प्रयोगशील शाळा

मद्रकन्या's picture
मद्रकन्या in जनातलं, मनातलं
7 Dec 2016 - 1:55 am

रविवारच्या लोकमत मंथन पुरवणी मध्ये प्रयोगशील शाळांबद्दल लेख आला होता. या शाळांच्या कार्यपद्दतीची थोडक्यात चांगली ओळख करून दिली आहे या लेखात. त्यात महाराष्ट्रातल्या काही शाळांची नावं पण आहेत.

http://epaper.lokmat.com/epapernew.php?articleid=LOK_MTHN_20161204_5_1&a...

याच लेखाच्या निमित्ताने नाशिक मधील आनंद निकेतन शाळे बद्दल थोडी माहिती:
शाळेची वेबसाईट

माझा मुलगा तन्मय आनंद निकेतन, नाशिक या शाळेत इयत्ता पहिलीत आहे. तो खेळवाडी (pre-school) पासूनच या शाळेत आहे. आणि ते तसं असेल तर मुलांसाठी फार चांगलं आहे. का ते पुढे लेखात येईलच.

आपल्या पाल्याला शाळेत घालायची वेळ आली की आपल्याला असंख्य प्रश्न पडतात. त्यासंदर्भात पुढे लेखात दिलेली माहिती ही फक्त प्रयोगशील शाळांबद्द्ल आहे.

त्यातला पहिला प्रश्न म्हणजे
माध्यम कोणतं निवडायचं?
(आजकाल अनेक पालकांना हा प्रश्न पडतच नाही कारण बरेचदा बाळ जन्माला येण्यापूर्वीच इंग्रजी माध्यम ठरलेलं असत :-)).

ह्या प्रयोगशील शाळा मातृभाषेतून शिकवतात. महाराष्ट्रापुर्त बोलायचं तर मराठी ही प्रथम भाषा. मग मराठीतूनच का शिकायचं आणि मग मुलांना इग्रजी कसं येणार हे प्रश्न तुम्ही त्यांना नक्कीच विचारू शकता. ते आपल्याला नीट समजावून सांगतात. आणि नुसतं बोलूनच गार करत नाहीत तर त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीतून पटवून देतात. इथली भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी कोणतीही असो) शिकवण्याची पद्धत शास्त्रीय आहे. ऐकणे, बोलणे, वाचणे मग लिहिणे या क्रमाने शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवले जाते. (आजकाल सर्वसामन्यपणे पहिले लिहिणे (A, B, C, D वगैरे) मग वाचणे बोलणे वगैरे अशा विचित्र क्रमाने शिकवले जाते.) इंग्रजी बद्दल निर्धास्त होण्यासाठी एकच सांगू शकते की या शाळेतली सहावी आणि सातवीतली मुलं स्नेहसंमेलनात पूर्ण आत्मविश्वासाने सहज सुंदर नाटक इंग्रजीतून सादर करतात. आठवी ते दहावीतली मुल स्वतः इंग्रजीतून कविता करतात तसेच प्रसिद्ध इंग्रजी कवितांचे सुंदर अनुवाद ही करतात आणि या कविता काव्य वाचनात वाचून पण दाखवतात. 
(तर मराठी माध्यम नक्की झालं. हुश्श एक प्रश्न सुटला.)

कोणत्या शाळेत घालायचं?
आपलं पाल्य कोणत्या शाळेत जातं हा प्रतिष्ठेचा प्रश्न न करता खरच कोणती शाळा आपल्या पाल्याला नुसत्या घोकंपट्टी च्या आणि मार्कांच्या मागे धावायला लावून “परीक्षार्थी” न करता खऱ्या अर्थाने “विद्यार्थी” म्हणून घडवू शकते याचा शोध घ्यावा. या निकषावर प्रशा (प्रयोगशील शाळा) नक्कीच सरस ठरतात.

Admission process काय असेल?
प्रशा मध्ये प्रथम येणार्‍यास प्राधान्य असा प्रकार आहे. (निदान नाशिक च्या आनंद निकेतन मध्ये तरी हे कसोशीने पाळले जाते. कोणताही आडमार्ग, मागचा दरवाजा असले प्रकार नाहीत.) दिवाळी नंतर शाळा सुरु झाली की पहिल्या आठवड्यात जाऊन नाव नोंदणी करावी लागते खेळवाडीसाठी. नाव नोंदणी मध्ये ज्यांची मोठी भावंडे शाळेत आहेत त्यांना प्राधान्य देऊन मग उरलेल्या जागांसाठी इतर मुलांचा नंबर लागतो. डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात, जर आपला नंबर लागत असेल तर, आपल्याला शाळेतून फोन येतो. मग १०० रुपये भरून फॉर्म घ्यायचा आणि जन्माचा दाखला, पाल्याचे दोन फोटो यासकट वर्षाची फी भरून admission नक्की करायची. या वर्षीची खेळवाडीची फी आहे आठ हजार (८०००/-) रुपये. पालकांना फक्त एखाद दुसरा प्रश्न विचारतात. जसे की व्यवसाय/नोकरी काय करता वगैरे. बस इतकच. इथे पालकांचा तसेच पाल्याचा interview वगैरे घेण्याची अघोरी प्रथा नाही. पहाटे पासून लांबच लांब रांग लावून फॉर्म घेण्यासाठी ताटकळत राहावे लागत नाही. फॉर्म तर मिळाला पण admission मिळेल की नाही अशी चिंता करायची गरज नाही. कारण इथे मुळातच फक्त दोन तुकड्या असतात आणि एका तुकडीत २० ते २२ मुले असतात, जास्त नाही. हा सगळा विचार करूनच फॉर्म दिले जातात.

आता पुढचा प्रश्न म्हणजे
डोनेशन किती भरावे लागते?
विश्वास बसणार नाही कोणाचा पण खरच ही शाळा डोनेशन मागत नाही. फक्त वार्षिक फी भरायची. त्यानंतर वर्षभरात उगाच फी वाढवणे नाही की अजून काही कारण दाखवून अव्वा च्या सव्वा पैसे मागणे नाही. कोणाला काही मदत म्हणून कधी द्यावेसे वाटले (पालकांव्यतिरिक्त पण इतर कोणीही मदत करू शकतात) तर त्यांनी शाळेच्या प्रशासनाशी चर्चा करून शाळेत कशाची तातडीची गरज आहे हे जाणून घ्यावे. त्याप्रमाणे यथाशक्ती मदत करावी. त्यावर Tax Benefit मिळू शकते. शाळेकडून पक्की पावती मिळते. अगदी पैसे नाही तर कोरे किंवा पाठ कोरे कागद, रंगीत खडू, स्केचपेन, कात्र्या, खेळणी असं काहीहि छोट मोठ पण आपण देऊ शकतो. पण हे सगळ ऐच्छिक आहे. कशाचीही जबरदस्ती नाही. :-) त्यामुळे लोक खरच मनापासून भरपूर मदत करतात.

शाळेची शिक्षण पद्धती कशी आहे?
खरच वाखाणण्याजोगी आहे. खेळवाडी, बालवाडी असो की प्राथमिक, माध्यमिक शाळा त्यांच बालपण, किशोरावस्था जपतात आणि खुलवतात सुद्धा.

खेळवाडीत त्यांच्या वयाला झेपतील असे खेळ खेळायचे, ताईन सोबत गाणी म्हणायची (इथे शिक्षिकांना ताई म्हणतात, बाई नाही :-). पुरुष शिक्षक असले तर दादा. पण माझ्या मुलाच्या शाळेत सगळ्या ताई च आहेत.), गोष्टी ऐकायच्या, व्यायाम करायचा, डबा खायचा. असं सगळ सुशेगात सुरु असत. पहिले आठ दहा दिवस बरीच मुल रडतात कंटाळतात. पण ताई कोणालाच धाक दाखवत नाहीत, ओरडत नाहीत. त्यांच्या कलाने घेतात. (हे मी स्वतः पूर्णवेळ शाळे बाहेर बसून पाहिले आहे पहिले आठ दिवस.) मुलांच मन रमवायला त्यांना खूप सारी खेळणी देतात, मैदानात उड्या मारू देतात, पळू देतात, बागेत खेळू देतात, डबा खाऊ देतात. थोडक्यात ज्याला जे हव ते करू देतात. हळूहळू रुळतात मुल. मग त्यांना शाळा इतकी आवडायला लागते की शाळेला सुट्टी नको असते. शनिवार-रविवार सुट्टी म्हणजे त्यांना फार वाटते.

खेळवाडीत लिहायला शिकवत नाहीत. ते बालवाडी १ मध्ये गेल्यावर ते सुद्धा पाटीवरच फक्त. बालवाडी २ मध्ये ही तसच. वही पेन्सिल पहिलीत गेल्यावर.

खेळवाडी ते बालवाडी२ म्हणजे तीन वर्षात मुलांच्या हातापायांच्या स्नायूंची योग्य वाढ, मेंदूची इतर अवयावान सोबत सुसूत्रता या गोष्टीन वर भर दिला जातो. मुलांना त्याच्या आजूबाजूचा परिसर, घर, शाळा या संबंधितल्या गोष्टी, प्राणी, पक्षी, भाज्या, फळ अशा सगळ्याची माहिती करून देणे तसेच सगळ्याचा शक्य तेवढा प्रत्यक्ष अनुभव देणे ह्याला महत्व असते. त्यासाठी आवश्यक वेगवेगळे खेळ, व्यायाम करून घेतले जातात. जस की चाळणीने माती चाळणे, बाटलीत माती भरणे, धान्य निवडणे, भाज्या निवडणे, चिरणे, किसणे, फळ कापणे, मातीकाम, कोलाज काम, वेगवेगळ्या रचना बनवणे ज्यात शंख शिंपले, पिस्त्याचे टरफल, प्लास्टिक च्या बांगड्यांचे तुकडे अशा काही वस्तू वापरणे, ठसे काम, जिग सौ पझल सोडवणे, सरळ रेषेवरून चालणे, पायऱ्यान वरून उडी मारणे, चेंडू बादलीत टाकणे, माळा ओवणे, शिवणकाम असे बरेच काही...

बालवाडी ते दहावी त्यांना समजतील अशा क्षेत्र भेटींना त्यांना नेतात. त्यात बऱ्याच ठिकाणाचा समावेश असतो जसे की आजूबाजूचा परिसर, बांधकाम सुरु असलेली जागा, शेत, कारखाने, बाजार आणि अगदी स्मशान सुद्धा.

शाळेच्या स्नेहसंमेलनात सगळ्यांना सहभागी करून घेतात. प्रत्येक विध्यार्थ्याला भाग घेता येईल आणि ते व्यासपीठावर उभे राहून काही न काही सादर करतील याची पूर्ण काळजी ताई घेतात. त्यासाठी सगळ्या ताई, काही माजी विद्यार्थी आणि बरेचसे पालकही खूप मेहनत घेतात.

खेळवाडी बालवाडी मध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी, गाणी व इतर अभ्यास क्रम हे सगळ मुलां कडून जबरदस्ती पाठ करून घेऊ नये असं सांगणारी शाळा मला तरी स्वप्नवत वाटते. हे सगळ त्यांना इतकं खेळीमेळीने शिकवलं जात की आपोआप त्यांच्या लक्षात रहात. काहीही घोकाव लागत नाही. :-)

पहिली ते दहावी पर्यंतच सगळ शिक्षण हे नुसत पुस्तकी न ठेवता मुलांना त्यात रस वाटेल, त्यांच्या बुद्धीला चालना मिलेल, त्यांच्यात निकोप स्पर्धा राहील हे पाहणे. प्रत्येक नवी गोष्ट शिकतना ती आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडून ती मुलांच्या पातळी वर आणून त्यांना उलगडून सांगणे, वयक्तिक रित्या तसच इतरांच्या सोबत गटात काम करून उपक्रम राबवणे. असं खूप काही सतत, दर वर्षी, नव्या जोमाने, प्रचंड उत्साहाने, खिलाडू वृत्तीने आणि महत्वाच म्हणजे तुफान सहनशक्तीने सगळ्या शिक्षिका करतात.

दरवर्षी शाळेला दिवाळीची सुट्टी लागण्या पूर्वी शाळेत एक दिवस दुकानजत्रा असते. ज्यासाठी कच्चा माल आणून, वस्तू बनवणे, विकणे, सगळा हिशोब ठेवणे अशी सगळी काम मुल करतात. त्यात ते छान छान ग्रीटींग्ज, बुकमार्क्स, वौल पीस, तोरणं, आकाशकंदील, मुलींचे कानातले, ब्रेसलेट, वेगवेगळ्या चटण्या, भेल, दाबेली आणि असंच बरच काही बनवून विकतात. काही गोष्टीचं फक्त रिटेल ट्रेडिंग ही करतात जस की फराळाचे पदार्थ, तयार कपडे, पिशव्या, पर्स, बुद्धीला चालना देणारी खेळणी, पुस्तक वगैरे.

या शाळेत शिस्त नक्कीच आहे पण धाकदपटशाही नाही. मुलांना पट्टीने मारणे, झोडणे हे प्रकार नाहीत.

आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इथे प्रत्येक विद्यार्थ्याच व्यवस्थित मूल्यमापन केलं जात. प्रत्येकाच रोजच रेकॉर्ड ठेवलं जात. त्यांच वागण, बोलण, न बोलण, रागावण, रडण, भांडण, दिलेली असैन्मेंट पूर्ण केली की नाही, केली तर कशी केली, काय जमल, काय नाही जमल, काय आवडीनी केलं जात, काय कारायला आवडत नाही, वागण्यात नव्याने झालेले चांगले वाईट बदल असं बरच काही नियमित नोंदवून ठेवल जात. जे पालकांपर्यंत योग्य पद्धतीनी पोचवल जात.

मार्क न देता, श्रेणी न देता प्रत्येक विषयात कशी प्रगती आहे हे योग्य आणि थोडक्या शब्दात लिहिलेली मूल्यमापन पत्रिका निकालाच्या दिवशी मिळते. त्यातच कुठे सुधारणा हवी, काय सुधारणा हवी हे सुद्धा नमूद केलेलं असते.

तर अशी ही बऱ्याच बाबतीत स्वप्नवत वाटणारी प्रयोगशील शाळा आपल्या मुलांना मिळावी असं कोणत्या पालकांना वाटणार नाही.

सांगायचं म्हंटलं तर अशा अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत. काय काय आणि किती किती सांगणार. ते सगळ अनुभवण्यातच मज्जा आहे... बालक आणि पालक म्हणूनही... :-)

--मद्रकन्या

शिक्षणलेख

प्रतिक्रिया

जयन्त बा शिम्पि's picture

7 Dec 2016 - 2:54 am | जयन्त बा शिम्पि

लेखात वर्णन केलेली अशी शाळा असू शकते यावर विश्वासच बसत नाही.खरं सांगायचं म्हणजे स्वप्नवत वाटत आहे. आता तुमचा पाल्यच तेथे आहे असे म्हटल्यानंतर ही शाळा समक्ष पहावीच अशी प्रेरणा झाली आहे. नेमकी ही शाळा नाशकात कुठे आहे हे ही लिहिले असते तर उत्तम झाले असते. विचारण्याचा त्रास होणार नाही. रच्याकने जे.क्रुश्णमूर्ती फौंडेशन तर्फे वेगळ्या पद्धतीने शाळा चालविल्या जातात हे वाचले होते, पण तेथील फी सामान्यांना परवडण्यासारखी नसते असे म्हणतात.अधिक अनुभवांची प्रतिक्षा.

रातराणी's picture

7 Dec 2016 - 10:33 am | रातराणी

+1 भारी आहे शाळा !

आमची शाळा अशीच आहे. पुण्यातील गोळवलकर गुरुजी विद्यालय.

पिलीयन रायडर's picture

7 Dec 2016 - 9:30 pm | पिलीयन रायडर

बरेच ऐकले आहे. थोडी माहिती द्याल का?

शाळेची माहिती आवडली. अशा ठिकाणी वेटींग लिस्टही असणार कि हो!

खटपट्या's picture

7 Dec 2016 - 3:39 am | खटपट्या

वा! अशा जास्तीत जास्त शाळा निघायला हव्यात

विंजिनेर's picture

7 Dec 2016 - 4:29 am | विंजिनेर

अशा जास्तीत जास्त शाळा निघायला हव्यात

खरंय. +१

माध्यम कोणत निवडायच?

स्वानुभवावरून सांगतो, मुलांना बिन्धास्त मातृभाषेतून शिकू द्यावे. इंग्रजी माध्यमाचा बाऊ करायची गरज नसते. मी इंग्रजी मुळाक्षरे पहिल्यांदा गिरवली ती इयत्ता ५वीत!- तरीसूद्धा इंग्रजीचा दैनंदीन वापर, ८वी-९वीपासूनच लागलेली इंग्रजी वाचनाची आवड आणि त्या भाषेवर बसलेलं माझं प्रेम आज कायम टिकून आहे. अर्थात ह्याचे श्रेय दर्जेदार शिक्षकांना आणि घोकंपट्टी पेक्षा भाषेवर प्रेम करायला लावणार्‍या शिक्षण- पध्दतीला जाते.

अत्यंत सुंदर आणि समर्पक ओळख. ही शाळा स्वप्नवत वाटावी अशीच आहे. दुर्दैवाने हल्ली सगळीकडेच गल्लाभरू शाळांची भूछत्रे उगवली आहेत. निव्वळ घोकंपट्टी, बाकी काही नाही!

तुषार काळभोर's picture

7 Dec 2016 - 8:47 am | तुषार काळभोर

धोपटमार्ग सोडून इतक्या सुंदर शाळेत मुलाला टाकल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

पण शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी, असं म्हणतात. तसं दुसऱ्या मुलांनी अशा प्रयोगशील शाळांत शिकून त्यांचं कौतुक करायला सर्वांना आवडतं. अशी शाळा आपल्या शेजारी असेल, तरी तिथे आपल्या मुलांना फार कोणी टाकणार नाही.(कदाचित मीही). कारणे असतात, पिअर प्रेशर, सामाजिक प्रतिष्ठा, पाल्याच्या भविष्याची अनाठायी काळजी.
या सर्वांतून अशी वेगळी शाळा निवडणे, यासाठी सर्वात महत्वाचं असतं मुलांच्या आईचं सहकार्य. कारण वरील कारणे ही वडिलांपेक्षा आईसाठी जास्त लागू होणारी असतात. म्हणून ऍज ए आई म्हणून तुमचं हार्दिक अभिनंदन!
(मागे कधीतरी डांगे आण्णांनी पण अशाच शाळेविषयी सांगितलं होतं)

जर मी चुकत नसेन तर या सौ. डांगे वहिनीच आहेत. :-) मागे खफवर संदीपभाऊंनी त्यांना मिपासदस्यत्व मिळाल्याचे सांगितले होते. (माझी माहिती चुकीची असल्यास क्षमस्व.)

संदीप डांगे's picture

9 Dec 2016 - 4:41 am | संदीप डांगे

आपली माहिती बरोबर आहे. 'तन्मय' आमचाच मुलगा! :)

स्रुजा's picture

9 Dec 2016 - 5:04 am | स्रुजा

:) अरे वा . त्यांचा आयडी तुमच्या आयडीनामा पेक्षा जास्त आवडला :प

लेख ही छान आहे. अशा शाळा असतात यावरचा विश्वास उडत चाललाय खरं तर. पण तुमचा लेख वाचुन छान वाटलं.

वेल्लाभट's picture

7 Dec 2016 - 11:00 am | वेल्लाभट

सुंदर, माहितीपूर्ण, आणि एका उत्तम शिक्षणसंस्थेचा परिचय करून देणारा लेख. पालकांनी नक्कीच वाचावा असं वाटतं. शक्य असल्यास शाळेची काही छायाचित्र, पत्ता इत्यादी तपशील देऊ शकाल का? इच्छुकांना मदत होईल.

मद्रकन्या's picture

7 Dec 2016 - 12:26 pm | मद्रकन्या

हि शाळेची वेबसाईट:
http://www.anandniketan.ac.इन
आता शाळेचे बांधकाम, रंगकाम पूर्ण झाले आहे पण बहुतेक ते फोटो अजून update केलेले नाहीयेत.

संपादकांना विनंती: कृपया ही लिंक लेखात समाविष्ट करा.

मद्रकन्या's picture

7 Dec 2016 - 12:46 pm | मद्रकन्या

संपादकांचे आभार :-)

मद्रकन्या's picture

7 Dec 2016 - 12:28 pm | मद्रकन्या
खटपट्या's picture

9 Dec 2016 - 6:43 am | खटपट्या

साइटवरले फोटो बघून फुल टू धमाल वाली शाळा वाटतेय. आमच्या वेळेला असली शाळा नव्हती. :(

पद्मावति's picture

7 Dec 2016 - 3:21 pm | पद्मावति

खूप सुंदर लेख आणि माहिती.

पाटीलभाऊ's picture

7 Dec 2016 - 3:39 pm | पाटीलभाऊ

अशा अजून शाळा सगळीकडे सुरु केल्या गेल्या पाहिजेत.

खूपच सुंदर माहिती.. कुणाला ऐरोली च्या आसपास अशा शाळा माहीत असतील तर सांगा..