वेणू

कौतुक शिरोडकर's picture
कौतुक शिरोडकर in जे न देखे रवी...
20 Feb 2009 - 8:49 am

चोरून पावा, वरी कांगावा
नाही लागली हाती
तुच शोध की, तुझी लाडकी
शोधू कशा मी सवती
सावळ रंगी बावळी राधा
भांडत बसली कॄष्णाशी
दिड दमडीची, नळी बांबूची
सोड तिला, बोल माझ्याशी
माझ्या कृष्णा रं, माझ्या कान्हा रं

निर्जीव तरी, द्वाड खरी
पिडते सार्‍या वृंदावना
ओठासंगे, जेव्हा लागे
लबाड, वेड लावी मना
रोज कटीला घेऊन फिरशी
लळा तिचा का इतका तुला
गोप गोपिका, झुरती फुका
चिंता कशी ना त्यांची तुला
माझ्या कृष्णा रं, माझ्या कान्हा रं

बैस समोरी, कधी मुरारी
तुला पाहू दे शुद्धीत
नकोच अडसर, कुठला कणभर
रंगू सावळ्या धूंदीत
तुझ्या भक्तीने भरली घागर
उतू जाऊ दे डोळ्यातून
काया वेणू, झाली जणू
सूर प्रीतीचे ओथंबून
माझ्या कृष्णा रं, माझ्या कान्हा रं

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

अभिष्टा's picture

20 Feb 2009 - 11:02 am | अभिष्टा

कौतूक, छान लिहिलीयस !
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.