सूफी़जम जगातली एक अनोखी प्रणाली आहे. तिच्यात सारं व्यक्त जग प्रेयसी आहे आणि ज्या अव्यक्तानं सारं व्यक्त तोललंय, तो प्रितम आहे. जे व्यक्त आहे, मग तो पुरुष देह असो की स्त्री देह, सूफी़ंच्या दृष्टीनं ते सर्व स्त्रैण आहे. जे कधीही व्यक्त होऊ शकत नाही, तो पुरुष आहे. खरंतर जोपर्यंत अव्यक्ताशी मीलन होत नाही तोपर्यंत जेजे काही व्यक्त आहे ते स्त्रैण आहे. हा प्रकृती आणि पुरुषातला अनंगरंग सूफी़ जगण्याचा अंदाज़ आहे. सूफी़जम हा जगण्यातला रोमान्स आहे. सूफी़ साधनेची फलश्रुती व्यक्त आणि अव्यक्ताच्या मीलनात आहे. आणि मीलनानंतर प्रियकर- प्रेयसी एकच आहेत. भक्तीमार्ग सूफी़जमपेक्षा वेगळा आहे. तो आराध्य आणि आराधकात नातं निर्माण करण्याचा यत्न करतो, त्यात पावित्र्य आहे; ती मुहोब्बत नाही, तो सूफी़ रोमान्स नाही.
तस सांगायचं असं की जो किंवा जी, आयुष्यात कुणावर कधी फिदा झाली नाही, ज्यांनी कधी मुहोब्बत केली नाही, त्यांना या गाण्याची तितकीशी मजा येणार नाही. या गाण्याचा माहौल सूफी़याना आहे. जो स्वतः ला, `हमने तो दिल को आपके कदमों पे रख दिया' इतकं निराधार करु शकतो आणि जी, `हम आपकी वफ़ाकी कसम खा रहे हैं आज' म्हणून आपल्या जीवनाची बागडोर त्याच्या हातात देते, त्यांना मजहूर सुल्तानपुरीचा हा क़लाम, ओपींची अनोखी धुन, रफी आणि आशाची मदहोश गायकी.... नशा आणल्याशिवाय राहाणार नाही.
प्रियकरानं आपली जान तिच्यावर कुर्बान करुन स्वतःला निराधार केलंय. आता या समर्पणाचा स्वीकार-अस्वीकार सर्वस्वी तिच्या हाती आहे. हमने तो दिल को आपके कदमों पे रख दिया...इस दिल क्या करेंगे ये अब आप सोचिये । आणि प्रेयसी म्हणते : मला तुझ्या या विश्वासाची शपथ आहे. मी सुद्धा माझा हात तुझ्या हाती दिलायं. आता आपल्या या पारस्पारिक विश्वासावर, दोघांच्या जीवनाची दिशा तू ठरवशील तशी मला मंजूर आहे. हम आपकी वफ़ाकी कसम खा रहे हैं आज ... कैसे वफ़ा करेंगे ये, अब आप सोचिये |
हमने तो दिल को आपके कदमों पे रख दिया –
इस दिल क्या करेंगे ये अब आप सोचिये ।
हम आपकी वफ़ाकी कसम खा रहे हैं आज –
कैसे वफ़ा करेंगे ये, अब आप सोचिये |
मजहूर म्हणतात की हा हृदयाचा हृदयाशी जोडलेला सिलसिला आहे. हृदयाचा निर्णय कायम एकमार्गी असतो, मनाच्या निर्णयासारखं द्वंद्व त्यात नसतं. त्यामुळे प्रियकर म्हणतो की आता मला भविष्याची फिकीर नाही. माझ्या प्रेमाचा तुझ्यावर वर्षाव करुन मी रीता झालो आहे , आता माझा स्वीकार करणं न करणं, तुझ्या हाती आहे. मजहूरजींनी पहिली ओळ अशी लिहीली असती तर अजून गज़ब झाली असती... `जब दिलने दिलसे जोड़ लिया, दिल का सिलसिला', कारण दिलसे दिल जोडण्याचं साहस केवळ हृदयच करु जाणे, वो अदमीके बसकी बात नाही. पण दुसरी ओळ मात्र कमाल झाली आहे ..`आगे है क्या नसीब में, जाने मेरी बला'....! तो सूफी़याना अंदाज़ आहे. एकदा समर्पित झाल्यावर सगळं अव्यक्ताच्या हाती आहे, मग नशिबाचं दान काहीही पडो त्याची पर्वा नाही... तो प्रियकराचा जुलूम म्हणून, व्यक्ताला सहर्ष स्वीकार आहे.
जब दिल से हम ने जोड़ लिया दिल का सिलसिला,
आगे है क्या नसीब में, जाने मेरी बला....
छोडा जब आपही पे, मुहोब्बत का फ़ैसला,
क्या फ़ैसला करेंगे ये, अब आप सोचिये |
हम ने तो दिल को आपके…
दुसर्या कडव्यात मजहूर कमालीची ऊंची गाठतात. प्रेयसी म्हणते की माझ्या प्रेमाचा तू केलेला स्वीकार, त्याची तुझ्याकडून मिळालेली ग्वाही, हेच माझ्यासाठी एक सुंदर स्वप्न आहे ! आता तू काहीही केलंस तरी त्याचा विरोध करणारं माझ्यात कुणी उरलं नाही. माझ्या नशीबाचा लेख तुझ्या हाती आहे, आता तू जे लिहीशिल ते मला मंजूर आहे !
चाहत का ऐतबार है, कितना हसीन ख्वाब,
ऐसे में कौन माँगे, किसी बात का जवाब...
जब आप ही के हाथ है तक़दीर की किताब,
क्या क्या लिखा करेंगे अब आप सोचिये ।
हम ने तो दिल को आपके…
हम आप की वफ़ा की…
या गाण्याला तिसरं कडवं नाही. खरं तर तिसरं कडवं म्हणजे दोघांनी केलेली जुगलबंदी असते आणि ती शायरीची परमावधी असते. मजहूरजी आज असते तर कदाचित त्यांनी तिसरं कडवं असं लिहीलं असतं..
उल्फ़तका दरिया हो सके, दोनोंसे आज पार,
कश्तीको हमने छोड दिया, मौजोंपे है सवार,
जब खोल लिए अपनेही मे, इक दूसरेके राज़...
क्या क्या खुलेंगे राज़ ये, अब आप सोचिये ।
तू मला आणि मी तुला समर्पित आहोत.. तर हा इश्काचा दरिया पार करुन, आपण आज एकरुप होऊ. ज्या (देहांच्या) नांवेत आपण सवार होतो, ती इश्काच्या या अपूर्व सागराला बहाल करुन, इश्काच्या तुफानी लाटांवरच आपण स्वार झालोत. एकमेकांची रहस्य आपण, एकमेकातच उलगडून, एकमेकांप्रती पूर्ण पारदर्शी झालोत...आता हे रहस्यमयी जीवन आपल्यासाठी कायकाय (नवी) रहस्य उलगडतंय ते पाहण्यासारखं असेल.
प्रतिक्रिया
10 Feb 2017 - 6:26 pm | यशोधरा
सुरेख!
10 Feb 2017 - 8:19 pm | संजय क्षीरसागर
या गाण्याचा बाज़ सूफ़ी नाही लिरिक्समधला भाव सूफ़ी आहे ! म्हणजे 'तू बोले तो मै बन जाऊं ' हे गाणं जसं सूफ़ी ढंगानं केलंय तसं हे गाणं नाही . मला हे गाणं आवडल्यानं रसग्रहण थोडं ओवर रेट झाल्यासारखं वाटण्याची शक्यता आहे . पण या निमित्तानं सूफीज़मवर लिहीता आलं .
10 Feb 2017 - 9:55 pm | चित्रगुप्त
माझ्या अत्यंत आवडत्या ओपीच्या गाण्यापैकी हे एक. रसग्रहण सुरेख झाले आहे.
गंमत म्हणजे इतके सुंदर गाणे म्हणे 'मेरे सनम' मधून सेन्सॉर बोर्डाने काढून टाकले होते, बहुतेक त्यामुळेच या गाण्याच व्हिडियो उपलब्ध नाही. (असल्यास इथे अवश्य द्यावा) त्याकाळी ओपीवर जळणारे खूप होते, त्यांपैकी कुणाची तरी करामत असावी.
असेच एक ओपीचे गाणे 'मोहोबत हो गयी जिनसे शिकायत उन से क्या होगी' (कहीं दिन कहीं रात-- एस एच बिहारी लिखित) मधील "अगर वो मुझ से रूठे है, तो मेरी ही खता होगी" ही भावना र्हदयस्पर्शी वाटते.
आणखी असेच लेख येवोत.