एस. एस. रामदास बोटीला या १७ जुलैला ७१ वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने घेतलेला हा आढावा. तूनळीवर याच घटनेवर मी एक लहान बायोग्राफी बनवले त्याची लिंक खाली देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=rGC2r-RawQU
हा लेख लिहिण्याचं प्रमुख कारण म्हणजे एस. एस. रामदास बोटीच्या दुर्घटनेबाबत अनेक लोकांना म्हणावी तेव्हडी फारशी माहिती नाही खास करून नव्या पिढीला. मीडिया सुद्धा थोड्या फार प्रमाणात याला कारणीभूत आहे. फालतू TRP घेणारे विडिओ तासंतास TV चॅनेलवर दाखवायला याना वेळ आहे, आजकाल मराठी चॅनेलसुद्धा हिंदी चॅनेलच्या पावलावर पाऊल ठेवायला लागले. असो, तर आपण वळू आपल्या एस एस रामदासकडे. लवकरच एक चित्रपट या घटनेवर येणार आहे असं ऐकलंय.
१७जुलै १९४७ आषाढी अमावासेचा तो दिवस होता. म्हणजेच आपली गटारी. गटारी म्हणजे या सणाला आपले लोक किती उत्साही असतात हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. तर अशा या उत्साही १००० प्रवाशांना घेऊन एस एस रामदास मुंबई ते रेवस अशा प्रवासाला निघाली होती. कोणीतरी शेख सुलेमान नावाचा इसम बोटीचा कॅप्टन होता. सिंदिया स्टीमशिप कंपनी मुंबई ते गोवा असा समुद्रप्रवास प्रवाशांना घडवून आणत असे. त्यासाठी त्यांच्याकडे ७-८ जहाजांचा ताफा होता. ही जहाजं त्यांनी इंडियन नेव्हीकडून दुसरं महायुद्ध संपल्यावर घेतली होती. मुळातच आकाराने ही जहाजं प्रचंड होती. त्यामुळे ही जहाजं कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ होती. एस एस रामदास ही त्यापैकीच एक. १९३६ साली बांधल्या गेलेल्या या अजस्त्र जहाजाचं वजन ४०६ टन होतं. कोकण किनारपट्ट्यावर प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या या तीन मजली जहाजामध्ये साधारण १२००-१५०० प्रवाशी वाहून नेण्याची प्रचंड क्षमता होती. रामदास बोटीच्या अवाढव्य आकारामुळे पाऊस असो व वादळी वारा, प्रवासी निर्धास्तपणे प्रवास करत असत. १७ जुलै १९४७ हा दिवस भारतीय जलवातुकीच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस ठरला. पावसाने सलग दोन दिवस मुंबई आणि कोकण किनारपट्टीला झोडपून काढलं होतं. त्या तसल्या वादळी वातावरणात रामदास भाऊंच्या धक्क्यावर रेवसला जाण्यासाठी उभी होती. रामदास बोटीची त्या वर्षीच नाविक अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली होती आणि बोट सुस्थित असण्याचे प्रमाणपत्रही तिला देण्यात आले होते. प्रचंड पाऊस आणि वादळ यामुळे बोट सोडावी कि नाही या विचार कप्तान विचार करत उभा होतं. बोटीवरचा झेंडा जोरजोराने पडफडात सांगत होता, आज जाऊ नका दिवस वैऱ्याच्या आहे. तसं पाहायला गेलं तर वातावरणाचा एकंदर रूप रंग पाहून बऱ्याच प्रवाशांनी आपला प्रवास रद्ध केला होता. पण काही नेहमीचे सराईत प्रवासी घरी जाण्यास आतुर झाले होते. त्यांनी कप्तानची समजूत काढली आणि अखेर १०.३०ला बोटीने नांगर उचलला आणि दीड तासाच्या प्रवासासाठी रेवसकडे मार्गस्थ झाली. साधारण पाऊण तास झाला असेल पावसाचा जोर अचानक वाढला, सोबतीला वारा वादळ धावून आले, रामदास हेलकावे खात लाटांना कपात काशाच्या खडकाजवळ आली. रेवसजवळ खोल समुद्रात एक बेट नैसर्गिकरित्या वर आलंय. चोहोबाजूनी अकळविक्राळ समुद्र आणि मधेच एखाद्या नववधूच्या कपाळावर टिकली शोभावी एवढं लहानसं हे बेट गल आयलंड म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. तर अशा या खडकाला डाव्या बाजूने ओलांडलं की १५-२० मिनिटात रेवस येणार होतं. परंतु एव्हाना अमावसेची उधाणाची भरती सुरु झाली होती आणि लाटांचे उंच तडाखे बोटीवर आदळू लागले होते. एका अजस्त्र लाटेच्या धडकेने बोट डाव्या बाजूला कलंडली. आता मात्र प्रवासी घाबरले. खालच्या डेकवरील प्रवासी वर आले आणि ज्याबाजूने लाटांचे तडाखे आदळत होते त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन उभे राहिले. सगळा भार एका बाजूला आल्यानं बोट एका बाजूला कलंडली. घाबरलेल्या कप्तानने बोट वळवली तेव्हड्यात एका महाकाय लाटेच्या तडाख्यात आदळून बोट उलटीपालटी झाली, बोटीवर हाहाकार उडाला.
याच दिवशी सकाळी ८.३० वाजता कोळ्यांची पाच गलबतं २,००० रुपयांची मासोळी घेऊन मुंबईकडून रेवसला येण्यास निघाले होते. रेवसवरून निघाल्यावर साधारण १५-२० मिनिटांनी त्यांना वातावरणात फरक दिसला. दर्या तुफान झाला होता. आकाशात एकाएकी काळेकुट्ट ढग येऊन अंधार पसरला होता. वादळाची चिन्हे दिसू लागली होती, त्यामुळे त्यांनी आपली गलबते पुन्हा रेवस बंदरात आणली, परंतु थोड्या वेळाने पुन्हा वातावरणात चमत्कारिकरित्या बदल झाला. सृष्टीने सौम्य रूप धारण केले. आता मुंबईस जाण्यास हरकत नाही असे समजून त्यांनी आपली गलबते पुन्हा समुद्रात हाकली. साधारण ३-४ मैल आले असतील नसतील तोच त्यांना एक भीषण दृश्य दिसलं. असंख्य माणसं पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असून अनेक प्रेत इकडे तिकडे विखरलेत असं विचित्र दृश्य त्यांना दिसलं. आपल्या जहाजावरची २,००० रुपयांची मासोळी समुद्रात फेकून त्यांनी ७५ जणांचा जीव वाचवला. या ७५ जणांना घेऊन ते पुन्हा रेवस बंदरात आले. रेवसच्या कस्टम अधिकाऱ्यांनी हि बातमी तारेने संबंधितांना कळवण्यासाठी अलिबागला धाव घेतली. लाईफ जॅकेट घेण्याचीही सवड न देता सागराने रामदास गिळंकृत केली होती. १००० प्रवाशांपैकी साधारण ६५० जणांना जलसमाधी मिळाली. २५० सुदैवी लोक या दुर्घटनेतून वाचले.काही पोहत तर काही फळकुटांचा आधार घेत. या बोटीतून प्रवास करणारे बहुतांश लोक कोकणातील असल्याने सगळी कोकणकिनारपट्टी हवालदिल झाली होती. येत्या १७जुलैला या दुर्घटनेस ७१ वर्ष पूर्ण होतील. कशाचा खडक आजही समुद्राच्या तळाशी असलेल्या रामदास बोटींसाठी अश्रू ढाळत उभा आहे.
प्रतिक्रिया
9 Jul 2017 - 12:59 pm | आदूबाळ
जबरदस्त!
बोटीचे तांत्रिक तपशील काय होते? दुर्घटनेत सापडलेल्या आणि वाचलेल्या लोकांनी काही आठवणी लिहिल्या आहेत का? अशा आणखी घटना घडल्या होत्या का?
10 Jul 2017 - 11:22 am | कल्पतरू
तपशील नाही मिळाले. 1927 साली तुकाराम आणि जयंती या दोन बोटी चक्रीवादळात सापडून बुडाल्या होत्या. पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही
9 Jul 2017 - 1:01 pm | प्रमोद देर्देकर
अतिशय दुःख द घटना मला वाटतं यानंतरच कोकणची बोट सेवा बंद झाली. एकदाच दाभोळ ते मुंबई प्रवास झालाय पण तेव्हा मी ६ महिन्याचा होतो.
9 Jul 2017 - 1:50 pm | अभ्या..
बापरे 650 लोक मृत पावले होते ह्या दुर्घटनेत?
मोठीच न्यूज त्याकाळची.
एका कादंबरीत हे उल्लेख वाचल्याचे पुसटसे आठवते.
9 Jul 2017 - 5:59 pm | एस
एस एस रामदास या बोटीचा अपघात विचित्र म्हणावा इतका अनपेक्षित होता त्या काळी. या घटनेला जनसामान्यांच्या विस्मृतीतून पुन्हा वर खेचून काढल्याबद्दल आभारी आहे.
9 Jul 2017 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
या अपघाताची माहिती मोठ्या माणसांच्या चर्चेत लहाणपणी अनेक वर्षे ऐकलेली आठवते आहे. त्यानंतर जलप्रवास टाळण्याकडेच लोकांचा भर राहीला. एस्टीचा प्रवास किती त्रासाचा असेना व किती वेळखाऊ असेना, त्याचे महत्व वाढले.
9 Jul 2017 - 9:46 pm | उदय ४२
त्या 250 वाचलेल्यांपैकी कुणी जिवंत असेल काय? काही संपर्क होईल काय?
10 Jul 2017 - 11:25 am | कल्पतरू
‘दर्यावर्दी’च्या ऑ गस्ट 1947च्या अंकामध्ये रामदास बोटीच्या दुर्घटनेतून वाचलेल्या विश्वनाथ कदम या 16 वर्षे वय असलेल्या मुलाची विस्तृत मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यात त्याने रामदास बोटीचा अपघात नेमका कसा घडला व तो त्यातून वाचून स्वत:च पोहत किना-याला कसा लागला याची अंगावर काटा आणणारी कथा आहे. मला मिळाली तर ती पण सविस्तर इथे पोस्ट करेन
10 Jul 2017 - 3:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
(युट्युबवरून साभार)
12 Jul 2017 - 10:48 pm | जुइ
युट्युबची लिंक दिल्या बद्द्ल धन्यवाद!
9 Jul 2017 - 11:28 pm | सुबोध खरे
आमची आई याच बोटीने प्रवास करणार होती मुंबई ते रेवस आणि मग पुढे नागावला.
परंतु आजीने तो दिवस अमावास्येचा म्हणून आदल्या दिवशी जाण्याचे ठरवले आणि आदल्या दिवशी पण खवळलेल्या समुद्रातून त्या दोघी रेवसला पोहोचल्या. दुसऱ्या दिवशी रामदास बोट बुडाली म्हणून आमच्या रेवदांड्याच्या मावशीने मुंबईच्या मावशीला ट्रंक कॉल केला परंतु आई आणि आपली धाकटी बहीण आदल्या दिवशीच सुखरूप पोहोचली हे पाहून सुस्कारा सोडला.
10 Jul 2017 - 3:29 am | रुपी
फारच दु:खद घटना.. वाचता वाचता अंगावर काटा आला!
या लेखासाठी आणि व्हिडिओच्या लिंकसाठी धन्यवाद.
10 Jul 2017 - 6:19 am | कंजूस
त्या दहएकवर्षांत चारही बोटी बुडाल्या अथवा बंद झाल्या. पुढे कोणी ही सेवा वर्षभर देण्यास पुढे आले नाही. आताच्या लाँच पावसाळ्यात बंद ठेवतात. फक्त नेव्हीची कर्मचाय्रांची उरण ते गेटवे चालू असते॥ तिसरा बावटा लागेल त्या दिवशी बंद असते॥
लेखाबद्दल धन्यवाद. त्यावेळचे पेपर असतील मुंबई मराठी ग्रंथालयात.
10 Jul 2017 - 10:48 am | इरसाल
२ तारखेलाच रेवस ते उरण आणी करंजा ते भाउचा धक्का असा प्रवास केला.
10 Jul 2017 - 11:04 am | प्रीत-मोहर
सुरेख!!
10 Jul 2017 - 11:31 am | प्राजक्ताके
ह्या बोटीवर माझे आजोबा प्रवास करत होते, त्यांनी बोट बुडायच्या आधीच उडी मारली. पोहता येत होते हा मेजर प्लस पॉइंट. नंतर त्यांना एका बोटीने वर उचलले.
आई सांगते त्यांची बहीण पण असणार होती बरोबर, ऐन वेळी तिचे कँसल झाले, नाहितर तिला सोडून त्यांना उडी नसती मारता आली.
10 Jul 2017 - 3:07 pm | पद्मावति
बापरे, फारच दुख:द घटना. याविषयी माहिती नव्हती मला. लेखासाठी आणि व्हिडिओसाठी धन्यवाद.
10 Jul 2017 - 4:00 pm | दीपक११७७
दुख:द घटना............
माहीती बद्दल धन्यवाद.
11 Jul 2017 - 2:19 am | सौन्दर्य
खरंच दु:खाची गोष्ट.
11 Jul 2017 - 5:17 pm | अभय म्हात्रे
खाशाबा जाधव कादंबरीत उल्लेख आहे .
12 Jul 2017 - 10:40 pm | जुइ
बापरे अतीशय दु:खद घटना. काटा आला वाचताना. ही माहिती दिल्या बद्द्ल आभारी आहे.
13 Jul 2017 - 4:16 pm | सचिन काळे
फारच दुःखद घटना!!
13 Jul 2017 - 10:25 pm | निशाचर
विस्मरणात गेलेल्या घटनेविषयी लिहिल्याबद्दल धन्यवाद! एक छोटीशी दुरुस्ती सुचवाविशी वाटते.
७१ ऐवजी ७० वर्षे असा उल्लेख हवा.
तुकाराम, जयंती आणि रामदास या बोटींबद्दल लहानपणी आजोबांकडून ऐकलं होतं. मुंबईहून दाभोळला निघालेल्या जयंती बोटीवरील लोकांचा काहीही पत्ता लागला नव्हता. दापोली-दाभोळ पट्ट्यात जयंतीविषयी जुन्या लोकांकडून ऐकायला मिळत असे.
हा लेख वाचल्यानंतर थोडा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रामदास बोटीचा अपघात हा जगातील मोठ्या वीस कि पंचवीस सागरी अपघातांपैकी एक आहे. (चू.भू.द्या.घ्या.) परंतु आंतरजालावर विशेष माहिती मिळाली नाही. मग जालावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वृत्तपत्रांत शोधलं. (बरीच जुनी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रे, नियतकालिके वगैरे इथे नि:शुल्क उपलब्ध आहेत, लॉगिन करावं लागत नाही. नॅशनल लायब्ररी ऑफ ऑस्ट्रेलिया ची Trove नावाची ही साइट आहे.) तिथे असलेल्या बातम्यांपैकी काही बातम्यांचे दुवे:
19 Jul 1947 - 650 PERSONS DROWNED WHEN SHIP SANK - Trove
19 Jul 1947 - 669 Die In Ship Disaster - Trove
21 Jul 1947 - Wreck of Ramdas - Trove
20 Jul 1947 - Crew "Drowned Like Rats" - Trove
या बातम्यांनुसार Indian Co-operative Navigation and Trading Co. च्या मालकीच्या सहा मुंबई-रेवस फेरीबोटींमध्ये रामदास ही सगळ्यांत मोठी होती. ही twin-screw (दोन propeller असलेली) steamer १९३६ साली बांधण्यात आली होती. तिसर्या, २१ जुलैच्या बातमीनुसार मालक कंपनीचं म्हणणं होतं की बोटीवर रेडिओ असता तर एवढी जीवितहानी झाली नसती आणि त्यांनी सरकारकडे रेडिओचं लायसन्स अनेकदा मागितलं होतं. परंतु तेव्हा सुरू असलेली प्राथमिक चौकशी करणार्या अधिकार्याचं मत होतं की अत्यंत कमी वेळात बोट बुडाल्याने रेडिओ असता तरी विशेष फायदा झाला नसता.
शेवटच्या बातमीत कर्मचार्यांपैकी एकाचा विषण्ण करणारा अनुभव आहे. त्याच्या म्हणण्यानुसार life boats उतरविण्याइतकाही वेळ मिळाला नाही. या बातमीत १९२७ साली तुकाराम आणि जयंती बोटी एकमेकांवर आदळल्याचा उल्लेख आहे.
तुकाराम आणि जयंती बोटींच्याही काही बातम्या सापडल्या.
launch of Jayanti: 09 Jan 1920 - BRITISH AND FOREIGN MEMS. - Trove इथे जयंती बांधून पूर्ण होण्याआधी तिच्यावर चाललेल्या एका कोर्ट केसची बातमी आहे. (या बातमीचा अपघाताशी अर्थातच संबंध नाही.)
12 Jan 1928 - STEAMERS FOUNDER - Trove या बातमीनुसार काही प्रवाश्यांनी आणि कर्मचार्यांनी दोन तास प्रयत्न करूनही life boats पाण्यात सोडता आल्या नव्हत्या. मरिन कोर्ट याची चौकशी करत होते.
Jayanti: 18 Feb 1928 - MISSING STEAMER - Trove इथे जयंतीबद्दल विस्तृत बातमी आहे. चार दिवस शोध घेऊनही जयंतीचे काहीही अवशेष सापडले नव्हते. बोटीवर ५१ प्रवासी आणि ४५ कर्मचारी होते. बोटीचा दाभोळआधी हर्णैलाही थांबा होता. जयंती शेवटची हर्णै बंदराबाहेर दिसली. हर्णै हे दाभोळहून फार दूर नाही. मुंबई ते हर्णै हा एकूण प्रवासाच्या साधारण ८० टक्के प्रवास झाला होता. पण वादळी वार्यांमुळे हर्णैला नांगर टाकता आला नाही आणि बोटीला परत मुंबईकडे वळविण्यात आले. चक्रीवादळाचं केंद्र मुरुड-जंजिर्यापाशी होतं आणि मुंबईकडे जाण्यासाठी जयंती दुर्दैवाने त्याच दिशेला गेली असणार!
जुन्या भारतीय आणि ब्रिटिश वृत्तपत्रांत या अपघातांविषयी आणखी माहिती मिळू शकेल असं वाटतं. शिवाय या बातम्यांतील उल्लेखांनुसार ज्या चौकश्या करण्यात आल्या त्यांचीही माहिती सरकार दफ्तरी असायला हवी.
16 Jul 2017 - 5:32 pm | अभिजीत अवलिया
हे पहिल्यांदाच वाचले. खूप दु:खद घटना आहे.