भारतासाठी एक अभिमानास्पद गोष्ट! "भारतासाठी अभिमानास्पद" असे मुद्दाम लिहिले आहे. कारण आज डॉ अब्दुल कलाम हयात असते तर त्यांना त्यांच्या अनेक सन्मानांसारखेच या सन्मानाचेही फारसे अप्रूप वाटले नसते. परंतु, त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारलेल्या माझ्यासारख्या चाहत्याला या क्षणी अवर्णनीय आनंद झाला नसता तरच आश्चर्य!
असामान्य शास्त्रज्ञांचा सन्मान, शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टीचे नामकरण त्यांचे नाव वापरून करण्याचा प्रघात आहे. ते कधी एखाद्या जैविक प्रजातीचे नाव, तर कधी एखाद्या ग्रह/तारा/खगोलशास्त्रीय समूहाचे नाव, तर कधी एखाद्या परिमाण/नियम/संकल्पनेचे नाव, इत्यादी असते. असे करण्याने, जेव्हा जेव्हा त्या संज्ञेचा उपयोग केला जातो, तेव्हा तेव्हा त्या शास्त्रज्ञाचे नाव घेतले जाते आणि सहजच त्याची आठवण होत राहते. या अशा पायंड्यामुळे, अर्थातच, जोपर्यंत या जगात आधुनिक शास्त्र अस्तित्त्वात आहे तोपर्यंत शास्त्रज्ञ अजरामर होतो. हे लक्षात घेतले तर हा सन्मान साधा नाही, हे ध्यानात येईल.
"आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (International Space Station उर्फ ISS)" नावाची अवकाशप्रयोगशाळा यूएसए, रशिया, युरोप, जपान आणि कॅनडा यांच्या प्रमुख सहभागाने सुरू असलेला प्रकल्प आहे. सुमारे ४०० किलोमीटर (३३० ते ४३५ किमी) अंतरावरून ती दर दिवशी १५.५४ पृथ्वीप्रदक्षिणा करते. जीवशास्त्र, मानवी शरीरशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, पृथ्वीवर शक्य नसलेले अवकाशसंशोधन, चंद्र-मंगळस्वार्यांसाठी आवश्यक असणारे संशोधन, इत्यादी असंख्य विषयांवरचे संशोधन तिच्यावर केले जाते.
या स्थानकावर अनेक सूक्ष्म जीव (जिवाणू , विषाणू, बुरशी, इ) वस्ती करून आहेत. स्थानकावरील शास्त्रज्ञ आणि त्यांची उपकरणे यांना या जीवांचा उपद्रव होऊ नये यासाठी खास सुरक्षा व्यवस्था आहे. नासामधील आंतरग्रह प्रवासाच्या संशोधनाचे कार्य करणार्या Jet Propulsion Laboratory (JPL) कडे या व्यवस्थेची जबाबदारी आहे. स्थानकावरचे वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्या HEPA (High-Efficiency Particulate Arrestance) फिल्टर्समध्ये या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना एक नवीन जीवाणू सापडला. शोधाअंती असे दिसून आले की हा जीवाणू केवळ अवकाशस्थानकावरच अस्तित्त्वात असून, तो पृथ्वीवर आढळत नाही.
अशा या वैशिष्ट्यपूर्ण जीवाणूचे, डॉ कलाम यांच्या सन्मानार्थ "Solibacillus kalamii" असे नामकरण केले गेले आहे.
माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम
डॉ कलाम यांना दिलेला हा सन्मान, एका शास्त्रज्ञालाच नव्हे तर एका असामान्य अजातशत्रू व्यक्तिमत्वाला (not only a scientist, but a great human being, loved by all) शास्त्रीय जगताने केलेला मानाचा मुजरा आहे.
एक जागतिक कीर्तीचे अवकाश शास्त्रज्ञ (aerospace scientist) असलेल्या डॉ कलाम यांनी १९६३ साली नासामध्ये आपल्या विषयातले प्रशिक्षण घेतले होते. तेथून परतल्यावर त्यांनी केरळमधील थुंबा येथे भारताची पहिली अग्निबाण प्रक्षेपक सुविधा (rocket launching facility) निर्माण केली... आणि नंतर घडलेला इतिहास जगप्रसिद्ध आहेच !
भारतीयांसाठी अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे या जीवाणूचे अस्तित्त्व सिद्ध करण्यात JPL मधिल डॉ कस्तुरी वेंकटेश्वरम या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचा मोलाचा हात आहे व त्यांनी हे संशोधन नुकतेच International Journal of Systematic and Evolutionary Microbiology या जगन्मान्य जर्नलमध्ये प्रसिद्ध केले आहे.
या निमित्ताने डॉ कलाम यांना माझा मानाचा मुजरा !!!
प्रतिक्रिया
24 May 2017 - 1:05 am | मोदक
__/\__
24 May 2017 - 9:31 pm | राघवेंद्र
+१
24 May 2017 - 1:31 am | टवाळ कार्टा
_/\_
24 May 2017 - 6:09 am | अत्रे
नासाच्या नावावर भारतात बऱ्याच खोट्या बातम्या खपतात. ही पण बातमी तशीच आहे का काय हे बघण्यासाठी गुगलला सर्च मारला.
मूळ संशोधनाची लिंक
https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/28475026
म्हणजे बातमी खरी आहे :)
24 May 2017 - 11:06 am | अभ्या..
नासाच्या खोट्या अफवा चेक करण्याएवजी धागालेखक तरि पाहायचा.
म्हात्रेकाका आहेत ते, व्हाट्सप फॉरवर्ड वाले नाहीत. ;)
24 May 2017 - 11:28 am | अत्रे
हे काका कोण आहेत हे मला माहित नव्हते :)
27 May 2017 - 6:46 pm | सुबोध खरे
नासाच्या खोट्या अफवा चेक करण्याएवजी धागालेखक तरि पाहायचा.
बाडीस
आणि हि बातमी बऱ्याचशा( किंबहुना सर्वच) वृत्तपत्रात ठळक ठशात छापूनही आली आहे.
27 May 2017 - 7:23 pm | अत्रे
याआधी बऱ्याच नासा अफवा आपल्या पेपरात आल्या आहेत. नंतर त्यांना त्या मागे घ्यावा लागल्या. मूळ लेखात संदर्भ दिला गेला असता तर बरे झाले असते पण कोणी तो दिला तर त्यावर एवढे आक्षेप का घ्यावेत.. असो.
5 Jul 2017 - 8:41 pm | Nitin Palkar
__/\__
24 May 2017 - 10:55 am | नि३सोलपुरकर
_/\_.
24 May 2017 - 12:08 pm | बबन ताम्बे
हा सन्मान नासाने केला म्हणून. आपल्याकडे नाहीतर नाव देण्यावरून पण राजकारण झाले असते.
24 May 2017 - 12:08 pm | एस
नक्कीच आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. नासाला धन्यवाद. डॉ. कलाम यांना विनम्र अभिवादन!
24 May 2017 - 4:16 pm | हेमंत८२
पण जर असे जिवाणू कसे तयार होतात हे विस्कटून सांगितले तर बरे होईल कारण आपण उल्लेख केल्याप्रमाणे जीवाणू केवळ अवकाशस्थानकावरच अस्तित्त्वात असून, तो पृथ्वीवर आढळत नाही. याचे कारण काय आहे? आणि असे का?
24 May 2017 - 10:02 pm | गॅरी ट्रुमन
डॉ. कलामांचे नाव जीवाणूलाच का दिले असावे हे समजत नाही. तो जीवाणू अवकाशात सापडतो हा एक मुद्दा सोडला तर अन्यथा कलामांचा अशा जीवाणूंवरती काही अभ्यास/ संशोधन होते का? याविषयी कोणाला काही माहित आहे का?नासाने सोडलेल्या एखाद्या उपग्रहाला किंवा एखाद्या मिशनला कलामांचे नाव दिले असते तर ते समजू शकतो. कारण तो त्यांच्या विषयाशी निगडीत भाग होता. पण जीवाणू? ही गोष्ट काही समजली नाही.
असो. कोणत्याही कारणाने त्यांचा सन्मान करावा या उद्देशाने हे नाव दिले असेल तर ते चांगलेच आहे.
24 May 2017 - 10:17 pm | राघवेंद्र
परवाच आशिष महाबळ यांची मुलाखत विश्वसंवाद पॉडकास्ट ऐकली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या लोकांची यादी असते आणि जेंव्हा अवकाशातील नवीन ग्रह, लघुग्रह यांना नाव देताना ही यादी वापरतात.
यादीतील व्यक्तीचा त्या उपग्रहाच्या संशोधनात ०% वाटा असण्याची शक्यता असते.
24 May 2017 - 10:19 pm | राघवेंद्र
याच नियमाप्रमाणे डॉ कलामांचे नाव नव्या जिवाणूला देण्यात आले असेल.
6 Jul 2017 - 9:04 am | उपाशी बोका
डॉ कलाम यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे, पण तरीही यात "भारतासाठी अभिमानास्पद" वाटण्यासारखे काय आहे, ते कळले नाही. की उगीचच आपली कॉलर टाइट करण्याची ही भारतीय पद्धत आहे. कुठल्यातरी लाखोपैकी एका जिवाणूला नाव दिले, दशलक्ष तार्यांपैकी एका तार्याला नाव दिले, चंद्रावरच्या किंवा मंगळावरच्या अगम्य अशा भागाला नाव दिले, तर त्याने काय सिद्ध होते. हे म्हणजे कल्पना चावला ही नासामध्ये भारतीय वंशाची स्त्री अंतराळवीर होती म्हणून आनंद जाहीर करायचा आणि मुंबईत रस्त्यावरच्या एका चौकाला तिचे नाव द्यायचे तशातला प्रकार झाला.
माझ्या मते डॉ कलाम यांना भारतीयांनी "भारतरत्न" पुरस्कार दिला तो खरंतरं कितीतरी मोलाचा आहे. उगीच नासाने कौतुक केले म्हणून अभिमान कशाला?