(लोकांच्या अनुभवावर)
दहा नोव्हेंबरची गोष्ट कार्यालयात आपल्या रूम मध्ये बसलो होतो अचानक सुब्बु रूम मध्ये शिरला, जवळपास ओरडतच म्हणाला, पटाईतजी क्या आपको मालूम है, RBI के सामने तो कुटीर उद्योग शुरू हो गया है, कुटीर उद्योग???. प्रथम सुब्बुला काय म्हणायचे आहे मला काहीच उमजले नाही. हा कुटीर उद्योग आहे तरी काय पाहण्यासाठी मी स्वत: लंच मध्ये कार्यालयातून बाहेर पडलो. आरबीआयच्या समोर भली मोठी रांग पैसे बदलण्यासाठी लागलेली होती. तीच परिस्थिती जनपथ वर असलेल्या सर्व बँकांची होती. पण एक जाणवले, लाईनीत लागणारे अर्ध्यापेक्षा जास्त लोक या पूर्वी कधीच बँकांच्या लाईनीत लागले नसतील. घूँघट काढलेल्या बाया (बहुतेक राजस्थानी), पर्दानशीं स्त्रिया, आपल्या सोबत चिल्ल्या-पिल्ल्याना घेऊन लाईनीत उभ्या होत्या. बहुतेक लोक जुन्या दिल्लीतले दिसत होते. सुब्बुच्या म्हणण्याप्रमाणे ह्या लोकांनी कुटीर उद्योग सुरु केला आहे. स्वत:च्या आधारकार्डच्या उपयोग करून लोकांचे ४००० रुपये बदलून काही दिहाडी कमविण्यासाठी हे गरीब लोक बँकांच्या लाईनीत उभे होते. एका मोटारबाईक जवळ दोन चार लोकांचा घोळका दिसला. बहुतेक लाईनीत लागलेल्या स्त्रियांसोबत ते आले असावे. हिम्मत करून मी विचारले "क्या रेट चाल रिया है, मियां." त्याने लगेच उत्तर दिले, ५०० रुपैया, चाहे हजार बदलो चाहे ४००० हजार. "रेट कुछ जियादा लग रिया है". तो: एक माणसाची पूर्ण दिवसाची दिहाड़ी, शिवाय चाय-पानी आणि जास्त वेळ लागल्यास नाश्ता हि द्यावा लागणार. त्या हिशोबाने काही जास्त घेत नाही आहे, सर्वत्र हाच रेट आहे. "पैसा बदलून मिळेल याचा काय भरोसा?" तो: माझा मोबाईल न. आणि आधार कार्डची फोटो कापी मी तुम्हाला देणार, आता तर झाले. ऐसे कामों में भरोसा करना हि पड़ता है. "किती बदलून देऊ शकता?" तो: पाच दहा लाख, त्याहून जास्ती काम आपल्या बसचे नाही. असो. असाच प्रकार दिल्लीत अधिकांश ठिकाणी दिसला.
रेडक्रॉसच्या इमारती समोर एक वयस्कर अपंग भिकारी बसलेला दिसतो. घरी जाताना बहुतेक त्याच्या हातावर एक दोन रुपयांचे नाणे मी ठेवतो. तेवढेच पुण्य. पण आज काही तो दिसला नाही. बहुतेक तो हि या कुटीर उद्योगात उतरला असावा. १७ तारखेला तो भिकारी पुन्हा रेडक्रासच्या इमारती समोर बसलेला दिसला. बहुतेक १६ तारखेला बोटांना स्याही लावल्यामुळे आता त्याला नोट बदलणे शक्य नव्हते. मी सहज त्याला विचारले, "कुठे होता एवढे दिवस." तो म्हणाला साब, लाईनीत लागलो होतो. "कितने नोट छापे." दात दाखवत तो म्हणाला, सब मोदीजी कृपा है. नेहमीप्रमाणे त्याच्या हातावर २ रुपयांचे नाणे ठेवत मी पुढे निघालो. (खरे म्हणाल तर देण्याची इच्छा नव्हती. पण विचार केला हा कुटीर उद्योग अल्पकालीन आहे, ह्याचा मूळ धंधा तर भिक मागण्याचाच). ७-८ दिवसात लाईनीत उभे राहून गरिबांनी श्रीमंतांचे तीस एक हजार कोटी नक्कीच बदलून दिले असतील आणि सहा-सात हजार कोटी कमविले हि असतील. काही विरोधीपक्ष नेता लोक RBI समोर धरना द्यायला आले होते. लोकांनी त्यांना पळवून लावले, कारण त्यांच्या येण्यामुळे लाईन तुटली. गरिबांची दिहाडी मारल्या गेली. त्यांना राग येणार साहजिकच होत. पुढे नेत्यांनी लाईनीत लागलेल्यांना भडकवायचे सोडून दिले.
दुसरा कुटीर उद्योग म्हणजे जनधन योजनेचा दुरुपयोग. अंदाजे किमान ४० ते ५० लक्ष लोकांनी श्रीमंतांचे काळे धन स्वत:च्या खात्यात टाकून उजळ केले असावे. कारण या अवधीत ४० हजार कोटींच्या अधिक रक्कम या खात्यांत जमा झाली (११.१२.२०१६). २० ते २५ टक्के कमिशन या कुटीर उद्योगात हि गरिबांना मिळाले असेल. असो.
काहीही म्हणा, काही दिवस तरी, गरीब लोकांना एक नवीन कुटीर उद्योग मिळाला. मोठ्या प्रमाणात लोकांनी या बहती गंगेत हात धुऊन घेतले.
प्रतिक्रिया
12 Dec 2016 - 7:36 pm | स्वामी संकेतानंद
दिल्लीत बेकार प्रकार सुरू होता. आमच्या पटेल नगर भागात पण सगळे दिहाडी मजदूर, पोट्टेबिट्टे रांगेत लागले होते. एजंट लोकांनी भरपूर छापून घेतले.
13 Dec 2016 - 12:01 am | डॉ सुहास म्हात्रे
हे शहर-खेड्यांत भारतभर झाले असणार यात शंका नाही. या रांगातले काही अल्पजण खरे असतील, पण बहुतेक बँक-क्यु-हमाल असल्याचे रिपोर्ट्सच्या व्हिडीओंत दिसत होते.
पण, त्या रांगांचा सरसकट कळवळा येऊन त्यांच्यावर कॅमेरा रोखून टीव्ही वाहिन्यांत एकामागोमाग एक अर्धा-पाऊण तासांचे प्रोग्रॅम्स रचले जात होते... आणि त्या कार्यक्रमांतल्या विसंगती धडधडीतपणे दिसत असताना काही लोक डोळे मिटून (की चष्मा घालून) विश्वास ठेवत होते ! :) ;)
हाताला शाई लावायला सुरुवात झाल्याच्या दुसर्याच दिवशी या रांगातील जनता अचानक निम्म्यापेक्षा कमी झाते, यावरूनही सत्य स्विकारायला हरकत नव्हती. पण ते न करता शेतकर्यांचा कळवळा सुरू झाला, जसा पहिल्या १५ दिवसांत शेतकर्यांना काहीच त्रास नव्हता !
13 Dec 2016 - 12:27 am | चित्रगुप्त
रोचक माहितीपूर्ण धागा. पटाईतसाहेब, तुम्ही खास दिल्लीकर. त्यामुळे तुमचे दिल्लीतल्या घडामोडींवरील लिखाण एकदम भावते. दिल्लीविषयी सखोल माहिती आणि दिल्लीकरांविषयीची चांगली जाण असणारा मिपाकर माझ्यातरी माहितीत आणखी कोणी नाही. तुम्ही अश्याच गमतीजमती, तुमची निरीक्षणे, कविता वगैरे लिहीत रहा. प्रतिसाद कमी मिळाले तरी तुम्ही लिहीलेले आवडीने वाचणारे खूप आहेत.

दिल्लीतला जुना भाग, तिथले जुन्या काळातील जीवन आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमि, फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांमुळे दिल्लीचे पालटत गेलेले रूप आणि तिकडून आलेल्या पंजाबी लोकांचा वाढता प्रभाव -- त्यामुळे बदलत गेलेली लोकांची मनोवृत्ती, त्या सर्व वातावरणात गेलेले तुमचे बालपण या सर्वांचा आढावा घेणारा एकादा विस्तृत लेख नक्की लिहा.
13 Dec 2016 - 12:55 am | गामा पैलवान
ठाम अनुमोदन!
-गा.पै.
13 Dec 2016 - 2:11 am | पिलीयन रायडर
मला तर आता कळेनासे झाले आहे. आधी माझा फार ठाम विश्वास होता ह्या सगळ्या नोटाबंदी आणि त्या मागच्या प्लानिंगवर. पण तो जरासा डळमळला आहे मागच्या काही दिवसात, हे ही खरंय.
आमच्या सारख्या अडाण्यांनी अजुन थोडे दिवस वाट पहावी हेच बरं!
13 Dec 2016 - 2:23 am | खटपट्या
प्लानींग सुद्धा बरोबर झालंय. पण असं दीसतंय की काही धेंडांनी थेट बँक कर्मचार्यांना हाताशी धरुन मोठ्या प्रमाणात नवीन नोटा हस्तगत केल्यायत. जीथे बँक कर्मचारी हाताशी लागले नाहीत तीथे गरीबांना लालूच दाखवून त्यांच्याकरवी पैसे पांढरे करुन घेतलेत.
13 Dec 2016 - 6:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
नोटाबंदी कारवाईत अर्थक्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या व्यवसायात/विभागांत अनेक दशकांचे "उलटे" हितसंबंध असलेले अनेक प्रकारचे प्रतिस्पर्धी आहेत. ते थोडेच सहजासहजी हार मानणार आहेत ? त्यामुळे काही काळ हा चोर-पोलिसाचा खेळ होणे अपेक्षित आहेच. सुरुवात त्यांनी केली आहे, सरकारने शेवटचा डाव जिंकला तरी पुरे आहे.
13 Dec 2016 - 12:29 pm | इरसाल कार्टं
काही धेंडांनी थेट बँक कर्मचार्यांना हाताशी धरुन मोठ्या प्रमाणात नवीन नोटा हस्तगत केल्यायत. जीथे बँक कर्मचारी हाताशी लागले नाहीत तीथे गरीबांना लालूच दाखवून त्यांच्याकरवी पैसे पांढरे करुन घेतलेत.
13 Dec 2016 - 12:45 pm | संजय पाटिल
पांढरे कसे होतील? ते काळेच रहाणार, फक्त बदलून घेतले जातील..
13 Dec 2016 - 1:26 pm | स्वीट टॉकर
काही धेंडांनी थेट बँक कर्मचार्यांना हाताशी धरुन मोठ्या प्रमाणात नवीन नोटा हस्तगत केल्यायत. >>> +१००
या वावटळीनी उडालेली धूळ खाली बसायला बराच काळ लागणार आहे. मात्र ती बसली की बँकांमधल्या असल्या कित्येक कर्मचार्यांना तुरुंगाची हवा खायला लागणार आहे अशी माझी अटकळ आहे. रिसर्व बँकेतून निघालेली प्रत्येक नोट कुठल्या बँकेत गेली याची नोंद असेलच. त्यावर कारवाई करायला वेळ लागेल कदाचित, पण शेवटी होईलच यात शंका नाही. (जर मोदींचं राज्य राहिलं तर.)
13 Dec 2016 - 7:51 pm | अभिजित - १
भारतात अशी कोणाला शिक्षा होत नसते . खास करून व्हाईट कॉलर गुन्हेगारांना ..
13 Dec 2016 - 1:41 pm | याॅर्कर
नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थीमुळे आणि गोंधळामुळे सरकारला रोज एक नवीन निर्णय घ्यावा लागला,यावरूनच लक्षात येते कि निर्माण होणार्या शक्यतांचा सरकारने किती कमी अभ्यास केला असेल?
13 Dec 2016 - 7:18 pm | विवेकपटाईत
या शिवाय एक माहिती आणिक मिळाली. डिसेंबर महिन्याचा जो रोख १०,००० हजार आधीच (ग आणि ड श्रेणीच्या सरकारी कर्मचार्यांना) मिळाला होता. काहींनी त्याच्या उपयोग हि कमिशन साठी केला. असो.
14 Dec 2016 - 5:44 pm | विजुभाऊ
नोटा बंदी मुळे आपल्यासारख्याना एखादी नोट मिळते.
पण टीवी वर दाखवतात ती नोटांची बंडले मिळवणारे कसे मिळवत असतील इतके पैसे.
मधल्या मधे ब्यांक मॅनेजर्स ची चांदी झाली. ब्रषष्टाचाराला हातभार लावणारेही भ्रष्टच आहेत.
गरीबांचे हाल होतात म्हणून सरकारला धारेवर धरणारांपैकी एकानेही या बद्दल एक अक्षरही काढलेले नाहिय्ये.
14 Dec 2016 - 6:09 pm | पैसा
चांगभलं. बघूयात ३१ डिसेंबरला काय काय कळतंय ते.