आमच्या सहलीच्या तिसऱ्या दिवशी युएस कॅपिटॉल आतून पाहिले. हा अनुभव अतिशय चांगला होता कारण की कॅपिटॉल आतून पाहायलाही खूप रंजक आहे. तसेच तेथील ऐतिहासिक संदर्भासहित केलेली गायडेड टूर खूपच माहितीपूर्ण होती. ते पाहून होईपर्यंत दुपार कधी झाली ते कळले नाही. शेवटी तेथे काही सॉव्हेनियर्स खरेदी केले.
आम्ही राहतो त्या मिनेसोटा राज्याने दिलेला मारीया सॅनफोर्ड यांचा युएस कॅपिटॉलमधील पुतळा.
त्यानंतर आम्ही लायब्ररी ऑफ काँग्रेस पाहायचे ठरवले. या लायब्ररीविषयी आधीही खूप ऐकले होते. खास करून येथील साहित्यसंपदा आणि लायब्ररीच्या अतिशय भव्य आणि देखण्या वास्तूबद्दल. त्यामुळे लायब्ररी ऑफ काँग्रेस आवर्जून पाहायच्या यादीत होती. काँग्रेसच्या सदस्यांच्या उपयोगासाठी या लायब्ररीची स्थापना केली गेली. ही लायब्ररी अमेरिकेचे राष्ट्रीय ग्रंथालय आहे. ही लायब्ररी फेडरल सरकाराने स्थापन केलेली सर्वात जुनी सांस्कृतिक संस्था आहे. तसेच ही लायब्ररी जगातील सर्वात मोठी लायब्ररी आहे.
युएस कॅपिटॉल व लायब्ररी ऑफ काँग्रेसला भुयारी मार्गाने जोडलेले आहेत . आम्ही त्याच भुयारी मार्गाने लायब्ररीच्या दिशेने चालू लागलो. या मार्गात अनेक उत्तम चित्रे पाहायला मिळतात. युएस कॅपिटॉलला लायब्ररी ऑफ काँग्रेसची जी इमारत आतून जोडली आहे ती आहे थॉमस जेफरसन बिल्डिंग.
अमेरिकेची राजधानी फिलाडेल्फीयाहून डीसीला स्थलांतरित झाल्यावर या लायब्ररीची स्थापना करण्यात आली (सन १८००). ही लायब्ररी त्यावेळी युएस कॅपिटॉल मधेच होती. मात्र १८१४ सालच्या ऑगस्ट महिन्यात ब्रिटिश सैनिकांनी कॅपिटॉल जाळले. त्यावेळी या आगीत लायब्ररीतले तीन हजार ग्रंथ जळून नष्ट झाले. लगेच महिन्याभरात थॉमस जेफरसन यांनी आपली व्यक्तिगत लायब्ररी काँग्रेसला बदली म्हणून वापरायला दिली. त्यात सुमारे ६ हजार ग्रंथ होते. त्यासाठी काँग्रेस ने जेफरसन यांना त्या काळी २४ हजार डॉलर्स दिले . दुर्दैवाने १८५१ साली पुन्हा कॅपिटॉल मधील लायब्ररीच्या दालनास आग लागली. ज्यात जेफरसन यांनी दिलेली बरीचशी ग्रंथसंपदा नष्ट झाली. यानंतर लायब्ररीतील पुस्तकांची संख्या वाढत गेली. १८७० साली कॉपीराइट लॉ पास करण्यात आला. त्यामुळे कापी राइट मिळवण्यासाठी लेखकांना त्यांच्या लिखाणाचे २ नमुने लायब्ररीला पाठवावे लागत असत. या लायब्ररीत आजही अमेरिकेचे कॉपीराइटचे ऑफिस आहे. तसेच लायब्ररीतील बहुतकरून सगळ्या संग्रहित वस्तू आणि बौद्धिक संपदा कॉपीराइट लॉद्वारे मिळवण्यात आल्या आहेत. लायब्ररीसाठी नवीन इमारतीचे बांधकाम १८८८ साली सुरू होवून १८९४ साली पूर्ण झाले. हीच ती थॉमस जेफरसन बिल्डींग जी १८९७ साली खुली करण्यात आली. आता कॅपिटॉल हिलवर लायब्ररीच्या तीन इमारती आहेत. जेफरसन बिल्डींग , जॉन अॅडम्स बिल्डींग जी १९३८ साली बांधली गेली आणि जेम्स मॅडीसन मेमोरियल बिल्डींग १९८० साली लोकांच्या वापरासाठी खुली करण्यात आली. या तिन्ही इमारती एकमेकींशी भुयारी मार्गांनी जोडल्या आहेत.
या लायब्ररीत सुमारे १५ कोटी संग्रहित वस्तू आहेत. यात सुमारे ३.६ कोटी पुस्तके आणि इतर छापील साहित्य आहे. या लायब्ररीत प्रामुख्याने पुस्तके तर आहेतच पण इतरही अनेक गोष्टींचा इथे संग्रह आहे. जसे की नकाशे, शीट म्युझिक, फोटो, साऊंड रेकॉर्डींज, सिनेमे आणि हस्तलिखितांचा समावेश आहे. या लायब्ररीत सुमारे ४५० विविध भाषांचे साहित्य संग्रहित केलेले आहे. या लायब्ररीत असलेल्या हस्तलिखितांची संख्या जवळजवळ ७ कोटी आहे. या हस्तलिखितांमध्ये अमेरिकेच्या इतिहास व संस्कृतीविषयी अनेक लेख आहेत. तसेच या थॉमस जेफरसन यांनी लिहिलेल्या "डिक्लेरेशन ऑफ इन्डीपेंडन्स" चा मूळ मसुदा देखिल आहे. या लायब्ररीत समाविष्ट होण्यासाठी वेगवेगळ्या अशा सुमारे १५००० बौद्धिक संपदेच्या गोष्टी दर दिवशी येत असतात. यातून जवळजवळ रोज १२००० या लायब्ररीत समाविष्ट केल्या जातात. ज्या गोष्टी समाविष्ट केल्या जात नाही त्या मग देशात तसेच आंतररष्ट्रीय पातळीवर आदान प्रदान केल्या जातात. ही लायब्ररी जेव्हा लोकांसाठी खुली झाली. त्या काळी ही एक मोठी उपलब्धी होती कारण अर्थात ही लायब्ररी सर्वात मोठी, खूप भव्य आणि सगळ्यात सुरक्षित असे ठिकाण म्हणून गणले गेले. वय वर्षे १६ आणि वरील कोणतीही व्यक्ती इथे वाचक म्हणून नाव नोंदवू शकते किंवा आपला फोटो आयडी दाखवून येथील पुस्तके वाचू शकते. तसेच ऑनलाईन अॅक्सेस करू शकते. या लायब्ररीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की या लायब्ररीच्या साईटवर शेकडो पुस्तके डिजीटल स्वरूपात उपलब्ध आहेत. ही डिजीटल पुस्तके सर्वांना वाचण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध आहेत (कुठल्याही
सदस्यत्वा शिवाय).
ही थॉमस जेफरसन बिल्डींग मधील मुख्य रीडिंग रूम. या दालनाच्या एका बाल्कनीला काचेने सील करून पर्यटकांना या दालनाचे निरीक्षण करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे.
खाबांवरचे आकर्षक नक्षीकाम
१९६२ सालापासून या लायब्ररीने जगभरात आपली कार्यालये उघडली आहेत. यात नवी दिल्ली, कैरो, रिओ डी जनेरो, जकार्ता, नैरोबी तसेच इस्लामाबाद येथे ही कार्यालये आहेत. या कार्यालयांद्वारे इतर देशांतून पुस्तके व इतर अशा वस्तू गोळा करतात जसे की मौल्यवान पुस्तके, नकाशे इत्यादी. या लायब्ररीत अतिशय दुर्मिळ अशी हस्तलिखितं आहेत. तसेच जगभरातील दुर्मिळ पुस्तकांचा सर्वात मोठा साठा आहे. यात पंधराव्या शतकातील काही हस्तलिखितं आहेत. तसेच ज्ञात असे पहिले छापील पुस्तक “The Bay Psalm Book” हे देखिल आहे. हे पुस्तक १६व्या शकतील आहे. या लायब्ररीत लहान मुलांची सुमारे १०० अतिशय दुर्मिळ पुस्तके आहेत. तसेच येथे अगदी लहान पुस्तक आहे "ओल्ड किंग कोल". हे पुस्तक इतके लहान आहे की ते आकाराने एका पूर्णविरामा एवढे आहे. या लायब्ररीत सर्वात मोठे पुस्तक देखील आहे जे की ५x७ फूट एवढे आहे. यात भूतानची रंगीत छायाचित्रे आहेत. येथे प्रिटींगचे अगदी पुरातन उदाहरण आहे जे की इ. स. ७७० मधील आहे. १९३१ सालापासून लायब्ररीने अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके तसेच ध्वनिमुद्रण पुरवत आहे. आता ही सुविधा अद्यावत होवून ही पुस्तके ऑडियो स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. या लायब्ररीत अमेरिकन तसेच इतर देशांतल्या शहरांच्या टेलिफोन डिरेक्टरीज देखील आहेत. येथे गुटेनबर्ग बायबलची प्रत पाहायला मिळते. या बायबलच्या छपाईत वापरलेल्या तंत्रज्ञाने प्रसिद्ध अशी गुटेनबर्ग क्रांती आली.
लायब्ररीतील भव्य असा ग्रेट हॉल
लायब्ररीतला थॉमस जेफरसन यांचा पुतळा
या लायब्ररीला देता आलेली प्रत्यक्ष भेट ही आमच्यासाठी एक अपूर्वाई ठरली. ही लायब्ररी बघायला अतिशय देखणी आहेच तसेच येथील साहित्य संपदा अतिशय उच्च दर्जाची आहे. पुस्तक या विषयात रस असणार्यांनी या लायब्ररीला आवर्जून भेट द्यावी. येथून पाय निघत नव्हता पण आता बाहेर पडावे लागणार होते. म्हणून मग इथून काही सॉव्हेनियर्स खरेदी केले आणि बाहेर पडलो.
थॉमस जेफरसन ब्लिडींगचा हा फोटो विकीवरून साभार
हा फोटो लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या संस्थळावरुन साभार
लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या संस्थळावर उपलब्ध असलेला ३६० अंशाचा टूर. यात चार ठिकाणांचे दृश्य उपलब्ध आहे.
हा व्हिडिओ जालावरून साभार
ता. क. - प्राध्यापक संजय सोनवणी यांनी लिहिलेले जातीसंस्थेचा इतिहास हे पुस्तक लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये सामील झाले आहे.
माहितीचा स्रोत - लायब्ररी ऑफ काँग्रसचे संस्थळ. विकी
क्रमशः
प्रतिक्रिया
23 Jul 2017 - 12:50 am | डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम इमारती आहेत या... केवळ स्थापत्याच्याच दृष्टीनेच नाही तर अंतर्गत सजावटही तोडिस तोड आहे. अश्या जागी मी एक स्थानिक वाचक म्हणून गेलो तर पहिला आठवडाभर इमारतींचे निरिक्षण करण्यातच घालवीन. वाचन वगैरे नंतर करता येईल ! :)
डीसीमधले बरेच काही, "गेले पहायचे राहूनी", याची तुम्ही वारंवार आठवण करून देत आहात !
26 Jul 2017 - 9:52 am | जुइ
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
लायब्ररी ऑफ काँग्रेसमधे फारसा वेळ घालवता न आल्याने तसेच तिथल्या गायडेड टूरची वेळ न जुळल्याने आमची अवस्थाही दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखी झाली :-) .
25 Jul 2017 - 5:22 am | रुपी
अप्रतिम!
फोटो तर सुंदर आहेतच, लेखनही खूप माहितीपूर्ण आहे. धन्यवाद!
25 Jul 2017 - 2:01 pm | पद्मावति
उत्तम लेखन आणि खुप सुरेख फोटो.
29 Jul 2017 - 4:00 am | इडली डोसा
ही लायब्ररी म्हणजे वाचनालय अधिक संग्रहालयचं दिसतयं मस्तपैकी, माहिती आणि फोटो दोन्ही आवडले.
29 Jul 2017 - 6:15 pm | पलाश
सुरेख माहिती व छायाचित्रे असलेली ही मालिका खूप उपयोगी आहे. फार आवडली.
1 Aug 2017 - 3:49 pm | पैसा
फोटो सुरेख आणि लिखाण अतिशय माहितीपूर्ण झाले आहे.
14 Aug 2017 - 9:49 am | जुइ
सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद.
पाचवा भाग नुकताच प्रकाशित केला आहे.