नमस्कार,
गेली अनेक वर्षे मी जमेल तसे बिछान्यात लोळत आहे आणि लोळत असताना मिसळपाववरचे लेख वाचत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचता वाचता किंवा आपल्या जोडीदाराच्या संगतीने अनेक लोकांना बिछाना गाठावासा वाटतो आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक मस्तपणे आणि नियमीतपणे आराम करतात. मला स्वप्नातून अनेकजण झोपेबद्धल प्रश्न विचारतात आणि तेथेही पुढील प्रगती कळवतात.
आरामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही पुरेसा आराम मिळत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला आराम" नोंदवत राहूया.
आराम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. वामकुक्षी घ्या, पहाटेची साखरझोप घ्या, घोरा, अस्ताव्यस्त पसारा, शवासन करा, गादीवर नुसतेच लोळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा.
आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि आरामाला नक्की सुरूवात करतील.
मग... आज किती आराम केला..?
**************************************************************
काही डिस्क्लेमर्स.
१) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी आराम करावा" इतकाच आहे.
२) आपल्या आरामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर झोपाळू आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत.
माझीही शँपेन: हाफ / फुल पँट्स घालून मॅरेथॉन लोळतो, झोप्लाभट नियमीतपणे डुलक्या घेतो, निद्रेंद्र, श्रीघोरुजी, केडी (म्हणजे कायम डुलक्या), आनंदी झोपाळ असे अनेक मुरलेले रेस्टिस्ट लोक आहेत. डॉक्टर घोरे आणि डुलक्याकाका निद्रानाशावर उपाय सांगतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले अंथरूण पसरण्यासाठी उद्युक्त करूया.
३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :)
**************************************************************
टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
प्रतिक्रिया
10 Nov 2016 - 11:07 am | साहेब..
मी आज १० तास आराम केला.
10 Nov 2016 - 11:08 am | सत्याचे प्रयोग
.
10 Nov 2016 - 11:11 am | असंका
कहर केला आहे अगदी!! जबरदस्त!!
जरा आरामात प्रतिसाद द्यायला हवा होता खरं तर! पण ते एक म्हणले होते ना 'आराम हराम है!' म्हणून म्हणलं लगेच प्रतिसाद द्यावा मग आरामात आराम करावा...!
धन्यवाद!
10 Nov 2016 - 12:04 pm | आदूबाळ
कवी बडे बाबू यांच्या सौजन्याने:
आज करे सो कल कर, कल करे सो परसों
इतनी जल्दी क्या है बेटा, जब जीना है बरसों?
10 Nov 2016 - 1:34 pm | नीलमोहर
आत्ता बसून हे वाचतेय तेवढाच आराम जीवाला,
ती सगळी नावे कहर आहेत !!
( या विडंबनामुळे, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, देजा वू फिलींग आली :)
10 Nov 2016 - 1:44 pm | पैसा
=)) =))
10 Nov 2016 - 2:04 pm | माम्लेदारचा पन्खा
असे सल्ले देणारं कोणीतरी हवंच आयुष्यात राव !
10 Nov 2016 - 2:06 pm | पाटीलभाऊ
याच्यासाठी सुद्धा प्रोत्साहन लागत... :D
10 Nov 2016 - 2:11 pm | केडी
हाहाहा, जमलाय, जोरदार जमलाय, हसून हसून पुरेवाट!
:-))
10 Nov 2016 - 2:22 pm | आनन्दा
__/\__
10 Nov 2016 - 2:28 pm | सस्नेह
जोरदार विडंबन !
..येउद्या आरामात !
10 Nov 2016 - 2:29 pm | सिरुसेरि
लेखाचे नाव वाचुन गनबोटे फरसाणाच्या जाहिरातीतला "गट्टमा" आठवला .
10 Nov 2016 - 2:35 pm | नाखु
तो ये आराम का मामला है !!!
मिपा जाहीराती (सुद्धा) बघणारा नाखु मिपाकर.
10 Nov 2016 - 2:48 pm | सोनुली
आवडला
10 Nov 2016 - 3:19 pm | वरुण मोहिते
मजा आली वाचताना . आराम पण महत्वाचा आहे हो बाकी
10 Nov 2016 - 4:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज सकाळी ब्याडमिंटन खेळून आल्यापासून लोळुन आहे. सुट्टी आहे, सो मजा.
-दिलीप बिरुटे
10 Nov 2016 - 6:04 pm | मोदक
ह्या ह्या ह्या.. खुसखुशीत.
10 Nov 2016 - 7:05 pm | धर्मराजमुटके
कुणीतरी सांगीतलयं ना की आराम हा राम आहे म्हणून गेल्या आठवड्यात खंप्लीट आराम केला.
10 Nov 2016 - 7:15 pm | जव्हेरगंज
जोरदार !!!
10 Nov 2016 - 7:21 pm | जयन्त बा शिम्पि
गेल्या चार महिन्यापासून आम्ही दोघे पती-पत्नी, अमेरिकेत, मुलाकडे आलेलो आहोत. येथे घराबाहेर बोचर्या थंडीमुळे कोठे जाता येत नाही. बाहेर मॉल मध्ये अथवा किराणा आणण्यासाठी, मुलगा कारमधून घेऊन जातो व कारमधूनच परत घरी आणतो. मुलगा, सूनबाई सकाळी आठ वाजता ऑफिसला जातात ते सायंकाळी परत येतात. नात व नातू सकाळी सात वाजता शाळेत जातात ते परत सायंकाळी पाच वाजता परत येतात. त्यामुळे दिवसभर घरात आम्हाला " आरामच आराम " असतो.विषेश म्हणजे असा हा 'सक्तीचा' आराम आम्हाला ३० डिसेंबर २०१६ पर्यंत करावयाचा आहे. एकदाचे भारतात गेलो म्हणजे नेहमीची कामे ( लहान मुलाच्या दोन्ही पिल्लांना- नात व नातू, तेही जुळे !! शाळेत नेणे-आणणे, त्यांचेशी इतर वेळी मस्ती,गप्पा,फिरायला जाणे, बँकेची व घरातील किरकोळ कामे,उरलेल्या वेळात संगणकाशी दोस्ती व मिपावर 'पत्ते पिसणे') सुरु होतील. मग आराम कुठला ? असतं एकेकाचं नशीब ! !
10 Nov 2016 - 7:21 pm | स्थितप्रज्ञ
मागील दोन दिवस नवीन येणाऱ्या २००० च्या नोटेमध्ये रॉकेट लॉंचरचेही फीचर अॅड करण्यात व्यस्त असल्यामुळे आराम करायला अजिबात सवड मिळाली नाही याबद्दल शासनातर्फे दिलगिरी व्यक्त करतो.
10 Nov 2016 - 7:32 pm | खटपट्या
विडंबन छान झाले आहे. व्यायाम करणार्यांसाठीपण आराम खूप महत्वाचा आहे. वजनाचा व्यायाम करतात त्यांचे शरीरातील टीश्यू पूर्ववत व्हायला ४८ तास लागतात. त्यामुळे व्यायामानंतर आराम अत्यावश्यक आहेच अन्यथा अपाय होउ शकतो.
11 Nov 2016 - 1:47 am | रेवती
विडंबन आहे का? मी सिरियसली सांगायला आले होते.
11 Nov 2016 - 5:29 am | कंजूस
हा लेख भावला वामना. तू १०००० पावलं न टाकता फक्त तीन पावलात जे साध्य केलंस ते सर्वांनाच माहित आहे.
11 Nov 2016 - 11:09 am | तुषार काळभोर
11 Nov 2016 - 11:44 am | अजया
धागा काल वाचला.आज आरामात प्रतिसाद देते ;)
जमलंय विडंबन!
11 Nov 2016 - 2:16 pm | पद्मावति
मस्तं जमलंय.