शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळमध्ये राणा शासनाचे शतक - नेपाळ भाग ८
श्री तीन राणाज्यूं को सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर नेपाळच्या सामान्यजनांचा बाहेरील जगाशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घेण्यात आली - अपवाद नेपाळी उमराव आणि गोरखा सैन्याचा.
सगळ्या नेपाळी सरदार-भारदारांच्या व्यक्तिगत सैन्य तुकड्यांना एका छत्राखाली आणून राणांनी आधी गोरखा सैन्यावर पूर्ण ताबा मिळवला. म्हणून खऱ्या अर्थाने एकजिनसी 'रॉयल नेपाल आर्मी' स्थापण्याचे श्रेय राणा शासकांचे. सुगौलीच्या तहानंतर (वाचा- नेपाळ भाग ५) काठमांडूच्या दरबारात ब्रिटिश प्रतिनिधीची नियुक्ती घडून आली होती. ह्या पदावर हमखास ब्रिटिश सैन्यातील किंवा होम डिपार्टमेंटमधील उच्चाधिकाऱ्याची नेमणूक होत असे. त्याची नेपाळच्या स्थानिक प्रशासनात आणि अर्थातच लष्करी आणि व्यापारी निर्णयप्रक्रियेत ढवळाढवळ असायची. सुगौलीच्या तहामुळे ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणावर शूर-काटक गोरखा सैन्य उपलब्ध झाले होते, आणि त्याचा हवा तसा वापर करायची मोकळीक सुद्धा. गोरखा सैनिकांची भरती, निवड-चाचण्या, त्यांच्या पलटणींचे प्रशिक्षण, त्यांचे पगारपाणी हे विषय काठमांडूतील ब्रिटिश प्रतिनिधीच हाताळत असल्यामुळे पुढे त्या पदाचे प्रस्थ प्रचंड वाढले. ते ओळखून राणा शासकांनी ब्रिटिश प्रतिनिधींशी आणि एकूणच ब्रिटिश राजवटीशी मधुर संबंध स्थापित करून स्वतःचे आसन अधिक बळकट केले. १८५५ नंतर तर पंतप्रधानपदी आरूढ होण्यासाठी मिरवणुकीने जाण्यापूर्वी नवीन राणाज्यूंनी देवदर्शनाच्याही आधी ब्रिटिश रेसिडेंटला भेटून त्याच्या शुभेच्छा (आणि अर्थातच काही मागण्या) स्वीकार करण्याची पद्धत पडली!
गोरख सैन्याने १८४८ -४९ दरम्यान शेर-ए-पंजाब महाराजा रणजितसिंहाच्या शीख सैन्याविरुद्ध आणि पेशावर-मुलतानमध्ये अफगाणिस्तानच्या खानशी लढताना ब्रिटिशांना मोलाची सैन्य मदत केली. भारतात उसळलेल्या १८५७ च्या क्रांतिपर्वात ब्रिटिशमित्र असलेल्या (उदा. ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर इ.) भारतीय शासकांच्या पदरी असलेल्या सैन्यावर ब्रिटिशांचा विश्वास थोडा डळमळीत झाला होता. त्यावेळी गोरख सैन्य मात्र अगदी प्राणपणाने ब्रिटिशांच्या बाजूने लढले. पहिल्या (१९१४-१९१८) आणि दुसऱ्या महायुद्धात (१९३९-१९४५) गोरख सैन्य जगभरातील अनेक दुर्गम प्रदेशात लढले. अश्या जवळपास प्रत्येक युद्धात / मोहिमेवर राणा कुटुंबीय प्रत्यक्ष सहभागी होत - नव्हे, ते नेहमीच आघाडीवर असत. ब्रिटिश सैन्यातर्फे जगभर लढणाऱ्या गोरखा सैन्य तुकडीचे नेतृत्व हमखास एखाद्या राणा राजपुत्राकडे असे. त्यामुळे सर्व स्तरावरील ब्रिटिश अधिकाऱ्यांशी ओळख - सलगी - मित्रता - घनिष्टता असे टप्पे ओलांडत राणांचे अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांशी घरोब्याचे संबंध जुळले आणि त्यांचा पूर्ण विश्वास जिकंण्यात राणांना यश आले. हे संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊन जवळपास २०० वर्षे सलोख्याचे आणि परस्पर विश्वासाचे राहिले याचे श्रेय राणा शासकांना नक्कीच आहे. आजही ब्रिटिश लोकांना नेपाळमध्ये विशेष अगत्याची वागणूक मिळते, सेवानिवृत्त गोरखा सैनिकांसाठी ब्रिटिश सरकार मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करते, अनेक उच्चभ्रू -समृद्ध नेपाळी नागरिक सहज ब्रिटिश नागरिकत्व मिळवतात - ब्रिटनमध्येच स्थायिक होतात / सुट्ट्या-सहलींसाठी जातात, मोठा ब्रिटिश मित्रपरिवार बाळगून असतात - त्याचे मूळ इथे आहे.
श्री तीन राणाज्यूं सरकार शतकभर सत्तेवर होते. ह्या कालावधीत शेजारी भारतात ब्रिटिश सत्ता स्थिरावली होती आणि दिवसेंदिवस श्रीमंत होत होती. सर्व मोठी भारतीय संस्थाने ब्रिटिश ताब्यात आली होती. ब्रिटिशधार्जिण्या भारतीय संस्थानिकांशी राणाज्यूंचे संबंध अर्थातच उत्तम होते. त्यात त्यांनी स्वतःच्या अनेकानेक राजकन्यांचे विवाह अश्या श्रीमंत आणि शक्तिशाली भारतीय संस्थानिक कुटुंबामध्ये करून आपले संबंध अधिकच घट्ट केले होते. हिमालयाच्या तराई भागात शिकारीसाठी, हुगळीच्या (कोलकत्याच्या) दमट गजबजाटापासून सुटका म्हणून, तिबेट/चीनमध्ये व्यापारासाठी ये-जा म्हणून ब्रिटिश उच्चाधिकाऱ्यांना नेपाळमध्ये मुक्त प्रवेश आणि विशेष आतिथ्याची सर्वच राणा शासकांची भूमिका होती. आंतरराष्ट्रीय संबंधात ज्याला 'गुडविल हंटिंग' म्हणतात त्यात सर्व राणा शासक तरबेज होते असे म्हणता येईल.
स्वतः जंगबहादूर राणा आणि त्यानंतर सत्तेवर आलेल्या त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना ब्रिटिश लोकांचे, त्यांच्या जीवनशैलीचे विशेष आकर्षण होते. जंगबहादूर नेपाळमध्ये स्वतःचे स्थान स्थिरस्थावर झाल्यानंतर जवळपास तीन वर्षे ब्रिटन आणि अन्य युरोपियन देशांच्या प्रदीर्घ दौऱ्यावर गेला. ह्या दौऱ्यामुळे त्याला ब्रिटिश सत्ता आणि त्यांच्या राजकारणाचा, सत्ता-तंत्राचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळाली. ब्रिटिशांचे लिखित नियमावली असलेले कायदे-कानू त्याला आवडले. नेपाळमध्ये परतल्यानंतर त्याने केलेल्या राजकीय सुधारणांमध्ये 'मुलकी ऐन' हा लिखित कायदा ताबडतोबीने अमलात आणला गेला, त्यामुळे राज्यकारभार आणि न्यायदानाच्या कामात एक प्रकारची सुसूत्रता आली.
काठमांडू शहरात ब्रिटिश उमरावांसारखे अतिप्रचंड विस्ताराचे चुना-विटांमध्ये (नेवार शैलीतील लाकडी नव्हे) बांधलेले निओ-क्लासिकल शैलीतील भव्य महाल (ह्यातील एक महाल तर तत्कालीन काठमांडू शहराच्या बरोब्बर दुप्पट क्षेत्रफळ असलेल्या जागेत बांधण्यात आला!), जवळपासच्या जंगलात शिकारीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाश्चात्य शैलीत बांधलेल्या गढ्या-किल्ले, फ्रेंच-ब्रिटिश पद्धतीचे उंची फर्निचर, दोन पुरुष उंचीचे आरसे असलेले महाल, गरम पाण्याचे तरण तलाव, विजेवर चालणारे दिवे, राजवाड्याच्या आवारातल्या आवारात फिरण्यासाठी एक आगगाडी (!) असा थोडाफार विकास काठमांडू शहरात झाला पण तो फक्त राणाज्यूंच्या मालकीच्या जागेतच. एक मात्र आहे, राणाज्यूंनी बांधलेल्या जवळपास सर्वच इमारतींची गुणवत्ता दृष्ट लागेल इतकी चांगली होती. अनेक वर्षांनंतर आणि २-३ मोठ्या भूकंपांना तोंड देऊनही यातील अनेक इमारती आजही उभ्या आहेत. त्यात स्वतः राणाज्यूं आणि कुटुंबातील स्त्रियांची पाश्चात्य शैलीची राजसी वेशभूषा आणि राहणी, शाही जामानिमा, रोज महालाच्या आवारात होणारे पोषाखी सैनिक तुकड्यांचे शाही संचालन, स्वतःला दररोज सैनिक मानवंदना ......... राणांनी तत्कालीन ब्रिटिश राजेशाहीच्या सर्व खाणाखुणा आणि प्रचलित 'फ्याशन' नेपाळला आयात केली.
हे सर्व विलासी प्रकार काठमांडूत होत असले तरी सामान्य नेपाळी जनता ही गरिबी, नैसर्गिक विपत्ती, अज्ञान, सामाजिक कुप्रथा आणि कुपोषणाच्या मूलभूत प्रश्नांशी झगडत होती. सामाजिकदृष्ट्या नेपाळी समाज फारच मागासलेला होता, रूढी परंपरा, जातीवाद, धार्मिक शोषण, बालविवाह, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा यांनी वेढलेला. समाजात प्रतिष्ठित आणि सामान्यजन असे सरळ दोन तट पडले होते. जनतेला कुठलेही स्वातंत्र्य नव्हते. ब्रिटिशांशी असलेल्या घनिष्ठतेमुळे राणांचे बळ प्रचंड होते, त्यात सर्वत्र कुटुंबाचेच राज्य असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची कोणाची हिम्मत नव्हती.
अर्थात राणा राजवटीच्या नावावर काही सत्कृत्येही आहेत. पारंपरिक शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नाला उतारा म्हणून नेपाळमध्ये चहाचे मळे फुलवण्यात आले ते राणा राजवटीच्या सक्रिय समर्थनानेच. पण ह्यात एक गोम होती - जवळपास सर्व चहा मळ्यांची मालकी राणा कुटुंबाचीच! काही लघु उद्योग, शेती व शेतमालावर आधारित उद्योगधंद्याची मुहूर्तमेढ, नद्यांवर धरणे - कालवे आणि मुख्यतः सगळ्यांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण, स्त्रियांना संपत्तीत वाटा, असे काही चांगले बदल घडले.
शेजारी भारताप्रमाणे इथेही सती प्रतिबंधक कायदा आणि गुलाम-व्यापारास बंदीचे कायदे आले पण पूर्णतः यशस्वी ठरले नाहीत. सतीबंदीचा कायदा तर फक्त ब्रिटिश सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना अल्पवयीन विधवा मुली लैंगिक शोषणासाठी उपलब्ध करण्यासाठीच केला की काय अशी परिस्थिती अनेक वर्षे होती. विधवा पुनर्विवाह पुढे हळूहळू समाजात रुजला. गुलाम व्यापार बंदीचा चांगला भाग असा की तथाकथित शूद्र जातीत जन्मलेल्या, वेठबिगारीचा शाप भोगत असलेल्या कुटुंबातील अनेक तरुण मुलांना दास्यातून मुक्ती मिळाली आणि गोरख सैन्यात मानाचे जीवन जगण्याची एक संधी उपलब्ध झाली. सर्वांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी १०० शाळा स्थापित झाल्या. 'गोरखपत्र' नावाचे एक वर्तमानपत्र सुरु करण्यात आले (ते आजही सुरु आहे !). पण हे सर्व भारतातल्या ब्रिटिश राजवटीसारखे होते. सत्ताधाऱ्यांसाठी सोयीस्कर ते सर्व बदल स्वीकारले गेले पण सामान्य जनतेचा पुसटसाही विरोधी स्वर पाशवी बळाने चिरडण्यात राणा शासक कोठेही ब्रिटिशांपेक्षा कमी नव्हते.
असे अनेक दशके चालल्यामुळे सर्वसामान्य नेपाळी जनतेला सामंती / एकाधिकार राबवणाऱ्या, धार्मिक आणि सामाजिक बाबतीत लोकांना त्यांच्या-त्यांच्या 'स्टेटस' प्रमाणे अगदी काटेकोरपणे वेगळे वागवणाऱ्या शासन आणि समाजव्यवस्थेची सवय झाली.
दरम्यानच्या काळात सर्व राणा पंतप्रधानांनी आणि त्यांच्या बंधूंनी केलेली अनेक लग्नें, बाळगलेली अंगवस्त्रे आणि प्रेमिका - त्यातून जन्मलेले अनेकानेक औरस-अनौरस राजपुत्र-राजकन्या असा एक प्रचंड मोठा राणा परिवार तयार झाला. तीन-चार दशकातच जंगबहादूर राणांनी ठरवलेली उत्तराधिकाराची 'रोटा' पद्धत ह्या प्रचंड मोठ्या गोतावळ्याच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात कमी पडू लागल्याचे दिसताच तत्कालीन राणा पंतप्रधानांनी ह्या राजपुत्राची व A -क्लास, B-क्लास आणि C -क्लास राणा अशी वर्गवारी करून त्यांना त्यांच्या वर्गाप्रमाणे पदांचे वाटप ठरवले. पण व्यक्तिगत महत्वाकांक्षा आणि बंधू-मत्सराचा रोग कोणाला चुकला आहे ? त्यामुळे ह्या गोंधळात अनेक राणा राजपुत्र दुखावले आणि सत्ताबदल घडवण्यासाठी सरसावले.
चाळिशीचे दशक लागले आणि स्वतःच्याच प्रचंड पसाऱ्यात गुंतलेला आणि विलासी राहणी, व्यक्तिगत हेवेदावे, भाऊबंदकी आणि अति-महत्वाकांक्षी राणा राजपुत्रांची प्रचंड मोठी संख्या अश्या व्याधींनी ग्रासलेले राणा तंत्र स्वतःच्याच ओझ्याखाली डचमळू लागले. पण नेपाळमध्ये राणा शासनाचे सर्वव्यापी रूप बघता त्यांना कोठलाही पर्याय नव्हता.
एव्हाना शेजारच्या भारतात स्वातंत्र्याचे वारे वादळाचे रूप प्राप्त करते झाले. १९३९-१९४५ दरम्यानच्या दुसऱ्या महायुद्धानंतर भारतीय स्वातंत्र्याची चळवळ प्रखर होऊन त्याची परिणीती भारतातून ब्रिटिश सत्तेचे उच्चाटन होण्यात झाली आणि १९४७ साली भारतात भारतीय लोकांचे स्वतःचे सरकार स्थापन झाले. लवकरच भारतातील शेकडो संस्थाने एका सलग, स्वतंत्र लोकशाही राज्यात विलीन होण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि जागोजागी राज्यकारभार लोकांच्या प्रतिनिधींकडे प्रत्यक्ष हस्तांतरित होऊ लागला. लवकरच १९५१-५२ भारतात पहिल्या मुक्त सार्वत्रिक निवडणुकाही घडून आल्या - 'एक व्यक्ती एक मत आणि प्रत्येक मताची एकच किंमत' हे तत्वज्ञान प्रत्यक्षात उतरले.
भारतातल्या ह्या सर्व घटनांचा प्रतिध्वनी हिमालयाच्या देशात उमटला नसता तरच नवल ........ तसा तो उमटलाच आणि पुढे 'सात सालको क्रांती' म्हणून ओळखल्या गेलेल्या मर्यादित लोकशाहीच्या पहिल्यावहिल्या नेपाळी प्रयोगाची नांदी ठरला !
थोडे अवांतर -
भारताच्या फाळणीतून पाकिस्तान जन्माला आला आणि ब्रिटिश साम्राज्याचा पूर्वी कधीही न मावळणारा सूर्य अस्ताला लागला. (पुढे भारताच्या सक्रिय सहभागाने त्याचा पूर्व पाकिस्तान हा भाग मुक्त होऊन स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली) १९४८ मध्ये सिलोन (आता श्रीलंका) ब्रिटिश जोखडातून मुक्त झाला. ४ जानेवारी १९४८ ला बर्मातही (आता म्यांमार) स्वातंत्र्याची पहाट उगवली. नेपाळ ह्या आपल्या शेजारी देशाला मात्र 'स्वतंत्रता दिवस' नाही, कारण नेपाळ कधीच परकीय अमलाखाली नसलेला आशियातील एकमेव देश आहे !
क्रमशः
प्रतिक्रिया
7 Apr 2017 - 6:52 pm | एस
वाचतोय. पुभाप्र.
7 Apr 2017 - 7:44 pm | अस्वस्थामा
हम्म.. वाचतोय.
पण जर सगळंच काढून इंग्रजांना असं दिलं असेल तर त्याला 'स्वातंत्र्य' कसं म्हणावं. त्यांची आणि संस्थानिकांची अवस्था सारखीच होती की जवळपास.
हे टेक्निकली बरोबर असलं तरी तितकंसं खरं नाही म्हणायचं.
21 Apr 2017 - 6:28 am | अनिंद्य
@ अस्वस्थामा,
बात में दम है :-)
पुढील भागांमध्ये विषय थोडा अधिक क्लीअर होईल.
प्रतिक्रियेबद्दल आभार !
8 Apr 2017 - 7:49 am | अनन्त अवधुत
पुभाप्र.
21 Apr 2017 - 6:25 am | अनिंद्य
@ एस,
@ अनन्त अवधुत
प्रतिक्रियांबद्दल आभार !
21 Apr 2017 - 7:23 am | यशोधरा
वाचते आहे, लेखमालिका आवडते आहे.
28 Apr 2017 - 1:48 pm | अनिंद्य
@ यशोधरा,
आभार !
28 Apr 2017 - 7:14 pm | शलभ
छान लेखमालिका..पण लवकर येऊद्या..अजून बरेच शेजारी देश बाकि आहेत..:)
9 May 2017 - 10:56 am | अनिंद्य
@ शलभ
आभार ! लवकरच मालिका लिहून संपवतो :-)
28 Apr 2017 - 11:31 pm | diggi12
पुढचा भाग कधी ?
9 May 2017 - 11:02 am | अनिंद्य
@ diggi12
लवकरच.
19 May 2017 - 2:30 pm | अनिंद्य
@ शलभ,
@ diggi12
पुढील भाग प्रकाशित केला आहे,
संपादकांना तो अनुक्रमणिकेला जोडण्यासाठी विनंतीही केली आहे.
5 Aug 2017 - 3:03 am | रुपी
छान लिहिलंय.
हा भाग बर्याच गॅपनंतर वाचला, आता पुढचे लवकर वाचते :)
5 Aug 2017 - 12:44 pm | अनिंद्य
@ रूपी,
जरूर.
तुमच्या सदस्यनामाला परफेक्ट चित्र लावले आहे तुम्ही !