युएस कॅपिटॉल पूर्वार्ध

Primary tabs

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in भटकंती
22 May 2017 - 12:33 am

आम्ही राहतो त्या राज्याचे (मिनेसोटा) अन शेजारच्या विस्कॉन्सीन राज्याचे स्टेट कॅपिटॉल पाहिल्यावर युएस कॅपिटॉल पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. या वर्षी युएस कॅपिटॉल पाहायचा योग जुळून आला. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चेरी ब्लॉसम फेस्टिवलच्या निमित्ताने वॉशिंग्टन डिसीकडे कूच केले. वॉशिंग्टन डिसी व भोवतालचा परिसर मेट्रो ट्रेनच्या जाळ्याने अतिशय उत्तमरीत्या जोडलेला आहे व तिथली सिटीबस सेवा देखील या मेट्रो ट्रेनला पूरक आहे. आमच्या वास्तव्यादरम्यान आम्ही या सुविधेचा पुरेपूर लाभ उठवला.

युएस कॅपिटॉलला भेट देण्यासाठी सकाळीच एका मेट्रो स्टेशनच्या बाहेर गाडी लावून मेट्रोने साऊथ कॅपिटॉल या मेट्रो स्टेशन वर उतरलो. इथून अगदी जवळच चालत जाण्याच्या अंतरावर यूएस कॅपिटॉल आहे. यूएस कॅपिटॉलची भटकंती सुरू करण्या आधी काही गोष्टींची जुजबी माहिती लिहितो. कॅपिटॉलला सोमवार ते शनिवार सकाळी ८:३० ते दुपारी ३:२० पर्यंत पर्यटक भेट देऊ शकतात. सिनेटचे चालू कामकाज पाहण्यासाठी आपल्या राज्यातल्या सिनेटरच्या ऑफिसशी संपर्क साधून पूर्वनियोजित वेळ घ्यावी लागते. मात्र आत जाताना खाद्य पदार्थ नेता येत नाहीत. आत गेल्यावर कॅपिटॉल मधल्या कॅफेटेरियात खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. लहान मुले बरोबर असल्यास या कॅफेटेरियात दूधही उपलब्ध आहे. आत जाताना सामानाची आणि आपली सुरक्षा तपासणी केली जाते. परंतु कुठलेही ओळखपत्र मागितले जात नाही व आपल्या नावाची नोंदही केली जात नाही. ही झाली कॅपिटॉल भेट देण्या संबंधी काही माहिती. आता लांबूनच कॅपिटॉलची भव्य वास्तू दिसू लागली होती.

कॅपिटॉलची वास्तू टीव्हीवर जवळजवळ रोज पाहिली जात असली तरी प्रथमच प्रत्यक्ष पाहताना तिची भव्यता, सौंदर्य, रेखीवपणा डोळ्यांत भरतो. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी दिवसभर चांगले ऊन होते त्यामुळे कॅपिटॉल बाहेरुन चांगले पाहावे असे ठरले. कॅपिटॉलची वास्तू बाहेरून बघितल्यावर सतत जाणवत राहते की ही वास्तू काही एकदाच बांधून झाली नाही तर हे काम टप्प्याटप्प्याने केले गेले आहे. कारण बाहेरून दिसणार्‍या बांधकामाच्या दगडांचे रंग वेगवेगळे आहेत.

आम्ही तिथे पोचलो तेव्हा बऱ्याच पर्यटकांचे जथ्थे कॅपिटॉल पाहायला आले होते. काही सर्व्हिस डॉग्ज त्यांची ड्यूटी बजावत होते. याशिवाय राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या विरोधात घोषणा देणारे आणि फलक घेऊन उभे असलेले काही लोक दिसले. कॅपिटॉलच्या दर्शनी भागाचे बरेच फोटो काढून आम्ही उजव्या बाजूने मागे गेलो. या बाजूच्या पायर्‍यांवर नवीन राष्ट्राध्यक्षाचे इनॉगरेशनचा (शपथविधी) सोहळा पार पडतो. समोरच जरा लांबवर वॉशिंटन मॉन्युमेंटची भव्य आणि उंच वास्तू दिसते. इथेच भव्य अशी कारंजी आहेत. शिवाय एक मोठे तळे आहे. त्या सभोवती अनेक देखणे पुतळे आहेत. कॅपिटॉलच्या मागील पायऱ्या ते वॉशिंटन मॉन्युमेंटच्या मध्ये भली मोठी हिरवळ पसरली आहे. या जागेत दुतर्फा उभे राहून लोक नव्या राष्ट्राध्यक्ष्याच्या इनॉगरेशनचा सोहळा पाहतात.

आता जाणून घेऊया कॅपिटॉलच्या बांधणी विषयी. १७९० साली अमेरिकेची राजधानी म्हणून पोटोमॅक नदीच्या तीरावरच्या जागेची निवड करण्यात आली. लोकप्रतिनिधींचे सभागृह व इतर प्रशासकीय कार्यालयांच्या निर्मितीसाठी १० वर्षांचा अवधी ठरवण्यात आला. तोवर फिलाडेल्फिया शहराने राजधानीची भूमिका पार पाडली. १८ सप्टेंबर १७९३ अमेरिकेच प्रथम व तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी आपल्या ८ सहकाऱ्यांसह कॅपिटॉलच्या इमारतीची कोनशिला बसवली.
कॅपिटॉलचे डिझाइन Dr. William Thornton यांची आहे. तर सध्याचा घुमट Thomas U. Walter यांनी डिझाइन केला आहे. जवळजवळ ११ वेगवेगळ्या आर्किटेक्ट्सनी कॅपिटॉलच्या बांधणीत सहभागी आहेत. कॅपिटॉलचे बांधकाम १७९३ मध्ये सुरू झाले. तसेच मूळ वास्तू १८२६ मध्ये बांधून पूर्ण झाली. त्यानंतर वेळोवेळी त्यात भर घालण्यात आली. कॅपिटॉलच्या गोल घुमटावर स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आहे. हा पुतळा पूर्वे कडे तोंड करून उभा आहे. याचे कारण असे की पूर्वेकडून कॅपिटॉलचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हा पुतळा १८६३ साली कॅपिटॉलवर उभारण्यात आला.

नवीन घुमटाचे काम १८६८ साली पूर्ण झाले. ८९ ,०९,२०० पाउंड वजनाचा हा घुमट हा कास्ट आयर्नचा बनलेला आहे. १९५८ ते १९६२ पर्यंत कॅपिटॉलच्या पूर्व भागात काही खोल्या बांधल्या गेल्या. "व्हिजिटर सेंटर" हा भाग अगदी अलीकडे कॅपिटॉल मध्ये बांधला गेला. याचे काम २००८ साली पूर्ण झाले. मूळ वास्तू जी १८२६ साली पूर्ण झाली तिच्या बांधकामात वीटांचा आणि दगडांचा वापर करण्यात आला होता. पूर्वेकडील बांधकाम हे वीट आणि संगमरवराचे आहे. त्यामुळेच बाहेरून कॅपिटॉलच्या रंगामध्ये फरक जाणवतो. १८१२ साली "ओल्ड ब्रीक कॅपिटॉल" ही इमारत त्यावेळी काँग्रेसचे कामकाज करण्यासाठी वापरली जात होती. मात्र ही इमारत ब्रिटिश सैनिकांनी जाळून टाकली. ही इमारत आताच्या सुप्रीम कोर्टाच्या जागेवर (सध्याच्या कॅपिटॉलच्या वास्तुसमोर डाव्या हाताला) उभी होती. तसेच सिव्हिल वॉरच्या काळात तिचा तुरुंग म्हणूनही उपयोग केला जायचा. २००३ पर्यंत कॅपिटॉलच्या बांधकामावर सुमारे $१३३ दशलक्ष इतका खर्च झाला आहे. तसेच नंतर बांधल्या गेलेल्या व्हिजिटर सेंटरसाठी $६२१ दशलक्ष इतका खर्च झाला.

कॅपिटॉलच्या वास्तुचे फोटो काढताना माझ्या जुजबी छायाचित्रण कौशल्याच्या मर्यादांची जाणीव मला वेळोवेळी होत होती. कुठल्याही कसलेल्या फोटोग्राफरसाठी युएस कॅपिटॉलला फोटोंमध्ये कैद करणे ही पर्वणी असेल याबाबत शंका नाही.

या लेखाच्या उत्तरार्धात कॅपिटॉलची आतुन सफर घडवण्याचा मानस आहे.

माहितीचा स्रोतः विकी व युएस कॅपिटॉलचे रोटुंडा अ‍ॅप.

~ उत्तरार्ध ~

प्रतिक्रिया

इडली डोसा's picture

22 May 2017 - 6:56 am | इडली डोसा

लेख अजुन वाचला नाही. नंतर वाचुन सविस्तर प्रतिक्रिया देईनच. एका छान मालिकेची सुरुवात.

छान आले आहेत फोटो! लेख आवडला.

वा! खूपच छान! ऐतिहासिक वास्तू व अवशेष जपण्यासाठीची या लोकांची धडपड पाहिली की आपण आपल्या देशात काय दिवे लावतो ह्याची जाणीव होऊन मन उद्विग्न होते. लेखमाला छान होणार यात शंका नाही. पुभाप्र. आणि छायाचित्रे आवडली!

प्रचेतस's picture

22 May 2017 - 1:42 pm | प्रचेतस

छान सुरुवात.

युएस कॅपिटॉलचे वर्णन डॅन ब्राउनच्या 'द लोस्ट सिम्बॉल' मधून वाचले होते. आता थेट मिपाकराद्वारे ह्याची सैर करता येईल.

पद्मावति's picture

22 May 2017 - 1:48 pm | पद्मावति

वाह, किती भव्य वास्तू.
फोटो अप्रतिम आले आहेत. वर्णनही आवडले.
पु.भा.प्र.

पुंबा's picture

22 May 2017 - 3:20 pm | पुंबा

फार सुंदर लिहिलं आहे..
पहावसं वाटलं..

जबरदस्त वास्तु, फोटो सुद्धा देखणे काढले आहेत

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 May 2017 - 4:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहिती आणि फोटो !

परदेशातून अमेरिका बघायला गेले असता, दीड-दोन दिवसांच्या वॉशिंग्टन डी सी च्या वास्तव्यात, इतर असंख्य प्रसिद्ध स्थळांना पाहण्याच्या यादीत कॅपिटॉल बरेच खाली राहते. त्यामुळे, इतके सविस्तर वर्णन आणि चित्रे अत्यंत स्वागतार्ह आहेत.

पुभाप्र.

खेडूत's picture

22 May 2017 - 5:07 pm | खेडूत

+ १११

छान माहिती. सगळंच नव्याने कळतंय!

अभ्या..'s picture

22 May 2017 - 5:48 pm | अभ्या..

मस्त रे श्रीरंगा
आवडले

रुपी's picture

23 May 2017 - 1:59 am | रुपी

अरे वा.. मस्त लेखन.

काही वर्षांपूर्वी कॅपिटॉल पाहिले, पण इतक्या अभ्यासपूर्ण नजरेतून नाही, त्यामुळे वाचायला छान वाटले.

म्हात्रे काकांच्या प्रतिसादाशी सहमत. या इमारती आणि आजूबाजूचा परिसर पाहिला आहे, पण तरीही ते सौंदर्य अनुभवायला वेळ कमीच पडतो. वॉशिंग्टन डी सी मध्ये राहणार्‍या लोकांचा (उन्हाळ्यात) हेवा वाटतो.

गॅरी ट्रुमन's picture

24 May 2017 - 8:54 pm | गॅरी ट्रुमन

छान फोटू.

नवीन घुमटाचे काम १८६८ साली पूर्ण झाले.

अमेरिकेच्या अध्यक्षांचा शपथविधी होतो त्यापूर्वी काही वेळ कोणी सिनेटर/काँग्रेसमन इत्यादी अमेरिकन लोकशाहीच्या इतिहासातील काही टप्प्यांचा थोडक्यात उल्लेख करणारे पाचेक मिनिटांचे छोटेखानी भाषण करतात.बराक ओबामांचा जानेवारी २०१३ मध्ये अध्यक्षपदी दुसर्‍यांदा शपथविधी झाला त्यापूर्वी कुणा सिनेटरने या घुमटाविषयी (डोम) सांगितले होते. या घुमटाचे काम अमेरिकेचे यादवीयुध्द चालू होण्यापूर्वी सुरू झाले होते. यादवीयुध्द सुरू झाल्यावर हा घुमट अर्धवट बांधून पूर्ण झाला होता. यादवी युध्दावर इतका खर्च होत असताना या घुमटाचे काम पुढे रेटायचे का हा प्रश्न काही लोक विचारत होते. त्यावेळी अध्यक्ष अ‍ॅब्रॅहॅम लिंकन यांनी काहीही झाले तरी घुमटाचे काम पूर्ण करायलाच हवे असे निक्षून सांगितले कारण त्यांच्या मते 'Unfinished dome is a sign of a divided nation'. ही गोष्ट बराक ओबामांच्या शपथविधीपूर्वी त्या सिनेटरने सांगितली होती. या घुमटाचे काम पूर्ण व्हायला लिंकनचा खून झाल्यानंतर आणखी ३ वर्षे लागली हे माहित नव्हते.

राघवेंद्र's picture

24 May 2017 - 9:27 pm | राघवेंद्र

उत्तरार्ध केंव्हा येणार पंत ???

बऱ्याच वेळेला कॅपिटॉल बाहेरून बघितले आहे. तुमच्यामुळे तपशीलवार माहिती मिळत आहे.

अभिजीत अवलिया's picture

25 May 2017 - 7:47 am | अभिजीत अवलिया

आवडले फोटो.

पैसा's picture

25 May 2017 - 10:36 am | पैसा

मस्त सुरुवात!

श्रीरंग_जोशी's picture

26 May 2017 - 9:08 am | श्रीरंग_जोशी

सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद.

गॅरी - या माहितीसाठी धन्यवाद. अमेरिकेत असुनही २००९ व २०१३ चे इनॉगरेशन पाहिले नाही. त्यामुळे ही घडामोड ठाऊक नव्हती. लिंकन चित्रपटात एका प्रसंगात प्रेसिडेंट लिंकन रस्त्यावरुन चालत असताना कॅपिटॉलच्या घुमटाचे बांधकाम अर्धवट आहे असे दाखवले आहे.

सुंदर, तुम्ही ज्या ठिकाणी राहिलात तेथील पत्ते,फोन नंबर दिले तर फार बरे होईल.

श्रीरंग_जोशी's picture

20 Jun 2017 - 6:11 pm | श्रीरंग_जोशी

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. आम्ही जेथे राहिलो ती हॉटेल्स सर्वांच्याच सोयीची असतील असे नाही.

मी नेहमी हॉटेल्स.कॉम वरून बुक करतो. त्यांचा रिवार्ड प्रोग्राम असा आहे की हॉटेल रूमचे १० नाइट्सचे बुकिंग झाल्यावर त्या बुकिंग्जची सरासरी किंमत काढून पुढच्या बुकिंगदरम्यान एका नाइटच्या बुकिंगसाठी तेवढी रक्कम वजा होते.

अमेरिकेतल्या पर्यटनासाठी कोणी माहिती / मार्गदर्शन मागणारा धागा टाकल्यास मी माझ्या अनुभवानुसार भर घालू शकीन.

सही रे सई's picture

22 Jun 2017 - 8:02 pm | सही रे सई

आम्ही १ जुलै ला जाणार आहोत वॉशिंग्टन डिसी ला. या लेखाचा आणि जुईच्या लेखाचा पुरेपुर फायदा घेऊच.
अजून काही टीप्स असतील तरी सांगा.