===========================================================================
शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...
===========================================================================
एक होते हिंदुराष्ट्र - नेपाळच्या एकीकरणाचे पर्व - भाग ३
पृथ्वीनारायण शाह - काठमांडू खोऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या अनेक छोट्या छोट्या 'ठाकुरी' संस्थानापैकी एक 'गोरख' (नेपाळी भाषेत - गोरखाली) ह्या पिटुकल्या संस्थानाच्या राजाचा हा मुलगा. ह्या तरुण महत्वाकांक्षी राजपुत्राचे स्वप्न होते 'सम्राट' होण्याचे. त्यासाठी अगदी वयाच्या पंधराव्या वर्षी राजकारणाची उत्तम समज असलेला हा युद्धनिपुण तरुण आसपासच्या छोट्या संस्थानांना जिंकून आपले ‘गोरखाली’ राज्य वाढवण्याच्या कामाला लागला सुद्धा. शेजारी असलेली छोटी संस्थाने जिंकून, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेली सेना तयार करून तो अंतर्गत यादवीने गांजलेल्या मल्ल साम्राज्याच्या सीमेला धडका देत होता - पुन्हा पुन्हा.
अर्थात मल्ल साम्राज्याची शक्ती कमी झाली असली तरी ते अगदीच काही पांगळे झाले नव्हते. राज्यरक्षणासाठी त्यांची फौज शूरपणे लढत होती. मल्लांना हरवण्याचे गोरखाली सैन्याचे असे दोन मोठे प्रयत्न फसले. पृथ्वीनारायणच्या फौजा शौर्यात कोठेही कमी नव्हत्या. त्याचे सेनापती आणि तो स्वतः युद्धाच्या डावपेचात कमी नव्हते. तरीही मल्लांना जिंकण्याचे दोन प्रयत्न वाया गेले. त्याचे जिगरबाज सैनिक सर्वशक्तीनिशी लढले तरी दोनदा पराभव आणि खूप नुकसान! त्या अनुभवावरून एक गोष्ट हा राजा शिकला - आपले सैनिक प्रचंड शूर असले तरी अंतिम विजय मिळवायला युद्धात आधुनिक शस्रास्त्रेच लागतील. मग ही आधुनिक शस्त्रे मिळवण्यासाठी त्याने हुगळी (कोलकाता) येथील काही ब्रिटिश व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. पण काम साधले नाही. राजा स्वतः काशीला आला, आणि त्याने गाठले काशीतील एक मोठे प्रस्थ असलेल्या अभिमानसिंह नामक धनाढ्य ब्राह्मण जमीनदाराला. ह्या अभिमानसिंहाचे काशी (बनारस/वाराणसी) आणि अलाहाबाद येथील ब्रिटिश व्यापाऱ्यांशी घनिष्ठ संबंध होते. त्याला काशीत मोठा मान होता. ब्रिटिश व्यापारी शस्त्रास्त्रे विकताना फार चौकस असत, सहजी कोणत्याही मागणीदाराला पुरवठा असे त्यांचे धोरण नव्हते. अभिमानसिहांनी शब्द टाकला आणि काही ब्रिटिश व्यापारी आधुनिक बंदुका, दारुगोळा वगैरे विकायला तयार झाले. ह्या सर्व वाटाघाटींसाठी तरुण राजाचा अभिमानसिहांच्या घरी मुक्काम थोडा लांबला. राजाच्या भविष्यातील योजनांबद्दल दोघांमध्ये चर्चा होई. भारतात तोवर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराच्या नावाखाली प्रवेश करून नंतर छोटी-छोटी दुर्बल राज्ये गिळंकृत करण्याच्या कामाला लागली होती. प्लासीचे पहिले युद्ध ब्रिटिशांनी जिंकून एव्हाना बंगाल प्रांत ताब्यात घेतला होता आणि व्यापारी आता राज्यकर्ते झाले होते. मोगलांचे साम्राज्य खिळखिळे झाले होते आणि ब्रिटिश एक शक्तिशाली घटक म्हणून भारतात पाय रोवून उभे होते. अभिमानसिहांनी ब्रिटिश राज्यकर्ते, त्यांच्या शिस्तबद्ध फौजा आणि त्यांच्या विस्तारवादी राजकारणाबद्दल राजाला सावध केले, युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. खरे तर स्वतः अभिमानसिंह ह्या राजाची धडाडी आणि हुशारी बघून खूप प्रभावित झाला. इतका की आपल्या एकुलत्या कन्येचा, नरेंद्र राज्यलक्ष्मीचा, विवाह त्यानी पृथ्वीनारायणाशी करून दिला आणि त्याला सर्वतोपरी मदत देऊ केली.
काशीत नरेंद्र राज्यलक्ष्मीशी लग्न करण्यापूर्वी ह्या राजाने आणिक एक केले- कुठलाही धार्मिक हिंदू पुरुष सहसा करणार नाही असे काम. त्याने काशीतील ब्राह्मणांकरवी समारंभपूर्वक स्वतःचे भारद्वाज हे गोत्र बदलून काश्यप गोत्र धारण केले! ह्या अतर्क्य समारंभामागे एक कारण होते. आजवरच्या राज्यविस्तारात त्याने स्वतःचे अनेक जवळचे नातेवाईक ठार केले होते आणि अजून काही त्याच्या 'हिट लिस्ट' वर होते. मल्ल सम्राटांच्या तत्कालीन धार्मिक रुढींप्रमाणे 'गोत्र हत्येचे' पातक असलेल्या व्यक्तीस सम्राटपदावर आरूढ होता येत नसे. म्हणून ही पूर्वतयारी! आपल्या पूर्वजांची ओळख पुसण्याचा ह्या एका घटनेवरूनच 'सम्राट'पदाची पृथ्वीनारायणाची दुर्दम्य लालसा आणि त्यासाठी असलेला प्रचंड आत्मविश्वास दिसून येतो.
आणि मग आधुनिक शस्त्रे, काही पगारी सैनिक आणि रणनीतिकुशल सल्लागार, बरेचसे धन असा सर्व जामानिमा घेऊन सर्वबाजूनी सज्ज होऊन नेपाळला परतलेल्या पृथ्वीनारायणाला फार दिवस रोखणे कुठल्याच नेपाळी राज्यकर्त्याला शक्य नव्हतेच. दुही आणि इर्षेने पोखरलेल्या वैभवी मल्ल राज्यांना निकराच्या तिसऱ्या प्रयत्नात नमवून संपूर्ण नेपाळ एकसंघ करून 'शाह' घराण्याचा एकछत्री अंमल कायम करण्याच्या स्वप्नाची पूर्ती करण्यात ह्या पराक्रमी पुरुषास यश मिळाले आणि सुरु झाला नेपाळी इतिहासातील एक नवा अध्याय ! पुढची जवळपास अडीच शतके नेपाळवर राज्य करणाऱ्या 'शाह' घराण्याचा अध्याय !
अखंड नेपाळचे जनक, आजच्या नेपाळचे आद्यपुरुष, नेपाळ नरेश - पृथ्वीनारायण शाह ह्यांचा अध्याय!
जुन्या लिच्छवी काळात बांधलेल्या काठमांडूच्या हनुमानढोका राजमहालाच्या आवारात जेव्हा श्वशुर अभिमानसिंह आणि काशीहून आलेल्या धर्मगुरूंनी 'समरविजयी' पृथ्वीनारायण शाहचा राज्याभिषेक केला तो दिवस होता २५ सप्टेंबर १७६८! तेव्हापासून ते अगदी अलीकडे २००८ साली नेपाळी राजेशाही संपुष्टात येईपर्यंत त्याच्या वंशजांनी नेपाळवर राज्य केले.
थोडे अवांतर:
ह्या पृथ्वीनारायण शाहला सगळ्याच कामात घाई होती असं गमतीने म्हटल्या जातं. माता कौशल्यावतीला सातवा महिना लागताच त्याचा जन्म झाला म्हणूनही असेल. पण हा घाई करण्याचा गुण ह्या राजाला वेळोवेळी फार कामी आला.
पृथ्वीनारायणाचे नेपाळात राज्यारोहण झाले त्याआधीच शेजारी भारतात ब्रिटिश सत्ता बाळसे धरू लागली होती. आधी फक्त व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी हळूहळू हातपाय पसरले होते. अधिकाधिक प्रदेशात व्यापार हक्क, नवीन वखारी, समुद्रमार्गासाठी मोठी जहाजं आणि ती नांगरण्यासाठी उपयुक्त बंदरं मिळवून भारतातील व्यापार उदीम पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी शक्य ते सर्व ब्रिटिश करत होते. त्यांचे हेच सर्व उद्योग शेजारच्या बर्मा आणि चीनमध्येही चालले होतेच. त्यामुळे भारतातून तिबेट आणि पलीकडे चीनला जाणाऱ्या नेपाळच्या व्यापारी मार्गावर ब्रिटिशांची नजर नसती तर नवल!
ब्रिटिशांना नेपाळ-तिबेट-चीन मार्गाचा मोह लवकरच होईल तेंव्हा क्षेत्रातील सर्व व्यापारी मार्ग ताब्यात घेऊन नेपाळची एक सलग भूमी आणि एक सशक्त राज्य म्हणून बांधणी जरा घाईनेच करावी लागेल हे पृथ्वीनारायणाने ओळखले होते आणि आज आपल्याला शास्त्रात्रांची मदत करणाऱ्या ब्रिटिशांशी आज ना उद्या आपली युद्धात गाठ पडणार हे ही ! म्हणून त्याने योग्य ती घाई केलीसुद्धा!
क्रमशः
===========================================================================
शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४...
नेपाळ-०५... नेपाळ-०६...
===========================================================================
प्रतिक्रिया
9 Jan 2017 - 12:33 am | अमितदादा
पुभाप्र..अजून मोठे भाग वाचाय आवडतील.
9 Jan 2017 - 9:32 am | एस
छान माहिती. पुभाप्र.
11 Jan 2017 - 1:55 pm | अनन्त अवधुत
आपल्या शेजाऱ्यांबद्दल बरेच काही नवीन माहिती होणार.
पु भा प्र.
11 Jan 2017 - 6:52 pm | शलभ
मस्त लिहिताय..नवीन माहिती मिळतेय..पटपट येऊद्या..
12 Jan 2017 - 2:29 pm | महेन्द्र ढवाण
मस्त लिहिताय..नवीन माहिती मिळतेय..पटपट येऊद्या..
12 Jan 2017 - 6:08 pm | पद्माक्षी
उत्तम माहितीपूर्ण लेख.
17 Jan 2017 - 11:10 am | अनिंद्य
@ अमितदादा, एस, अनन्त अवधुत, शलभ, महेन्द्र ढवाण, पद्माक्षी
आभार !
मला तर हा विषय सर्वांना फार बोर होईल असे वाटले होते :-)
23 Jan 2017 - 5:03 pm | पैसा
अगदी इंटरेस्टिंग लिहिताय!
27 Jan 2017 - 5:45 pm | अनिंद्य
आभार !
13 Feb 2017 - 9:16 am | एकुलता एक डॉन
ब्रिटिश व्यापारी चौकस का होते ?
13 Feb 2017 - 5:44 pm | अनिंद्य
ब्रिटिश व्यापारी शस्त्रास्त्रे विकताना फार चौकस असत, सहजी कोणत्याही मागणीदाराला पुरवठा असे त्यांचे धोरण नव्हते.
- शस्त्रांचा व्यापार आजही 'क्लोज्ड ग्रुप ट्रेड' आहे, बाजारात गेलो आणि बंदुका विकत आणल्या असे सोपे प्रकरण नाही :-) त्याकाळीही हेच कारण असावे.
15 Feb 2017 - 12:16 am | एकुलता एक डॉन
माफ करा
मी चित्रपटानं मध्ये बंदुकांची दुकाने बघतील होती ,ज्यात कोणी पण जाऊन विकत घेत होते
बॉलीवूड
गॉलियॉन कि रासलीला
हॉलिवूड
डबले इम्पॅक्ट
15 Feb 2017 - 8:48 pm | अनिंद्य
@ एकुलता एक डॉन,
तुम्ही डॉन आहात - शस्त्रास्त्रांबद्दल तुमचीच माहिती बरोबर असावी :-)
31 May 2017 - 4:14 am | रुपी
मस्तच.. अगदी रोचक माहिती!
9 Jun 2017 - 9:18 pm | अनिंद्य
@ रुपी,
आभार.