1856 च्या ऑगस्ट महिन्यात, जर्मनीमधल्या निअंडरथल दरीत काही मजूर काम करत होते, एका चुन्याच्या खाणीत त्यांना काही हाडं सापडली. अशी हाडं सापडण्यात फार विशेष काही नव्हतं पण तरी त्यांनी ती एका स्थानिक अभ्यासकाला दिली. सुरवातीला वाटलं की ही एखाद्या अस्वलाची हाडं असतील, पण जेव्हा ती नीट जुळवली गेली तेंव्हा त्यांनी एक वेगळाच ईतिहास समोर आणला, 40000 वर्षांपूर्वी नाहीशा झालेल्या आपल्या सख्ख्या चुलतभावांचा इतिहास, जो आजही आपल्या प्रत्येक पेशीत स्वतःच अस्तित्व ठेवून आहे.
हे होते होमो निअंडरथल, आपल्या अगोदर जग व्यापणारे, आपल्याहून ताकदवान, आपल्यापेक्षा मोठा मेंदू असणारे मानव..जे अवघ्या 30000 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या बरोबर नांदत होते.
आणि गम्मत म्हणजे ते एकटे नव्हते, हळू हळू शास्त्रज्ञांना आणि पुरात्त्ववेत्यांना अनेक मानवी वंश सापडले, जे काळाच्या ओघात नष्ट झाले होते, त्यातले महत्वाचे काही,
होमो इरेक्टस
हा ताठ कण्याचा सरळ उभा राहणारा माणूस पूर्व आशियात रहायचा, हा आजवर सगळ्यात जास्त काळ पृथ्वीवर टिकलेला माणूस, जवळ जवळ 20 लाख वर्ष हा पृथ्वीवर होता. आपल्या वंशाचे वय अवघे 2 लाख वर्ष आहे, आणि आपण होमो सेपियन म्हणून अजून 2000 वर्ष तरी राहू कि नाही ते सांगता येतं नाही, हे बघता या चुलतभावाची कमाल वाटते, आणि हो, बहुदा आगीचा वापर यांनीच प्रथम केला, आणि आपल्याला शिकवला. हा आपल्या भारतात रहायचा साधारण 60/70 हजार वर्षापूर्वी पर्यंत, नंतर तो नाहीसा होतं गेला.
होमो फ्लोरिसीएनसिस
इंडोनेशियात फ्लोरिस नावाचं एक बेटं आहे, समुद्राची पातळी कमी असताना, मानवाचे काही पूर्वज तिथे गेले आणि समुद्राची पातळी वाढल्यावर तिथेच अडकले. त्या लहानश्या बेटावर त्यांना फारसं काही खायला नव्हतं, त्यामुळे त्यांचा आकार लहान लहान होतं गेला. कसा? सोपं आहे, ज्यांचा आकार मोठा होता त्यांना जास्त खायला लागायचं, अन्न न मिळाल्याने ते लवकर मेले तर ज्यांची भूक आणि शरीरयष्टी लहानखुरी होती ते प्रजनन करत राहिले. शेवटी असा माणूस निपजला ज्याची उंची 3 फूट आणि वजन 25 किलो होतं. तरीही ते दगडी हत्यारं बनवायचे आणि हत्तींची शिकारही करायचे, पण खरं सांगायचं तर ते हत्तीही बरेचसे बारीक आणि बुट्टे होते.
होमो हबिलिस
बहुदा पहिला मानव ज्याने दगडी हत्यारं बनवली, आजच्या मानवापेक्षा दिसायला अगदी वेगळा, साधारण दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंत हा आफ्रिकेत वावरत होता.
होमो हैडेलबेर्गेंसिस
बरेच मानववंश शास्त्रज्ञ याला आपला पितामह मानतात, फक्त आपलाच नाही, इतरही काही प्रजातींचा.. साधारण 6 लाख वर्षांपूर्वी आफ्रिका, मध्य आशिया आणि युरोपात हा वावरत होता.
होमो नालेंदी
अगदी आपल्यासारखेच पाय असलेला हा आपला पूर्वज, स्वतःच्या समाजातील मृतांना एकत्र पुरायचा. साधारण 6/7 लाख वर्षापर्यंत याचं अस्तित्व सापडतं.
होमो निअंडरथलेसिस
हा आपला सगळ्यात महत्वाचा शेजारी, अवघ्या 30000 वर्षांपूर्वीपर्यंत आपण एकत्र राहायचो, मारामाऱ्या करायचो, शिकारी करायचो, एकमेकांच्या लोकांना, खासकरून बायकांना पळवायचो. हा आपल्यापेक्षा ताकदवान, आपल्यापेक्षा कणखर.. थंड प्रदेशात मुरलेला आणि शिकारीत तरबेज, लाखभर वर्षांपूर्वी जेंव्हा होमो सेपियन आणि निअंडर थल युरोपात सामोरासमोर आले, तेंव्हा त्यांनी सेपियन्सला परत आफ्रिकेत हाकलून दिलं. कित्येक हजार वर्षे ते युरोपचे अनभिषिक्त राजे होते. आजही युरोपीय वंश जो वेगळा दिसतो तो यांच्यामुळेच.. कसं ते पुढे बघू.
त्याआधी आपण एका महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया जो बऱ्याचदा विचारला जातो , खालचं चित्र पहा,
प्रश्न असा आहे कि जर माकडा पासून माणूस उत्क्रांत झाला तर अजूनही माकड अस्तित्वात का आहे ? आणि दुसरा प्रश्न असतो कि उत्क्रांतीच्या या चक्रात आपण मानव वंशात एकटेच कसे उरलो?
आधी पहिला प्रश्न नीट समजून घेऊ, आपण माकडापासून नव्हे तर माकड सदृश्य प्राण्यापासून उत्क्रांत झालो, त्या प्राण्यापासून एक शाखा मानव बनली दुसरी माकड. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उत्क्रांती हि नित्य घडणारी क्रिया आहे, ती आजही चालू आहे. जेंव्हा एखादी नवीन स्पिसिज या भूतलावर येते तेंव्हा काही हजार/ लाख वर्ष ती ज्या प्रजातीपासून फुटून वेगळी झालीय ती प्रजातीही या जगात असते, त्या काळात हि नवीन तयार झालेली प्रजाती आपल्या मूळ प्रजातीबरोबर सतत संकर करत असते कारण त्यांची गुणसूत्र जवळ जवळ सारखी असतात, आणि अशा कित्येक प्रजाती तयार होत असतात. काही काळात जर हि नवीन प्रजाती मूळ प्रजातिपेक्षा जगण्याच्या शर्यतीत यशस्वी ठरली तर ती जुन्या प्रजातीत आपले सगळे जीन्स पसरवून टाकते आणि जुनी प्रजाती नामशेष होते, (पुढच्या भागात हा सिद्धांत आपण अजून नीट बघू)
त्यामुळे वर दाखवलेलं चित्र फसवं आहे. एकाच वेळी या जगात, विकासाच्या (?) वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेले हे प्राणी अस्तित्वात होते आणि आजही आहेत
या सगळ्यांबद्दल माहिती घेतल्यावर पुढचा प्रश्न उभा राहतो, कि हे सगळे गेले कुठे आणि कसे?
या संदर्भात दोन शक्यता सांगितल्या जातात, एकीला म्हणतात रिप्लेसमेंट थिअरी आणि दुसरीला म्हणतात इंटरब्रिडिंग थिअरी.
रिप्लेसमेंट थिअरी अगदी सोपी आहे, सेपियन्स आफ्रिकेतून आले, त्यांनी पाहिलं, ते लढले आणि ते जिंकले.. राजकीय दृष्ट्या अत्यंत सोयीची अशी ही थिअरी, कारण या थिअरीनुसार अस्तित्वात असलेले सगळे मानव हे एकाच वंशाचे ठरतात. तुम्हीं आम्ही सेम..
इंटरब्रिडिंग थिअरी मात्र जरा किचकट आहे, वादग्रस्त आहे.. कशी ते बघा,
या थिअरीनुसार होमो सेपियन आफ्रिकेतून निघाले, मग ते युरोपात निअंडरथलला भेटले, त्यांच्याशी संबंध आला, त्यांना मुलं झाली, आणि एक वेगळा मिश्र वंश तिथे अस्तित्वात आला. काही सेपियन भारतात किंवा चीनमध्ये आले, होमो इरेक्टसला भेटले आणि तिथे त्यांचा एक वंश सुरु झाला.
म्हणजे आपण सगळे वेगळे, एकमेकांचे सख्खे चुलतभाऊ, आपले जनुकीय नकाशे वेगळे. अत्यंत गैरसोयीच असलेलं हे सत्य, सत्य यासाठी कि युरोपीय आणि माध्यपूर्वेतल्या लोकांनी त्यांचा वर्ण आणि उंची हे निअंडरथलकडून घेतलाय. या वंशाच्या लोकांमध्ये 1 ते 3 % निअंडरथल DNA आढळतो.
ऑस्ट्रेलियन आदिवासींमध्ये निअंडरथल DNA अजिबात नाही पण तिथे होमो डेंनीसोवा नावाच्या मानवाचा DNA चांगल्या प्रमाणात आहे, आणि ह्या डेनिसोवाचे अवशेष आढळले कुठे, तर सैबेरियात... कुठे ऑस्ट्रेलिया कुठे सैबेरिया..
हे सत्य म्हणजे जणू एक निद्रिस्त ज्वालामुखी आहे..
होमो सेपियनने या मानावांवर विजय मिळवला, पण स्वतःच्या पेशीत नोंदवलेल्या या इतिहासावर तो कसा विजय मिळवेल?
पुढच्या भागात आपण पाहू होमो सेपियानाच्या या विजयाचे कारण..
प्रतिक्रिया
18 Mar 2017 - 7:42 pm | शैलेन्द्र
पहिल्या भागाची लिंक http://www.misalpav.com/node/39178
18 Mar 2017 - 8:00 pm | ज्योति अळवणी
खूप माहितीपूर्ण आणि तरीही रोचक लिहिता तुम्ही. पुढचा भाग देखील लवकर टाका ही विनंती
19 Mar 2017 - 10:24 am | शैलेन्द्र
धन्यवाद
18 Mar 2017 - 8:04 pm | पद्मावति
+१
हेच म्हणते. इतका कठीण विषय पण तुमच्या सहज सुंदर लेखनशैलीमुळे जाणून घ्यावासा वाटतोय.
19 Mar 2017 - 10:24 am | शैलेन्द्र
धन्यवाद
19 Mar 2017 - 3:48 pm | जव्हेरगंज
+१
लिहित रहा!
19 Mar 2017 - 8:55 pm | समाधान राऊत
कधीकाळी रामा शॅपियन , निअॅंडरथल , इरेक्टस असे शब्द वाचल्याचे आठवतेय. वाचुन भारी/छान वाटले. फोटो थोडे जपुन ना राव!! भिती वाटेल असे आहेत.;):)तरी सुद्धा भारीच .
20 Mar 2017 - 4:31 pm | मराठी कथालेखक
जर युरोपात होमो सेपियनने निअंडरथलशी संकर केला आणि आशियात होमो इरेक्टसशी तर हे वंश वेगळे आहेत असे मानण्याला पुष्टी मिळते. जगातली सगळी माणसं सारखीच आहेत असं म्हणता येणार नाही, हो ना ?
तसेही त्वचा, केस आणि डोळ्यांच्या रंगातील मोठा फरक लोक वेगवेगळ्या वंशाचे आहेत असेच दर्शवतो. पण या वेगवेगळ्या वंशांत संकर होवू शकतो. मग आधीच्या उदाहरणात पाहिल्याप्रमाणे कुत्र्याप्रमाणेच या माणसाच्या वेगवेगळ्या जाती/प्रजाती आहेत (सब-स्पेसिज) असे का मानले जात नाही ?
21 Mar 2017 - 5:35 pm | शैलेन्द्र
एक दुरुस्ती, सगळे कुत्रे हे एकाच स्पिसीजचे आहेत, त्यांच्यात पुढचं वर्गीकरण नाही, कारण त्यांच्या जाती या निसर्गतः किंवा मानवाने नियंत्रित प्रजनन करून घडवून आणल्यात.
आता तुमच्या प्रश्नाकडे येऊ या, हा प्रश्न म्हणजे एक निद्रिस्त ज्वालामुखी आहे. एक गोष्ट खरी कि वेगवेगळ्या वंशाच्या मानवात जनुकीय फरक आहेत, जसं आफ्रिकन, युरोपियन, एशियन इत्यादी, पण शास्त्र सोयीस्कररित्या असं मानत कि हे फरक फार महत्वाचे नाहीत. दुसरं सत्य हेही आहे की आजचा मानव त्याच्या प्रगतीसाठी त्याच्या जनुकीय नकाशापेक्षा बौद्धिक विकासावर जास्त अवलंबून आहे आणि त्या बाबतीत मानवी वंश नव्हे तर मानवी समाज हा त्याच्यावर जास्त परिणाम करतो. तसंच हे सगळे मानवी वंश हळूहळू परस्परात इतके मिसळत चाललेत कि त्यांचे जनुकीय वेगळेपण पुढे फारसे महत्वाचे ठरणार नाही.
21 Mar 2017 - 6:56 pm | मराठी कथालेखक
एका स्पिसीजचे आहेत पण सब-स्पिसीजचं काय ?सब-स्पिसीज पण एकच का ? मग दोन जातीत इतका फरक असताना जर सब-स्पिसीज एकच असेल तर सब-स्पिसीजचं नेमकं महत्व काय असा प्रश्न निर्माण होतो. स्पिसीज एक पण सब-स्पिसीज वेगळी अशी कोणती उदाहरणं आहेत ?
मला वाटतं सध्यापुरतं आपण या प्रश्नाची राजकीय गुंतागुंत बाजूला ठेवू, चालेल का ?
ही राजकीय सोय आहे की केवळ शास्त्रीय (let's assume सारखी ) ?
मुळात दोन प्राणी एकाच सब स्पिसीजचे आहेत की वेगळे , एका स्पिसीजचे आहेत की वेगळ्या हे कसे ठरवले जाते ? निसर्गात एखादा नवीन जीव सापडला (समजा एखादा सस्तन प्राणी किंवा पक्षी किंवा किटक) तर त्याचे वर्गीकरण करण्याची पद्धत काय आहे ? किती फरक असेल तर भिन्न जिनस , किती फरक असला तर भिन्न स्पिसीज आणि भिन्न सब स्पिसिज गणल्या जातात ?
तुमच्या पहिल्या भागानुसार मला अस वाटलं होतं की
१) दोन प्राणी दिसायला भिन्न पण त्यांच्यात प्रजोत्पादन होवू शकत असेल, नवीन जन्मलेला जीव पण पुढे प्रजोत्पादन करु शकणारा असेल तर भिन्न सब स्पिसिज पण स्पिसीज मात्र समान (जसे कुत्र्याच्या जाती)
२) दोन प्राणी दिसायला भिन्न पण त्यांच्यात प्रजोत्पादन होवू शकत असेल, नवीन जन्मलेला जीव पण पुढे प्रजोत्पादन करु शकणारा नसेल तर भिन्न स्पिसीज आणि जिनस समान. (जसे गाढव आणि घोडा)
३) आणि दोन प्राणी पुर्णतः वेगळे त्यांच्यात प्रजोत्पादन अजिबात शक्य नसेल तर जिनस भिन्न (जसे माणूस व कुत्रा)
पण आता थोडा गोंधळ होतो आहे.
23 Mar 2017 - 2:31 pm | शैलेन्द्र
सब स्पिसीज म्हणजे अनुवांशिक दृष्ट्या जवळ जवळ सारखेच जीव, जे नैसर्गिक अधिवास वेगळा असल्याने मिसळू शकले नाही आणि मग त्यांच्यात काही काही अंतर पडत गेले, जस रानडुक्कर आणि पाळलेले डुक्कर, किंवा जंगली गाढव किंवा पाळलेले गाढव..
कुत्र्याची गोष्ट वेगळी , त्या "ब्रीड " आहेत , सब स्पिसीज नव्हे, त्या नियंत्रित प्रजननाने तयार झाल्यात.
20 Mar 2017 - 4:38 pm | मराठी कथालेखक
भाग १ मध्ये एका प्रतिक्रियेत तुम्ही होमो सेपियन इडालटूबद्दल लिहिलं होतं. त्याबद्दल अधिक माहिती देवू शकाल काय ? त्यात तुम्ही लिहिलं की सुमारे पावणे दोन लाख वर्षापुर्वी तो अस्तित्वात होता. होमो सेपियन दोन लाख वर्षापासून आहे. म्हणजे होमो सेपियन इडालटू ही प्रजाती "होमो सेपियन" पासूनच म्युटेशनने बनली होती का ?
21 Mar 2017 - 5:43 pm | शैलेन्द्र
बहुदा आपण आणि इडलटू, दोघंही एका किंवा अनेक मानव पूर्वजांपासून उत्क्रांत झालो, असे अनेक असतील, इडलटू इकडे नसावे. आज आपल्याला त्यांचे अवशेष सापडत नाहीत इतकंच.. https://en.m.wikipedia.org/wiki/Homo_sapiens_idaltu
21 Mar 2017 - 5:43 pm | शैलेन्द्र
बहुदा आपण आणि इडलटू, दोघंही एका किंवा अनेक मानव पूर्वजांपासून उत्क्रांत झालो, असे अनेक असतील, इडलटू इकडे नसावे. आज आपल्याला त्यांचे अवशेष सापडत नाहीत इतकंच.. https://en.m.wikipedia.org/wiki/Homo_sapiens_idaltu
21 Mar 2017 - 5:43 pm | शैलेन्द्र
बहुदा आपण आणि इडलटू, दोघंही एका किंवा अनेक मानव पूर्वजांपासून उत्क्रांत झालो, असे अनेक असतील, इडलटू इकडे नसावे. आज आपल्याला त्यांचे अवशेष सापडत नाहीत इतकंच.. https://en.m.wikipedia.org/wiki/Homo_sapiens_idaltu
21 Mar 2017 - 5:44 pm | शैलेन्द्र
बहुदा आपण आणि इडलटू, दोघंही एका किंवा अनेक मानव पूर्वजांपासून उत्क्रांत झालो, असे अनेक असतील, इडलटू इकडे नसावे. आज आपल्याला त्यांचे अवशेष सापडत नाहीत इतकंच.. https://en.m.wikipedia.org/wiki/Homo_sapiens_idaltu
21 Mar 2017 - 9:17 pm | पैसा
प्रचंड आवडले आहे हे!
2 Apr 2017 - 7:55 am | इनू
छान, रोचक माहिती!