सकाळी लवकर उठून डीसी भटकंतीला सुरुवात केली. डीसीतील मंद गतीने चालणार्या ट्रॅफिक मध्ये गाड्यांवरील नंबर प्लेटकडे लक्ष गेले. दिसायला अतिशय साध्या असलेल्या या नंबर प्लेटवर लिहिलेल्या एका घोषवाक्याने चांगलेच लक्ष वेधले. त्यावर लिहिले होते "TAXATION WITHOUT REPRESENTATION". या घोष वाक्या मागील इतिहासा विषयी थोडे खोदकाम करायचे ठरवले. याचे मूळ घोषवाक्य आहे "No taxation without representation". सन १७५० ते सन १७६० च्या दशकात या घोषवाक्याचा उगम झाला. त्या काळी अमेरिकेत ब्रिटिशांच्या १३ वसाहती होत्या. ब्रिटिश संसदेत त्यावेळी या वसाहतींचे थेट प्रतिनिधित्व कुणी करत नव्हते. त्यामुळे ब्रिटिशांनी पास केलेला कोणताही कायदा या मूळ वसाहतींना मान्य नव्हता. कारण हे कायदे त्यांच्या मते राईट्स ऑफ इंग्लिशमेन या हक्कांची पायमल्ली करणारे होते. थोडक्यात काय की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अमेरिकेतल्या वसाहतींना थेट प्रतिनिधित्व असल्याशिवाय कोणत्याही स्वरूपाचा कर भरायला वसाहतींतील नागरिकांचा विरोध होता. या प्रकारे प्रत्येक राजांशी निगडित नंबरप्लेट वरील वाक्यांमागील पार्श्वभूमी जाणून घेणे खरंतर एक वेगळा विषय आहे.
हा फोटो जालावरून साभार.
युएस कॅपिटॉलची बाहेरुन भटकंती केली. कॅपिटॉलच्या मागील बाजूच्या तळे आणि पुतळ्यांचे बरेच फोटो काढले.
तोवर जेवायची वेळ झाली म्हणून मग आधी पोटपूजा केली. बसने परत कॅपिटॉल जवळच्या रस्त्यावर उतरलो. काही मॉन्युमेंट्स पाहावेत म्हणून मग वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेने चालत निघालो. आम्ही ज्या भागातून फिरत होतो तो फेडरल ट्रँगल म्हणून ओळखला जातो. या त्रिकोणी भागाच्या एका बाजूला युस कॅपिटॉल आहे तर त्या विरुद्धच्या बाजूला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान 'व्हाईट हाउस' आहे. फेडरल ट्रँगल मध्ये फेडरल प्रशासनाच्या तसेच वॉशिंग्टन डीसी शहराच्या विविध कार्यालयांच्या इमारती आहेत. या सर्वच इमारती स्थापत्यसौंदर्याच्या बाबतीत एकाहून एक वाटतात.
चालता चालता अनपेक्षितपणे ट्रंप इंटरनॅशनल हॉटेलच्या भव्य इमारतीसमोर येऊन थांबलो. हे हॉटेल पेनस्लिवेनिया ऍव्हेन्यु वर स्थित आहे. या हॉटेलचे गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काही दिवस अगोदर डॉनल्ड ट्रंप यांच्या हस्ते थाटात उद्घाटन सोहळा पार पडला होता. इमारत पाहून असे वाटले की ही वास्तू किमान १०० वर्षांपूर्वीची असावी. म्हणून मग इमारतीचे बरेच फोटो काढले. ही बहुमजली अशी इमारत बाहेरून बघायला अतिशय आखीवरेखीव वाटते.
इमारतीचे समोरून, आजूबाजूने असे बरेच निरीक्षण केले. त्यावरच समाधान मानले आणि हॉटेलच्या बाजूने पुढे चालू लागलो. तेवढ्यात तेथील सुरक्षा कर्मचार्याने आम्हाला पाहिले आणि म्हणाला की हॉटेलच्या मागील बाजूने वर जाऊन क्लॉक टॉवर आवर्जून पहा. झाले आम्ही लगेच हॉटेलच्या मागे असलेल्या लिफ्टकडे निघालो. हा क्लॉक टॉवर पाहायला. क्लॉक टॉवर हा हॉटेलच्या इमारतीचा एक भाग आहे. खरंतर हे हॉटेल म्हणजे "ओल्ड पोस्ट ऑफिसची" ची इमारत आहे. डॉनल्ड ट्रंप यांच्या कंपनीने या इमारतीचे रूपांतर एका आलिशान हॉटेल मध्ये केले आहे.
सन १८९२ साली बांधकामाला सुरुवात झाली आणि सन १८९९ साली ओल्ड पोस्ट ऑफिस' आणि क्लॉक टॉवर यांचे बांधकाम पूर्ण झाले. या इमारतीला 'ओल्ड पोस्ट ऑफिस पॅव्हिलियन' असेही संबोधले जाते. यात क्लॉक टॉवरची उंची ३९५ फूट एवढी आहे. ही इमारत पेनसिल्वेनिया ऍव्हेन्युवरच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. डी सी शहरातील ही पहिलीच अशी इमारत बांधली गेली ज्यामध्ये स्टीलच्या फ्रेमचा उपयोग करण्यात आला होता. तसेच इमारतीच्या डिझाइन मध्ये इल्केट्रिकल वायरिंग अंतर्भूत असणारीही ही या शहरातली पहिलीच इमारत होती. क्लॉक टॉवर मधील घड्याळ सुरुवातीला यांत्रिक स्वरूपाचे होते. नंतर मात्र ते बदलून विजेवर चालणारे करण्यात आले. सन १९१४ पर्यंत या इमारतीने वॉशिंग्टन डी सीचे मुख्य पोस्ट ऑफिस म्हणून भूमिका बजावली.
या इमारतीच्या उद्घाघाटनानंतर एक वर्षात डी सी शहराचे पोस्टमास्तर जेम्स विलेट यांचा इमारतीतील लिफ्टच्या पोकळीत पडून अपघाती मृत्यू झाला. तसेच या इमारतीच्या शेजारी असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ओल्ड पोस्ट ऑफिस जमीनदोस्त करावे असे त्या काळी काँग्रसचे मत होते. मात्र त्यावेळी इमारत पाडली गेली नाही. पुन्हा एकवार १९३८ साली ही इमारत पाडावी असे काही काँग्रेसच्या सदस्यांचे मत होते. मात्र तेही बारगळले गेले. स्थानिक लोकमतही सुस्थितीत असणाऱ्या ३५ वर्षा जुनी इमारत पाडण्याच्या विरोधात होती. असो ही इमारत आजही अतिशय सुस्थितीत आहे यातच सारे काही आले :-) .
२००१ सालापासून या इमारतीचे रूपांतर एका हॉटेल मध्ये व्हावे यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. अखेर सन २०१२ साली ट्रंपच्या कंपनीने या इमारतीचे लीज मिळवण्यासाठी वाटाघाटींना सुरुवात केली. यात त्यांनी जवळजवळ २०० मिलियन डॉलर्स इतका खर्च करण्याची तयारी दाखवली. यावेळी डीसीतील सामान्य जनतेला वाटले की क्लॉक टॉवर पर्यटकांसाठी बंद केला जाईल. मात्र तसे काही झाले कारण की नॅशनल पार्क सर्व्हिसकडे हा भागाचे हक्क आहेत आणि पर्यटकांसाठी हा क्लॉक टॉवर आजही खुला आहे. एवढेच नव्हे तर क्लॉक टॉवर पाहायला कोणतेही प्रवेशशुल्क नाही. सन २०१३ साली वाटाघाटी पूर्ण झाल्या. ट्रंपच्या कंपनीला ६० वर्षांचे लीज दिले गेले. ज्यात ते सुमारे २,५०,००० डॉलर्स इतके मासिक भाडे भरते. आता या आलिशान हॉटेलमध्ये सर्व सुखसोयींनी युक्त अशा २६० खोल्या आहेत.
१९११ सालचा हा फोटो विकीवरून साभार.
फेडरल ट्रायंगलचा एक भाग असलेली इमारत.
इमारतीच्या मागील बाजूने आत प्रवेश केल्यावर एक छोटेखानी म्युझियम आहे.त्यात जुन्या काळातील ओल्ड पोस्ट ऑफ़िस आणि क्लॉक टॉवरची अनेक छायाचित्रे आहेत. ते म्युझियम पाहून आम्ही क्लॉक टॉवरला जाण्यासाठी लिफ्टच्या दिशेने निघालो. या लिफ्टने थेट ९व्या मजल्यावर पोचवले जाते. या लिफ्ट मधून वर जाताना खाली ट्रंप हॉटेलच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या रेस्टॉरंटचे विलोभनीय दृश्य दिसत राहते. तिथून पुढे आणखी एक लिफ्ट आहे त्यातून ११व्या मजल्यावर पोचावे लागते. शेवटी तिसर्या लिफ्टने आणखी १ मजला वर जाऊन आपण क्लॉक टॉवरच्या ऑब्झरवेटरी डेकला पोचतो. इथे मध्यभागी ते भव्य घड्याळ आणि ते चालवणारी अजस्त्र वाटणारी यंत्रणा दिसते. तसेच या उंचीववरून डी सी शहराचे अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. ते दृश्य नजरेत साठवून आणि बरेच फोटो काढून आम्ही पुन्हा खाली आलो.
म्युझियम मधील काही फोटो.
Peter Charles L'Enfant - यांनी सन १७९१ साली डी सी शहराचा मूळ आराखडा तयार केला होता. पेशाने तो मिलिटरीत काम करणारा इंजिनियर होता. याच्या नावाने डी सी शहरात एक मोठे स्टेशन आहे.
युएस कॅपिटॉलच्या डोमचे काम चालु असताना (साल १८६२) .
पेनसिल्वेनिया अॅव्हेन्यु
ट्रंप हॉटेल मधील काही दृश्य.
१९१४ सालचा हा फोटो विकीवरुन साभार
त्या दिवशी ठरवले होते की कॅपिटॉल बाहेरुन पाहून झाल्यावर काही मॉन्युमेंट्स पाहायचे. पण अनपेक्षितपणे ओल्ड पोस्ट ऑफिस आणि क्लॉक टॉवरची इमारत पाहायला मिळाली. ऐतिहासिक असा हा ठेवा अतिशय उत्तम प्रकारे आजही जतन करून ठेवला आहे याचे समाधान वाटले.
माहितीचा स्तोत्र : टॅक्स विदाऊट रिप्रेस्नेटेशन, ओल्ड पोस्ट ऑफिस पॅव्हिलीयन, L'Enfant
क्रमशः
प्रतिक्रिया
11 Jun 2017 - 3:47 am | एस
वा! फार छान छायाचित्रे आणि विविध लिंकांनी सजलेली अतिशय नेटकी माहिती. वॉशिंग्टन डीसी हे त्यामानाने मला जरा बसके शहर वाटते. इथल्या इमारती गगनचुंबी म्हणाव्यात इतक्या उंच नाहीत. पण सुंदर आहे शहर. पुभाप्र.
11 Jun 2017 - 4:09 am | अंतु बर्वा
एसभाउ ते इमारतींच्या उंची वर असलेल्या प्रतिबंधामुळे. खालिल माहिती विकीवरून:
The height of buildings in Washington is limited by the Height of Buildings Act. The original Act was passed by Congress in 1899 in response to the 1894 construction of the Cairo Hotel, which is much taller than the majority of buildings in the city. The original act restricted the heights of any type of building in the United States capital city of Washington, D.C., to be no higher than 110 feet (34 m), 90 feet (27 m) for residential buildings. In 1910, the 61st United States Congress enacted a new law which raised the overall building height limit to 130 feet (40 m), but restricted building heights to the width of the adjacent street or avenue plus 20 feet (6.1 m); thus, a building facing a 90-foot (27 m)-wide street could be only 110 feet (34 m) tall.
बाकी प्रवासवर्णन झकास. डिसी पहिल्यापासूनच आवडत्या शहरांच्या लिष्टित आहे.
11 Jun 2017 - 7:11 pm | एस
अच्छा, धन्यवाद. तरीच. पण चांगला नियम आहे हा.
16 Jun 2017 - 6:36 pm | जुइ
प्रतिसादासाठी व या रोचक माहितीसाठी धन्यवाद. आमच्या ऐकीव माहितीनुसार भविष्यात डीसीतल्या बांधकामांच्या कमाल उंचीची मर्यादा वाढवली गेली तरी ती वॉशिंग्टन मोन्युमेंटच्या उंचीपेक्षा कमीच ठेवली जाईल (प्रथम राष्ट्राध्यक्षांप्रती असलेला आदर म्हणून).
11 Jun 2017 - 2:01 pm | संजय क्षीरसागर
.
11 Jun 2017 - 3:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं चाललं आहे प्रवासवर्णन ! फोटोही सुरेख !
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. L'Enfant च्या उल्लेखावरून १९८९ मध्ये डिसी भेटीच्या वेळी L'Enfant Plaza Hotel मध्ये राहिलो होतो त्याची आठवण झाली. आता गुगलवर पाहिले तर ते २०१३ मध्ये बंद झालेले दिसले. :( भर चौकात असलेल्या त्या हॉटेलच्या चार मजले खाली सबवे स्टेशन होते. ते हॉटेल स्वतःची जाहिरात, "द सेकंड बेस्ट अॅड्रेस इन डिसी" अशी स्वतःची जाहिरात करत असे ! कारण, अर्थातच, "द बेस्ट अॅड्रेस इन डिसी" म्हणजे खुद्द व्हाईट हाऊस ! :) हॉटेलची मोक्याची जागा व आम्हाला मिळालेल्या खोलीची जागा यामुळे खोलीच्या गॅलरीतून "लिंकन मेमोरियल-वॉशिंग्टन मॉन्युमेंट-स्मिथसोनियनचा अवाढव्य पसारा-कॅपिटॉल" हा डिसीची बहुतेक महत्वाची आकर्षणे असणारा पट्टा समोरच नजरेत येत होता. ती सगळी आकर्षणे हॉटेलपासून पायी चालत जाऊन मनसोक्त पाहिली होती !
आता नक्की पत्ता आठवत नाही पण तिथल्या जवळच्याच एका सरकारी इमारतसंकुलातील भारतिय रेस्तराँमध्ये दुपारचे जेवण घेतेले होते. डिसीमध्ये चक्क २०-२५ चटकदार शाकाहारी-मांसाहारी पदार्थांचा मोठा बुफे आणि त्यासोबत पापड, लोणची, चटण्या असा भारी बेत पाहून आश्चर्याने गारेगार झालो होतो ! शुक्रवार दुपार असल्याने एक शँपेनचा ग्लास 'ऑन द हाऊस' होता :) आतापर्यंत मी भारताबाहेर घेतलेल्या भारतिय जेवणांच्या चविष्टपणात या जेवणाचा दुसरा क्रमांक लागतो ! विशेष म्हणजे तीन लोक (आम्ही नवरा-बायको आणि एक जपानी गृहस्थ) सोडून रेस्तराँमधली सगळी गर्दी (बहुतेक तिथल्या ऑफिसेसमध्ये काम करणार्या) गोर्या अमेरिकनांचीच होती ! या सगळ्या विशेषांमुळे तो प्रसंग अजूनही आठवणींत ताजा राहीला आहे !
16 Jun 2017 - 6:27 pm | जुइ
प्रतिसादासाठी धन्यवाद. तुमच्या डीसीतल्या आठवणी आवडल्या.
आम्हीही या सहलीचे नियोजन करताना कॅपिटॉल हिल्स किंवा व्हाईट हाऊसजवळच्या अपस्केल भारतीय रेस्तराँमध्ये जेवायचा बेत आखला होता. परंतु अशा दोन रेस्तराँमध्ये आगाऊ बुकिंग आवश्यक होते. तिथे प्रत्यक्ष भटकताना वेळेचे गणित न जमल्याने ते राहून गेले. प्रेसिडेंट ओबामांनी त्यांच्या पत्नीबरोबर एका लग्नाच्या वाढदिवसाला तिथल्या भारतीय रेस्तराँमध्ये डिनर केल्याची बातमी वाचली होती. त्याच बातमीत प्रेसिडेंट क्लिंटन यांच्या कार्यकाळात त्याच रेस्तराँमधून व्हाईट हाउसमध्ये नियमितपणे जेवण मागवले जात असे अन चेल्सी क्लिंटन तर ते जेवण खाऊनच मोठी झाली आहे असाही उल्लेख होता :-) .
या सहलीदरम्यान आम्ही अलेक्झांड्रिया व्हर्जिनिया इथल्या डिशेस ऑफ इंडिया या भारतीय रेस्तराँमधल्या जेवणाचा आस्वाद घेतला. अमेरिकेतल्या टिपीकल भारतीय रेस्तराँपेक्षा ते वेगळे वाटले. तिथे आम्ही पालक चाट हा रुचकर पदार्थ प्रथमच खाल्ला.
11 Jun 2017 - 10:23 pm | मिहिर
छान माहिती व फोटो.
'टॅक्सेशन विदाऊट रिप्रेझेंटेशन' हे वॉशिंग्टन डीसीची आजची राजकीय स्थिती व त्याची वसाहतीच्या काळाशी तुलना करण्यातून असावं. वॉशिंग्टन डीसी हे राज्य नाही आहे, त्यामुळे त्यांना सिनेटमध्ये प्रतिनिधित्व नाही, काँग्रेसमध्ये एक प्रतिनिधी आहे तोही मतदान करू शकत नाही. मात्र वॉशिंग्टन डीसीतील लोकांना फेडरल कर भरावा लागतो, जो प्रत्यक्षात अमेरिकेतल्या इतर १९ राज्यांच्या एकत्र फेडरल करापेक्षा जास्त आहे. इथे पाहा. म्हणजे एका प्रकारे वॉशिंग्टन डीसीतल्या लोकांची स्थिती तेव्हाच्या वसाहतींसारखीच आहे.
16 Jun 2017 - 6:30 pm | जुइ
प्रतिसादासाठी व या रोचक माहितीसाठी धन्यवाद.
22 Jun 2017 - 12:25 am | राघवेंद्र
मित्रा, एवढे टॅक्स चे टेन्शन घेऊ नकोस. :)
बाकी माहिती रोचक.
12 Jun 2017 - 1:29 pm | पद्मावति
मस्तं चाललीय ही सहल. पु.भा.प्र.
13 Jun 2017 - 3:29 am | इडली डोसा
छान सफर.
13 Jun 2017 - 7:14 am | वरुण मोहिते
कधीतरी जायला हवे ...बघू केव्हा योग येईल .
20 Jun 2017 - 6:16 pm | जुइ
सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद.
टाइम मासिकाच्या गेल्या आठवड्यातल्या अंकाच्या मुखपृष्ठावर या भागात वर्णन असलेल्या हॉटेलचा आतला फोटो आहे व अंकात त्यावर राजकीय लेख आहे.
22 Jun 2017 - 12:27 am | राघवेंद्र
खूप छान माहिती जुइ !!!
डी. सी. च्या पुढील सहलीमध्ये काय करायचे हा प्रश्न सुटला.