शेजाऱ्याचा डामाडुमा -एक होते हिंदू राष्ट्र- एकीकृत नेपाळची जडणघडण आणि शाह राजवट - भाग ४

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
14 Jan 2017 - 8:01 pm

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...

===========================================================================

एकीकृत नेपाळची जडणघडण आणि शाह राजवट - भाग ४

पृथ्वीनारायण एकीकृत नेपाळचा पाहिला नरेश म्हणून काठमांडूतील सिंहासनावर बसला खरा पण गोरखालीतील छोटे संस्थान आणि काठमांडूच्या नेपाळी सिंहासनात बराच फरक होता. एकतर नेपाळच्या एकीकरणात स्वतःचे हक्काचे परंपरागत राज्य गेल्यामुळे तत्कालीन छोटे संस्थानिक मनातून पृथ्वीनारायणावर खूप चिडले होते. त्यात नेपाळी प्रदेशातील परंपरागत 'ठाकुरी' आणि 'नेवारी' वाद उफाळून आला होता. आता हा ठाकुरी-नेवारी वाद नेपाळच्या इतिहासाला कायम चिकटलेले प्रकरण आहे. ठाकुरी राजे स्वतःला राजस्थानातील राजपूत राज्यांचे वंशज आणि म्हणून श्रेष्ठ समजत. स्वतः पृथ्वीनारायण शाह ठाकुरी वंशातच जन्मले होते. याउलट नेवार ही नेपाळमधीलच एक शूर युद्धनिपुण जमात स्वतःला खरे भूमिपुत्र समजत असे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये कायम श्रेष्ठत्वाचे वाद होत, प्रसंगी युद्धेही होत. ह्या दोन्ही प्रमुख लढवैय्या समाजांना एकत्र आणून शाह राजाने नेपाळच्या दरबारात 'भारदार' म्हणजे 'राज्याचे आधारस्तंभ' असे उच्च स्थान बहाल केले. अनेक शूर सेनापतींना आणि पूर्वाश्रमीच्या मल्ल दरबारातील असंतुष्ट पण योग्यता असलेल्या मंत्र्यांना 'काझी' म्हणजे मंत्रिपरिषदेत स्थान दिले. अनेक पुरस्कार, शौर्यदर्शक खिताब, युद्धखर्च वगैरे देऊन माजी संस्थानिकांना गोंजारले. थोडक्यात, सर्व उपाय करून नवीन नेपाळ राज्याची घडी नीट बसवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या गोरखाली भागातून आलेल्या बालमित्रांवर राजाचा जास्त विश्वास असणे स्वाभाविकच होते. असाच एक गोरखाली 'काझी' होता रामकृष्ण कुंवर, राजाच्याच वयाचा. त्याने मल्लांविरुद्ध लढताना विशेष चमक दाखवली होती. त्याला
राजाने स्वतःच्या व्यक्तिगत सुरक्षा दलाच्या प्रमुखपदी नेमले आणि विशेष बाब म्हणून त्याचे पद वंशपरंपरागत केले.

नव्या राज्याचा ध्वज आणि राजचिन्ह ठरवण्यात आले. हिंदवी मराठी राज्याच्या भगव्या जरीपटक्यासारखाच पण रक्तवर्णी लाल रंगाचा त्रिकोणी ध्वज. त्याला गडद निळी किनार आणि ध्वजावर शुभ्र पांढऱ्या रंगात चंद्र आणि सूर्य. राजचिन्हावर हिमालय, जुन्या गोरखाली राज्याचे प्रतीक म्हणून खुकरी आणि खाली संस्कृत सुभाषित - जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरीयसी !

ब्रिटिशांच्या विस्तारवादाचा संभाव्य धोका ओळखून वेळीच सावध झालेल्या पृथ्वीनारायणाने नेपाळी सैन्य संख्या वाढवण्यावर, सैन्याच्या शिस्तीवर आणि शस्त्रसज्जतेवर भर दिला. स्वतःची प्रतिमा आणि नाव असलेली नाणी प्रचलित केली. दोनच वर्षात संपूर्ण नेपाळभर हे नवीन चलन वापरण्याची सुरवात झाली होती आणि हे नेपाळी चलन तिबेट आणि शेजारच्या भारतीय राज्यातही व्यापारासाठी स्वीकृत व्हावे म्हणून करारमदार झाले होते.

नवीन राज्याला शिस्त लावण्यासाठी काहीतरी लिखित मार्गदर्शक तत्वे असावीत म्हणून पृथ्वीनारायणाने 'दिव्योपदेश' हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात नेपाळच्या राज्यकर्त्यांची आणि नागरिकांची कर्तव्ये, राजकीय आणि महसुली व्यवस्था, करप्रणाली, सैन्यदलांसाठी मार्गदर्शक तत्वे, परराष्ट्र संबंध असे सर्व महत्वाच्या विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केलेले आहे.

दिव्योपदेशातले पहिलेच वाक्य म्हणजे राजाच्या दूरदृष्टीचा आणि मुसद्दीपणाचा पुरावा - स्वतःच्या नेपाळ राष्ट्राला त्याने अडकित्त्यातल्या सुपारीची आणि दगडी जात्यातल्या धान्याची उपमा दिली आहे. एकीकडे चीन आणि दुसरीकडे भारत ह्या दोन्ही बलाढ्य शेजाऱ्यांना सारखेच सहकार्य करावे पण दोघांनाही अंतर्गत बाबींपासून दोन हात दूर ठेवावे आणि चातुर्याने नेपाळचा उत्कर्ष साधावा असे मार्गदर्शन त्याने स्वतःच्या मंत्रिमंडळाला केलेले आहे. लाच देणारा हा लाच घेणाऱ्यांपेक्षा जास्त दोषी आहे, त्याला शिक्षा व्हावी असा वेगळा आणि राज्यकर्त्यांना फारसा न शोभणारा विचारही आहे त्यात. अर्थातच पुढे नेपाळचे जे कोणी राज्यकर्ते झाले त्यांनी ह्या लाच देण्या-घेण्याच्या मुद्याकडे नक्कीच दुर्लक्ष केले.

काळ भरभर पुढे जात होता. नरेंद्र राज्यलक्ष्मी आणि पृथ्वीनारायण ह्या दाम्पत्याची तीनही मुले आता वयात आली होती, राज्यकारभाराचे आणि युद्धशास्त्राचे धडे गिरवत होती. मधल्या काळात राजाने राजकीय मोर्चेबांधणीचा भाग म्हणून विरोधी पक्षातील काही ठाकुरी आणि नेवार राजांच्या मुलींशी लग्ने करून त्यांचा विरोध बोथट करून त्यांना स्वतःच्या बाजूला वळवले होते.

राज्य थोडे स्थिरस्थावर करून तिबेट आणि भारतीय प्रदेशात अजून साम्राज्यविस्तार करण्याचा राजाचा मानस होता. पण इथे राजाचा घाई करण्याचा स्वभाव आडवा आला. स्वतःच्या स्वभावाला जागून हा राजा अवघ्या बावन्नाव्या वर्षी घाईने देवाघरी निघून गेला.

तदनंतर गादीवर आलेल्या प्रतापसिंह शाहने साम्राज्यविस्ताराचे धोरण सुरूच ठेवले. सिक्कीमचा बराच भाग ताब्यात घेतला, थेट भूतान पर्यंत धडक दिली. पण दोनच वर्षात त्याचा अगदी तरुणपणी, सव्वीस वर्षाचा असतानाच मृत्यू झाला. त्यानंतरचे रणबहादूरबिक्रम शाह आणि गीर्वाणयुद्धबिक्रम शाह हे दोन्ही सम्राट (आणि पुढे जवळपास सर्वच शाह सम्राट) अल्पायुषी ठरले. तरीही राज्याचे भारदार आणि गोरखा सैन्यातील अनेक शूर सेनापतींनी राज्यविस्ताराचे धोरण पुढे रेटले.

त्याकाळात सर्वशक्तीनिशी तिबेटवर चालून गेलेल्या गोरखा सैन्याला प्रचंड जीवहानी आणि आर्थिक नुकसान सहन करून पराभव पत्करावा लागला. एकदा नव्हे तर दोनदा. दुसऱ्यांदा १७९२ मधे तर 'माझ्या' तिबेटवर हल्ला केला म्हणून चीनच्या सम्राटाने नेपाळच्या राजाकडून मोठी खंडणी वसूल केली आणि नेपाळी राज्याचा काही प्रदेशही ताब्यात घेतला. (चीनची तिबेट गिळंकृत करण्याची इच्छा किती जुनी आणि प्रबळ होती ह्याचीच ही झलक)

पुढे गोरखा सैन्याने नेपाळच्या दक्षिण आणि पश्चिम सीमेला लागून असलेल्या भारतीय प्रदेशावर केलेले हल्ले आणि बराच मोठा डोंगराळ भूभाग स्वतःच्या अधिपत्याखाली आणून तेथे ठाणी स्थापन केली. शतक बदलत होते, १८०० साल उजाडले होते. भारताच्या भूमीवर तोवर ब्रिटिश अंमल गडद झाला होता. ब्रिटिश भारताचा अधिकाधिक भूभाग ताब्यात घेण्याची एकही संधी वाया घालवत नव्हते. ते योग्यवेळी नेपाळच्या सीमेवरच्या छोट्या राज्यांना 'मदत' करायला धावून जाणारच होते, तसे ते गेले. ब्रिटिश अमलाखालचा पूर्वेकडचा सीमांत भारत आणि गोरखा सैन्यात झटापटीला सुरवात झाली होती. पृथ्वीनारायणाचे भाकीत खरे ठरणार होते - नेपाळ आणि ब्रिटिश सैन्यात युद्ध आता अटळ होते.

* * *

गोरखा सैन्याचा आक्रमकपणा, सिक्कीम-भूतान-तिबेट ते भारतातल्या तराई भागातील त्यांच्या धडका हे ब्रिटिशांना खुपत होतेच. त्यांच्या चीन-तिबेट-भारत-बर्मा ह्या व्यापारी (आणि राजकीय सुद्धा) साम्राज्य विस्ताराच्या मार्गातील ही नेपाळी धोंड त्यांना नकोशीच होती. योग्य वेळी नेपाळच्या सामरिक महत्वाकांक्षेचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटिशांनी दार्जिलिंग/ बंगाल, बिहार आणि गोरखपूर या चौक्यांवर सैन्याची आणि शस्त्रांची जय्यत तयारी करून ठेवली होती. काही वर्षे एकमेकांवर केलेल्या छोट्या-मोठ्या हल्ल्यांनंतर ब्रिटिश सैन्याची आणि नेपाळी फौजांची पहिली 'आमने-सामने' गाठ पडली ती नालापानी येथे. हे ठिकाण आजच्या हिमाचल प्रदेशातील देहरादून शहराजवळ आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी थेट ब्रिटिश फौजेच्या प्रमुखाचा बळी घेऊन नेपाळी सैनिकांनी ब्रिटिशांना धडकी भरवली. १८१४ ते १८१६ अशी दोन वर्षे गोरखांच्या गनिमी युद्धतंत्राने ब्रिटिशांना मेटाकुटीला आणले. इरेला पेटलेल्या ब्रिटिशांनी सर्वशक्तीनिशी नेपाळी सैन्याला नालापानीच्या किल्ल्यापर्यंत मागे रेटले आणि मग सर्वबाजूनी नाकाबंदी करून नेपाळी सैन्याची रसद तोडली. आता नेपाळी सैन्य शरण येईलच असा ब्रिटिश सैन्याचा होरा होता. तो अंदाज फसला, नेपाळी सैनिक अगदी अन्नावाचून मेले पण शरण आले नाहीत. शेवटी थोड्या उरलेल्या गोरखा सैन्याने सर्व ताकद एकवटून ब्रिटिशांवर अखेरचा हल्ला केला आणि हाच हल्ला ब्रिटिश सैन्याच्या इतिहासात 'दे लॉस्ट बट दे वन' ह्या शब्दात अमर झाला. गोरख सैन्याने असा काही पराक्रम दाखवला की ब्रिटिश सैन्याला तोंडात बोटे घालायला लागली. ब्रिटिश जिकंले खरे, पण अन्नपाण्यावाचून भुकेल्या-तहानलेल्या नेपाळी सैन्याचा अतुलनीय पराक्रम पाहून जेत्या ब्रिटिश सैन्याला त्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहिले नाही. हे गोरखा लोक काहीतरी वेगळेच रसायन आहे हे त्यांना मनोमन पटले. आणि हे नालापानी युद्ध संपल्यानंतर काय झाले असेल तर 'ब्रिटिश सैन्यात नेपाळी गोरखा सैनिकांची भरती करण्याची परवानगी मिळावी' असा संदेश भारतातून ब्रिटिश होम डिपार्टमेंटला गेला ! सो, दे लॉस्ट बट दे वन.

* * *

थोडे अवांतर:

नालापानीच्या युद्धानंतर शत्रू होते ते मित्र झालेत. यथावकाश ब्रिटिश सरकारची परवानगी मिळाली आणि रॉयल ब्रिटिश आर्मी मध्ये गोरखा सैनिकांचा पहिला प्रवेश झाला. शेर-ए-पंजाब महाराजा रणजितसिंहाच्या शीख सैन्याविरुद्ध, पेशावर आणि मुलतानमध्ये अफगाणिस्तानच्या खानशी लढताना आणि पुढे १८५७ च्या भारतीय उठावाला चिरडण्यासाठी गोरखा सैनिकांचा ब्रिटिशांना खूप उपयोग झाला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यातर्फे जगभर लढताना ह्या शूर गोरखा सैनिकांनी असामान्य पराक्रम गाजवला. जगाच्या सैन्य-इतिहासात चर्चिल्या जाणाऱ्या अनेक सुरस युद्धकथा-कहाण्यांना जन्म दिला. ती परंपरा आजही कायम आहे. एकाच देशाचे सैनिक तीन वेगवेगळ्या स्वतंत्र सैन्यातर्फे सारख्याच निष्ठेने लढत असल्याचे उदाहरण जगात अत्यंत दुर्मिळ आहे. नेपाळच्या स्वतःच्या सैन्याव्यतिरिक्त ब्रिटिश आणि भारतीय सैन्यात आजही गोरखा वीर पराक्रम गाजवत आहेत, त्याविषयी पुढे येईलच.

क्रमशः

===========================================================================

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...

===========================================================================

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2017 - 2:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त चालली आहे लेखमालिका. पुभाप्र.

संजय पाटिल's picture

19 Jan 2017 - 3:05 pm | संजय पाटिल

पु. भा. प्र.

अनिंद्य's picture

23 Jan 2017 - 11:22 am | अनिंद्य

@ डॉ सुहास म्हात्रे, संजय पाटिल
- आभार.

वरुण मोहिते's picture

23 Jan 2017 - 11:36 am | वरुण मोहिते

चांगली मालिका चालू आहे .वाचत आहे .

खूप मस्त माहिती मिळत आहे, आधी कधीही न वाचलेली.

एस's picture

26 Jan 2017 - 4:46 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

ब्रिटिशांना केवळ १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध चिरडतानाच गुरखा सैन्याचा उपयोग झाला असे नाही. नंतरही ब्रिटिश सैन्यातील गुरखा पलटण तिच्या राजनिष्ठेमुळे ब्रिटिशांना उपयोगी ठरली. विशेषतः भारतीय सैनिक वापरण्याचे अडचणीचे ठरेल अशा वेळी. याचे एक उदाहरण म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड.

अनिंद्य's picture

26 Jan 2017 - 9:12 pm | अनिंद्य

@ एस
बरोबर.

जनरल डायर मोजून ६५ गोरखा आणि २५ बलोच सैनिक घेऊन गेला होता जालियनवाला बागेतल्या गोळीबारासाठी, एकही सैनिक ब्रिटिश (किंवा अन्य भारतीय) नव्हता.

बाकी राजनिष्ठ सैन्य हे कुठल्याही राजवटीचे महत्वाचे हत्यार असतेच.

वाल्मिकी's picture

24 Feb 2017 - 8:38 pm | वाल्मिकी

ब्रिटिश का नव्हता ?

अनिंद्य's picture

25 Feb 2017 - 8:16 pm | अनिंद्य

@ वाल्मिकी,

वर एस यांनी सांगितल्याप्रमाणे -
ब्रिटिश सैन्यातील गुरखा पलटण तिच्या राजनिष्ठेमुळे ब्रिटिशांना उपयोगी ठरली. विशेषतः भारतीय सैनिक वापरण्याचे अडचणीचे ठरेल अशा वेळी. याचे एक उदाहरण म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड.

वाल्मिकी's picture

25 Feb 2017 - 8:37 pm | वाल्मिकी

माफ करा माझा प्रश्न पूर्ण नव्हता

जलाईनवाला वेळी ब्रिटिश सैनिक का नव्हते ? त्याने काही फरक पडला असता का ?

अनिंद्य's picture

27 Feb 2017 - 12:04 pm | अनिंद्य

माझे मत - फारसा फरक पडला नसता.

तुम्हाला काय वाटते ?

वाल्मिकी's picture

27 Feb 2017 - 5:04 pm | वाल्मिकी

मला तोच प्रश्न पडलाय
कि ब्रिटिश सैनिक का नव्हता

अनिंद्य's picture

26 Jan 2017 - 8:58 pm | अनिंद्य

@ वरुन मोहिते, शलभ, एस

आभार !

अनिंद्य's picture

24 Feb 2017 - 12:58 pm | अनिंद्य

@ साहित्य संपादक / संपादक मंडळी,

पूर्ण लेखमालिकेच्या शीर्षकांना तुम्ही आता सुटसुटीत केले आहे - मला जमले नसते.

अनेक आभार!

- अनिंद्य

रुपी's picture

1 Jun 2017 - 5:39 am | रुपी

मस्त..
तुमची लेखनशैली फारच छान आहे.

अनिंद्य's picture

1 Jun 2017 - 11:14 am | अनिंद्य

@ रुपी,

तुम्ही वेळोवेळी देत असलेल्या अभिप्रायाबद्दल आभार !