मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग ४

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
9 Jul 2017 - 6:43 pm

मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग ४

भाग १ ------ http://www.misalpav.com/node/40043
भाग २ ------ http://www.misalpav.com/node/40076
भाग ३ ----- http://www.misalpav.com/node/40095

गाईडने सांगीतलेली हि माहिती ऐकुन मयुरा , नेहा आणी राधा या तिघीही थरारुन गेल्या . तरीही नेहाने शंका विचारली .

"पण इथे असं रात्री अचानक कोण येतं हे या मयुरखेडा गावातल्या लोकांनी कधी जाणुन घेण्याचा प्रयत्न केला नाही का ? "

" इथले गावकरी राणी शरावतीला , आणी या महालाला खुप आदरणीय मानतात . ज्यामुळे रानी शरावतीचा कोप होइल अशी कुठलीही कृती ते टाळतात . त्यामुळेच गावकरी इथे रात्री फिरकत नाहीत . तसंच बाहेरील पर्यटकांपासुनही हि जागा अज्ञात ठेवण्यात आली आहे . "

मयुरा , नेहा आणी राधा यांना अजुनही काही प्रश्न त्या गाईडला विचारायचे होते , कारण हि सगळी कथा आणी या कथेचे आजच्या काळाशीही असलेले संदर्भ खुपच चमत्कारीक होते . पण तेवढ्यात अचानक त्यांना दुरवरुन रेल्वेच्या शिट्टीचा आवाज ऐकु आला . दचकुन त्यांनी हातातल्या घड्याळाकडे पाहिले . रात्रीचे साडे अकरा वाजले होते . बघता बघता वेळ कसा गेला हे त्यांना समजलेच नव्हते . स्टेशनमास्तरांनी त्यांना त्यांची परतीची ट्रेन साडेअकरा वाजे पर्यंत येईल असेच सांगीतले होते .

"बहुतेक आपली ट्रेन आलेली दिसतीय . स्टेशनमास्तरांनी साडेअकराचीच वेळ दिली होती . चला लवकर . नाहितर आपली ट्रेन चुकेल . "

असं बडबडत नेहा आणी राधा घाईघाईने तिथुन निघु लागल्या . मयुराचा पाय मात्र त्या अदभुत जागेतुन अजुन निघत नव्हता . तिला अजुन बरेच प्रश्न त्या गाईडला विचारायचे होते . "रानीमां म्हणजेच रानी शरावती का ? " , " काहिही करुन आपल्याला हे मयुरनृत्य बघायला मिळेल का ?" असे प्रश्न तिला पडले होते . नेहा आणी राधाने तिला जवळ जवळ ढकलतच टेकडीवरुन खाली आणले . तेव्हा कुठे ती त्या महालाच्या जादुमधुन भानावर आली .

टेकडीच्या पायथ्याशी सुखीची ऑटो उभीच होती . या तीन पाहुण्यांना यायला उशीर होतो आहे हे पाहुन सुखीची जागच्या जागी चुळबुळ चालु होती . तिघी येउन ऑटोमधे बसताच त्याने भरधाव वेगाने स्टेशनकडे ऑटो न्यायला सुरुवात केली .

मयुरा अजुनही मनामधे रानी शरावतीची ऐकलेली विलक्षण कथा , रानीचा तो भव्य संगमरवरी महाल , आणी एक लोककाव्य बनलेले रानीचे ते जादुमय मयुरनृत्य यांचाच विचार करत होती . तिला आपल्या मनातले प्रश्न अजुनही सतावत होते . त्या प्रश्नांची उत्तरे त्या महालाशीच निगडीत आहेत , कदाचीत त्या गाइडला माहिती असावीत असेच तिला परत परत वाटत होते .

मयुरा स्वता नृत्यविशारद होती . अनेक नावाजलेल्या गुरुंकडुन तिने नॄत्याचे प्रशिक्षण घेतले होते . अनेक मान्यवर नर्तकांना तिने मयुरनृत्य सादर करताना पाहिले होते . तिनेही काहिवेळा कलासमारंभांमधे मयुरनृत्य सादर केले होते . या गुरुंकडुन , मान्यवरांकडुन तिने अनेकदा या विलक्षण नृत्याबद्दल खुप ऐकले होते . म्हणुनच तिला आज हि सर्व अदभुत कथा ऐकल्यावर त्या महालामधे जाउन ते जादुमय मयुरनृत्य प्रत्यक्ष बघायची ओढ लागली होती .

ती टेकडी , रानी शरावतीका महल अजुनही फार लांब गेला नव्हता . मयुराला ऑटोमधुनही तिच्या बाजुने तो महल स्पष्ट दिसत होता . ऑटोमधे राधा आणी नेहा यांची मात्र बडबड चालु झाली होती . मयुरा शांतपणाने त्यांचे बोलणे ऐकत होती .

" त्या गाईडने काय चमत्कारीक कथा सांगितली . बाकी तो गाईड चांगलाच रुबाबदार दिसत होता . जणु काही एखाद्या राजघराण्यातलाच असावा . "

"हो ना.. अगदी राजवंशातला वाटत होता . आणी त्याने त्या सापावर किती चपळाईने झडप घातली . अगदी एखाद्या मोरा प्रमाणे ... "

"खरंच की ..आणी तो आज त्या महालापाशी कशाला आला होता ? त्यात आजतर पौर्णिमा आहे .. म्हणुनच बाहेर चंद्र प्रकाश एवढा लक्ख आहे ."

त्यांचे हे बोलणे ऐकुन मयुराने चमकुन बाहेर त्या महालाकडे पाहिले . रात्र असुनही तो महाल चांगलाच उजळला होता . महालाच्या जाळीदार संगमरवरी भिंतींमधुन , गवाक्षामधुन आत कुणाचीतरी हालचाल जाणवत होती . त्या आतमधे असलेल्या अज्ञात अस्तित्वाची सावली महालाच्या भिंतींवर पडली होती . बघता बघता ती सावली अचानक एखाद्या पारंगत नर्तकाप्रमाणे डौलदारपणे फेरे , आवर्तने घेउ लागली .

मयुरा डोळे फाड फाडुन हा प्रकार पाहात होती . तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता . पौर्णिमेच्या रात्री रानी शरावतीका महलमधे मयुरनृत्याला सुरुवात झाली होती . का तो केवळ एक तिच्या मनाचा भास होता ?

बघता बघता ती टेकडी , तो महाल मागे पडला . काहितरी बोलायचे म्हणुन मयुरा राधा आणी नेहा यांना म्हणाली .

"त्या गाईडने माझे प्राण वाचवले . आपल्याला रानी शरावतीका महलची एवढी सुंदर माहिती दिली . आपण मात्र त्याला काहिच फी दिली नाही . तसेच घाईघाईने निघुन आलो ."

"तुला खुप काळजी आहे त्या गाईडची ? पिया तोसे नैना लागे रें .." राधाने मयुराची फिरकी घ्यायला सुरुवात केली . नेहानेही तिला साथ दिली .

"नाहीतर काय ? तो गाईड आहेच तसा ... आज फिर जीनेकी तमन्ना है .... तेरे मेरे सपने .. अब एक रंग है .. " मयुरा काहिच बोलली नाही . तिचे मन मात्र अजुन त्याच त्याच विचारांमधे अडकले होते .

काहि वेळातच ऑटो स्टेशनपाशी आली . ऑटोमधुन उतरुन तिघीही गडबडीने स्टेशनमधे जाउ लागल्या . दारापाशीच उभ्या असलेल्या स्टेशनमास्तरांनी त्यांना खुणेनेच थांबवले . फलाटावर उभ्या असलेल्या एका मालगाडीकडे हात दाखवत ते म्हणाले .

"तुम्ही काळजी करु नका . तुमची ट्रेन अजुनही आलेली नाही . ती अजुन निदान पाउण तास तरी लेट आहे . तुम्ही बहुतेक इथुन निघतच असलेल्या या मालगाडीची शिट्टी ऐकुन आलात वाटतं . पण आता आलाच आहात तर बसुन घ्या . बाकी कशी झाली तुमची रानी शरावतीका महल ची सफर ? मजा आली नां ? "

"हो . आमचा वेळ खुप चांगला गेला . " नेहा आणी राधा पटकन म्हणाल्या .

आपल्या ट्रेनला अजुनही पाउण तास तरी वेळ आहे हे ऐकल्यावर मयुराचे विचारचक्र जोरात फिरु लागले . तीला समोरच ती टेकडी अंधुक दिसत होती . स्टेशनपासुनच रुळांच्या कडेकडेने एक अरुंद पायवाट जात होती . दुर पाहिले तर ती वाट त्या टेकडीच्या जवळच जात होती . मयुरा विचार करु लागली .

"आपण जर या वाटेने धावत त्या टेकडीवर जाउन आलो तर पाउण तासांत नक्कीच परत येउ . आपलीही त्या महालामधे जाउन ते जादुमय मयुरनृत्य प्रत्यक्ष बघायची इच्छा पुर्ण होईल ."

तिचं मन परत रानी शरावतीका महलच्या जादुमधे गुंतुन गेले . आपला विचार पक्का होताच मयुरा नेहा आणी राधा यांना म्हणाली .

"तुम्ही दोघी इथेच थांबा . मी या पायवाटेवरुन धावत त्या टेकडीवर जाउन त्या गाईडला त्याची फी देउन येते . "

आणी क्षणार्धात मयुरा त्या पायवाटेवरुन टेकडीच्या , रानी शरावतीका महलच्या दिशेने धावु लागली . नेहा आणी राधा तिच्याकडे आ वासुन बघत राहिल्या . पण तो पर्यंत मयुरा खुप पुढे जाउन दिसेनाशी झाली होती . स्टेशनमास्तर हा सर्व प्रकार बघत होते . नेहा आणी राधा यांचे कावरे बावरे झालेले चेहरे पाहुन त्यांनी सुखीला बोलावले . त्याला परत ऑटोने टेकडीपाशी जाउन मयुराला सुखरुप परत घेउन येण्याबद्दल बजावले . सुखी त्वरेने ऑटो घेउन निघाला .

स्टेशनमास्तर नेहा आणी राधा यांना धीर देण्यासाठी म्हणाले .

"तुम्ही काही काळजी करु नका . सुखी मयुराताईंना लवकरच परत घेउन येईल . मयुराताई , प्रकाशजी यांच्या कुटुंबाला गावातील सगळेजण खुप मानतात . यांच्या पुर्वजांनी रानी शरावतीचे रक्षण करताना आपल्या प्राणांचे बलिदान केले होते . या कुटुंबावर रानीमांचा आशीर्वाद आहे. त्यामुळेच यांच्या कुटुंबातील सगळेच खुप शुर आणी कलेमधे निपुण असतात . हेच बघाना , प्रकाशजी , त्यांचे बंधु यांनी सैन्यात नाव कमावले . तर मयुराताई या नृत्यकलेमधे पारंगत आहेत . "

मयुरा त्या पायवाटेवरुन अथक धावत होती . लांबुन साधी वाटणारी ती पायवाट प्रत्यक्षात खड्ड्यांनी , काट्याकुट्यांनी भरलेली होती . अनेकदा मयुरा त्या वाटेमधे अडखळुन पडली . काटेरी झुडुपांमधे अडकली . पण क्षणार्धात उठुन ती परत धावु लागली . तिला डोळ्यासमोर फक्त दिसत होता तो रानी शरावतीका महल , रानी शरावतीचे मयुरनृत्य आणी त्या महालामधे मयुरनृत्य सादर करताना स्वताच मयुरामधे रुपांतरीत होणारी रानी शरावती .

बघता बघता ती टेकडीपाशी आली. भराभर टेकडीच्या पाय-या चढुन अखेर ती रानी शरावतीका महलच्या प्रवेशद्वाराशी आली . तिला आता काही वेळातच तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा वाटु लागली . ती आता महालामधे प्रवेश करणार , तेवढ्यात इतका वेळ धावुन दमलेल्या तिच्या पायांनी शरणागती पत्करली . महालाच्या प्रवेशद्वारापाशीच मयुरा दमुन खाली पडली . खरोखरच ती दमली होती का कुण्या अज्ञात शक्तीने तिला आत जाण्यापासुन रोखले होते .

एक दोन क्षणांमधेच मयुरा सावरुन परत उभी राहिली . पण ते एक दोन क्षणच त्या क्षणी रानी शरावतीका महलमधे असलेल्या अस्तित्वाला सावध करायला पुरेसे होते . पाहता पाहता एक सावली त्या महालाच्या भिंतींवरुन सरकत सरकत अद्रुश्य झाली .

अनेक अपेक्षा घेउन मयुराने त्या महालामधे उत्सुकतेने प्रवेश केला . पण आतमधे कोणीच नव्हते . चंद्रपकाशात उजळुन निघालेला तो महाल पुर्ण रिकामा होता . काहि वेळापुर्वी त्यांना भेटलेला तो गाईड कुठेच दिसत नव्हता . तिचे प्रश्न तसेच अनुत्तरीत राहिले होते . तिच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तिथे कोणीही नव्हते .

महालातील संगमरवरी फरशीवर एक हिरवेगार मोरपीस तेवढे अलगद विखरुन पडलेले होते .

------------------------------------------------ समाप्त ------------ काल्पनीक --------

कथालेख

प्रतिक्रिया

कथा अनेक प्रश्न अनुत्तरित ठेऊन संपली. मला वाटतं की अजून एक भाग होऊ शकला असता. असो. कथा आवडली.

सुचिता१'s picture

9 Jul 2017 - 11:34 pm | सुचिता१

कथा अपूर्ण वाटतेय ; पूर्ण करा ही विनंती.असे प्रश्न अर्धवट ठेउन , समाप्त का केली,?

ज्योति अळवणी's picture

9 Jul 2017 - 11:58 pm | ज्योति अळवणी

अजून एक भाग हवाच. अजून थोफी खुलवता येईल कथा. पुढचा भाग लिहाचं

वरच्या प्रतिसादांशी सहमत. आधीचे भाग वाचून उत्सुकता वाढली होती, अशी अचानक समाप्त झाल्याने विरस झाला.

अनेक अपेक्षा घेउन मयुराने त्या महालामधे उत्सुकतेने प्रवेश केला . पण आतमधे कोणीच नव्हते . चंद्रपकाशात उजळुन निघालेला तो महाल पुर्ण रिकामा होता . काहि वेळापुर्वी त्यांना भेटलेला तो गाईड कुठेच दिसत नव्हता . तिचे प्रश्न तसेच अनुत्तरीत राहिले होते . तिच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तिथे कोणीही नव्हते .

असंच जरा वाटत आहे कथेच्या बाबतीत.

आनन्दा's picture

11 Jul 2017 - 9:52 pm | आनन्दा

anticlimax..

सिरुसेरि's picture

14 Jul 2017 - 1:54 pm | सिरुसेरि

आपणा सर्वांचे अभिप्राय व सुचनांबद्दल आभार .

प्रीत-मोहर's picture

14 Jul 2017 - 2:18 pm | प्रीत-मोहर

मलाही अपुर्णच वाटतेय, प्लीज अजून एक भाग लिहाना पुढचा