शेजाऱ्याचा डामाडुमा - श्री तीन राणाज्यूं को सरकार - नेपाळ भाग ६

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
23 Feb 2017 - 4:55 pm

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - श्री तीन राणाज्यूं को सरकार - नेपाळ भाग ६

नेपाळमध्ये १७६८ मध्ये शाह राजांची राजवट अस्तित्वात आल्यापासून म्हणजे म्हणजेच आज आपण ज्या भूभागाला 'नेपाळ राष्ट्र' म्हणून ओळखतो त्या एकीकृत नेपाळ राष्ट्राची खरी स्थापना झाल्यापासून शाह कुटुंब सत्तेवर होते खरे, पण अल्पजीवी नेपाळ नरेश आणि पर्यायाने मग पुन्हा अल्पवयीन राजाचे राज्यारोहण असे अनेकदा घडल्याने पंतप्रधान-भारदार-काझी-सेनापती ह्यांना अनन्यसाधारण महत्व आले. नेपाळच्या काही मोजक्या प्रसिद्ध घराण्यांमध्ये सर्व पदे आणि सत्ता एकवटली. त्यात ही पदे सुद्धा यथावकाश वंशपरंपरात होत गेली. पर्यायाने नेपाळ नरेश हे पद अधिकाधिक शोभेचे आणि शक्तिहीन झाले होते. सरदारांच्या महत्वाकांक्षा आकाशाला भिडल्या होत्या. एकमेकांविरुद्ध शह-काटशह, कारस्थाने-षडयंत्र, मत्सर, विषप्रयोग, हत्या, बदला ह्यांनी नेपाळच्या सर्व सरदार- भारदारांचे जीवन व्यापून गेले होते.

वर्ष होते १८४६, सिंहासनावर होता राजेंद्र बीर बिक्रम शाह असे भारदस्त नाव असलेला राजा. नेपाळचा हा राजा सर्वात कमकुवत राज्यकर्ता म्हणून ओळखला जातो. तो ३ वर्षाचा असताना गादीवर आला. तो लहान असेपर्यंत राज्यकारभार त्याची सावत्र आई आणि त्याचे जवळचे नातेवाईक असलेले पंतप्रधान फतेहजंग शाह चालवत असत. पुढे तत्कालीन राजप्रथेप्रमाणे त्याचाही दोन सख्ख्या बहिणींशी एकाच दिवशी विवाह झाला. राज्याला लवकरात लवकर वारस मिळावा आणि राण्यांमध्ये फार सवतीमत्सरही होऊ नये म्हणून ही प्रथा पडली होती. त्याची पहिली पत्नी (नेपाळी भाषेत बडामहारानी ज्यूं) कोवळ्या वयातच पुरेश्या राजपुत्रांना जन्म देऊन निवर्तली होती आणि राजा पूर्णपणे त्याच्या धाकट्या (नेपाळी भाषेत कांचामहारानी ज्यूं) राणीवर, राज्यलक्ष्मीदेवीवर अनुरक्त होता, पूर्णपणे विसंबून होता. ह्या कांचामहारानी कारस्थानी, प्रचंड कोपिष्ट आणि सत्तालोलुप म्हणून प्रख्यात होत्या. राजाने 'लाल सनद' म्हणजे सर्व राजकीय आदेश देण्याचा अधिकार सुद्धा राजलक्ष्मीला बहाल करून टाकला होता. राज्यकारभारात ना त्याला फार रस होता ना वाव.

ह्याचवेळी नेपाळमध्ये घडले एक थरारक नाट्य. नेपाळच्या राजकीय क्षितिजावर एका नवीन शक्तीचा असा काही धडाकेबाज उदय झाला की नेपाळ दरबारात-शासनतंत्रात शक्तिमान समजले जाणाऱ्या सर्व नेपाळी रथी-महारथींची पार धूळधाण झाली. ही धूमकेतूसारखी अवतरलेली शक्ती होती 'राणा' शासकांची. हे राणा शासक पुढे जवळपास शंभरएक वर्षे नेपाळच्या शासनतंत्रातील सर्वाधिक शक्तिशाली केंद्र म्हणून प्रसिद्धी पावले. नेपाळमध्ये एक 'स्टेट विदिन द स्टेट' च अस्तित्वात आले म्हणा ना.

* * * * *

कोट पर्व

नेपाळमध्ये 'राणा' शासकांच्या राजकीय उदयाला निमित्त ठरली एक अनन्यसाधारण सभा. या प्रसंगाला नेपाळी इतिहासात 'कोट सभा' किंवा 'कोट पर्व' म्हणून ओळखतात. प्रचंड विस्तार असलेल्या थापाथली राजवाड्याच्या चौकात झालेल्या ह्या सभेत नेपाळचा संपूर्ण राजदरबार - सरदार, सेनापती आणि झाडून सगळ्या महत्वपूर्ण व्यक्ती उपस्थित होत्या. अर्ध्या तासा नंतर सभा संपली तेंव्हा मात्र रक्त आणि मृतदेहाच्या चिखलातून फक्त नेपाळचे तत्कालीन राजा-राणी आणि जंगबहादूर कुंवर नावाचा शूर सरदार आणि त्याचे नऊ भाऊ एवढेच लोक जिवंत बाहेर पडले !

१९ सप्टेंबर १८४६ ची रात्र ही नेपाळच्या राजदरबारात मोठ्या पदांवर असलेल्या सर्व महत्वाच्या सरदार घराण्यांसाठी काळरात्र ठरली. निमित्त झाले गगनसिंह नावाच्या एका अत्यंत महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी सरदाराच्या मृत्यूचे. हा गगनसिंह कांचामहारानी राज्यलक्ष्मी देवी शाह यांच्या खास मर्जीतील काझी (मंत्री) होता. राणीसरकार आणि गगनसिंह ह्यांच्यात छुपे प्रेमसंबंध आहेत अशीही वदंता होती. गगनसिंह स्वतःकडे सात सशस्त्र सैनिक रेजिमेंट्स बाळगून होता, म्हणजे सर्वात जास्त सैनिक. खुद्द पंतप्रधान असलेल्या चौतारीया फतेहजंग शाह कडे तीनच रेजिमेंट असताना जास्त सैनिक असलेला गगनसिंह दरबारात जास्त ताकतवान होता आणि सर्व सरदारांचा नावडतासुद्धा. नेपाळमधील राजकीय वातावरण अगदी गढूळ झाले असतांनाच हा काळ आणि तश्यात १९ सप्टेंबरच्या सांयकाळी काठमांडूच्या दक्षिणेकडे असलेल्या त्याच्या महालाच्या सज्ज्यात गगनसिंह मृतावस्थेत आढळला. झाले......., हस्तेपरहस्ते बातमी रात्री उशिरा कांचामहारानीकडे पोचली. राणीसरकार क्रुद्ध झाल्या आणि ताबडतोब त्यांनी सर्व मंत्री, सेनापती आणि प्रमुख सरदारांची बैठक कोट (राजवाड्यातील शस्त्रागार) चौकात बोलावण्याचे फर्मान काढले. मध्यरात्री अर्ध्या झोपेत जेंव्हा सेनापती आणि इतर सर्व सरदार कोट चौकात पोचले तेंव्हा बहुसंख्य सरदार कुठल्याही शस्त्र किंवा अंगरक्षकाशिवाय आले होते. राजाच्या अंगरक्षक तुकडीचा प्रमुख असलेला जंगबहादूर कुंवर आणि त्याचे सर्व सैनिक मात्र पूर्ण शस्त्रसज्ज होते आणि त्यांनी बंदिस्त चौकात येण्याची सर्व दारे बंद करून फक्त एक दार प्रवेशासाठी उघडे ठेवले होते. आत येण्याऱ्या काही सरदारांकडे शस्त्रे असलीच तर ती तत्परतेने अंगरक्षक दलाने अडवली आणि ताब्यात घेतली.

सभा सुरु झाली तेव्हा कांचामहारानी रागाने थरथरत होत्या. त्यांनी उपस्थित सर्व सरदाराना तंबी दिली - काझी गगनसिंह भंडारीचा मारेकरी आपल्यातलाच आहे, कोण आहे ते मला माहित आहे. त्याला तुमच्यातील काहींची फूस आहे हे ही मला माहित आहे. पण तरी मी जनरल अभिमानसिंह यांना संधी देते, त्यांनी सभेला खरे ते सांगावे. नेपाळचे गृहमंत्री असलेले जनरल अभिमानसिंह हे मोठे प्रस्थ होते पण त्यांच्यावर राणीसरकारांची मर्जी नव्हती. त्यांनी राजा आणि राणीला अभिवादन करून सभेला काही सांगायला सुरुवात केली न केली तोच पंतप्रधान तिथे उपस्थित नाहीत नाहीत हे जंगबहादूरने राणीच्या लक्षात आणून दिले. वर स्वतःच्या भावाला पंतप्रधान फतेहजंग यांना ताबडतोब घेऊन येण्यास बाहेर पाठवले. कोणालाही सभा संपेपर्यंत चौकातून बाहेर सोडू नये असे आदेश स्वतःच्या तुकडीला देऊन जंगबहादूर परतला. तोवर राणीचा संताप अनावर झाला होता, त्यांनी काझी बीरकिशोर पांडे हाच गगनसिंहाच्या हत्येला जबाबदार आहे आणि त्याला ताबडतोब मृत्युदंड द्यावा अशी आज्ञा जनरल अभिमानसिंहाना दिली. अभिमानसिंह चपापले आणि त्यांनी राजे राजेंद्र बीरबिक्रमकडे पाहिले. राजे राजेंद्र काही बोलले नाहीत, त्याची सहमती आहे असे समजावे काय हे जनरल अभिमानसिंहना कळेना. एका वरिष्ठ मंत्र्याला फक्त संशय आहे ह्या कारणाने जीवानिशी मारायचे परिणाम भयंकर होवू शकतात हे त्यांना माहित होते. प्रचंड रागात असलेल्या कांचामहारानी अजून भडकण्याच्या आधी कोट सोडवा आणि त्यांचा राग कमी झाल्यावर पुढे काही करावे असे त्यांनी ठरवले आणि ते दरवाज्यापर्यंत आले. राजे राजेंद्र सुद्धा 'आधी चौकशी करा मग पांडे दोषी कि नाही हे ठरवू' असे पुटपुटत सभा मध्यावर सोडून उठले आणि अन्तःपुरात गेले. अभिमानसिंह बाहेर पडायला दाराजवळ गेले, जंगबहादूरच्या भावांनी मज्जाव केला, झटापट झाली आणि कुणाला काही कळण्याच्या आत अभिमानसिंह मारले गेले. मग काय, 'हेल ब्रेंकिंग लूज' ज्याला म्हणतात तशी स्थिती झाली आणि सर्व सभागण सैरावैरा पळू लागले. अगदी काही मोजके लोक कोटच्या उंच भिंती चढून जीव वाचवू शकले (पण तेही पुढे दुसऱ्या एका हत्याकांडात टिपून-निवडून मारले गेले.) पुढच्या काही मिनिटातच जवळपास सर्व उपस्थित सरदार, सभास्थानी नुकतेच आलेले पंतप्रधान चौतारिया फतेहजंग शाह आणि अख्खे मंत्रिमंडळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.

त्या काळरात्री मृतदेहाच्या चिखलातून फक्त नेपाळचे तत्कालीन राजे राजेंद्र शाह, कांचामहारानी राजलक्ष्मी आणि जंगबहादूर कुंवर नावाचा शूर सरदार आणि त्याचे नऊ भाऊ एवढेच लोक जिवंत बाहेर पडले! हा जंगबहादूर म्हणजेच गोरखालीतून पृथ्वीनारायणासोबत काठमांडूला आलेल्या काझी रामकृष्ण कुंवरचा खापर-पणतू!

२० सप्टेंबर १८४६ ची पहाट झाली आणि नेपाळची थापा, चौतारीया-शाह, बस्नेत, पांडे, सिरुपली, जोषी इत्यादी तालेवार घराणी शोकसागरात बुडाली असताना राजमहालातून नेपाळचा इतिहास पुढच्या १०४ वर्षांसाठी पूर्णपणे बदलणाऱ्या फार्मानांची विद्युतवेगाने रवानगी झाली. पाहिले फर्मान होते जंगबहादूर कुंवरला 'राणा' हा खिताब देवून पंतप्रधानपदी नियुक्त केल्याचे. दुसरे त्यालाच नेपाळी फौजेचा सर्वोच्च कमांडर नियुक्त केल्याचे आणि तिसरे होते त्याच्या चार भावांची मंत्रीपदी नियुक्ती झाल्याचे. पुढच्या दोन दिवसात नेपाळच्या सर्व महत्वाच्या पदी जंगबहादूर राणा समर्थकांची नियुक्ती झाली आणि रक्तपाताच्या पायावर नेपाळ मध्ये 'राणा' राजवटीची पहिली वीट रचली गेली.

थोडे अवांतर:

प्रख्यात इटालियन विचारक-लेखक निकोलो मॅकियावेलीचे "द प्रिन्स" आले इसवी सन १५१३ मध्ये. ते जंगबहादूर कुंवरने वाचले असण्याची सुतराम शक्यता नसली तरी त्यात सुचवल्या प्रमाणे ‘नवीन राजसत्तेचा भक्कम पाया रचताना सर्व लायक प्रतिस्पर्धी मुळानिशी गारद करण्याची’ युक्ती नेपाळमध्ये १८४६ मध्ये घडलेल्या खऱ्याखुऱ्या 'कोट पर्वात' जंगबहादूर कुंवरने पुरेपूर वापरली. ३३३ वर्षांचा अंतराळ असलेल्या ह्या दोन गोष्टी - एक कल्पित शक्यता, एक खरीखुरी घटना. पण दोहोंमध्ये असामान्य साम्य आहे. आश्चर्यच!rong>

थोडे जास्तच अवांतर:

इतिहासात क्रूर घटनांची पुनरावृत्ती होते तेव्हढी प्रसन्न घटनांची होत नसावी. नजीकच्या इतिहासात पुन्हा १ जून २००१ च्या उत्तररात्री असेच एक भयपर्व काठमांडूच्या नारायणहिटी राजवाड्यात घडले. नेपाळ नरेश राजे बिरेंद्र, राणी ऐश्वर्या, त्यांचे दोन्ही वारस राजपुत्र, त्यांचा भाऊ, बहिणी, आत्या झाडून सर्व राजपरिवार एका नृशंस हत्याकांडाला बळी पडला….. हे हत्याकांड घडवले कुणी तर राजा बिरेंद्रचा घोषित वारस युवराज दिपेंद्रने स्वतः !! ह्यात कोण जगले वाचले तर शेवटचे नेपाळ नरेश ज्ञानेंद्र आणि त्यांचा मुलगा राजकुमार पारस !

* * *

क्रमशः

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...

===========================================================================

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

साहित्य संपादक / संपादक मंडळी,

एक चूक झाली आहे, ह्या भागात आधी प्रसिद्ध झालेल्या भागांची लिंक मी दिली नाही. ती देता येईल काय ?

कृपया मदत करावी.

अनिंद्य's picture

24 Feb 2017 - 11:52 am | अनिंद्य

अरे व्वा !
झटपट दुरुस्ती केल्याबद्दल आभार!

रोचक शैलीत लिहिले आहे. 'द प्रिन्स' चा उल्लेख बऱ्याच कालखंडानंतर वाचला. छान. पुभाप्र.

अनिंद्य's picture

24 Feb 2017 - 5:04 pm | अनिंद्य

@ एस

द प्रिन्स सहजच आठवले हा प्रसंग लिहितांना.

लेखमालेच्या प्रत्येक भागावर तुम्ही न चुकता प्रतिक्रिया देता, आभार !

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2017 - 12:20 am | डॉ सुहास म्हात्रे

रोचक !

नवीन राजसत्तेचा भक्कम पाया रचताना सर्व लायक प्रतिस्पर्धी मुळानिशी गारद करण्याची’ युक्ती

ही "युक्ती" ऑटोमान साम्राज्यात आणि भारतिय सल्तनतींत नेहमीच वापरल्या जात होत्या. किंबहुना, ती "युक्ती" न वापरता सर्व प्रतिस्पर्ध्यांना कैदेत ठेवण्याची सुरू झालेली प्रथा ऑटोमान साम्राज्याच्या र्‍हासाला कारणीभूत झाल्याचे म्ह्टले जाते. कारण त्यामुळे सम्राटाच्या मृत्युनंतर गादीवर हक्क असलेला नवीन सम्राट अनेक वर्षे कैदेत असलेला (आणि त्यामुळे राजकारणाशी संबध तुटलेला) असू लागला. अश्या दुर्बल सम्राटांमुळे राजकीय चढओढ वाढली आणि साम्राज्याचा र्‍हास झाला.

अनिंद्य's picture

24 Feb 2017 - 2:59 pm | अनिंद्य

@ डॉ सुहास म्हात्रे

सविस्तर माहितीबद्दल आभार!

ऑटोमान राजवटींबद्दल पूर्वी केमाल कफादरचे एक पुस्तक वाचले होते ते आठवले, बहुतेक बिटवीन द वर्ल्डस असे नाव होते.

आमचे एक स्नेही नेहेमी 'बन्धुग्रस्त' असलेल्या लोकांबद्दल सहानुभूती आहे असे म्हणतात तेंव्हा मला इतिहासातले सर्व शक्तिशाली राज्यकर्ते आठवतात. आणि इथे तर राणाज्यूं ना एकूण ९ भाऊ :-)

सॉरी, केमाल कफादार असे वाचावे.

अगदीच काटा आला हे वाचताना. गगनसिंह यांना खरेच कुणी मारले हे नंतर कळले का?

अनिंद्य's picture

31 Jul 2017 - 11:16 am | अनिंद्य

@ रुपी, कोट पर्व मानवी क्रूरतेचा कळस होते खरे.

गगनसिंह भंडारीचे भरपूर शत्रू होते, त्यामुळे नक्की कोणी मारले हे शेवट पर्यंत कळू शकले नाही. काही इतिहासकारांनी नोंदवल्याप्रमाणे जनरल अभिमान सिंह यांनी मृत्यूपूर्वी 'हत्त्यारा जंगे नै हो' (हत्यारा जंग बहादूरच आहे) असे उद्गार काढले होते.

पण घटनेचा प्रत्यक्षदर्शी कोणी उरलाच नाही खरे तर. जे कोणी आठ दहा सरदार कोटच्या भिंती चढून पळून जाण्यात यशस्वी झाले, त्यांना पुढे लवकरच टिपून-निवडून मारून टाकण्यात आले - ते कोट सारखेच एक दुसरे हत्याकांड - भंडाऱखाल पर्व :-(

पैसा's picture

29 Jul 2017 - 9:53 am | पैसा

एवढासा नेपाळ, तिथे सत्तेसाठी असे घडू शकते तर अख्ख्या भारताच्या सत्तेसाठी बाप भाऊ याना मारायचा मोह काही मंडळींना झाला यात विशेष ते काय!

अनिंद्य's picture

31 Jul 2017 - 12:36 pm | अनिंद्य

@ पैसा,

बरोबर.
आणि ही अशी पराकोटीची सत्तालिप्सा सार्वकालिक आहे, सर्व धर्म-संस्कृतींमध्ये आहे हे उघड आहे. वर म्हात्रे साहेबांनी एका प्रतिसादात भारतीय सल्तनतींचे उदाहरण दिले आहे. भाऊ, पिता, काका इत्यादी वारसांना जिवानिशी मारणे / कैदेत टाकणे याबद्दल तर आपण सर्वच ऐकून आहोत.

नेपाळमध्ये जंगबहादूर राणांचे वेगळेपण म्हणजे त्यांचे 'बन्धुग्रस्त' नसणे :-) त्याचे एक दोन नव्हे तर ९ भाऊ त्याच्या 'सोबत' होते आणि त्यांनी एकमेकांना न मारता सर्वांनी मिळून अन्य प्रतिस्पर्धी गारद केले.

- अनिंद्य