संथ चालते मालिका ही...
'पात्रे' बदलून का होईना पण बारमाही वाहणा-या सर्व मराठी मालिकांना अर्पण..
(संथ वाहणा-या कृष्णामाईची क्षमा मागून..)
संथ चालते मालिका ही...
दर्शक देती दीर्घ जांभया, जाणीव तिजला नाही!
कथानकाचा थांग न लागे
पुढे तीळभर, गहूभर मागे
'मार्गी' झाली म्हणता म्हणता क्षणात 'वक्री' होई..
संथ चालते मालिका ही...
नसे कुणी का तिला नियंता
कंटाळून करी प्रश्न ही जनता
नदीस फुटावे नाले, ओहळ, तशी 'वाहवत' जाई..
संथ चालते मालिका ही...
सूना, सासवा, आजी, नाती
मालिकांचे च्युईंगम खाती
सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही...
संथ चालते मालिका ही...
-अविनाश ओगले
प्रतिक्रिया
26 Jan 2008 - 2:15 pm | विसोबा खेचर
वा ओगलेसाहेब,
अत्यंत सुरेख आणि मार्मिक विडंबन..
दूरचित्रवाणीवरील कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या उगवलेल्या एकापेक्षा एक फालतू मालिकांना आपण अगदी झकास हाणले आहे! साला, वाचून मौज वाटली!
आपला,
(टीव्हीवरील मालिका पाहणे हा स्वत:च्या रसिकतेचा अपमान आहे असं समजणारा) तात्या.
26 Jan 2008 - 5:54 pm | सहज
>अत्यंत सुरेख आणि मार्मिक विडंबन..
सहमत
26 Jan 2008 - 10:13 pm | तळीराम
साले तुमी काय भारी मानसं जमला मिसळपाव खायला? मी आपला कालपासून हिकडेच हाय. ते स्साला जेवणखाणचा पण शुद्ध नाय राहीला.. ते मूळ कविता आनि तुमचा आभिप्राय दोनी लै भारी...
सूना, सासवा, आजी, नाती
मालिकांचे च्युईंगम खाती
सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही...
हे मस्त...
27 Jan 2008 - 12:50 am | इनोबा म्हणे
ओगले...
तुमचे हे विडंबन आम्ही फार पुर्वी ऑर्कुटवर वाचले आहे, तुमच्या नावाने की कुणा तिर्हाईताच्या नावाने हे आठवत नाही.
(आम्हालाही आवडत नाहीत मालिका)-इनोबा
2 Feb 2008 - 2:51 pm | भडकमकर मास्तर
नदीस फुटावे नाले, ओहळ, तशी 'वाहवत' जाई...............
>>>>> अहाहा....अगदी तंतोतंत्.....मस्तच..... अवंतिका नावाच्या एका अतिलांब्लचक मालिकेत ती अभिनेत्री घर सोडून दुसर्या सोसायटीत राहायला जाते आणि त्या सोसायटीमधील *( मुख्य गोष्टीशी संपूर्णपणे असंबंधित)बाळे,तरूण म्हातारे कोतारे, यांचे प्रश्न / समस्या पाहत राहायच्या आपण... :)
3 Feb 2008 - 12:46 am | ऋषिकेश
सूना, सासवा, आजी, नाती
मालिकांचे च्युईंगम खाती
सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही...
संथ चालते मालिका ही...
हा हा हा हे सगळ्यात आवडले
3 Feb 2008 - 4:14 pm | स्वाती राजेश
छान केले आहे.
मालिका जरी २ महिन्यांनी पाहिली तरी काही बिघडत नाही ती आहे तिथे च असते.
१० वर्षे झाली तरी कोणतेही पात्र चेज( वयात) होत नाही.
केसाला कोणते तेल वापरतात?
क्रिम कोणती वापरतात?
हे विचारले पाहिजे..:))))))))))))))))
3 Feb 2008 - 9:42 pm | अविनाश ओगले
''प्रेक्षकांचा बिन'डोक'पणा'' नावाचे तेल केसाना चोपडल्याने व टीआरपी नावाचे 'क्रीम' चेहर्याला फासल्याने ही पात्रे तरुण रहात असावीत.