सध्या जे आपल्या सह्याद्री मध्ये अपघातांच सत्र सुरू आहे, त्यावर काही तरी बोलावं आणि त्या संदर्भात काही चर्चा करावी या हेतूने हा लिहायचा एक प्रयत्न.
लिखाण माझा पिंड पण नाही. पण सध्या जे काही विचित्र अपघात घडतायत त्या मध्ये विनाकारण माझ्या सह्याद्री बद्दल ज्या काही शंका,भीती पसरवली जात आहे तो दूर करण्याच्या साठी हा सगळा लेखनाचा प्रपंच. हो जाणीवपूर्वक मी 'माझा सह्याद्री' म्हणतोय कारण त्यानेच मला घडवलं आहे असा माझा ठाम विश्वास आहे. मला तो गुरुस्थानीच आहे. मी त्याला माझाच समजतो आणि त्याने देखील कधी मला परकं समजलेलं नाही. सह्याद्री च्या अंगाखांद्यावर खूप बागडलो,हुंदडलो,त्याचं पाणी पिऊन नकळत त्याचे संस्कार देखील आत कधी गेले ते कळलेच नाही.
खरं तर मी स्वतःला 'ट्रेकर' वगैरे मानत नाही.आम्ही सगळे या सह्याद्रीची पोरं. ट्रेकर म्हणलं की जरा परकं असल्या सारखं वाटतं. पण सध्या आजूबाजूचं वातावरण पाहता एवढी फिलॉसॉफी एखाद्याला झाडली तर ते म्हनलं काय येडं आहे हे. येडं म्हणून घ्यायला पण माझी हरकत नाही पण कुठं,कशाला एखाद्याला सगळं सांगत बसा. पण आता हे सगळं सांगायची आणि चांगलं विस्कटून सांगायची वेळ आलीय असं वाटलं. म्हणून बाह्या सरसावूनच लिहायला बसलो.
तसं म्हनलं तर अल्लड वयातच या सह्याद्रीचा नाद लागला. सध्याच्या भाषेत सांगायच तर ते addicted का काय ते म्हणतात ते. आणि या सह्याद्रीने पण खुल्या मनाने आम्हाला त्याच्या कवेत घेतलं. त्याच्या अंगाखांद्यावर खेळू दिलंं. माया लावली. थंडी-पावसाचं राहायला गुहा दिल्या,बिसलेरी झक मारल असं प्यायला पाणी दिलं. एवढं सगळं का तर आम्ही त्याला आमचं मानलय. त्याने पण कधीच आम्हाला हाडतुड केली नाय. एखादी माहेरवाशीन माहेरी गेल्यावर तिला जो आनंद मिळतो तोच आनंद या सह्याद्रीत आम्हाला मिळतो. आमच्या सारख्याचं माहेर च आहे हे. एखादा ट्रेक हुकला की तोंडं बारीक व्हायची आमची. लै काळजी आणि जीव लावला यानी आम्हा पोररांना. इतक्या वर्षात आमचा साधा पाय देखील या सह्याद्री ने कधी मुरगळू दिला नाही आणि आता अचानक इतक्या लोककांच्या जीवावर का रे उठला बाबा तू? जिकडे बघावं तिकडं कोणतरी मरतंय, जखमी होतंय. काय झालं नक्की याला? का कोपला एवढा रे तू? आम्हाला प्यायला बिसलेरी पेक्षा भारी पाणी देतोय आणि बाकी लोक्काना त्याच पाण्यात ढकलतो? असा फरक का रे बाबा?
म्हनलं बघावं जरा याच उत्तर मिळतयं का.
जरा शोधाशोध केल्यावर याचं उत्तर या बाकी मंडळी कडूनच मिळालं.
याचं साधं आणि सरळ उत्तर असं सापडलं की ही जी लोकं मरतायत, जखमी होतायत यातल्या बहुतांशी लोककांनी या सह्याद्रीला कधी आपलं मानलंच नाही.
हे इथं येतायत फक्त हुल्लडबाजी करायला, दारू प्यायला, बाकी किडे करायला.यांना या सह्याद्रीचे पण काही नियम आहेत ते देखील माहित नाहीयेत मग ते पाळायचं लांबच राहिलं. काही दुर्दैवी अपघात होतही असतील ज्यात कुणाची चूक नसेल.शेवटी अपवाद प्रत्येक गोष्टीला आहे. अशा घटनांचं वाईट त्या सह्याद्रीला पण वाटत असणार. असे काही अपवाद वगळता तो कशाला कुणाला मारतोय तुम्ही मरताय तुमच्याच चुकीमुळं. दिसला धबधबा की काढ कपडे, हान उडी, घे सेल्फी ,
दिसला एखादा कडा की चढ वर हान कनाकना 5/10 फोटो, फोटो पण साधा नाय काढणार, यांचं म्हणणं काय तर "मी वर चढतो, आणि उडी मारतो मग त्याचा फोटो काढ". आता ही उडी नीट बसली तर ठीक, एकतर ते पाय मोडून तरी येतं नायतर तसंच खाली जातंय, त्या सेल्फी ला तर लै उत आलाय. कुठं ते सेल्फी काढावं ते पण कळत नाही, पार टोकाला जाऊन ती सेल्फी घ्यायची.आणि ती सेल्फी मग येती दुसऱ्या दिवशी पेपरला. पेपरला बातमी तर अशी येती 'एका ट्रेकर चा गडाच्या कड्या वरून पडून मृत्यू' . ट्रेकर आणि हा? अशा लोक्काना ट्रेकर म्हणणं म्हणजे जे खरे ट्रेकर आहेत, ज्यांचं प्रेम आहे या सह्याद्रीवर त्यांचा तो अपमान आहे.
सुरक्षेच्या द्रुष्टीने कसलीही माहिती घेत नाही. कुठंही घुसा, कुठंही उड्या मारा. मग दुसरं काय होणार.अति तिथं माती होणारच. या मंडळी चा अतिउत्साह तर एवढा असतो की घराची वेस ओलांडली की यांना काय फेफरं भरतं,यांच्या अंगात काय संचारत तेच कळत नाय.काय करू काय नको याच्या नादात पार जीव गमावून बसतात. कुठं गाडीच्या टपावरच बस,बोनेट वरच बस, खिडकीतून बाहेर येऊन बोंबल. अरे बाबा मान्य आहे की तुला लै आनंद झालाय पण हे चाळे कशासाठी?
आणि ही सगळी सर्कस बघायची असेल तर शनिवार-रविवार लोणावळा , ताम्हिणी, खडकवासला कुठेही जा. जेवढे प्राणी एखाद्या प्राणी संग्रालय मध्ये नसतील तेवढे तर हिकडं बोंबलत फिरत असतात. पावसाळा म्हटलं की सगळ्यांनाच भिजावं वाटतं, त्याचा आनंद घ्यावा वाटतं. मस्त पावसात मित्र, फॅमिली सोबत भिजावं,कुठं एखादं गरम कणीस खावं. सगळ्यांनाच वाटतं असं. अहो पण आनंद व्यक्त करायची ही कसली अघोरी पद्धत.
हे सर्व पाहता,आणि लोक ज्या प्रकारे जीवाशी खेळ करून वर्षाविहार करतायत ते
पाहता जे काही अपघात होतायत ते जेवढे होऊ शकतात त्यापेक्षा कमीच होतायत,असं दिसतंय. कळस म्हणजे यांत फक्त तरुणाई नसून काही फॅमिली पण आहेत. भर घाटाच्या वळणावर, कडे कपारीत, रिस्की एज वर यांचं फोटो सेशन सुरु असतं.
हे सगळं सांगायचं कारण की अशा घटनांची झळ सगळ्यांनाच लागू लागलीय. ज्यांना या सह्याद्री च्या कवेत यायचंय त्यांना याची भीती वाटू लागलीय, पोरगं कुठं ट्रेक ला गेल्यावर घरी आई-वडील तो घरी येसतोवर त्याची काळजी करत बसलेले असतात, ज्यांना निसर्ग खुणावतोय ते त्यालाच घाबरू लागलेत, त्याच्यावर शंका घेऊ लागलेत.
अशी अजूनही भरपूर उदाहरण देता येतील,कारण आपल्या आजूबाजूला विकृतीच तेवढी वाढत चाललीय.होय ही विकृतीच आहे.एखादा अपघात झाला तर त्याला मदत करायची सोडून त्याची शूटिंग,फोटो काढणारी जमात आपण,तोंडं वाकडी करून करून आपण माकडा पासूनच जन्म घेतलाय हे वारंवार सांगणारी किती तरी लोकं आपल्या आसपास आहेत. फोटो किंवा शूटिंग काढण्याला माझा आक्षेप नाहीय आणि तो घ्यायचा माझा काही अधिकार पण नाहीय.तो प्रत्येकाचा खाजगी विषय आहे पण तो खाजगी विषय जेव्हा सार्वजनिक ठिकाणी विचित्र प्रकारे मांडला जातो खास करून आमच्या सह्याद्रीच्या गड किल्ल्यांवर तेव्हा त्याचा फटका त्या मंडळींना जागच्या जागेवर बसत असतो. मग आमच्या गड किल्ल्यांवर शंका घ्यायचं कारण नाही की अमुक गड असाय अमुक किल्ला बेकार आहे.
यांना पाहिलं त्याच्याशी गट्टी जमवावी लागेल मग त्याच्या अंगाखांद्यावर खेळू देईन तो.तुम्हाला पण माया लावल तो. तुम्ही डायरेकट् ओळख ना पाळख त्याच्या डोक्यावर बसून त्याला त्रास देऊ लागलात तर तो काय आपण तरी ते सहन करू का?
या सह्याद्रीशी इतक्या वर्षांची घष्ठन असून देखील आजही जेव्हा एखाद्या गड किल्ल्यावर जातो तिथं त्याची आदरयुक्त भीती ठेऊनच. त्याच्या धाकातच आम्ही वावरत असतो. त्याच्या कुशीत असताना वाऱ्याची झुळूक बनून तो आमचे लाड ही करतो तर कधी ढगांचा गडगडाट करून आम्हाला घाबरवतो पण.
हा सह्याद्री म्हणजे भोळा शंकर आहे. एखाद्यावर माया लावली की त्याची पुरेपूर काळजी घेणार, त्याला सर्वतोपरी जपणार पण त्याच्या मर्यादा ओलांडून जर कोणी त्याला आव्हान देत असेल तर सह्याद्रीचा तांडव झेलायची ताकत अजूनतरी कोणामध्ये आली असेल असं मला वाटत नाही.
हे सर्व लिहून माझीपण जवाबदारी संपत नाही आणि वाचून तुमचीपण संपणार नाही. एखाद्या गड किल्ल्यावरच नाही आपल्या सह्याद्रीत कुठेही, अशी पिऊन हुल्लडबाजी,धिंगाणा चालू असेल तिथं फक्त.. It's so cheap na..... असं म्हणून नाही भागणार आता.काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेन.
आपल्या राजांनी हे सगळे गड-किल्ले लढवले जगवले वाढवले, आपण निदान त्याचं पावित्र्य तरी राखूया की, काय म्हणता....!
प्रतिक्रिया
27 Jul 2017 - 8:26 pm | टर्मीनेटर
आपल्या राजांनी हे सगळे गड-किल्ले लढवले जगवले वाढवले, आपण निदान त्याचं पावित्र्य तरी राखूया की, काय म्हणता....!
ह्याच्याशि सहमत, आपल्या भावना पोचल्या. पण मध्ये मध्ये ग्रामीण किंवा बोलीभाषेची सरमिसळ खटकली.
27 Jul 2017 - 10:22 pm | विखि
भाषेची सरमिसळ झालीय, खरयं, पण, भावना पोचणं जास्त महत्वाचं होतं
28 Jul 2017 - 1:28 pm | सुचिता१
छान वाटली भाषा ... अगदि मनाला भिडणारी .. विषय तर महत्वाचा आहेच
28 Jul 2017 - 3:21 pm | विशुमित
भावना पोहचल्या..!!
भाषेची काळजी करू नका. मिपा आपलेच आहे. लिहीत राहा.
28 Jul 2017 - 4:05 pm | विशुमित
"""अरे बाबा मान्य आहे की तुला लै आनंद झालाय पण हे चाळे कशासाठी?""
हे लय भारी लिहलंय.
27 Jul 2017 - 8:50 pm | दशानन
हा सह्याद्री म्हणजे भोळा शंकर आहे. एखाद्यावर माया लावली की त्याची पुरेपूर काळजी घेणार, त्याला सर्वतोपरी जपणार पण त्याच्या मर्यादा ओलांडून जर कोणी त्याला आव्हान देत असेल तर सह्याद्रीचा तांडव झेलायची ताकत अजूनतरी कोणामध्ये आली असेल असं मला वाटत नाही.
प्रचंड सहमत.
27 Jul 2017 - 9:05 pm | दुर्गविहारी
खुप मनापासून आणि शंभर टक्के खर लिहिलय. सघ्या होत काय कि फेसबुकवर नाही तर व्हॉटस अॅपवर डि.पी. ठेवण्यासाठी कुठेतरी जायची टुम काढली जाते. या कुठेतरीला काहीही अर्थ नसतो. बर्याच ब्लॉगवर मी वाचतो," शुक्रवारी ट्रेक फायनल झाला आणि आम्ही निघालो", हे काय ट्रेकचे नियोजन आहे? सुदैवाने ईंटरनेटच्या माध्यमातून आधी गेलेल्यांचे अनुभव, गुगल अर्थ किवा विकीमॅपीयासारखी टूल्स उपलब्ध असताना ईतका गहाळपणा का?
लोकाना धड किल्ल्यांची नावे माहिती नसतात. सुधागडाला साधुगड? शिवाय सेल्फीछाप मंडळीचा निराळाच प्रॉब्लेम, त्यांना प्रत्येक जागेवर तोंड डुकरासारखे करून किंवा मुंगसासारखे करून मी ईथे गेलो होतो याचा पुरावा निर्माण करण्यातच रस. ना त्या जागेचे महत्व माहिती, ना धड निसर्गाचा आनंद. शिवाय पुरेशी माहिती नसलेले, केवळ रविवारच्या अल्पश्या श्रमात भरपुर कमावणारे भुछत्रासारखे उगवलेले ट्रेकिंग ग्रुप. मग अंधारबन ट्रेकला दोन जण वाहून गेले, धबधब्यात वडील, मुलगी वाहुन गेले अश्या बातम्या वाचायला मिळतात.
या प्रकारासाठी प्रसंगी खाजगी यंत्रणाची मदत घेउन मर्यादित पर्यटक सोडायला हवेत. हुल्लडबाजाना सरळ चोप दिला पाहिजे तरच हा प्रकार कमी होईल.
28 Jul 2017 - 3:23 pm | विशुमित
सेल्फीछाप मंडळीचा निराळाच प्रॉब्लेम, त्यांना प्रत्येक जागेवर तोंड डुकरासारखे करून किंवा मुंगसासारखे करून
अरररा .... लय च हनलंय..
27 Jul 2017 - 9:12 pm | चौथा कोनाडा
तसं म्हनलं तर अल्लड वयातच या सह्याद्रीचा नाद लागला. सध्याच्या भाषेत सांगायच तर ते addicted का काय ते म्हणतात ते. आणि या सह्याद्रीने पण खुल्या मनाने आम्हाला त्याच्या कवेत घेतलं. त्याच्या अंगाखांद्यावर खेळू दिलंं. माया लावली. थंडी-पावसाचं राहायला गुहा दिल्या,बिसलेरी झक मारल असं प्यायला पाणी दिलं. एवढं सगळं का तर आम्ही त्याला आमचं मानलय. त्याने पण कधीच आम्हाला हाडतुड केली नाय. एखादी माहेरवाशीन माहेरी गेल्यावर तिला जो आनंद मिळतो तोच आनंद या सह्याद्रीत आम्हाला मिळतो. आमच्या सारख्याचं माहेर च आहे हे. एखादा ट्रेक हुकला की तोंडं बारीक व्हायची आमची. लै काळजी आणि जीव लावला यानी आम्हा पोररांना. इतक्या वर्षात आमचा साधा पाय देखील या सह्याद्री ने कधी मुरगळू दिला नाही आणि आता अचानक इतक्या लोककांच्या जीवावर का रे उठला बाबा तू? जिकडे बघावं तिकडं कोणतरी मरतंय, जखमी होतंय. काय झालं नक्की याला? का कोपला एवढा रे तू? आम्हाला प्यायला बिसलेरी पेक्षा भारी पाणी देतोय आणि बाकी लोक्काना त्याच पाण्यात ढकलतो? असा फरक का रे बाबा?
पोटं-तिडकींनं लिहिलंय ! आवडलं !
वाईट परिस्थिती आहे. आज काल शनिवार-रविवार साप्ताहांत कुठं जायचं म्हंजे अंगावर काटा येतो. सेल्फिचा रोग झपाट्यानं पसरलाय, आणखी आणखी पसरत चाललाय. धोकादायक जागेतल्या सेल्फि साठी रू. एक लाख डिपॉझिट घेतले पाहिजेत, व रू. एक हजार प्रति-सेल्फि आकार लावला पाहिजे.
27 Jul 2017 - 9:26 pm | सतिश गावडे
कळकळीने लिहीलंय तुम्ही. मात्र फेसबुक आणि व्हात्सापवर सेल्फी लावण्यासाठी जे केवळ फोटो काढण्यासाठी निसर्गाला गृहीत धरतात त्यांना हे कधीच कळणार नाही.
पूर्वी पावसाळ्यात शनिवारी सकाळी ताम्हिणी घाटातून गावी जात असे आणि रविवारी संध्याकाळी पुण्यात परतत असे. मात्र आता रविवारी संध्याकाळी पुण्यात परतण्याचा पर्याय बंद झाला आहे.
जागोजागी वाहतुकीची कोंडी आणि कसलाही धरबंद नसलेल्या कमरेवरून अंतर्वस्त्र खाली घसरलेल्या पेताड लोकांच्यातून वाट काढत वेळेत पुण्यात पोचणे अवघड झाले आहे. शिवाय हे माजोरडे लोक रस्ता आपल्या पिताश्रीच्या मालकीचा असल्याप्रमाणे अक्षरशः नंगानाच घालत असतात रस्त्यावर. त्यामुळे यांना बाजूला करण्यासाठी हॉर्न वाजवणे हा पर्याय कामाचा नसतो.
27 Jul 2017 - 9:57 pm | नीलमोहर
' It's so cheap na..... असं म्हणून नाही भागणार आता.काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेन.'
- म्हणजे नेमकं काय आणि कुठे कुठे करायचं?
हे कुणी एक दोघे नसतात ज्यांना समजवावं, झुंडीने लोकं असे प्रकार करतात, कुणाकुणाला, किती रोखणार,
जिथे गेलो ते ठिकाण बघायचे, अनुभवायचे सोडून दंगा आणि धंगाणा करण्यात काही लोकांना कसली मौज वाटते खरंच कळत नाही.
अर्थात अशांसाठी अनुभव घेणं हा हेतू नसतोच, 'आता उरलो फक्त सेल्फीपुरता' हे आजचे वास्तव आहे.
वर दुर्गविहारी यांनी लिहीलेय त्याच्याशीही पूर्णपणे सहमत. आणि हे प्रकार फक्त सह्याद्री पुरते मर्यादित राहिले नाहीतय.
कुठल्याही पर्यटन स्थळी गेले की थोड्याफार फरकाने अशाच प्रकारचे अनुभव येतात. त्यामुळे अशा ठिकाणी जाणं नको अस होतं.
पांडवलेणी परिसरात, तिथल्या शिल्पांपुढे, त्यांना कव्हर करून उभे राहून सेल्फीज काढणारे लोक पाहून काय बोलावं सुचत नाही.
अनेक सुंदर निसर्गरम्य ठिकाणं लोकं कचरा करून खराब करू शकतात, हे पाहून मन विषण्ण होतं,
अशी अनेक ठिकाणे संपूर्ण भारतात असतील ज्यांची पर्यटनाने, पर्यटकांनी वाट लावून टाकलेली आहे.
त्यापेक्षा ही ठिकाणं अप्रसिध्द, अननोन राहिलेलीच बरी, ती व्यवस्थित टिकून तरी राहतील.
27 Jul 2017 - 9:58 pm | अभिजीत अवलिया
मनापासून लिहिलंय तुम्ही. पण ह्याच्यवर काहीही उपाय नाही.
मी आजच मुळशी / ताम्हिणी घाट इथे जाऊन आलो. गुरुवार असल्याने शक्यतो कुणी नसेल असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. जवळपास ५० एक दुचाकींवरून एक मोठा ग्रुप अंगातील शर्ट काढून, भयानक ओरडत चालला होता. घाटात अजून ३ मोठे ग्रुप दिसले जे गाडी रस्त्यात उभी करून पूर्ण रस्त्यात बोंबा मारत उघडे नाचत होते. कारमधून डोके बाहेर काढून पावसात भिज, टपावर बसून प्रवास कर, चालत्या दुचाकीवर मागे उभे राहून पुढच्याला शूटिंग करायला सांगणे हे ही प्रकार होतेच0.
गेल्या रविवारी पुरंदर किल्ल्यावर गेलो होतो. आता हा किल्ला आर्मिच्या ताब्यात दिला गेला आहे. आत जाणाऱ्या प्रत्येक गाडीची एंट्री करून मगच आत सोडली जात होती. गडावर कॅमेरावाला मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जायला आणि फोटो काढायला बंदी आहे. पार्किंगच्या ठिकाणी एक अर्मिवाला प्रत्येकाला कॅमेरावाला मोबाईल किंवा कॅमेरा जवळ घेऊन गडावर जाऊ नका अशा सूचना करत होता. तरी सुद्धा काही महाभाग लपवून मोबाईल वर घेऊन गेले आणि गडावर फोटो सेशन करत होतेच.
साक्षात आर्मिच्या नियमाला धाब्यावर बसवणारी ही लोक अन्य कुणाला भीक घालतील का?
27 Jul 2017 - 10:43 pm | विखि
ज्याला जी भाषा समजते त्याला त्या भाषेत समजावलं तर बराच फरक पडतो. अनुभवा वरुन सांगतोय. हा आता अर्थात सगळ्यानांच हे जमेल की नाही माहीत नाही. आपापल्या कुवती प्रमाने प्रत्येक जण काही ना काही भुमीका घेउ शकतो. हे पचणं अवघड आहे. पण बरेच जण ऐकतात, असा माझा तरी अनुभव आहे. परवाच
अंधारबन ला एक ग्रुप नेला होता, तिथं यशस्वी प्रयोग करुन झालाय.
27 Jul 2017 - 10:31 pm | इरसाल कार्टं
आपण किती उंचीवर वावरत याचे बऱ्याच जणांना भानच राहात नाही. उगीच पोरींसमोर चमकण्यासाठी स्टंट करणे ही तर सामान्य गोष्ट झालीय.
काही दिवसांपूर्वी आमच्या माहुली गडाच्या पायथ्याला असलेल्या धबधब्यात उंचावरून उडी मारताना एक तरुणाने आत्मघात करून घेतला. विशेष म्हणजे त्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला.
आजची तरुणाई मदत करण्या ऐवजी शूटिंग करण्यात धन्यता मानते हे तर त्याहून घातक.
27 Jul 2017 - 10:32 pm | इरसाल कार्टं
आपण किती उंचीवर वावरत याचे बऱ्याच जणांना भानच राहात नाही. उगीच पोरींसमोर चमकण्यासाठी स्टंट करणे ही तर सामान्य गोष्ट झालीय.
काही दिवसांपूर्वी आमच्या माहुली गडाच्या पायथ्याला असलेल्या धबधब्यात उंचावरून उडी मारताना एक तरुणाने आत्मघात करून घेतला. विशेष म्हणजे त्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला.
आजची तरुणाई मदत करण्या ऐवजी शूटिंग करण्यात धन्यता मानते हे तर त्याहून घातक.
27 Jul 2017 - 11:03 pm | विखि
या सेल्फी आणि दारु ने लै घोटाळा केलाय, मागच्या आठव्ड्यात एक माणुस मढे घाटात पडला होता, दारु तर घेतलीच होती, त्यात सेल्फी घेताना १५० फुट खाली पडलं, कळस म्हन्जे त्याच्या बरोबर च्या लोकाना माहीतही नाही तो पडलेला, माझ्याच ग्रुप च्या पोराने रेस्क्यु करुन काढला त्याला १६ तासा नंतर आणी त्याच्या बरोबरची मंडळी वेल्ह्यात घोरत होती.
हरीशच्न्द्रगड ला तर समोर एक पोरगं गेलं, पोहता येत न्हवतं तरी कुन्डात उतरलं होतं, त्याला वाचवता आलं नाय याचं अजुनही गिल्ट वाटतं. अशी कितितरी उदाहरण देता येइल. पोरं सगळं कॅज्युअली घेतात, त्यांना वाट्त गुगल करुन आलो म्हन्जे सगळ् झालं, आनि प्रत्यक्ष ट्रेक ला आल्यावर मग थरथरु लागतात, अशी परीस्थिती आहे.
28 Jul 2017 - 1:47 pm | नरेश माने
आजकल पावसाळी सहल किंवा ट्रेक्स करणे म्हणजे खरंच नकोसे वाटते. सेल्फी आणि दारूमुळे होणार्या अपघातांच्या एव्हढ्या बातम्या येतात तरीसुध्दा माणसे सुधारत नाहीत. आता तुम्ही जी पहिली बातमी दिली आहेत ती वर्तमानपत्रात वाचली तेव्हाच संशय आला होता. पण आता तुमच्यामुळे सत्यता सुध्दा कळली. अश्यावेळी खरंतर दारूच्या अंमलाखाली सदर व्यक्ती अपघातग्रस्त झाली असे स्पष्ट लिहावे म्हणजे तरी काही लोकांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा.
http://www.hindustantimes.com/pune-news/pune-man-falls-into-gorge-spends...
28 Jul 2017 - 2:06 am | सौन्दर्य
लेख लिहिण्यामागची तुमची कळकळ जाणवली. पण अजून एक करा. तुम्ही सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडला आहात तर तुम्हाला त्याचे खाचखळगे पूर्ण माहित असतील. कृपया अशी एखाद दोन ठिकाणं घ्या जिथे जास्तीतजास्त लोकं जातात, आणि मग त्या ठिकाणावरचे धोके काय आहेत ते लिहा (उदा.: टोकदार खडक किंवा दगड, नदीचे किंवा तलावाचे उथळ पात्र ज्यात उंचावरून उडी मारली तर धोका संभवतो, निसरडी वाट वगैरे). अति-उत्साहाच्या भरात तरुणाई काय काय करते हे आता आपल्या सर्वांना माहित आहे पण मग अश्याच तरुणाईसाठी काही मोलाच्या सूचना केल्यात तर काही प्राण वाचविण्याचे पुण्य आपल्याला लाभू शकेल. हे लिहिण्याचे कारण की आजपासून २५ वर्षांपूर्वी पावसाळ्यात लोहगड-विसापूरला ट्रेकिंगसाठी गेलो होतो त्यावेळी दुसर्या एका ग्रुपमधील काही 'हुशार' मंडळी नेहेमीची पायवाट सोडून डोंगर उतारावरून, निसरड्या मातीवरून वर चढण्याचा प्रयत्न करीत होती. भर पावसात माती मोकळी झाल्याने ते धड वर पोहोचू शकत नव्हते की खाली उतरू शकत नव्हते. शेवटी दिवेलागणीच्या वेळी फायरब्रिगेडच्या लोकांनी दोर टाकून त्यांना सुखरूप वर आणले. त्यावेळी सेल्फी नव्हते पण तरुणाईचा 'अति-उत्साह', 'मुलींवर इम्प्रेशन पाडणे' वगैरे स्वभाव वैशिष्ठ्ये कालातीत असतात असे मला वाटते.
28 Jul 2017 - 7:07 am | अत्रे
+१
एकंदरीत सेल्फीबहाद्दरांचा प्रश्न "सेल्फ सॉलव्हिंग" आहे (रेल्वेचे रूळ ओलांडून जाणाऱ्यांच्या प्रश्नाप्रमाणे).
28 Jul 2017 - 8:15 am | धर्मराजमुटके
आशयाशी सहमत पण प्रत्यक्षात असे होत नाही. धोक्याची पाटी पाहताच असे पब्लिक उलट जास्त चेकाळते. ठिकाणे धोकादायक नाहीत तर 'सेल्फी'श प्रवृत्ती धोकादायक आहे.
28 Jul 2017 - 3:30 pm | विशुमित
"येथे थुंकू नका " अशी पाटी दिसली की त्या पाटीवरच पच्च दिशी थुंकणारे महाभाग आहेत आपल्याकडे.
28 Jul 2017 - 3:53 pm | नितिन५८८
येथे थुंकू नका लिहिले कि तिथेच थुंकणार, हे वाचु नका लिहिले तर ते वाचणारच.
मग इथे सेल्फी काढा "आपोआप उद्याच्या पेपर मध्ये दिसेल" किंवा
इथे दरड कोसळण्याचा धोका नाही "थोडावेळ उभे राहून पहा " असा बोर्ड असावा.
28 Jul 2017 - 4:03 pm | विशुमित
मग अजून पुढे जाऊन सेल्फी काढणार. इथे उलटे लिहण्याचा फायदा होणार नाही.
28 Jul 2017 - 10:43 pm | सौन्दर्य
म्हंजी 'प्येंट वला हाए, हात लावू णये' आसं लिवलेलं दिसलं की आपुन हात लावून पातो, तसंच का ?
28 Jul 2017 - 7:11 am | यशोधरा
लेख आवडला. टुरिस्ट मनोवृत्ती कुठेही फिरायला गेलात तरी दुर्दैवाने असतेच आणि जाणवते.
28 Jul 2017 - 7:25 am | कंजूस
सह्याद्रीतली दरी कशी खोलखोल
खोलखोल
सह्याद्री
तू माझ्याशी गोर बोल
गोर बोल
28 Jul 2017 - 8:24 am | जेम्स वांड
अतिशय कळकळीने लिहिलेला लेख, सगळ्या मुद्द्यांवर सहमत आहे, फक्त ते ऐकत नसतील तर चोप देऊन सरळ करा प्रवृत्ती आमच्या प्रकृतीस मानवणारी नाही, त्याला एक आमची असहमती रुजू करतोय.
28 Jul 2017 - 9:15 am | एस
यामागे सर्वात जास्त कारणीभूत काही असेल तर तो आहे आपला निष्काळजीपणाचा स्वभाव. निसर्गाबद्दल, स्वच्छतेबद्दल, शांततेच्या इतरांच्या अधिकाराबद्दल, आपल्या एक सामाजिक प्राणी म्हणून असणाऱ्या कर्तव्यांबद्दल अजिबात काहीही देणेघेणे नसल्यासारखे आपण वागतो. दुसरे म्हणजे असे प्रकार एकटा-दुकटा असताना फारसे घडत नाहीत. ते घडतात गर्दीत असताना. कारण गर्दीला चेहरा नसतो. आणि गर्दीमध्ये मनुष्याच्या संस्कारांचे मुखवटे गळून पडतात.
ह्यावर आगाफी लहानपणापासूनच समाजात वागण्याचे एथिक्स आणि एटिकेट्स हे कटाक्षाने शिकवले गेले पाहिजेत आणि नियम तोडणाऱ्यांना कडक शिक्षा होते हे लोकांच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे.
28 Jul 2017 - 3:34 pm | विशुमित
"""लहानपणापासूनच समाजात वागण्याचे एथिक्स आणि एटिकेट्स हे कटाक्षाने शिकवले गेले पाहिजेत""
आज सकाळीच एस टी ने येत असताना माझ्यामनामध्ये हा विचार आला होता. गावातील शाळेमध्ये ८-१० वर्गासाठी " समाजात वागण्याचे एथिक्स आणि एटिकेट्स" या विषयावर वर गेस्ट लेक्चर देण्याचा मानस आहे.
28 Jul 2017 - 11:49 am | लोनली प्लॅनेट
" मानव हा सुशिक्षित प्राणी आहे हा त्याने केलेला दावा तोपर्यंतच खरा आहे जोपर्यंत अन्य कुण्या प्राण्याने तो केलेला नाही"
28 Jul 2017 - 12:03 pm | पाटीलभाऊ
सहमत...अशा लोकांना खरंच वठणीवर आणलं पाहिजे.
28 Jul 2017 - 1:39 pm | कंजूस
धोके सांगणारे काका कुणालाही आवडत नाहीत.
28 Jul 2017 - 3:46 pm | मनिमौ
पटलाय लेख. यात आपण स्वता काही लोकांना थांबवू शकत असलो तर ते जरूर करावे. मे बी दहापैकी एखादा तरी ऐकेल. बाकी लेखात म्हणल्याप्रमाणे खरोखरीच कंबरड्यात लाथ घालावी असे कितीक वेळा वाटते
28 Jul 2017 - 4:33 pm | arunjoshi123
असे नसणारे, आणि असे लोक नावडणारे लोकही खूप आहेत पाहून बरं वाटलं. नैतर हे लोक इतके आहेत कि अदबीने निसर्गाचा आनंद घेणारे लोक नाहीतच कि काय असा गैरसमज करून बसलेलो.
28 Jul 2017 - 4:43 pm | सचिन७३८
असाच एक समोर बघितलेला किस्सा टाकायचा आहे. निवांत टाकतो.
1 Aug 2017 - 11:30 am | विशुमित
आंबोली मध्ये मौज(?) मस्तीमुळे आणखी काही जणांचा अंत.
http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-amboli-chikhaldara-touris...