शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळ-७

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
27 Mar 2017 - 4:35 pm

शेजाऱ्याचा डामाडुमा -नेपाळमध्ये राणा राजवट - बहर - भाग ७

थरारक 'कोट' पर्वानंतर पंतप्रधानपदी आरूढ झालेल्या जंगबहादूर कुंवरने शौर्यदर्शक राजसी 'राणा' हे उपनाम धारण केले आणि स्वतःची सत्तेवरील पकड बळकट करण्यासाठी जे जे करता येईल ते करायचा सपाटा लावला. सर्वप्रथम नेपाळच्या जवळपास सर्व महत्वाच्या राजकीय, न्यायालयीन, मुलकी आणि सैनिकी पदांवर त्याच्या भावांची-मेव्हण्यांची-कुटुंबकबिल्याची नियुक्त्ती घडवून आणली.

त्याला आता राजे राजेंद्र किंवा कांचामहारानी राजलक्ष्मीचा काही उपयोग नव्हता. त्यांना आधी काही दिवस नजरकैदेत ठेवले आणि नंतर संधी मिळताच देशाविरुद्ध कट-कारस्थाने केल्याचा(!) आरोप ठेवून भारतात काशीला निर्वासित केले. अवघे १६ वर्षे वय असलेल्या सुरेंद वीरबिक्रम शाहला कळसूत्री नरेश बनवून जंगबहादूर राणा नेपाळचा खरा राज्यकर्ता बनला.

नेपाळच्या पंतप्रधानपदी स्थिरस्थावर झाल्याझाल्या जंगबहादूर राणाने एक काम केले म्हणजे 'लामजंग आणि कास्की' ह्या नेपाळी प्रांताचा 'महाराजा' घोषित करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला! म्हणजे अन्य सरदारापेक्षा स्वतःला वेगळे आणि नेपाळ नरेशांसारखे परंपरागत 'महाराजा'पदी स्थापित केले. स्वतःला नेपाळनरेशांसारखाच पण श्री श्री श्री श्री श्री (लघुरूप ‘श्री पांच’) ऐवजी 'श्री तीन' खिताब, तसाच हिरेमाणकांचा पांढरी पिसं असलेला राजमुकुट आणि राजासारखाच भरजरी पोशाख, नेपाळी सरसेनापतीचा शाही मानमरातब आणि 'प्रोटोकॉल' असली सर्व सत्ताप्रदर्शनाची बाह्य साधने सिद्ध करून 'राणा' हे पद कुंवर परिवाराला वंशपरंपरागत केले. त्याला अर्थातच दुर्बळ नेपाळनरेशाच्या सहीशिक्क्याने फर्मान काढून कायदेशीर मान्यता मिळवली. नेपाळसारख्या दुर्गम आणि मागासलेल्या प्रदेशात ही व्यवस्था किती दूरगामी विचाराची होती हे पुढे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले.

जंगबहादूर राणाची दुसरी असामान्य खेळी होती नेपाळच्या पंतप्रधानपदाला स्वतःच्या कुटुंबासाठी वंशपरंपरागत करताना उत्तराधिकारी निवडण्याच्या विशिष्ट पद्धतीची. त्याकाळी जगभर जवळपास सर्व राजकुलांमध्ये (अपवाद काही स्लोवाक आणि तुर्क राजकुले) 'मेल प्रायमोजेनीचर' पद्धतीचे प्रस्थ असताना राणांनी स्वतःसाठी मात्र वेगळी पद्धत निवडली. मेल प्रायमोजेनीचर पद्धतीत राजाचा सर्वात मोठा औरस मुलगा प्रथम उत्तराधिकारी (युवराज) असतो आणि त्याच्यानंतर राजाच्या अन्य औरस पुत्रांचा त्यांच्या वयाप्रमाणे क्रम असतो. राजाच्या सर्व औरस पुत्रांनंतर त्याच्या धाकट्या भावांचा वयाच्या जेष्ठतेनुसार क्रम असतो. अर्थात युवराजाच्या जेष्ठ औरस पुत्राचा क्रम नेहेमी राजाच्या वयानी लहान भावांपेक्षा कायम वरच असतो - ही झाली त्याकाळी प्रचलित व्यवस्था.

राणांनी स्वतःसाठी त्याकाळी स्लोवाकिया सोडला तर इतर कुठेही फारशी प्रचलित नसलेली 'रोटा' (स्टेअरकेस) पद्धत पसंत केली. ह्या पद्धतीत राजगादी पित्याकडून सर्वात जेष्ठ औरस राजपुत्राकडे न जाता राजापाठच्या लहान भावाला जाते. मग त्यापेक्षा लहान भाऊ, आणि त्या पिढीतील सर्व औरस राजपुत्राचा क्रम झाल्यानंतर उत्तराधिकार पुन्हा सर्वात मोठ्या भावाच्या हयात असलेल्या सर्वात जेष्ठ औरस राजपुत्राकडे अशी काहीशी गुंतागुंतीची रचना असलेली ही पद्धत. पण ह्यात सर्व भावांना पद मिळून भाऊबंदकी होणार नाही असा उद्देश. स्वतःला असलेली मुले, स्वतः चे नऊ भाऊ आणि प्रत्येकाची अनेक मुले लक्षात घेऊन ही पद्धत राणांनी निवडली असावी. ह्या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा काही असेल तर पंतप्रधानपदी अल्पवयीन व्यक्ती असण्याची शक्यता जवळपास नाहीच. अल्पायुषी शाह राजांच्या अनुभवावरून राणांनी धडा घेतला तो असा. (सध्या राजेशाही असलेल्या देशात बऱ्याच अरब राजवटी उत्तराधिकारी निवडण्यासाठी ही ‘रोटा’ पद्धत वापरत आहेत)

त्यातच नेपाळ नरेशांच्या बहिणींशी स्वतःच्या परिवारातील मुलांची आणि अल्पवयीन नेपाळ नरेशाशी स्वतःच्या मुलींची लग्ने लावून त्याने शाह-राणा परिवारांचे भविष्य एकमेकांशी घट्ट जोडले. ह्या दुहेरी लग्नासंबंधांमुळे भविष्यतही राणा वर्चस्वाला आव्हान निर्माण होऊ नये अशी तजवीज झाली.

यथावकाश दीर्घोद्योगी आणि दीर्घायुषी जंगबहादूर राणा निवर्तल्यानंतर एकूण नऊ राणा पंतप्रधान (तद्नुसार पदसिद्ध नेपाळ सरसेनापती तथा 'ग्रँड मास्टर ऑफ रॉयल ऑर्डर्स') झालेत. बहुतेक सर्व राणा राज्यकर्ते दीर्घायुषी ठरलेत आणि पहिल्या जॉर्जच्या वचनाप्रमाणे they had continuity of life, policy and peace to reign for long.

संपूर्ण राणा राजवटीत शाह राजांची अवस्था बरीचशी जपानच्या सम्राटासारखी होती. राजाला देवत्व प्रदान करण्यात आले होते, त्याचा जनतेशी अगदी कमीत कमी संपर्क येईल ह्याकडे राणांचे बारीक लक्ष होते. म्हणजे राजा म्हणायला श्रीविष्णूचा अवतार, परम आदरणीय, पूजनीय वगैरे पण सत्तेची सर्व सूत्रे फक्त राणांकडे. अगदी पंतप्रधानपदावर कोणाला बसवण्याचा किंवा पदच्युत करण्याचा अधिकार सुद्धा आता नेपाळ नरेशांना राहिला नाही कारण ते सुद्धा वंशपरंपरागत झाले होते. राजकीय आणि मुलकी प्रशासन, सैन्य, परराष्ट्र व्यवहार, व्यापार, न्यायपालिका - सबकुछ राणा अशी नेपाळची अवस्था झाली. हा काळ थोडाथोडका नाही तर १०४ वर्षे एव्हढा प्रदीर्घ होता आणि त्याचा नेपाळच्या राजकीय, आर्थिक, सैन्य आणि सामाजिक इतिहासावर असामान्य प्रभाव पडला.

थोडे अवांतर:

'यारास्लोव द वाईज' अशी बिरुदावली असलेल्या सध्या युक्रेन या देशाची राजधानी असलेल्या 'कीव आणि नॉव्हगोराद' नामक राज्याच्या एका हुशार स्लाव्ह वंशीय राजाने स्वतःच्या नऊ(च) भावांमध्ये भाऊबंदकी टाळण्यासाठी त्याच्या राज्यात ‘रोटा’ पद्धत इसवी १०१९ ते ११२३ च्या दरम्यान (एकूण १०४ वर्षे'च') वापरली होती. नेपाळच्या एका छोट्या खेड्यात जन्मलेल्या आणि लौकिकार्थाने अल्पशिक्षित असलेल्या जंगबहादूरकुंवरला ही माहिती असण्याची कुठलीच शक्यता नव्हती पण ....... पण इतिहास अश्या अनेक विचित्र योगायोगांचा गोफ असतो हेच खरे.

क्रमशः

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

साहित्य संपादक / संपादक मंडळी,

पुन्हा तीच चूक झाली आहे, ह्या भागात आधी प्रसिद्ध झालेल्या भागांची लिंक मी दिली नाही. ती देता येईल काय ?

अग्रिम आभार !

अनिंद्य's picture

28 Mar 2017 - 4:09 pm | अनिंद्य

@साहित्य संपादक / संपादक मंडळी,

ही 'अनुक्रमणिका' तर आधी असलेल्या सोयीपेक्षाही जास्त सुटसुटीत आहे.

आभार !

रांचो's picture

27 Mar 2017 - 6:04 pm | रांचो

डामाडुमा छान जमला आहे. हा भागपण छान व माहितीपुर्ण आहे.

अनिंद्य's picture

30 Mar 2017 - 1:32 pm | अनिंद्य

@ रांचो

मागील सर्व भाग वाचुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार !

अनन्त अवधुत's picture

28 Mar 2017 - 12:09 pm | अनन्त अवधुत

बऱ्याच दिवसांनी धागा दिसला.
नेपाळ बद्दल माहिती नसलेल्या खूप नवीन गोष्टी कळत आहेत . लेखमालेसाठी धन्यवाद!

अनिंद्य's picture

28 Mar 2017 - 4:00 pm | अनिंद्य

@ अनन्त अवधुत,
प्रोत्साहनाबद्दल आभार!
नेपाळ माझ्या आवडीचा विषय आहे :-)

सुनील's picture

28 Mar 2017 - 4:16 pm | सुनील

लेखमाला छान सुरू आहे.

राजाच्या निधनांतर राजपुत्राऐवजी राजाच्या भावाला राज्यावर बसवण्याची 'रोटा पद्धत' बहुधा शकांच्या काळात, मध्यभारतातील काही टिकाणी अस्तित्वात होती.

नक्की काळ आणि राज्ये कोणती ते पुनरेकवार वाचून पहावे लागेल.

अनिंद्य's picture

28 Mar 2017 - 4:39 pm | अनिंद्य

@ सुनील,

नवीन माहितीबद्दल आभार!

मध्य-पूर्वेत / अरब जगतात रोटा पद्धत आता बऱ्यापैकी स्थिरावली आहे हे माहित आहे पण शकांच्या उत्तराधिकारी निवडण्याच्या पद्धतीबद्दल मला कल्पना नाही. तुम्ही संदर्भ दिल्यास वाचायला आवडेल.

वरुण मोहिते's picture

28 Mar 2017 - 4:37 pm | वरुण मोहिते

भाग चालू आहेत

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Mar 2017 - 6:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहितीपूर्ण आहे सर्व मालिका. भाग जरा लवकर टाकलेत तर मागचे संदर्भ ताजे असल्याने माहितीत सलगता राहील व वाचायला अजून मजा येईल.

अनिंद्य's picture

29 Mar 2017 - 11:37 am | अनिंद्य

@ डॉ. सुहास म्हात्रे,
आभार!
तुम्ही म्हणता तसे हा भाग टाकायला जरा जास्तच उशीर झाला. काम-प्रवास-थकवा-आळस असे दुष्टचक्र होते :-) आता पुढील भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न असेल.

शलभ's picture

31 Mar 2017 - 9:26 pm | शलभ

+१
वाचत आहे. पुभाप्र.

अनिंद्य's picture

6 Apr 2017 - 10:51 am | अनिंद्य

@ शलभ

आभार, पूर्वी प्रसिद्ध केलेले भागही वाचावेत असा आग्रह !

पैसा's picture

30 Mar 2017 - 4:36 pm | पैसा

खूप इंटरेस्टिंग

अनिंद्य's picture

31 Mar 2017 - 11:35 am | अनिंद्य

@ वरुण मोहिते,
@ पैसा

आभारी आहे!
पूर्वी प्रसिद्ध केलेले भागही वाचावेत असा आग्रह करतो.