द ग्रेट अन"लॉयल' सर्कस...

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
1 Feb 2008 - 3:41 pm

""बाबा, सर्कसला जाऊया?''
"नको रे...कंटाळा आलाय. शिवाय गावाबाहेर आहे ती. खूप लवकर निघावं लागेल.''"
"शी बाबा! तुम्हाला नेहमीच कंटाळा. अहो, बरेच प्राणी असतात त्यात. मला बघायचेत.''"
"नको म्हटलं ना! आणि हल्ली मेनकाताईंच्या कृपेनं त्यात कुठलेच प्राणी नसतात. फक्त कुत्री-मांजरी, पोपट-मैना असतात.''"
"वाघ, सिंह, हत्ती नसतात?''"
"अजिबात नाही!''"
"मग...सर्कसमध्ये बघायचं काय?''
"अरे...सांगितलं ना, बघण्यासारखं काहीच नसतं हल्ली''"
"पण ते झुल्यावरच्या कसरती, मृत्युगोल, गाड्यांच्या कसरती तरी असतातच की!''"
"तू अगदी हट्टी आहेस बघ. अगदी आईवर गेलायंस. आपलं बोलणं खरं केल्याशिवाय राहणार नाहीस. अरे, गाड्यांच्या कसरती बघण्यासाठी सर्कशीच्या तंबूपर्यंत कशाला जायला हवं? मी तुला दाखवतो. आपल्या पुण्यातल्या रस्त्यांवर रोज अखंड कसरती चालू असतात.''"
"बाबा बाबा, आपण जायचं, रस्त्यावरची सर्कस बघायला?''"
"चल...''
-----
दृश्‍य दुसरे ः स्थळ ः टिळक चौक. (अलका टॉकीजच्या जवळचा. "टिळक' कोणाला माहित नाहीत, ना!)"

"हं. आता बघ गंमत. तुला वाहतुकीचे नियम शिकवलेत का शाळेत? हा हिरवा दिवा म्हणजे जा, पिवळा म्हणजे गाडी हळू करून थांबा आणि लाल म्हणजे पूर्ण थांबा. पण बघ हं आता...लक्ष्मी रस्त्यावरून येणाऱ्या या गाड्या आहेत ना, त्या पिवळा दिवा लागल्यावर थांबणारच नाहीत. उलट, आणखी वेगानं जातील. लाल दिवा लागल्यानंतरही पुढेच पळत राहतील.''"
"बाबा बाबा, तो बघा, सायकलवाला. तो काय उडवणार आहे का आता?''
""उडवू सुद्धा शकतो, बाबा! या सायकलवाल्यांचं काही खरं नाही. आता लकडी पुलावरून दुचाक्‍यांना बंदी आहे की नाही? पण सायकलवाल्यांना कुठलेच नियम नाहीत. ते कुठेही, केव्हाही, कसेही घुसू शकतात. बघ आता, कसा वाकडा-वाकडा शिरतोय, सिग्नल नसतानाही! अरे अरे अरे....तो बघ दुसऱ्याला पाडून निघून गेला!''"
"बाबा, लाल सिग्नल आत्ताच लागलाय ना, मग हे बाईकवाले गाड्या कशाला फुरफुरवतायंत?''
""अरे, मागच्या जन्मी मावळे होते ते. सारखी घोड्यावर टांग मारायची सवय. त्यामुळं गाडीचा चाबूक ओढल्याशिवाय करमत नाही. सिग्नल असताना गाडी बंद करणं त्यांना मान्य नाही.''"
"बाबा, ते कुठूनही वळवून, कसेही चालवणारे रिक्षावाले काका बघितलेत?''
""अरे बाबा हळू बोल! त्यांनी ऐकलं, तर त्यांच्या सगळ्या जातभाईंना गोळा करून आपल्या सळो की पळो करून सोडतील. दिसायला ही एवढीशी रिक्षा असली, तरी या काकांची "दादा'गिरी मोठी आहे. ते कुणालाही जुमानत नाहीत. तो रिक्षावाला तर बिनधास्त कडेला रिक्षा लावून दुसऱ्याशी बोलत बसलाय, बघ! रिक्षा एवढीशी असली, तरी तिचे दर विमानापेक्षाही जास्त असतात, माहितेय?''
-----------

दृश्‍य तिसरे ः अप्पा बळवंत चौक.

""बाबा, आपण इथे का आलोय?''"
"अरे, संतांच्या, ज्ञानवंतांच्या, विचारवंतांच्या, बुद्धिमंतांच्या आणि आता काही उपद्रवी जंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा एक हिस्सा आहे हा! ऐतिहासिक शनिवारवाडा इथून अगदी हाकेच्या अंतरावर. जगप्रसिद्ध बावनखणी....जाऊ दे जाऊ दे....! आणि तू असा उद्धटासारखा प्रश्‍न विचारतोयंस...? अरे आयशी-बापसानं हेच शिकवलं का?''"
"बाबा, तुम्ही तर मला आज पहिल्यांदाच इथे आणताय. आणि बावनखणी म्हणजे काय?''
""अं...अरे ते बघ..ते बघ...तू आईस्क्रीम खाणार?''"
"नको. विषय बदलू नका.''"
"आता इथे उभं राहून निमूट गंमत बघ. इथे पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्याचीच खरी सर्कस आहे. बघ, कुठल्याही बाजूनं वाहनं सुटली, तरी बाजीराव रस्ता ओलांडणंच शक्‍य नाही. ते पांढरे पट्टे दिसताहेत ना, ते क्रॉसिंगसाठी नव्हे, गाड्यांच्या रेससाठीच असावेत, असं वाटतं ना?''"
"बाबा, इथे पोलिस नसतात का?''
""असतात ना...अरे, पुण्यातले वाहतूक पोलिस कर्तव्यदक्ष आहेत. ते नेहमी ड्युटीवर हजर असतात. पिवळ्या दिव्यावर गाड्यांना थांबायला लावतात. नाही थांबल्या, तर दंड घेतात. चिरीमिरी अजिबात घेत नाहीत. पण ते नसले, की असा गोंधळ होतो बघ...!''
""बाबा, ते कोपऱ्यात तंबाखू मळत, गप्पा मारत उभे असलेले पांढरा शर्ट, खाकी पॅंटमधले काका कोण आहेत? मघाशी इथे रस्त्यातच उभे राहून वाहनांना सूचना करताना बघितलं होतं मी त्यांना...!!''"
"अं....ते ना... ते...आपले ते हे...जाऊ दे. घरी चल!''

-------

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

तात्या विंचू's picture

1 Feb 2008 - 7:05 pm | तात्या विंचू

लेख बाकी झकास आहे.......पण....

बावनखणी म्हणजे काय?'????????

सुनील's picture

1 Feb 2008 - 8:46 pm | सुनील

आवडला.

माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला किस्सा.

माझा ठाणेकर मित्र पहिल्यांदाच पुण्याला गाडी घेऊन गेला. कुठल्याशा सिग्नलला लाल दिवा लागला म्हणून गाडी थांबवली आणि मागून एका स्कूटरवाल्याने गाडीला ठोकर दिली! बरे, दिली तर दिली वर पुढे येऊन मित्रालाच दमदाटी - "गाडी का थांबवली?"
"अहो, रेड सिग्नल आहे", मित्र
"तर काय झालं? दुसरं कोणी थांबलय?"
मित्राने इकडे तिकडे वळून पाहिले. वाहतूक सुरूच होती!
"माफ करा. पुण्यात नवीनच आहे मी. इथे चौकात रोषणाईसाठी दिवे लावतात याची कल्पना नव्हती!", मित्र गाडी चालू करीत म्हणाला.

अहो, तो मी नव्हेच! तुम्हाला बावनखणी माहित नाही?
घाशीराम कोतवाल पाहून या!
तरीही नाही समजले तर इथे मिपावर आपले बरेच पुणेकर रसिक आहेत, त्यांना विचारा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Feb 2008 - 9:12 pm | llपुण्याचे पेशवेll

बावनखणी म्हणजे ...
पूर्वी म्हणजे पेशवाईच्या काळात नाटकशाळा (म्हणजे नाचगाण्यासाठी ठेवलेल्या बाया)लोकांच्या (सरदारांच्या) वाड्यावर असायच्या. .. भर वस्तीत आणि घराघरात... त्यामुळे मुलांना बालवयात विविध नाद लागून ती वाया जातात असे पेशव्यांचे सरदार खाजगीवाले यांना वाटले. त्यामुळे त्यानी या मुलांना फुकट जाण्यापासून वाचवण्यासाठी तेन्व्हाच्या पुणे शहराबाहेर एक ५२ खोल्यांची म्हणजे 'खणांची' इमारत बांधली. सर्व नाटकशाळानी त्यातच उतरावे असा नियम करण्यात आला.तिला बावनखणी म्हणत. पण वरील कथेतल्या मुलाप्रमाणे तेंव्हाच्याही बालकाना प्रश्न पडत असे आपले वडील रोज संध्याकाळी बावनखणीत का जातात. जिज्ञासा वाढत गेली आणि शहराबाहेरील बावनखणी जगप्रसिध्द झाली. आणि नंतर तर 'ईष्कबाजी' लाच बावनखणी असे नाव रूढ झाले. असो ..
असा हा बावनखणीचा इतिहास.
इतिहासकार
डॅनी
पुण्याचे पेशवे

वरदा's picture

2 Feb 2008 - 2:17 am | वरदा

आहे लेख... अगदी खरं चित्र टिपलंय....

प्राजु's picture

2 Feb 2008 - 10:25 pm | प्राजु

जो नीट गाडी चालवू शकतो तो जगाच्या पाठीवर कुठेही अगदी नीट गाडी चालवू शकतो.
पुण्यात जो नीट श्वास घेऊ शकतो (प्रदूषित हवेत).. त्याला जगातल्या कोणत्याही हवेचा त्रास होत नाही.
(हा.. आता एखाद्याला शुद्ध आणि स्वच्छ हवेचा त्रास नक्की होऊ शकेल. :))

- प्राजु

टिउ's picture

2 Feb 2008 - 11:33 pm | टिउ

http://abhipendharkar.blogspot.com वर हे आधी वाचलं होतं...
ते अभिजित पेंढारकर म्हणजे तुम्हीच का?

स्वाती राजेश's picture

3 Feb 2008 - 4:04 pm | स्वाती राजेश

लेख छान आहे. पुणे तेथे काय उणे...
पुण्यात राहिल्यावर खरेच याची प्रचिती येते.

आपला अभिजित's picture

3 Feb 2008 - 9:23 pm | आपला अभिजित

तो मीच आहे!

धन्यवाद, दोस्तहो!!
भरभरून प्रतिसादाबद्दल!!!

-आपला,
अभिजित पेंढारकर.

विसोबा खेचर's picture

4 Feb 2008 - 7:11 am | विसोबा खेचर

अभिजितराव,

नेहमीप्रमाणेच मस्त लेखन!

'मौत की खाई' करता 'मृत्युगोल' हा शब्द आवडला! :)

आपला,
(सर्कसप्रेमी) तात्या.

आपला अभिजित's picture

4 Feb 2008 - 9:13 am | आपला अभिजित

तात्याराव,

`म्रुत्युगोल' हा शब्द मी लहानपणापासून ऐकत आलोय.

तो माझा नाही.
धन्यवाद.
-आपला, अभिजित.