आधीच्या तीन भागांची लिंक
http://www.misalpav.com/node/39750
http://www.misalpav.com/node/39761
http://www.misalpav.com/node/39789
"उल्लू बनवतं का बे सायच्या मले?" गब्ब्यांन बबन्याच्या कानाखाली मारली.
"काय झालं बे? काऊन मारतं मले?
"इमानाची वेळ काय सांगतली मले तू?"
"सात वाजता हाय ना सायंकाळच्या."
"सात वाजता?"
"हो मंग."
"मंग हे काय लिहेल हाय इथं? एकोणीस वाजता? घडाळ्यात एकोणीस वाजताना तुया बापानं पायलते का कधी?"
"अबे च्यामायबीन!! कोन्या जमान्याचा अडाणी हायेस बे तू गब्ब्या. अबे चोवीस ताशी घड्याळ व्हय ना ते! एकोणीस म्हंजे सायंकाळचे सातंच होते ना राजा."
"खरं सांगतं काय तू?"
"हो ना बे"
"असं हाय नाही मंग ते. माफ करजो बबन्या लेका चूक झाली उलशीक."
"हाव! तुमी चुका करा अन आम्हाला कानफाटा च्यामायबीन!!"
"जौदे दे ना लेका बबन्या."
"बरं..तयारी झाली का तुयी? उद्या जायचं हाय ना बावा."
"अबे लग्नात बी येवढी तयारी नसनं केली अशी तयारी सुरु हाय माया घरी."
"ते जौदे..बाबू रे आधार कार्ड घेतले का त्वां तिघाइचे? ते दाखवा लागीन तिथं."
"हाव घेतले ना..."
अन एकदाची ते सकाळ उगवली बा!! आज गब्ब्या अन फ्यामिली इमानात बसाले जाणार व्हते. गब्ब्याच्या बायकोला तं काय करू अन काय नाही असं झालं होतं. जेवनाचं सामान म्हनून भाकऱ्या,थालिपीठं, चटण्या,लोणचे,मेतकूट,लाडू,चिवडे काही इचारू नका. त्येच्यात शेजारपाजारचे आणखी दोन दोन -तीन तीन भाकऱ्या आणून देत होते. उन्हाच्या भाकऱ्या खराब होतींन म्हून बबन्याच्या मायनं दुधाच्या दशम्या देल्ल्या कागदात गुंडाळून. अन गब्ब्या बिचारा धा-धा वेळा बॅग भरू भरू परेशान झाल्ता. फक्त जेवणाच्या सामानाच्या पाच पिशव्या झालंत्या. अन तिघाईच्या मिळून तीन बॅगा अन तीन पिशव्या.पान्याची एक पिशवी.
निघायची वेळ झाली. अन बबन्या आला गब्ब्याच्या घरी. बबन्यानं सामान बघून गब्ब्याले जरा साईडले घेतलं.
"काबे भयकान्या!! तू सायच्या इमानात फिरायले चाल्ला का तिथं जेवनाचे डब्बे पोचवायले चाल्ला?"
"काय झालं बे आता?"
"अबे येवढं सामान घेत असते का गब्ब्या? हे सामना उचलायले आणखी दोन मानसं घ्या लागतींन सोबत."
"मी उचलतो ना बे."
"अबे गब्ब्या..तिथं एरपोर्टवर सारं सामान मशिनीच्या आतून चेक करा लागते. अन तू टाक त्या मशिनीत लोणच्याच्या बरन्या."
"मंग काय होते त्यानं?"
"हाव टाक ना..मंग सांडू दे लोणचं आतमध्ये. अन एकेक भाकरी देजो तिथल्या पोलिसाले. खा म्हना बा लोणच्यासोबत."
"हे माया लक्षात न्हाय आलं लेका बबन्या. मंग आता बे?"
"सामान कमी कर पाच मिनिटात. जेवनाची एक पिशवी घे फक्त. ते बी लोणचे-गिनचे घेऊ नको. जाय लौकर."
सामान-सुमान कमी करून गब्ब्या घराबाहेर आला. घरात त्येच्या बायकोचं नटनं सुरूच होतं अजून. थोडं सामान येष्टी स्टॅन्डवर नेऊन ठेवावं या विचारानं गब्ब्या घराबाहेर आल्ता. बाहेर येऊन पायते तं सारं गाव जमा झालेलं. नाही म्हणलं तरी सत्तर-ऐंशी टाळके तरी जमलेच होते. दोन-चार पोट्टे गब्ब्याच्या हातातल्या पिशव्या पकडायले समोर आले.
"अबे राहूद्याना पोट्टेहो..इथं बाजूले तं हाय स्टॅन्ड."
"ओ गब्ब्या..कायले जातं स्टॅन्डवर? इकडं ये.," बबन्या हसत म्हनला.
बबन्यानं होबासक्या करून गब्ब्यासाठी टॅक्सी बोलावून ठेवली होती.
"हे गाडी कोणाची हाय बे बबन्या?"
"भाड्याची हाय. ह्याच्यात बसून जाय नागपूरले. तीन-चार घंट्यात पोहोचशीन."
"हा शानपना करायला कोन सांगितलं तुले? ह्याच भाडं तुया बाप देईन का?"
"काय भाड्याचं घेऊन बसला बे गब्ब्या. इमानात बसून चाल्ला ना लेका तू. उलशीक तरी इज्जत ठेव लेका त्या इमानाची!!"
"कायची इज्जत बे?"
"गब्ब्या ऐक मायं..एक तू चाल्ला सारं लचांड घेऊन. त्यात येष्टीनं जाशीनं. नागपूर एरपोर्टले ऑटोत बसून जाशीनं काय? आतमध्ये घेतीन का तुले तुय सारं ताल बघून? टॅक्सित बसून गेला तं जरा स्टॅण्डर वाटते."
गब्ब्यांनं डोक्याला हात मारला. त्याले आनखी तीन-चार हजाराचा बांबू बसला होता. त्यानं गपचिप सामान टॅक्सित ठेवलं. अन बायकोले आवाज देल्ला. गब्ब्याची बायको बाहेर आली.
अ हा हा हा...काय वर्णावं तिचा अवतार!! नवीकोरी जरीची नव्वार,नाकात नथ,चेहऱ्यावर नट्टापट्टा, केसांची ह्येरश्टाईल केलेली. नव्या नवरीले मांडवात घेऊन येते तश्या दोन-चार बायका तिच्या मागं उभ्या होत्या.
बबन्याला हे बघून मस्करी सुचली,
"गब्ब्या..वैनीच्या मामाले नाही घेतलं का बोलावून? त्याईनं आनलं असतं तिले खांद्यावर घेऊन!!"
"हाव बोलावतो ना! तू जाय बामनाले घेऊन ये...अन दोन मुंडावळ्या घेऊन ये बाजारातून..बसतो म्या बाशिंग बांधून!! च्यामायबीन लय मजा येऊ राहिली न्हाय तुले?"
"चिल्लावतं कायले बे?"
कसंतरी करून गब्ब्यानं तिले अन राम्याले गाडीत बसवलं. गाडी सुरु झाली. तश्या बबन्याच्या सूचना सुरु झाल्या.
"गब्ब्या हे पाय तिकीट सांभाळून ठेवजो."
"अन जमत नसनं तं फालतू इंग्लिश फाडू नको तिथं."
"अन राम्याले तो सीटबेल्ट व्यवस्थित बांधजो."
"अन जास्त घुरून पाहू नको त्या ऐरहोष्टेशकडे!!"
"अन आपल्या दारूचं भुलजो नको."
गाडी निघाली.
चार तासांच्या प्रवासात राम्याले सहा वेळा भूक अन चार वेळा सु-शी लागली. गाडी थांबत थांबत नागपूरला पोहोचली. डायव्हरले एरपोर्ट माहिती नसल्यामुळे गावातल्या गावात २ चकरा झाल्या. शेवटी कशीबशी गाडी एरपोर्टला पोहोचली. गब्ब्यानं सारं सामान खाली उतरवलं. टॅक्सीवाल्याले पैसे दिले.
एरपोर्टची येवढी मोठी इमारत बघून त्याले कुटून आतमध्ये जाचं ते कळेना. शेवटी कोनाले तरी इचारून गब्ब्या त्या गेटच्या समोर उभा राहिला. गब्ब्यांनं एकदा बायकोकडे,राम्याकडे अन सामानाकडे बघितलं. त्याले राहून राहून एकच प्रश्न पडत होता,
"आपला भैताडवानाचा चेहरा अन हे लचांड बघून घेतीन का आपल्याला आतमध्ये??"
क्रमशः
प्रतिक्रिया
16 May 2017 - 3:39 pm | अमोल काम्बले
च्यामायबीन एकडाव अजुन येक नम्बर......
16 May 2017 - 3:47 pm | टवाळ कार्टा
=))
16 May 2017 - 6:09 pm | पद्मावति
=))
16 May 2017 - 6:10 pm | पैसा
मस्त चाललय इमान!
16 May 2017 - 7:03 pm | आनंदयात्री
हा हा हा. पुढच्या भागात खरी मजा आणणार तुम्ही चिनारसाहेब. अगदी वऱ्हाड निघालायच्या तोडचा विनोद आहे. चारही भाग अतिशय आवडले.
16 May 2017 - 7:42 pm | चिनार
धन्यवाद!
17 May 2017 - 7:09 am | इरसाल कार्टं
कहर केलात
17 May 2017 - 3:48 pm | प्राची अश्विनी
मजा येतेय वाचायला.
17 May 2017 - 4:14 pm | अद्द्या
या पुढे वाचलंच नाही अजून
यायचा घो.. चुकी केली आणि जेवताना वाचायला घेतलं हे.. भात अडकला घशात .. मधेच मेलो बिलो तर तुमच्यावर नाव =))
जेवण करून मग वाचतो ..
मस्त चाललंय साहेब.. लवकर टाका पुढचे भाग
17 May 2017 - 5:04 pm | संजय पाटिल
धमाल आहे राव!!!!
*ROFL*
17 May 2017 - 10:37 pm | चिनार
धन्यवाद!!