साधारण 13.5 बिलियन वर्षांपूर्वी एक महास्फोट झाला असं मानलं जातं. या महास्फोटाच्या सिद्धांतानुसार, त्या क्षणी(?) वेळ, ऊर्जा, अवकाश आणि पदार्थ अस्तित्वात आले. त्या क्षणापूर्वी ना वेळ होती ना ऊर्जा..
वेळ, ऊर्जा, अवकाश आणि पदार्थ यांच्या अभ्यासाला फिजिक्स म्हटलं जातं..
या महास्फोटानंतर साधारण 3 लाख वर्षांनी, पदार्थ आणि ऊर्जा यांच्यात अभिसरण सुरु झालं, या दोन घटकांनी एकमेकांना एका आकृतिबंधात बांधलं, ज्याला आपण ऍटम किंवा अणू म्हणतो. या अणूनी स्वतःला पुन्हा काही विशिष्ट प्रकारे रचून घेतलं, ज्याला आपण आज रेणू म्हणतो. या अणू रेणूंच्या आणि त्यांच्या एकमेकांतील संबंधांच्या अभ्यासाला रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री म्हणतात.
साधारण 4 बिलियन वर्षांपूर्वी, पृथ्वी नावाच्या एका ग्रहावर, काही विशिष्ट रेणू, विशिष्ट उर्जेच्या संपर्कात असताना एकत्र आले, त्यातून सजीव नावाची एक गुंतागुंतीची आणि मोठे रेणू असलेली रचना तयार झाली, या सजीवांच्या अभ्यासाला जीवशास्त्र किंवा बायोलॉजी म्हटलं जातं.
साधारण 70000 वर्षांपूर्वी या सजीवांमधल्या होमो सेपियन नावाच्या एका प्रजातीने अजूनच गुंतागुंतीची आणि विस्तृत रचना तयार केली, तिला संस्कृती म्हटलं जातं, या संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास..
आता हे सगळं वाचल्यावर पहिला प्रश्न पडतो की हे खरं कसं मानायचं?, हा प्रश्न खास करून दोन घटनांबद्दल पडू शकतो, पहिली म्हणजे बिग बँग सिद्धांत आणि दुसरी सजीवांच्या उत्पत्तीचा सिद्धांत.. या दोन्ही घटना तापासण्यापूर्वी आपणं प्रथम सिद्धांत म्हणजे काय ते जाणून घेऊया..
सिद्धांत म्हणजे नियम नव्हे, सिद्धांतात काही नियम अंतर्भूत असतात पण स्वतः सिद्धांत म्हणजे नियम नाही. सिद्धांत हा एखाद्या श्रद्धेसारखाच निरीक्षकाच्या मनात असतो. पण श्रद्धेशी असलेले त्याचे सारखेपण तिथेच संपते, कारण कोणत्याही सिद्धांताला खरं ठरण्यासाठी दोन कसोट्या पूर्ण कराव्या लागतात, पहिली म्हणजे त्या सिद्धांतांशी निगडित असलेली सारी आणि खूप निरीक्षण, त्या सिद्धांतानुसार तपासता आणि सिद्ध करता आली पाहिजेत, आणि दुसरी म्हणजे त्या सिद्धांतानुसार पुढे केल्या जाणाऱ्या अनेक निरीक्षणांचे भाकीत त्याला वर्तवता आले पाहिजे. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जसं सफरचंद झाडावरून का पडतं हे सांगू शकतो तसंच सूर्य चंद्र आणि ताऱ्यांचे एकमेकांभोवती होणारे भ्रमण आणि त्याचा वेगही अचूकपणे वर्तवू शकतो.
तुम्हीं सिद्धांत कधीच सिद्ध करू शकत नाही, तो नेहमीच एक शहाणा अंदाज किंवा ठोकताळा राहतो कारण कितीही निरीक्षण त्या सिद्धांतानुसार खरी ठरली तरी पुढचं निरीक्षण तसं ठरेलच असं नाही. सगळे शास्त्रीय सिद्धांत या चक्रातून गेलेत, आणि या पुढेही जातील. ज्या क्षणी त्या सिद्धांताला विपरीत निरीक्षण नोंदवलं जातं, त्या क्षणी एका नवीन सिद्धांताचा जन्म होतो, जो खरंतर जुन्या सिद्धांताचेच विस्तृत रूप असते.
बिग बँग आणि सजीव उत्पत्तीच्या सिद्धांताला विपरीत ठरेल असे निरीक्षण आजवर नोंदले गेलेलं नाही, ज्या क्षणी असं निरीक्षण नोंदवलं जाईल त्याक्षणी हे सिद्धांत विस्तृत केले जातील.. विज्ञान त्याबाबत फार निष्ठुर आहे.
वरील भागात आपण शास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा आणि शास्त्रीय सिद्धांताबद्दल जाणून घेतलं, पण या लेखाच्या शिर्षकाप्रमाणे हा मुख्यतः स्वतःला जाणण्याचा प्रवास आहे, स्वतःला म्हणजे मानव वंशाला..
चला तर मग करूया सुरवात, आपल्या नावापासून..
"होमो सेपियन" म्हणजे शहाणा माणूस, पण कोणापेक्षा शहाणा? आणि मग इतर माणसं कोण?
या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला ही शास्त्रीय नावं कशी ठेवली जातात ते जाणून घ्यावं लागेल, फार सोपं आहे.
आपल्याला घोडा आणि गाढवं तर माहीतच आहेत, घोड्याचं शास्त्रीय नावं आहे (Equus ferus caballus) आणि गाढवाचे शास्त्रीय नाव आहे (Equus africanus asinus).
यातला पहिला शब्द समान आहे, त्याला म्हटलं जातं genus, अनेकवचन Genera. घोडा आणि गाढवं हे दोघंही एकाच जिनसमधून आलेत याचा अर्थ असा की त्यांचा पूर्वज, ज्या पासून या दोघांची उत्क्रांती झाली, तो एकचं होता.
दुसरा शब्द आहे तो आहे "species". स्पिसीज खूप महत्त्वाची, ती आपण जरा विस्ताराने बघू..
आपल्याला माहित आहे की हिमालयात आणि इतरही काही ठिकाणी, सामान वाहण्यासाठी खेचर वापरतात. हे खेचर म्हणजे घोडा आणि गाढवं यांच्यात कृत्रिमपणे केलेला संकर. निसर्गतः घोडा आणि गाढवं शक्यतो संकरीत पिल्लांना जन्म देतं नाहीत, कारण त्यांच्यात नैसर्गिक शारीरिक आकर्षण नसते, शिवाय जरी त्यांचा संकर झाला तरी खेचर, हे नपुंसक असतात, त्यांचा वंश वाढू शकत नाही. याचं कारणाने जरी घोडा आणि गाढव यांचा संकर शक्य असला तरी त्यांना वेगळ्या गटात ठेवलं आहे, त्यांची स्पिसिज वेगळी.
याउलट कुत्र्याचे उदाहरण घ्या, गाढवाइतका मोठा ग्रेटडेन आणि छोटासा पॉकेट पामेरियन, दोघंही एकाच स्पिसिज मधले कारण त्यांचा संकर होऊ शकतो आणि त्यांची पिल्लं जन्माला येऊन पुढे पुनरुत्पादन करू शकतात.
तिसरा शब्द आहे तो sub species, हे वर्गीकरण गाढवं घोडे व इतर काही प्राण्यांमध्ये पहायला मिळतो, कारण आजही या प्राण्यांच्या जंगली प्रजाती अस्तित्वात आहेत. अनुवंशिकदृष्ट्या बऱ्यापैकी वेगळ्या प्राण्यांसाठी सब स्पिसिज हा खास प्रकार आहे. हे प्राणी सहजपणे एकमेकांशी संकर करू शकतात आणि जन्मास येणारी प्रजाती पुढील पुनरुत्पादनास सक्षम असते.
तर आपलं नाव आहे होमो सेपियन, होमो या जिनस मधली सेपियन हि स्पिसिज.. खरी गंमत आहे ती इथे, ती अशी की होमो या जेनेरामधली अस्तित्वात असलेली ही एकमेव स्पिसिज आहे, इतर सगळ्या नष्ट झाल्या किंवा होमो सेपियन या स्पिसीजने त्यांना कत्तल करून किंवा स्वतःत सामावून घेऊन नष्ट केल्या. म्हणूनच बरेच शास्त्रज्ञ ह्यूमन हि संज्ञा त्या सगळ्या प्रजातींना मिळून वापरतात आणि आजच्या आधुनिक माणसाला सेपियन म्हणतात.
साधारण 60 लाख वर्षांपूर्वी, कुठेतरी एका मर्कट वंशीय मादीला 2 पिल्लं झाली, त्यातली एक पुढे चिंपाजी झाली आणि दुसरी, आपली खापरपणजी होती.
साधारण 25 लाख वर्षांपूर्वी पहिल्या मानवाने, म्हणजे होमोने या जगात पाय ठेवला. पण मानवाचा पूर्वज त्याच्याही खूप आधी जन्माला आला होता. अगदी सगळे मानवसुद्धा सेपियन नव्हते.
कोणती माणसं होती हि? ती कधी होती या पृथ्वीवर? आपल्या किती आधी? त्यांच्यातला शेवटचा माणूस कधी अस्तित्वात होता?
आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ते सगळे होमो सिपीयन्सशी लढताना किंवा एकत्र वावरताना का हरले? ते नामशेष कसे झाले? आज आपला त्यांच्याशी काय संबंध उरलाय?
पुढच्या भागात आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करू.
-शैलेंद्र
प्रतिक्रिया
15 Mar 2017 - 8:01 pm | जव्हेरगंज
16 Mar 2017 - 9:02 am | शैलेन्द्र
धन्यवाद
15 Mar 2017 - 8:08 pm | जव्हेरगंज
रोचक!!!
15 Mar 2017 - 8:51 pm | पद्मावति
खूप इंटरेस्टिंग आहे हे. पु.भा.प्र.
16 Mar 2017 - 9:03 am | शैलेन्द्र
धन्यवाद
15 Mar 2017 - 9:49 pm | टवाळ कार्टा
रोचक...पुढचे भाग टाकायला वेळ घेउ नका
16 Mar 2017 - 9:03 am | शैलेन्द्र
धन्यवाद
15 Mar 2017 - 10:43 pm | पैसा
फेसबुकवर वाचत होते. तेव्हाच म्हटलेलं, हा इथे का लिहितोय.
16 Mar 2017 - 9:04 am | शैलेन्द्र
धन्यवाद
15 Mar 2017 - 11:30 pm | एस
भारी. मानववंशशास्त्र!!! पुभाप्र.
16 Mar 2017 - 9:03 am | शैलेन्द्र
धन्यवाद
15 Mar 2017 - 11:32 pm | एस
भारी. मानववंशशास्त्र!!! पुभाप्र.
15 Mar 2017 - 11:58 pm | इडली डोसा
छान लिहिताय. पुढचे भाग लवकर येऊ देत.
16 Mar 2017 - 9:05 am | शैलेन्द्र
धन्यवाद
16 Mar 2017 - 6:20 am | अनन्त अवधुत
छान लिहिलंय.
हे आणि ह्याच्या (बिग बँग, उत्क्रांती, डार्विन वगैरे )अनुषंगाने लिहिलेले इतरही काही लिखाण वाचले आहे, पण तुमची लिहिण्याची पद्धत छान आहे. लिखाण आवडले. पुभाप्र.
16 Mar 2017 - 9:04 am | शैलेन्द्र
धन्यवाद
16 Mar 2017 - 9:22 am | सतिश गावडे
ईश्वराची लीला आहे सारी.
16 Mar 2017 - 10:24 am | शैलेन्द्र
अजून एक बादली पाणी देऊ का?
16 Mar 2017 - 9:32 am | ज्योति अळवणी
खूप मस्त लेख. पुढचा भाग लवकर टाका
16 Mar 2017 - 10:53 am | शैलेन्द्र
धन्यवाद
16 Mar 2017 - 10:35 am | उत्तरा
इंटरेस्टींग!!
मस्त.. उत्सुकता वाढलीये पुढील भागांची..
16 Mar 2017 - 10:54 am | शैलेन्द्र
धन्यवाद
16 Mar 2017 - 10:39 am | संजय पाटिल
आणि सहज शैली
16 Mar 2017 - 11:37 am | शैलेन्द्र
आभारी आहे
16 Mar 2017 - 10:57 am | अप्पा जोगळेकर
छाण. नंदा खरे यांचे पुस्तक आठवले.
पुड्ढच्या भागापासून मिलियन, बिलियन ऐवजी अमुक एक लाख असे दिले तर बरे पडेल.
16 Mar 2017 - 11:39 am | शैलेन्द्र
नक्की,
कोणते पुस्तक?
16 Mar 2017 - 11:43 am | शैलेन्द्र
नक्की,
कोणते पुस्तक?
16 Mar 2017 - 12:26 pm | हेमंत८२
विषय रोचक आहे.. पुढे बोलू
16 Mar 2017 - 12:45 pm | शलभ
काहीतरी नवीनच..खूप मस्त लिहिताय..लवकर येउ द्या पुढचे भाग..
16 Mar 2017 - 1:18 pm | मराठी कथालेखक
छान माहिती.
होमो सेपियन मध्ये विविध सब स्पेसिज आहेत का ? असल्यास कोणत्या ?
16 Mar 2017 - 2:31 pm | शैलेन्द्र
फार कळीचा सवाल,
पूर्वी होती एक, आता अस्तित्वात नाही, पण वादाचे मुद्दे वेगळे आहेत, पुढच्या भागात त्यावर चर्चा करू
16 Mar 2017 - 3:07 pm | मराठी कथालेखक
उत्तराबद्दल धन्यवाद.
पुढच्या भागात याबद्दल अधिक माहिती वाचयला आवडेलच.
पुर्वी जी होती त्याबद्दलही कृपया अधिक माहिती द्या
16 Mar 2017 - 4:25 pm | शैलेन्द्र
त्याला होमो सेपियन इडालटू म्हणतात, साधारण पावणे दोन लाख वर्षापूर्वीचे त्याचे अवशेष इथिओपियात मिळालेत, त्यानंतर तो नष्ट झाला, म्हणूनच काही शास्त्रज्ञ आपल्याला होमो सेपियन सेपियन म्हणतात
16 Mar 2017 - 4:26 pm | शैलेन्द्र
त्याला होमो सेपियन इडालटू म्हणतात, साधारण पावणे दोन लाख वर्षापूर्वीचे त्याचे अवशेष इथिओपियात मिळालेत, त्यानंतर तो नष्ट झाला, म्हणूनच काही शास्त्रज्ञ आपल्याला होमो सेपियन सेपियन म्हणतात
16 Mar 2017 - 4:44 pm | मराठी कथालेखक
होमो सेपियन इडालटू आणि आताच्या होमो सेपियनमध्ये काय महत्वाचे फरक होते ?
16 Mar 2017 - 7:32 pm | शैलेन्द्र
आपण त्या गोष्टीचा फक्त अंदाज करू शकतो कारण आपल्याला फक्त विस्कळीत अवशेष मिळालेत, पण त्याचं डोकं आपल्यापेक्षा मोठं होतं, आणि तो बहुदा आपल्यापेक्षा जरा जास्त हट्टाकट्टा होता.
16 Mar 2017 - 4:56 pm | सरल मान
जास्त वाट पाहायला लावू नका....
16 Mar 2017 - 7:33 pm | शैलेन्द्र
नाही, लवकरच
16 Mar 2017 - 8:51 pm | प्रचेतस
थोडक्यात पण उत्तम.
पुभाप्र
17 Mar 2017 - 12:06 am | दीपक११७७
उत्सुकता वाढलीये पुढील भागांची
धन्यवाद
17 Mar 2017 - 12:56 pm | स्वीट टॉकर
उत्तम उकल करून सांगता आहात. पुढचे भाग लवकर आणि विस्तृत येऊ द्यात.वाट बघतोय!
22 Mar 2017 - 10:44 am | शित्रेउमेश
जाम भारी बोल, शैलेन्द्र दादा...
लई म्हणजे लईच इन्टरेस्टींग भाऊ...