मान्य आहे ते सत्तेत होते
मान्य आहे त्यांनी स्वप्नं दाखवली
मान्य आहे ते तुमचे 'आदर्श' होते
त्यांच्यातले बरेच जण
खरे असतील
हेतूही स्वच्छ असतील बहुतांशी
आणि काही जण त्यांनीच घेतलेल्या निर्णयाच्या
विरोधातही असतील
पण कदाचित
निर्णायक क्षणी समोर आलेली
त्यांची काही अपरिहार्यता असेल
किंवा त्यांना, तुम्हाला सगळ्यांना
घाईसुद्धा झाली असू शकते...
ईतकी वर्षं लढा दिल्यावर
समोर विजय दिसत असतानाची घाई
सगळं सगळं मान्य आहे
पण तरीही ,
ते मूठभरच होते
तुम्ही तर करोडोंच्या संख्येने होता ना
का नाही सांगितलंत मग
...की आम्हाला नकोय फाळणी
प्रतिक्रिया
16 Aug 2017 - 11:33 am | मिसळलेला काव्यप्रेमी
प्रभावी झालिये... लिहिते रहा...
18 Aug 2017 - 12:58 pm | चाणक्य
काही दिवसांपूर्वी मी पियुष मिश्रा चं 'हुस्ना' गाणं ऐकलं. लई वेळा ऐकलं...जाम आवडलं. वरवर पाहता एक प्रियकर त्याच्या प्रेयसीला काही प्रश्न विचारतो या गाण्यात...की भारतात झाडाची पानं झडतात, पाकिस्तानात असंच होतं का ? ईथे सकाळ होते, तिथेही अशीच होते का ? अजून तिथे लोढी साजरी होते का ? वगैरे वगैरे..... पण हे झालं वरवरचं. खरे प्रश्न वेगळेच. पाकिस्तान वेगळा तर झाला, पण एक बाॅर्डर आणि परस्परांविषयीचा द्वेष यापलिकडे काय मिळालं ? फाळणीने विधायक असं नक्की काय साध्य झालं ?
त्यातून पेपर ला त्याच दिवशी बातमी की आत्तापर्यंत काश्मीर मधे 5000 च्या वर सैनिक मारले गेलेत. हे आपले. तिकडचेही असतीलच. आणि हे थांबायची चिन्हं दिसत नाहीत. अजून किती पिढ्या चालणार आहे कोणास ठाऊक. त्यावेळी लोकांनी उत्स्फूर्तपणे फाळणीला का विरोध नसेल केला ?
करोडोंनी लोकसंख्या होती आपली. मग मूठभर नेत्यांनी ठरवलं की फाळणी करायची आणि ती झाली? का ? अर्थात निर्णय नेहमी मूठभर लोकंच घेतात म्हणा. पण तरीही....दुसरा काही मार्ग नसेल काय ?
खरं तर आता 70 वर्षांनी हे प्रश्न पडून उपयोग नाही काही. पण 'हुस्ना' ऐकून सैरभैर व्हायला झालं खरं.
आणि मग याच विचारात 'निर्णय' लिहीली गेली.
20 Aug 2017 - 12:40 am | तृप्ति २३
खूप छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया.
Marathi kavita
20 Aug 2017 - 12:45 pm | धर्मराजमुटके
छान आहे कविता ! अजुन लिहा !
20 Aug 2017 - 12:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहा अजून. छान आहे कविता.