नसतेस घरी तू जेव्हा

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
18 Feb 2017 - 2:14 pm

संदीपच्या या कवितेविषयी लिहीण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही, फक्त एक उत्कट अनुभव आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतो. ही कविता कार्यक्रमात एकदा तरी सलीलऐवजी संदीपनं गावी, अशी अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे, कारण तो ही कविता जगलायं.

आयुष्यातली सगळी नाती मान्यतेची आहेत कारण विवाह या बेसिक मान्यतेतून ती निर्माण होतात. पत्नी ही व्यक्ती नाही, ते तुम्ही घडवलेलं एक नातं आहे. जो हे नातं अत्यंत उत्कटतेनं आणि हृदयाची बाजी लावून घडवतो, त्याला ही कविता कळू शकेल. मजरूह सुल्तानपुरींनी म्हटलंय :

तुम्ही को चुन लिया, नज़र की बात है
लिया ग़म आपका, जिगर की बात है
हो तुम फिर भी खफ़ा, असर की बात है
ओ हो हो हो प्यार क्या है, जाने तमन्ना, अब तो पहेचानो |

म्हणजे तुम्हाला ती का आवडते हा सर्वस्वी तुमचा नज़रीया आहे, तुम्ही तिची सर्व दु:खं आणि वेदना आपल्याशा केल्यात कारण हे हृदयानं केलेलं साहस आहे आणि तरीही ती नाराज असेल तर फक्त तुमची लगन अजून तिच्या हृदयापर्यंत पोहोचलेली नाही... अर्थात, त्यानं काही फरक पडत नाही. देर-अबेर तो असर होईलच !

कदाचित संदीप हा एकमेव कवी आहे ज्यानं पतीची पत्नीप्रती असणारी अत्यंत हळवी संवेदना इतक्या दिलकशपणे पेश केली आहे. ही कविता ऐकून ज्याचा कंठ रुद्ध झाला नाही, ज्याच्या डोळ्यात भावविवश होऊन पाणी तरळलं नाही, त्याला संसाराची मजाच कळली नाही. खरं तर पत्नी हे एकच असं नातं आहे की ज्यात हृदयापासून सहस्त्राराच्यावर जाणारं आईचं नातं, हृदयापासून मुलाधारापर्यंत जाणारं मुलीचं नातं आणि हृदयापासूननिघून कोणताही आयाम घेऊ शकणारं सखीचं सप्तरंगी नातं, एकाच वेळी हजर असतं. संदीपच्या या कवितेत पहिल्या आणि तिसर्‍या आयामांचा घेतलेला उत्कट वेध आहे.

संदीपचे `जीव तुटका तुटका होतो' आणि `संसार फाटका होतो' हे शब्द काव्यात्मकतेला पूर्ण फाटा देणारे आहेत. पण ज्यानी तिच्याशिवाय जगणं अनुभवलंय त्यांना हे `जीव तुटका तुटका होणं' सरळ हृदयाला भिडतं आणि कधी कायमचं तिच्याविना जगावं लागलं तर संसार पूर्णपणे फाटका होईल या विव्हलतेशी ते शेवटच्या ओळीसरशी जोडले गेल्यावाचून राहात नाहीत.

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो |

रिलेशनशिपची खोली किती आहे यावर दुसर्‍या कडव्याच्या दाहक अनुभवाची प्रचिती अवलंबून आहे. जे वरवरचं जगलेत त्यांना `नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो' ही अतिशयोक्ती वाटू शकते पण जे सर्वस्वी एकमेकात आरपार झालेत त्यांना तो कल्लोळ मस्तकात जाणवतोच. आणि मग संदीपच्या या ओळी ....`ही धरा दिशाहीन होते, अन्‌ चंद्र पोरका होतो' केवळ कमाल करुन जातात. ‘धरा दिशाहीन होणं’ ही मनाच्या सैरभैर होण्याला योजलेली रुपकात्मकता आणि `चंद्र पोरका होतो' ही स्वतःची झालेली अवस्था, संदीपच्या अफाट प्रतिभेची साक्ष देतात.

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो |

दुसरं कडवं संवेदनाशिल कविमनाचं अत्यंत मोहक वर्णन आहे. दोघातल्या नात्याला इतक्या हळूवारपणे केवळ संदीपच स्पर्श करु जाणे. उन्हाचं हिरमुसून मागे जाणं आणि वार्‍याचं तिच्या देहगंधाविणा परत फिरणं हे काव्यातल्या तरलतेची आणि अनुभवाच्या उत्कटतेची परिसीमा आहेत. या ओळींना लता मंगेशकरसारख्या, आयुष्यात एकसोएक प्रतिभावंत शायरांच्या काव्यपंक्ती गायलेल्या गायिकेनं दाद दिलीये, यावरनं तो अनुभव किती प्रत्ययकारी आहे याची कल्पना येते.

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो |

प्रणय हा दोघातला फार जीवलग विषय आहे आणि संदीप तो तितक्याच नज़ाकतीनं मांडतो.... `तव मिठीत विरघळणार्‍या, मज स्मरती लाघववेळा ! पुढच्या दोन ओळीत संदीपच्या काव्याची साधी आणि सरळ शब्दयोजना कामाल करुन जाते... 'श्वासाविन हृदय जसे की, मी तसाच अगतिक होतो '... त्याच्या अगतिक या केवळ एका शब्दावर जान कुर्बान आहे.

सलीलनं मीटरच्या नांवाखाली तिसरी ओळ बदलीये, ज्याची काहीही गरज नाही आणि तो ती चुकीची गातो. मूळ कवितेत आहेत तशा ओळी मी दिल्या आहेत आणि त्या कवितेच्या रसाशी आणि लयीशी पूर्णपणे अनुरुप आहेत.

तव मिठीत विरघळणार्‍या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविन हृदय जसे की
मी तसाच अगतिक होतो |

माझ्या आठवणीप्रमाणे चवथ्या कडव्याची दोन वेरिएशन्स होती. सध्याचं कडवं हे संदीपनं (बहुदा सलीलच्या आग्रहाखातर बदललंय) पण त्यामुळे कडव्याचं ओरियंटेशनंच हुकलंय. त्या कडव्याची मानसिकता स्त्रैण झालीये म्हणजे ते पत्नीनं पतीला म्हणावं तसं झालंय. मूळ काव्यपंक्तींचा बराच शोध घेऊन सुद्धा त्या मिळाल्या नाहीत, जर त्या मिळाल्या तर या कडव्यावर पुन्हा लिहीन. त्यामुळे पहिल्या दोन ओळीत जोरदार महौल असूनही, सध्या या कडव्याचं रसग्रहण करु शकत नाही.

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो ।

मी मागे म्हटल्याप्रमाणे संदीप प्रत्येक कवितेला अध्यात्मिक रंग देतो आणि मग त्याची कविता मिस्टिकल होते. पराबलंबित्व हे अध्यात्मिक दृष्टीनं अज्ञानाचं आणि व्यक्ती अजूनही इमॅच्युअर असल्याचं लक्षण मानलं गेलंय, पण पत्नीसाठी संदीप हे दोन्हीही मान्य करतो ! ‘ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजुनी झालो’... आणि त्याच्या शेवटच्या दोन साध्याशा ओळी पुन्हा अध्यात्माला मात देउन जातात... तुजवाचून उमगत जाते, तुजवाचून जन्मच अडतो !... आणि आपल्या डोळ्यात हमखास पाणी उभं राहिल्याशिवाय राहात नाही.

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

हे नेहमी एक आव्हान असतं. सुभाष घईंसारख्या ख्यातनाम दिग्दर्शकानी, ताल चित्रपट करतांना म्हटलं होतं की एआर रहेमानची गाणी पडद्यावर सादर करणं माझ्यातल्या दिग्दर्शकाची कसोटी असते. माझ्या मते या कवितेचा भाव विडिओत बांधणं अशक्य आहे, ती ऐकून अनुभवायची चिज आहे म्हणून फक्त ऑडिओ दिलायं.

सुंदर कवितेचं सुंदर रसग्रहण !!

अवांतर: संदीप उत्तमच लिहितो. पण प्रत्येक कवितेचं गाण्यात रूपांतर झालंच पाहिजे हा आग्रह कधी कधी कवितेला मारक ठरतो.
उदा. :- १. हे भलते अवघड असते....
धडा वाचल्यासारखी चाल लावली आहे.

२. कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे...
अरे किती घाई किती घाई..आपण पहिल्या ओळीवर रेंगाळतो तोपर्यंत गाणं संपलेलं असते.

अवंताराशी बेशर्त सहमत

आम्ही समव्यावसायिक मित्रांनी एकदा "आयुष्यावर बोलू कांही" या कार्यक्रमाचे SWOT analysis केले होते ते आठवले

अशी अनेक निरीक्षणे शोधली होती.

संजय क्षीरसागर's picture

18 Feb 2017 - 3:13 pm | संजय क्षीरसागर

म्हणून सध्या काही लिहीत नाही.

पिलीयन रायडर's picture

19 Feb 2017 - 12:57 am | पिलीयन रायडर

सलील कुलकर्णीचा दोष असेल तो. मला तो काही आवडत नाही.

पण कसे सरतील सये चांगलय हो. इतकी गडबड वाटली नाही.

रेवती's picture

19 Feb 2017 - 7:02 pm | रेवती

अरे किती घाई किती घाई.
हेच संक्षींच्या मागील धाग्यावर म्हटलं होतं. कविता मनात उतरायला वेळ मिळत नाही.
का कोण जाणे मला त्याच्या दोन तीन ऐकलेल्या कविता तरी नाही भावल्या.
खूपच चर्चेत होती म्हणून दमलेल्या बाबाची कहाणी कविता ऐकली होती.
उगीच ह्रुदयाला पीळ पाडण्याचा सफल प्रयत्न इतकच वाटलं.
फारतर आजच्या काळातलं वास्तव!
संदीपची पिढी, जी लहानाची मोठी होताना जसं शांत वातावरण होतं, मनुष्य मनुष्याला ओळखत होता, घटकाभर गप्पा होत होत्या ते तो मिस करतो असं वाटतं, जे मीही करतेच पण असं शब्दात मांडता आलं नसतं, ते त्यानं केलं त्यामुळे बरं वाटलं इतकच!

संजय क्षीरसागर's picture

19 Feb 2017 - 7:20 pm | संजय क्षीरसागर

संदीपची पिढी, जी लहानाची मोठी होताना जसं शांत वातावरण होतं, मनुष्य मनुष्याला ओळखत होता, घटकाभर गप्पा होत होत्या ते तो मिस करतो असं वाटतं, जे मीही करतेच पण असं शब्दात मांडता आलं नसतं, ते त्यानं केलं त्यामुळे बरं वाटलं इतकच!

ज्या तीन कवितांचं रसग्रहण केलंय ते फक्त सध्याच्या पिढीचे नाहीत तर चिरंतन विषय आहेत. सगळं आलबेल असतांना अचानक येणारी उदासिनता, केवळ माणसाला सतावणारी भविष्याची चिंता आणि जीवनाचा केंद्रबिंदू असलेलं पती- पत्नीचं नातं हे तीन काव्यविषय हरपिढीचे आहेत. आणि संदीपनं ते सुरेख मांडलेत.

"दिवस असे की " चं संगीत शैलेश रानडे ने केलंय, सलील ने नाही. सलील ने खरं तर सुंदर काम केलंय संदीप च्या कवितांवर ! आणि इथे बरेच जणं म्हणतात की संदीप च्या कविता आवडत नाहीत , का कोण जाणे.. कुणाला आवडत नसतील असं वाटलं ही नव्हतं इतक्या मला आवडतात त्या कविता.

संक्षींना जसा संदीप ज्वर चढलाय तसा मला पीरियॉडिकली चढतो आणि मग लूप मध्ये फक्त सलील- संदीप ची गाणी वाजत असतात ( त्यात हा अल्बम पण आलाच) .

संजय क्षीरसागर's picture

19 Feb 2017 - 7:01 am | संजय क्षीरसागर

"दिवस असे की " चं संगीत शैलेश रानडे ने केलंय, सलील ने नाही.

बरोबरे. पण सम हाऊ, संदीप पुढे आला ते `आयुष्यावर बोलू काही' मुळे. आणि त्याहूनही नवल म्हणजे सलीलसारखा सुमार गायक पुढे आला तो संदीपमुळे !

नसतेस घरी तू जेव्हाचं म्युझिक संदीपनं केलंय.

प्रियाभि..'s picture

19 Feb 2017 - 5:48 pm | प्रियाभि..

माझ्यामते संदीपला खरा न्याय दिला तो सलीलने

संजय क्षीरसागर's picture

19 Feb 2017 - 7:08 pm | संजय क्षीरसागर

पण तो लेखनविषय नाही .

मराठी_माणूस's picture

20 Feb 2017 - 11:35 am | मराठी_माणूस

तो लेखन विषय नसताना मग उगीच सलील बद्दल मत प्रदर्शन कशाला ?

सुमार ??? अहो, काय हे संक्षी !! सलील कुलकर्णी सुमार गायक किंवा संगीतकार मुळीच नाहीये. या जोडीमध्ये तुम्हाला संदीप च्या कविता जास्त आवडतात असं म्हणा हवं तर. सलील ला काय सुमार डिक्लेअर करताय !

संजय क्षीरसागर's picture

19 Feb 2017 - 10:05 pm | संजय क्षीरसागर

पण तुमच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करतो.

स्रुजा's picture

19 Feb 2017 - 10:17 pm | स्रुजा

छे , छे ! भावना नाही दुखावल्या पण मला खुप आश्चर्य वाटलं . संदीप च्या कविता आवडत नाही असं ऐकल्यावर वाटलं होतं तेवढंच.

स्रुजा's picture

19 Feb 2017 - 10:17 pm | स्रुजा

छे , छे ! भावना नाही दुखावल्या पण मला खुप आश्चर्य वाटलं . संदीप च्या कविता आवडत नाही असं ऐकल्यावर वाटलं होतं तेवढंच.

रायबा तानाजी मालुसरे's picture

20 Feb 2017 - 5:14 pm | रायबा तानाजी मालुसरे

खरंच तुम्ही खूप सुंदर रसग्रहण करत आहात. तुमचा कवितेचा धागा आला की नकळत उघडला जातो. धन्यवाद.
संदीप खरेची जोडी सलील बरोबर का जमली असेल असा विचार करून पहा. सलीलच्या चालीत त्याचं शब्दांवरचं प्रेम दिसतं. शब्दांवरचं प्रेम हाच तर धागा आहे. सलीलचा संधीप्रकाशात अल्बम ऐकला असेल ना? तिथेही हेच जाणवतं.

संजय क्षीरसागर's picture

20 Feb 2017 - 6:19 pm | संजय क्षीरसागर

संदीप खरेची जोडी सलील बरोबर का जमली असेल असा विचार करून पहा. सलीलच्या चालीत त्याचं शब्दांवरचं प्रेम दिसतं. शब्दांवरचं प्रेम हाच तर धागा आहे. सलीलचा संधीप्रकाशात अल्बम ऐकला असेल ना? तिथेही हेच जाणवतं.

संदीपनं आयुष्यावर सुरु करण्यापूर्वीच म्हटलं होतं की त्याला कविता रसिकांपर्यंत गाण्याच्या माध्यमातून पोहोचवणारा गायक हवा होता. त्याच्या दृष्टीनं संगीतापेक्षा कवितेला जपणारा साथीदार महत्त्वाचा होता आणि आहे. अजून त्यांची जोडी टिकून आहे म्हणजे सलीलनं संदीपच्या अपेक्षापूर्ण केल्यात. थोडक्यात माझ्या सलीलबद्दलच्या मताला शून्य किंमत आहे.

तरीही, सलील संदीपच्या कवितेत करत असलेले बदल, संदीपला मंजूर असूनही, एक रसिक म्हणून मला फार त्रासदायक वाटले आहेत.

एक उदाहरण देतो `नसतेस घरी' मधे `श्वासाविण हृदय जसे की' या ऐवजी `श्वासाविण हृदय अडावे' असा बदल सलीलनं केला आहे आणि ते कडवं कायम तसंच गायलं जातं. हा बदल माझ्या अ‍ॅस्थेटिक्सला क्लेषदायी ठरला आहे. संदीप ती कविता जगला आहे आणि जगतो आहे. त्याचे शब्द ही त्याच्या अनुभवाची अभिव्यक्ती आहे आणि संदीपचा म्युझिकसेन्ससुद्धा तितकाच उत्तम आहे.

तुम्ही सुद्धा वरच्या ओळी मूळ कवितेप्रमाणे म्हणून पाहा आणि तुमच्या लक्षात येईल की वजन हृदयावर नसून अगतिक होण्यावर आहे. सलीलच्या बदलामुळे नेमका हेतूच फसला आहे. अगतिक हा शब्द शेवटी येत असला तरी `अडावे' या शब्दामुळे सगळा महौलच बिनसतो.

समीर_happy go lucky's picture

19 Feb 2017 - 9:23 pm | समीर_happy go lucky

अप्रतिम कविता, उत्तम रसग्रहण

प्राची अश्विनी's picture

20 Feb 2017 - 10:55 am | प्राची अश्विनी

आवडती कविता आणि सुंदर रसग्रहण .
पण पत्नीच्या अनुपस्थितीवर बोरकरांची देखील एक कविता आहे.
तूं गेल्यावर फिकें चांदणें, घरपरसूंहीं सुनें-सुकें
मुलें मांजरापरी मुकीं अन दर दोघांच्या मधे धुकें
तूं गेल्यावर घरांतदेखील पाउल माझें अडखळतें,
आणि आटुनी हवा भवतिची श्वासास्तव मन् तडफडतें...
तूं गेल्यावर या वाटेनें चिमणीदेखील नच फिरके,
कसें अचानक झालें न कळे, सगळें जग परकें परकें...
तूं गेल्यावर जडून पनगत लागे पिंपळ हाय गळूं,
गळ्यांतले मम झुरतें गाणे , वाटे मरतें हळूहळू...

तूं गेल्यावर दोन दिवसांस्तव जर ही माझी अशी स्थिती,
खरीच माझ्याआधीं गेलिस तर मग माझी कशी गती ???

( मूळ कवितेतील सर्व अनुस्वार मुद्दाम तस्सेच टंकले आहेत ):)

संजय क्षीरसागर's picture

20 Feb 2017 - 12:56 pm | संजय क्षीरसागर

तूं गेल्यावर जडून पनगत लागे पिंपळ हाय गळूं,
गळ्यांतले मम झुरतें गाणे , वाटे मरतें हळूहळू...

पुजारी's picture

20 Feb 2017 - 12:00 pm | पुजारी

प्राची अश्विनी जी ! किती दिवस हि कविता शोधात होतो !

या कवितेच विडंबन "असतेस घरी तू जेव्हा" मिपावर आहे.