यंका स्वप्नात आला होता की खरोखर जागेपणीच्या जगात हे मला स्वप्नातच असताना कसं कळणार ? ते तळघर आता अस्तित्वातच नाही. त्यामुळे मी उठून तिथे गेलोच तर ध्यानात असतानाच शक्य आहे. यंकाही मीच बनवलेलं काल्पनिक पात्र आहे. तो उठून खऱ्या आयुष्यात येणं शक्य नाही. आणि आत्ता मी ध्यानात नाही.
म्हणजे स्वप्नच असणार.. असा अर्थ मी काढला. स्वप्नाशिवाय दुसरा कोणताही अर्थ मला झेपणारा नव्हता.
तर.. यंका समोर पाटावर बसला होता तो उठून उभा राहिला आणि थेट मला म्हणाला "अशक्या. बास्टर्ड .. मोकळं कर मला."
माझाच आवाज ..माझाच तुलपा.. तो माझा तुलपा की मी त्याचा ? मी भीतीने थरथरलो. मोकळं कर म्हणजे काय?
मग मी धडधडत्या छातीने झटका मारत जागा झालो.
"काय झालं रे अशक्या ?", माझा रूम पार्टनर मला येऊन म्हणाला.
"स्वप्न रे.. बेक्कार स्वप्न", मी डबडबत म्हणालो.
तेव्हापासून नवीनच छळवाद सुरु झाला. जरासा डोळा लागणार इतक्यात त्याच क्षणी माझ्या कानात जडशीळ पाटांची रचलेली रास खाली कोसळावी तसा कल्लोळ उठवणारा आवाज यायचा. मी तळघरात कोसळतोय असं वाटायचं आणि मी हातपाय झटकत जागा व्हायचो. पार्टनर मला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी फारच लाईटली घेतलं.
"तुम्हाला जे होतंय ते अगदी नॉर्मल आहे. त्याला स्लीप स्टार्ट असं म्हणतात. एंक्झायटी आहे तुम्हाला कसली तरी. शांत झोप घ्या बरं वाटेल. थोडा व्यायाम करा रोज. वॉक बीक. काय काम करता तुम्ही ? ऑक्युपेशन काय?"
मी गप्प बसलो.
मग मीच विचारलं "पण डॉक्टर जागेपणी असे आवाज आले तर?"
"अहो जागेपणी नाही हो येत असे आवाज. ते जाग आणि झोपेच्या बॉर्डरवरच येतात. त्याला स्लीप स्टार्ट म्हणतात. इंटरनेटवर बघा सर्च करून."
थेट किर्रर्र करून बेल दाबत डॉक्टरांनी पुढचा पेशंट बोलावला आणि मला हाकललं.
आता डॉक्टरांना काय समजावू की तो आवाज कोसळणाऱ्या पाटांचा आहे. तो नॉर्मल नाही. ते तळघरातले पाट आहेत.
मग माझं झोपणं म्हणजे केवळ बेडमध्ये झटके मारत दचकून उठणं इतकंच उरलं.
रूम पार्टनरलाही ते नकोसं वाटायला लागलं. तो त्याच्या ऑफिसपासून जवळ सोयीची दुसरी जागा मिळालीय असं कारण सांगून गेला.
रूम पार्टनर म्हणजे तसा माझा पेईंग गेस्ट होता तो. महिन्याचे पाच हजार यायचे बंद झाले.
एक दिवस मला लक्षात आलं की पाटांनी आणि धुळीनं भरलेल्या या बंद कोंदट खोलीबाहेर मला जगच नाहीये. मी कल्पना म्हणून जगतोय. मला अस्तित्व तरी आहे की नाही तेही मला माहीत नाही.
खूप दिवस रिकामे काढून मी ठरवलं की माझा तुलपा बनवायचा. निरर्थक रिकाम्या आयुष्यात विरंगुळा. कल्पनेत का होईना पण इथून दुसऱ्या एखाद्या खोलीत जाण्याची संधी.
पूर्णवेळ ध्यान लावून नवीन जगातला माझाच भाग म्हणजे माझाच तुलपा बनवायला मला रिकामा वेळच वेळ पडला होता.
मी मनात एक छोटं सिंगल रूम अपार्टमेंट बनवलं. ती खोली सोडून बाहेर जाता येणार नसेल तर किमान आजूबाजूला कोणीतरी राहतंय अशी कल्पना करायची तरी सोय असावी म्हणून अपार्टमेंट. तिथे बसून माझा तुलपा, म्हणजे माझाच खोलवरचा एक भाग कथा लिहीत बसेल.. शाडूचे पुतळे बनवून त्यांनाच सोबती बनवेल.
कदाचित तो मला सोबत घेऊन घराबाहेर जाईल. त्याची खोली म्हणजे माझ्या खोलीसारखं गाडलं गेलेलं भूतकाळातलं तळघर नाहीये. तेच माझं बाहेर पाडण्याचं एकमेव आशेचं दार असेल.
माझ्या या तुलपाला मी मनापासून तपशीलवार बनवला. त्याचं नाव अशोक ठेवलं . अशक्या हे दोस्तीतलं नाव .
ध्यान लावलं की त्याच खोलीत अशक्याखेरीज आणखी एक माणूस दिसायचा. काय गडबड झाली होती माझ्या योजनेत ते माहीत नाही. मला तो नको होता. एकटा अशक्याच हवा. म्हणून मी माझ्या पद्धतीनें त्याला घालवला. गहिरं कॉन्सन्ट्रेशन झालं की मी एकदम पाट धडाधड खाली पाडायचो आणि हातपाय झाडत उठायचो. म्हणजे अशक्या उठायचा. एकूण एकच...मी अशक्याला वेगळा मानत नाही. तुलपा ही सिद्धीच मुळी अशक्याने यंकाला शिकवली हे यंकाला मान्यच आहे.
आता मला स्वातंत्र्य हवं होतं. अशक्या गोळी खायचा.. मग तो आणि मी दोघेही तरंगायला लागायचो. एकदा तिरीमिरीत त्याला म्हटलं "अशक्या , मला मोकळं कर.." तर त्याची बोबडी वळली . डबडबून ओला झाला आणि दोघांनाही चढलेली खाडकन उतरली. म्हणजे संपर्कच तुटला. डरपोक बनून अशक्यानं आता माझ्या भीतीने ध्यान लावणंच सोडून दिलं तर त्याला भेटण्यासाठी सगळा ताण मलाच घेतला पाहिजे. हे ध्यान लावणं म्हणजे आनंद नाही. भरपूर श्रम आहेत.
एवढे श्रम घेऊन अशक्या जर मला कायमचा टाळणार असेल तर तसं होऊ देता येणार नाही. मला त्याच्या अपार्टमेंटमध्ये जात राहिलंच पाहिजे.. त्याच्यासोबत राहिलंच पाहिजे.
अशक्या तुझ्यासोबत तुझ्या जगात घेऊन चल या यंकाला .. आपल्या मोकळीकीचा तो एकच मार्ग आहे. मला इथे तळघरात पाटावर बसवून तू कायमचा जाऊ शकत नाहीस. पाटांचा आवाज येत राहील. वाढत जाईल. मला येऊ दे ..
तुला नको असेल एकत्र राहणं तर .... एकटा यंका राहील. माझ्यासाठी देह सोड. सोड..
एका फटक्यात मी चारपाच पाट जमिनीवर कोसळवले.
रोज मनापासून ध्यान लावायचो.. अशक्याच्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये पोचलो की रोज तेच बोलायचो. मला मोकळा कर तळघरातून. तुझ्यासोबत कायमचा आण इथे. .. नाहीतर मला एकट्याला इथे राहू दे.. सोड देह तू एकटाच..
ऐकून ऐकून अशक्या एक दिवस तिरीमिरीत त्या खोलीबाहेर पडला. मीही सोबत होतो.
सगळं जग लखलखीत सुंदर होतं . कोंदट बंद अंधारी जागा नव्हती.
हीच सुटका तर मला हवी होती.
अशक्याने एकदम रस्त्यातल्या बसखाली अंग झोकून दिलं.
अशक्याच्या पोटावरून जडशीळ गाडी गेली. मला असह्य दुखलं. कळांमुळे मी ओरडून ओरडून रडलो पण मला आवाज नव्हता. अश्रूही नव्हते. ..
"यंका ... यू बास्टर्ड".. अशक्या खच्चून ओरडला.. त्याच्या तोंडात लाल गुळणी आली.
अशक्या मेला. यंकाला या तुलपाच्या भयानक सिद्धीत अडकवून अस्तित्वहीन तळघरात चिणून जाणार होता हरामखोर ..
पण शेवटी तिथून मला बाहेर काढलंन आणि मरून गेला. मी लावलंच त्याला शेवटी करायला.
किती दिवसांपासून तो टाचा घासून मरावा अशी इच्छा करत होतो. पण तो हलकट माझ्यासाठी देह उरवून नाही गेला. देह पुरता उसवून गेला.
.....
.....
मला आता तश्या काही समस्या नाहीत.. पण काही जाणिवा छळतातच.
एक म्हणजे अशक्या शरीरानिशी गेला मग यंका कसा शिल्लक आहे.?? अर्थात मला पूर्वीही देह नव्हताच म्हणा..
पण त्याहून वाईट म्हणजे गेला तो अशक्या की यंका ? कोण जिंकलं ? कोण सुटलं ? कोण स्वतंत्र झालं ?
बेकारतुंबडी अशक्या बास्टर्ड मेला आणि यंका तळघरातून मुक्त होऊन या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये सध्या राहतो.... याहून वेगळं काही उत्तर मला झेपणार नाहीये. आणि मुख्य म्हणजे कोणी उत्तर देणार नाहीये...
.. म्हणून मी मला स्वतःला शहाणा ठरवलंय आणि प्रश्न विचारणं थांबवलंय...
.................
...(Not to be continued..)
डिस्क्लेमर : हे लिखाण काल्पनिक आणि केवळ मनोरंजनासाठी लिहिलेलं आहे, त्यात कोणतंही वास्तव शोधू नये. भंजाळायला लावणारी विचित्र रचना वाटली तर उत्तम.. कारण ती तशीच आहे...
प्रतिक्रिया
9 Jan 2017 - 7:35 pm | ज्योति अळवणी
खूपच आवडली कल्पना. फक्त तुलपा ही संकल्पना कळली नाही. यावर लेख येऊन गेला आहे हे पहिल्या भागाच्या प्रतिसादामध्ये वाचले. त्या लेखाचे नाव कळले तर तुलपा ही संकल्पना देखील समजून घ्यायला आवडेल
9 Jan 2017 - 8:02 pm | Ranapratap
तुलपा बद्दल डिटेल मध्ये लिहा एकदा. 1 धागा येऊन गेला पण फारस काही उमगलं नाही.
9 Jan 2017 - 9:26 pm | प्रचेतस
जबरदस्त गूढकथा.
पहिला भाग वाचताना खरं तर रत्नाकर मतकरींची 'लपाछपी' ही कथा डोळ्यांसमोर येत होती.
एमपीडीतून सुरु झालेला आपल्याच प्रतिमांमधला संघर्ष सुरेख रेखाटला आहे.
9 Jan 2017 - 10:08 pm | जव्हेरगंज
_/\_
अशक्य आवडलं हे!
अवांतर : हे दिर्घकथेच मटेरीअल वाटलं. म्हणजे धावता प्लॉट सांगितलाय. डिटेलवार प्रसंग असायला हवे होते. पण तरीही आहे तेही जबराट आहेच!!!
9 Jan 2017 - 10:23 pm | गवि
अगदी तसंच आहे. मनात दीर्घच आहे पण वेळ, निवांतपणा नाही. बरेच दिवस वाट पाहून संक्षिप्तरुपात लिहून ठेवली. विसरण्याआगोदर.
थँक्स
9 Jan 2017 - 10:28 pm | गवि
करता का विस्तार.. ? आवाहन, आव्हान, विनंती ज्या कशामुळे साध्य होत असेल ते स्वीकारा. :-)
9 Jan 2017 - 11:04 pm | जव्हेरगंज
मला तरी या थीममध्ये इंटरेस्ट आहे!
लिहायला आवडेल!
बघूया कसं जमतंय ते!
thnx ..
9 Jan 2017 - 10:49 pm | Ujjwal
Inception ची आठवण झाली...
9 Jan 2017 - 11:06 pm | अजया
भंजाळलं डोकं नीटच !
9 Jan 2017 - 11:13 pm | Ram ram
aavadla
9 Jan 2017 - 11:46 pm | पिलीयन रायडर
भंजाळलं!!!
9 Jan 2017 - 11:59 pm | किसन शिंदे
"च्यायचं हे किशन्या! ब्येनं, ध्यानातून बाहेर पडायच्या आधी प्रतिसाद देवून ठेवलेला बरा. न जाणो पुन्हा कधी गोळी खायचा न ध्यान लावून बसायचा."
.
.
.
"ही नवी जागा, नवे बाॅक्सेस, नवा रंग, साले सगळे त्याच्या मनाचे खेळ."
.
.
.
.
इथं त्यांना त्यांच्या कामातनं वेळ मिळेना. आणि हे खूळं नव्या रंगाची स्वप्न बघतंय.
.
.
.
.
बघ तेजायला, स्वप्न बघायला आपल्या बाचं काय जातंय.
.
.
.
.
.
.
रच्याकने, थोडक्यात आवरलीत. पण आवडलं हे ही खूप. गुंतागूंतीचा खेळ सगळा. :)
10 Jan 2017 - 1:17 am | आदूबाळ
जबरदस्त! दीर्घकथा पाहिजेच.
10 Jan 2017 - 1:27 am | आनंदयात्री
खतरनाक!! या दुसऱ्या भागात सुंदर कलाटणी दिलीत, त्यामुळे मजा आली. मनाच्या आरश्याच्या पलीकडल्या विश्वातून यंकानेही त्याचा तुलपा अशक्या बनवलेला असतो, पण लिखाण करायला तर अशक्या जिवंत राहिलेला नसतो, मग यंका गोष्ट लिहितोय .. अन त्यालाही तो तोच म्हणजे यंका असण्याची खात्री नाही!
मजा आली गवी :)
10 Jan 2017 - 10:12 am | रातराणी
भन्नाट !
10 Jan 2017 - 1:23 pm | संजय पाटिल
अत्ताच दोन्ही भाग वाचले, जबरदस्त!!
10 Jan 2017 - 3:06 pm | अद्द्या
दोनदा वाचावी लागली कथा.. ( डोकं थोडं स्लो आहे )
नवीन काही तरी मिळालं इथे. बऱ्याच दिवसांनी काही तरी नवीन मिळालं .
मस्तच
11 Jan 2017 - 8:18 pm | vikrammadhav
जबरस्त लिहिलीय कथा !!!
दीर्घकथा पण वाचायला आवडेल !!!!
12 Jan 2017 - 10:52 pm | पैसा
आईशप्पत!
31 Jan 2017 - 1:03 pm | एमी
मस्त! लय भारी कल्पना आणि तेवढीच छान लिहलीय!
त्या पापडलोणच्यात अडकलेल्या बायकांच्या कथांऐवजी असले काहीतरी हटके लिहले तर जास्त आवडेल.
8 Feb 2017 - 1:16 pm | शित्रेउमेश
अतर्क्य आहे...
पुरता भंजाळलो....
वा वा राव.. लय भारी....लय भारी....