी फोनवर बोलणं यात गुंग असतात. क्वचित त्याही चिडतात, नाही असं नाही. तेव्हा मात्र पुरुषांचे चेहरे बघण्यासारखे असतात. अशावेळी तूरडाळ महाग झाल्याबद्दल सरकारचा निषेध करणाऱ्या पुरुषांची घरी बायको पुढे मात्र 'डाळ शिजत नाही'. शेपू ची भाजी आवडत नाही असं आई ला ठणकावून सांगणारे महाभाग, तीच भाजी बायको ने केल्यावर मात्र तिच्यापुढे 'शेपू'ट घालतात. बायकोच्या हातची खीर ही ज्यांना आयुष्यभर गोड लागत नाही त्यांना डायबेटीस झाल्यावर 'कारलं' गोड मानून घ्यावं लागतं. हळूहळू बायको च्या हातचं जेवण हा च त्याच्यासाठी ब्रँड बनून जातो.

बायकांचं योग्य कौतुक केल्यानं ज्या पुरुषांना मिरची झोंबतेय त्यांनी किचन मध्ये जाऊन स्वतः चार मिरच्या तळून दाखवाव्यात. एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडू शकणाऱ्या शास्त्रज्ञाच्या या देशात दूध उतू न जाऊ देणारी, तीन शिट्या झाल्या की कुकर बंद करणारी, झटपट पोळ्या करणारी,फोडणी हातावर न उडू देणारी, आज कोणती भाजी करावी हा यक्षप्रश्न सोडवणारी,कामवाली आली नाही तर पर्यायी दुसरी (तरुण आणि सुंदर नसणारी) कामवाली अरेंज करणारी, पंखे पुसणारी यंत्रणा आणि ऍप्स का तयार होऊ शकत नाहीत?

गॅस, मिक्सर, ओव्हन, फ्रीज, ब्लेंडर, जूसर, डिश वॉशर, फिल्टर अशा वस्तूंचा वापर लीलया आत्मसात करणारी अष्टावधानी स्त्री ही मला तर जणू आजच्या युगातील 'अष्टभुजा' देवीच भासते. देवघरातल्या 'कुळ देवी' ची रोज पूजा करणाऱ्यांनी सर्व आघाड्यांवर लढताना डोकं 'शांत' ठेवणाऱ्या या 'कुल देवी' च्या ही खुशीचा विचार नक्कीच करायला हवा, नाही का?

- ©मंगेश पंचाक्षरी, नासिक.

हे ठिकाणसंस्कृती

प्रतिक्रिया

सकाळ म्हणजे मुक्तपीठ मध्ये का..?

मंगेश पंचाक्षरी's picture

21 Aug 2017 - 12:02 am | मंगेश पंचाक्षरी

मुख्य पेपर मध्ये.

धर्मराजमुटके's picture

20 Aug 2017 - 11:30 pm | धर्मराजमुटके

असले हलकेफुलके लेख छान वाटतात वाचायला. आता कसं प्रसन्न मनानं झोपायला जातो. कुल देवीकडून नवरत्न तेलाची मसाज करुन घ्यावी म्हणतो आज झोपण्यापुर्वी :)

मंगेश पंचाक्षरी's picture

21 Aug 2017 - 12:01 am | मंगेश पंचाक्षरी

धन्यवाद!

एस's picture

21 Aug 2017 - 12:03 am | एस

अरे काय चालवलंय?

का बरं? आज घरचा आहेर मिळालेला दिसतोय. ;)

धडपड्या's picture

21 Aug 2017 - 12:18 am | धडपड्या

बायकोच्या वाढदिवसाची भेट म्हणून पाडलेलात का हो हा लेख?

पिलीयन रायडर's picture

21 Aug 2017 - 12:36 am | पिलीयन रायडर

पंचाक्षरी, रोज एक लेख नाही दिलात तरी चालेल अहो. चांगलं लिहीताय पण असं इथे आणुन ओतलंत तर लोकांना वैतागच येईल. थोड्या लोकांशी गप्पा मारा, दुसर्‍यांनाही प्रतिसाद द्या. मिपा ही प्रतिसाद मिळवण्यासाठीच्या एका फोरमहुन जास्त काही तरी चीझ आहे.. चार प्रतिसादांपेक्षा चार मिपाकर जोडा. नुसते प्रतिसाद मिळवण्याचा कर्मदरिद्रीपणा कशाला, नाही का?!

मंगेश पंचाक्षरी's picture

21 Aug 2017 - 1:07 pm | मंगेश पंचाक्षरी

एक संस्कृत वचन आहे. नापृष्ट कास्यचित ब्रूयात.

अभिजीत अवलिया's picture

21 Aug 2017 - 1:37 pm | अभिजीत अवलिया

नापृष्ट कास्यचित ब्रूयात

म्हणजे?

सिद्धार्थ ४'s picture

21 Aug 2017 - 1:57 pm | सिद्धार्थ ४

बुद्धिमान जानते हुए भी, बिना पूछे किसी से कुछ न कहे और न ही अन्याय से पूछने वाले को कुछ बतावे तथा इन दोनों किस्म के व्यक्तियों के साथ-समक्ष वह जड़-अनभिज्ञ-अनजान का सा व्यवहार करे।

रुस्तम's picture

21 Aug 2017 - 5:15 pm | रुस्तम

जब तक कोई पूछे नहीं तब तक किसी को उपदेश नहीं करना

असा अर्थ आहे

पिलीयन रायडर's picture

21 Aug 2017 - 8:15 pm | पिलीयन रायडर

इतकं डोकं चालणार्‍या माणसाला साधा शिष्टाचार कळु नये हे एक आश्चर्यच आहे...

......ह्या अर्थाचा एखादा संस्कृत श्लोक आहे का हे बॅट्याला विचारायला हवे! नसेल तर तो लिहूनही देईल कदाचित!

बाजीप्रभू's picture

22 Aug 2017 - 6:59 am | बाजीप्रभू

मंगेश पंचाक्षरी सर तुम्ही हा लेख शब्दशः ढापलेला आहे असं खेदाने नमूद कारावेस.

माझे स्वयंपाक घर, गोंदवलेकर महाराज, ५६ भोग रेसिपी, सतीश जोशी आणि रवींद्र चिंदरकर याच्या फेसबुक वॉलवर हा लेख वाचायला मिळतो.
तोच लेख तुम्ही तुमच्या भिंतीवर कॉपी केला आहेत आणि पुढे सकाळमधे स्वतः म्हणून छापून आणला अहात.
या सगळ्या ठिकाणच्या पोस्टिंग तुमच्याहि खूप आधी झालेल्या आहेत.

एखाद्या ब्लॉगरच्या लेखातील आवडलेल्या एखाददोन ओळी, छोटासा पॅरा स्वतःच्या लेखात घेणं समजू शकतो... पण असं मख्खी टु मख्खी पेस्टवतांना मूळ लेखकाला श्रेय द्यायला हवं.

अभिजीत अवलिया's picture

22 Aug 2017 - 7:52 am | अभिजीत अवलिया

अर्रर्र. म्हणजे गेले आठवडाभर आम्ही ज्या जिलब्या खातोय त्या ढापलेल्या आहेत ? आणि वर स्वत:च्या नावाने काॅपीराईट ?

मंगेश पंचाक्षरी's picture

22 Aug 2017 - 10:59 am | मंगेश पंचाक्षरी

नाही, हा आणि मी पोस्ट केलेले सर्व लेख मी स्वतःच लिहिलेले आहेत. बऱ्याच लेखांच्या चोऱ्या होतात म्हणूनच मी डिस्क्लेमर टाकत असतो. पण सर्वात आधी मी लेख माझ्या फेसबुक वर पोस्ट करत असतो.

सगळं नीट चेक केल्यानंतरच वरील प्रतिसाद लिहिला होता.
IT क्षेत्रात असल्याने कोणाचा नंबर पहिला याचा निर्णय निश्चितच घेता येतो मला. असो,
सांगायचं मुद्दा असा कि,
एखादा बाळबोध लेख असला तरी इथली मंडळी तुम्हाला प्रोत्साहन देतील, इतरांचे लेख आम्हीही रेफर करतो पण त्याचं क्रेडिट शेअर केल्यास मिपावर आपलाच सन्मान वाढतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

मंगेश पंचाक्षरी's picture

22 Aug 2017 - 1:55 pm | मंगेश पंचाक्षरी

आपण IT क्षेत्रातील आहात तर कृपया दिलेल्या लिंकवरून जरूर शोध लावा. कारण पूर्ण लेख मी च लिहिला आहे यात काही शंका नाही. मला तुमची मदतच होईल. माझ्या लेखाची 13 जुनची लिंक दिली आहे.

मंगेश पंचाक्षरी's picture

22 Aug 2017 - 11:01 am | मंगेश पंचाक्षरी
मंगेश पंचाक्षरी's picture

22 Aug 2017 - 10:23 am | मंगेश पंचाक्षरी

हा लेख मीच लिहिला आहे. माझ्या फेसबुकवर सर्वप्रथम मी पोस्ट केला. मी आजपर्यंत कधीही असे लेख वगैरे ढापले नाहीत. उलट माझे अनेक लेख चोरी होतात. कृपया त्या कोणा जोशींची लिंक द्या.

मंगेश पंचाक्षरी's picture

22 Aug 2017 - 10:43 am | मंगेश पंचाक्षरी

धन्यवाद सर आपण ही माहिती दिल्याबद्दल. हा लेख मी लिहून फेसबुकवर पोस्ट केला त्याची लिंक देत आहे. त्या चोरांवर कारवाई होईल. https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155353504026069&id=546846068

मंगेश पंचाक्षरी's picture

22 Aug 2017 - 10:56 am | मंगेश पंचाक्षरी

https://www.facebook.com/groups/1479035239031800/permalink/1915852625350...

56 भोग या समूहावर कमेंट मध्ये खुलासा नोंदवला आहे. सर, आपले खूप खूप आभार!

चष्मेबद्दूर's picture

23 Aug 2017 - 8:12 pm | चष्मेबद्दूर

ओढून ताणून लिहीलं म्हणजे लेख असतो का? कशाला त्या कोट्या करायच्या? इयत्ता 5 वी तला निबंध वाटला मला तर।।।।।