यंका - १

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
9 Jan 2017 - 11:08 am

मी लिहितोय. मीच लिहितोय. नक्की मीच.

लाईट बंद करणार नाही.

लाईट बंद केला की तो येतो. सध्यातरी चोवीस तास लख्ख प्रकाशात राहाणं भाग आहे.

मला सांगितलं गेलं होतं की तुलपा हा तुमच्याच मनाची एक क्रिएशन असते. ती तुम्हाला कधीच त्रास देऊ शकत नाही.

मला सांगितलं गेलं होतं की तुमचा तुलपा हा तुम्हाला कधीच वरचढ ठरत नाही. पण आता माझ्या बाबतीत तरी जे काही होऊन बसलं त्यामुळे माझ्या मनात ही भलती आयडिया घालणारा बेकारतुंबडी बास्टर्ड अशक्या तडफडून मरावा अशी मी इच्छा करत गेलो. आणि तो लगेचच बसच्या मागच्या चाकाखाली येऊन रक्त ओकत मेलासुद्धा. तेव्हापासून तुलपाच्या दहशतीसोबत स्वतः:चीही दहशत वाटायला लागलीय.

वेळेवर डॉक्टरांशी बोललो सुद्धा. ते मला अतिशय तर्ककर्कशपणे पटवून देतात की तो ऍक्सीडेन्ट म्हणजे योगायोग होता.

मी गेले दोन महिने झोपलेलो नाही. मला येते ती फक्त ग्लानी. मन पळून पळून थकलं आणि निपचित पडलं की तीच झोप.

मुळात मी माझा तुलपा का बनवला याचां कारणच मी विसरून गेलोय. मोस्ट प्रोबेबली माझा भलामोठा रायटर्स ब्लॉक तोडण्यासाठी काहीतरी नवीन थरारक करायचं म्हणून .. आणि एकटेपणावर उपाय म्हणूनही. एकटेपणा तर आहेच.

लहानशा स्टुडियो अपार्टमेंटमध्ये राहतो. आधी एक पार्टनर होता. पण तो असून नसल्यासारखाच. मी लिखाण आणि स्कल्प्चरवाला कलाकार. आणि तो पॉवर टूल्स कंपनीत इंजिनियर . तरी त्याच्यामुळे खोलीत जरा हालचाल होती. पण ते माझं झोपेत अंग झटकणं बघून तोही गेल्या महिन्यात घाबरून निघून गेला.

तुलपा बनवण्यापूर्वी मी पूर्ण सावध होतो. अगदी जादाच सावध. मी घेतलेल्या खबरदाऱ्या मी इथे लिहितोय. अशा लिहिण्यातून कधीतरी माझ्या सुटकेचा काहीतरी रस्ता निघेल या आशेने लिहितोय. मीच लिहितोय. तो नाही. नक्की मीच लिहितोय.

तुलपा म्हणजे आपणच आपल्या मनात अत्यंत बारकाव्यांसहित तयार केलेली एक नवीन व्यक्ती. बाहेरच्या जगात अस्तित्व नसलेली. फक्त तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात राहणारी.

तुलपा एखाद्या बंद जागेत तयार करायचा असतो असं अशक्याने सांगितलं होतं. मला पूर्ण इमॅजिनरी खोली किंवा घर बनवणं खूप अवघड वाटायला लागलं.

मग मी माझ्या आठवणीत घट्ट बसलेली जागा निवडली. ही बंदिस्त जागा सध्या कुठेतरी प्रत्यक्षात अस्तित्वात असलेली नको होती. कारण मग त्या जागी प्रत्यक्ष जाण्याचा नाद लागायचा. म्हणून मी आमच्या जुन्या वाड्याचं जमिनीखालचं तळघर निवडलं. घरी मोठी पंगत असली की आजी मला कधीकधी लाकडी पाट काढण्यासाठी तळघरात उतरवायची. बोळातली एक चौकोनी फरशी उचलून तळघरात उतरायला पायऱ्या होत्या. जुन्या काळी तिथे दरोड्यापासून वाचवण्यासाठी पैश्याच्या थैल्या आणि दागिने ठेवायचे असं आजी सांगायची. नंतर मात्र फक्त मोठाले जडशीळ पाटच पाट तिथे भरलेले होते. मी लहानपणी त्या तळघरात खूप रमायचो. मी तिथे कोळशाने भरपूर चित्रं गिरबाटली होती. तिथला इंच न इंच मला पाठ होता.

आजी गेल्यावर तो वाडा काकांनी विकला. आता तिथे मोठी सोसायटी झाली आणि तिच्या पायात तळघर बुजून कायमचं नाहीसं झालं.

हेच छोटंसं तळघर मी मनात उभं केलं. तसा मी मोकळाच असतो. हल्ली लिहायलाही सुचत नव्हतंच. म्हणून मी रोज तीन तीन चार चार तास ध्यान लावून भरपूर कॉन्सन्ट्रेशन करायचो. या तळघरात एक दिवस मी एका पाटावर माझा कल्पनेतला तुलपा बसवला. माझ्या मनात बरेच दिवस आकार घेत असलेला एक अनोळखी चेहऱ्याचा पुतळा मी यावेळी शाडूत न कोरता माझ्या मनातच कित्येकपट जास्त मनापासून आणि हुबेहूब कोरला. अशक्याने दिलेल्या गोळ्याही मी मदतीला घ्यायला लागलो.

डीप मेडिटेशन गोळ्यांमुळे सोपी झाली आणि जास्त वेळ टिकायचीही. फोन आणि डोअरबेल बंद करून मी बसायचो आणि तासनतास बसूनच असायचो. तुलपाच्या चेहऱ्याचे आणि शरीराचे तपशील न्याहाळण्यात आणि नवे तपशील कल्पनेने भरण्यात माझे तास संपत जायचे.

तुलपाचं नावही मला नेहमीचं किंवा ओळखीचं नको होतं. त्याचं नाव मी स्वतःच्याच मानाने "यंका" असं ठेवलं.

अशक्याने मला खात्री दिली होती की यंका मी स्वतःच्या इच्छेने ध्यान लावून त्या खोलीत जाईपर्यंत मला कधीही दिसणार नाही किंवा माझ्याशी नाही.

मी निवांत होतो आणि एकेक सुरु झालं.

गोळी लावून मी झोपलो आणि यंका भसकन माझ्या स्वप्नात आला. तळघरासकट.

माझ्याच गुंत्यात मी पुरता फसण्याची ती सुरुवात होती.

(To be contunued..)

( डिस्क्लेमर सर्वात शेवटी.. )

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

खेडूत's picture

9 Jan 2017 - 11:18 am | खेडूत

क्या बात गवि!
इतक्या झटपट तुलपा तयार..? अता लवकर मोठे मोठे भाग टाका ही नम्र विनंती.

पुभाप्र!

अनुप ढेरे's picture

9 Jan 2017 - 11:33 am | अनुप ढेरे

क्या बात!

जबराट एकदम. येऊद्या पुढचा भाग.

जबराट.. परवच तुलपावरचा साहना यांचा लेख वाचल्यामुळे पार्श्वभूमी आहेच. पुभाप्र.

संजय क्षीरसागर's picture

9 Jan 2017 - 12:11 pm | संजय क्षीरसागर

जपून !

ये बात! बऱ्याच दिवसांनी गवि लिहिते झाले.

नीलमोहर's picture

9 Jan 2017 - 12:25 pm | नीलमोहर

भारी !!

प्रचेतस's picture

9 Jan 2017 - 12:28 pm | प्रचेतस

भन्नाट सुरुवात.

टवाळ कार्टा's picture

9 Jan 2017 - 1:06 pm | टवाळ कार्टा

जब्रा, चायला पण तुलपा बनवताना कोणी टंच बाई का नाही बनावट?

संजय पाटिल's picture

10 Jan 2017 - 1:16 pm | संजय पाटिल

तुम्ही बनवा, आणि अनुभव सांगा इथे...

वाचतोय, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

मालिका लवकर पूर्ण केल्यावर हेमंतची भेट घ्यायला जाऊया ;)

राजाभाउ's picture

9 Jan 2017 - 2:01 pm | राजाभाउ

मस्त सुरुवात. पुभाप्र.

पद्मावति's picture

9 Jan 2017 - 2:15 pm | पद्मावति

जबरदस्त! पु.भा.प्र.

पुंबा's picture

9 Jan 2017 - 3:10 pm | पुंबा

गवि, जाम मजा येणार आहे.. पुभाप्र.

मी स्वतःच्या इच्छेने ध्यान लावून त्या खोलीत जाईपर्यंत मला कधीही दिसणार नाही किंवा माझ्याशी नाही.

या ओळीत काहीतरी मिसलंय का?

होय की. गूगल ट्रान्सलिटरेटर शब्द गिळतोय. बरेच परत टाकले पण इथे राहून गेलं.

थेट मिपामधे माझ्या ब्राऊजरवरुन लिहीलं जात नाही. अक्षरं मिक्स होतात.

ह्म्म, तुमचं नाव बघून धागा उघडला. पुढला भाग येऊ द्या आता. आणि क्रमशः पूर्ण होऊ दे.

गवि, मला वाटते ही समस्या फक्त गूगल क्रोम वापरात तर येते. दुसरं ब्राऊझर वापरून बघा.

अवांतरः मिपावर लिहिले असता जर बॅकस्पेस वापरला तर आधीच्या अर्ध्या शब्दात खोडलेला शब्द मिक्स होतो हा ब्राऊझरचा इश्यू आहे काय? मनोगतावर प्रतिक्रीया लिहीली तर असे होत नाही.

अजया's picture

9 Jan 2017 - 4:38 pm | अजया

गवि इज बॅक!
पुभाप्र

सुधांशुनूलकर's picture

9 Jan 2017 - 5:31 pm | सुधांशुनूलकर

गवि इज बॅक. नाउ वुइ नो इट.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jan 2017 - 6:50 pm | अत्रुप्त आत्मा

जब्बरदस्त!

अब आएगा मजा.

ज्योति अळवणी's picture

9 Jan 2017 - 7:25 pm | ज्योति अळवणी

मस्त सुरवात.

Ranapratap's picture

9 Jan 2017 - 7:48 pm | Ranapratap

खतरनाक लिखाण. येऊ दया अजून

जव्हेरगंज's picture

9 Jan 2017 - 9:54 pm | जव्हेरगंज

भारी सुरुवात!!

कैवल्यसिंह's picture

10 Jan 2017 - 1:11 pm | कैवल्यसिंह

खतरनाक सुरुवात... मस्त लेख... पुढे काय होणार आहे याच्या प्रतिक्षेत आहे...

पैसा's picture

12 Jan 2017 - 10:48 pm | पैसा

!!!