ग्रंथ परिचय - ग्रामगीता
ग्रामगीता ऍपवर मराठीतील पुर्ण गीता वाचायला क्लिक करा.
वंदनीय राष्ट्रीय संत श्री तुकडोजी महाराज विरचित युग परिवर्तन कार्य
मित्रहो,
नुकतेच एक ग्रंथराज वाचनात आले. त्याचा परिचय करून द्यावा आणि ज्यांना आधीपासून या ग्रामगीतेची महती ज्ञात आहे, त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा ही इच्छा. अमरावतीच्या साहित्य रत्न सूदामजी सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगी संत श्री तुकाराम जी दादा गीताचार्य जन्मशताब्दीच्या निमित्ताने याचे विशेष संस्करण सन 2014मध्ये प्रकाशित केले गेले.
सुजन हो, दुमदुमवा कानोकानी, ही ग्रामगीतेची वाणी ।
बाह्यांग –
41 अध्यायाच्या 375 पानाच्या या गीतेची रचना विदर्भातील राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांनी ओवीच्या स्वरूपात आहे. आजकालच्या मराठी वाचकाला समजेल अशी सोपी व जवळची भाषा आहे. यात पाच अध्यायांचे एक असे आठ पंचक आहेत. शेवटचा अध्याय ग्रंथ महिमा आहे. व्यक्तिसमूहातून वाडी, खेडी, गाव आणि शहर बनते. यातून पुढे जिल्हे, राज्य आणि राष्ट्र बनते. या सर्वांच्या सामुहिक सहचरातून अनेक शक्ती, विचार आणि व्यवहार निर्माण होतात. प्राचीन काळपासून समाजधुरिणांनी याचा विचार करून जीवन पद्धती कशी असावी याची मांडणी केली. सामाजिक मापदंड, परंपरा, चालीरिती यातून ती मान्य होत गेली. त्यातून सामाजिक उन्नती झाली. मात्र काळानुसार मालिन्य आल्याने अनेक गोष्टींचा पुनर्विचार करून अनिष्ट व विघातक मांडणींना निरोप देऊन नव्याने समाजाला प्रेरणा द्यायला हवी असे अनेक विचारकांना वाटत राहिले. परंतु ते लेखनबद्ध करून समाजापुढे आचरणात आणायचे कार्य तुकडोजी महाराजांसारख्या लोकोत्तर व्यक्तीला करावे लागले. 22 जुलै 1953 ला आषाढी एकादशीच्या चंद्रभागेच्या स्नानपर्वाच्या कलकलाटात तुकडोजींना ध्यानावस्थेत साक्षात्कार होऊन याकार्याला स्फूर्ती मिळाली. नंतर विविध ठिकाणी वास्तव्यात, तर कधी मोटार-अग्निरथाच्या प्रवासातून त्यांचे हे गीतानिर्मितीचे कार्य होत राहिले. आणि 28 मे 1954च्या नारद जयंतीच्या दिवशी हा ग्रामगीता काव्याची निर्मिती संपन्न झाली सामान्यतः गीता म्हटले की जड शब्दात देव, आत्मा-परमात्मा, मोक्ष, जपतप, साधना आदि उपदेशाची घुट्टी पाजण्याची पाणपोई असे वाटून दुर्लक्ष केले जाते. नेमके ते सर्व या गीतेत नाही. मग हे काय असा प्रश्न साहजिकच पडेल म्हणून हा परिचय उपयोगी व्हावा. याचा परिणाम म्हणजे काळाच्या पुढे राहून अंधश्रद्धा मुक्त, अनिष्ट रूढीमुक्त, तंटामुक्त, व्यसनमुक्त, भ्रष्टाचारमुक्त समाज बांधणीला सरकारकडून आणि अन्य समाजसेवी संस्थांकडून प्रचंड कार्य होत राहिले. तरीही अनेक विचारी व जाणीव रुंदावलेल्या तरुणांच्या नजरेत ही ग्रामगीता आली तर आपल्या आधीच्या पिढीने आपल्याला काय काय करायला प्रेरित केले आहे याची जाणीव व्हावी म्हणून हा ग्रंथ परिचय.
सुरवातीच्या अध्यायात श्रोता व वक्ता यातील संवादातून ते म्हणतात,
संतमहात्यांचे हद्गत। देवाचा शुभ सृष्टीसंकेत। विशद करावया सरळ भाषेत। सुखसंवाद आरंभिला।। येथे श्रोती विचारले । ग्रामगीते प्रति लिहिणे झाले। त्यात संत देव कासया घातले। स्तुतिस्तोत्रे गौरवूनि?।।... काय देव म्हणता काम नोहे?। संता न भजता वाया जाय?। आशीर्वाद न घेता येतो क्षय। सत्कार्यासि?। कासयासि मध्यस्थता। उगीच देव धर्माची कथा?। करावी सर्व आपण गाथा। मारावी माथा देवाच्या?।।….
यावर ते म्हणतात - देव म्हणजे अतिमानव। मानवचा आदर्श गौरव। त्याचे कार्य ध्यानी राहो। स्फूर्ति यावया पुढिलांसि।। येथे मुख्य देवाचे व्याख्यान। नाही केले यथार्थ पूर्ण। देवासि पुरुषोत्तम समजून। वागा म्हणालो सर्वांना।। मित्रहो! गाव व्हावे स्वयंपूर्ण। सर्व प्रकारे आदर्शवान। म्हणोनि घेतले आशीर्वचन पूर्वजांचे।। ग्रामातील सर्वजन। होवोत सर्वसुखी संपन्न। घेऊ नये कुणाचा प्राण। समाजस्थिती टिकावी।। आम्ही सर्वचि संतुष्ट राहू। सर्वमिळोनि स्व खाऊ। राबू सर्व, सुखे सेवू जे जे असेल ते सगळे।। ... आमची संपत्ति नसे आमची। आमचि संतति नसे आमची। कर्तव्यशक्तिही नसे आमची। व्यक्तिशः उपभोगार्थ।। हे सारे गावाचे धन। असो काया वाचा बुद्धि प्राण। ऐसे असे जयाचे धोरण। तो नास्तिकही प्रिय आम्हा।। लोकांपुढे विशाल ज्ञान। ठेवाया अत्युच्च आदर्श कोण?। म्हणोनि देवाचे नामाभिमान। घेतले विशाल भावाने।।...
भाग 1 समाप्त... पुढे चालू...
.....
प्रतिक्रिया
10 Nov 2016 - 2:03 am | जयन्त बा शिम्पि
विकत आणुन ठेवली आहे, पण वाचण्यासाठी ' योग ' आला नव्हता. आता या निमित्ताने वाचण्यास व लेखातुन समजाऊन घेण्यास सुरवात करीन.धन्यवाद.
30 Apr 2019 - 2:26 pm | शशिकांत ओक
आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. म्हणून त्यांच्या ग्रामगीता ग्रंथाच्या परिचयातून आदरांजली
10 Nov 2016 - 10:29 am | कंजूस
गावातल्या लोकांना गीता - पुस्तकातली नव्हे व्यवहारातली चांगलीच समजते.
कृष्णाने सांगितली- क्लिश्ट संस्कृतात- त्याचे आणखी मसाला मारून भाषांतर - सगळा शब्दबंबाळपणा वाटतो.
10 Nov 2016 - 10:29 am | कंजूस
गावातल्या लोकांना गीता - पुस्तकातली नव्हे व्यवहारातली चांगलीच समजते.
कृष्णाने सांगितली- क्लिश्ट संस्कृतात- त्याचे आणखी मसाला मारून भाषांतर - सगळा शब्दबंबाळपणा वाटतो.
10 Nov 2016 - 11:07 am | सतिश गावडे
ही गीता वेगळी आणि ती गीता वेगळी.
ग्राम गीता हा अतिशय सुंदर ग्रंथ आहे. एक अनोखे नागरीक शास्त्र या गीतेत आहे.
एका सुंदर ग्रंथाची मिपाकरांना ओळख करुन दिल्याबद्दल ओक काकांचे आभार !!
10 Nov 2016 - 11:32 am | नाखु
ती मुद्रीत स्वरूपात कुठे उपलब्ध आहे काय? असल्यास विकतच घेतो वाचायला.
तुमची जोरदार शिफारस असल्यावर नक्कीच उपयुक्त आणि वेगळी असणार आहे.
इथेच धाग्यावर दिला तरी चालेल.
तळटीप : ओककाकांनी स्वतःला विवादास्पद मुद्द्यापासून दूर ठेवल्याने आनंद द्विगुणीत झाला.
10 Nov 2016 - 12:00 pm | सतिश गावडे
अक्षरधाराला मिळण्यास हरकत नसावी. न मिळाल्यास माझ्याकडे दोन प्रती आहेत, त्यातील एक तुम्हाला देतो. :)
11 Nov 2016 - 5:12 am | कंजूस
ठीक आहे .तुमच्याकडून एकदा नेईन वाचायला.
पुस्तक परिचयाबद्दल ओककाकांना धन्यवाद.त्यांचं वाचन आणि अनुभव घेणं उत्साहात चालू असतं.
11 Nov 2016 - 11:22 am | सतिश गावडे
कदाचित तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल माहिती नसावे आणि लेख ओक काकांनी लिहिलेला असल्याने "कुणी तरी भोंदू महाराज असावेत" असा तुमचा गैरसमज झाला असावा. :)
11 Nov 2016 - 12:34 pm | मित्रहो
यांचा आश्रम गुरुकुंज अमरावती जिल्ह्यातील मोझरी या गावी आहे. खूप सुंदर जागा आहे. कॉलेजला असताना बऱ्याचदा गेलोय नंतर नाही. ग्रामविकास (स्नयंपूर्ण खेडे) व्हायला हवा असे त्यांचे मत होते. त्यांनी हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषात लेखन केले. माझ्या आठवणींप्रमाणे मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव हे भजन पण त्यांनींच लिहिले. तसेच खंजीरी (नक्की आठवत नाही)असे नाव असलेले वाद्य ते वाजवायचे.
11 Nov 2016 - 1:18 pm | शशिकांत ओक
कंजूस जी,
आपल्याला ग्रामगीता कशी वाटली. लि्कवरून वाचली काय़... ती पुस्तकी नसून व्यावहारिक आहे.
11 Nov 2016 - 9:38 pm | शशिकांत ओक
मित्रांनो, ७० - ८० वर्षांपूर्वी संत तुकडोजी महाराजांच्या नजरेतून राहणी आणि वेषभूषा यावर ते म्हणतात,
येथे श्रोता करी शंका सादर। साधी राहणी, उच्च विचार। हे जरी ऋषिजीवनाचे सूत्र। तरी ते आज न चाले।। किंमती कपडे , भडक राहणी। छाप पाडिती आज जनी।साधा सात्विक राहे पडोनि। मागच्या मागे।। विष्णुचा पीतांबर पाहून। सागरे लक्ष्मी केली अर्पण। शंकराची चिरगुटे बघून। दिले हलाहल, तैसे होय।।...
कापसाहूनि सफेद वसने। सोन्याहुनि पिवळे दागिने। शिखर गाठले कृत्रिमतेने। नित्य नव्या हौसेसाठी।।... नवी फॅशन थाटमाट। यांची वाढतचि गेली चट। ह्या गरजा वाढतचि जाती। तेथे न पुरे कुबेर - संपत्ती।। कोणी खाती लाचलुचपती। कोणी उघडचि डाके देती। अन्याय, अत्याचार वाढती। पैशासाठी।। कोणी सरळपणे चालती। ते या माजी रखडले जाती। मग त्यांचिही भांबावे वृत्ति। वाढे अशांति चहुकडे।।...
परिणामांची पर्वा न करिता। व्यर्थचि दाखवितो उदारता। घरी धन-संपत्ति नसता। कर्ज काढोनी हौस करी।।... सम्यक आचार सम्यक विचार। संयमाचा आदर्श थोर। साधु - संत, महावीर। जगज्जेते झाले या मार्गे।।...
11 Nov 2016 - 9:43 pm | प्रचेतस
तुकडोजी महाराजांचं हे भजन खूप आवडीचं.
मनीं नाही भाव म्हणे देवा मला पाव
देव अशानं भेटायचा नाही रे
देव बाजारचा भाजीपाला नाही रे
दगडाचा देव त्याला वडराचं भेव
लाकडाचा देव त्याला अग्निचं भेव
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव
सोन्याचांदीचा देव त्याला चोरांचं भेव
देव बाजारचा भाजीपाला नाही रे
देवाचं देवत्व नाही दगडात
देवाचं देवत्व नाही लाकडात
सोन्याचांदीत नाही देवाची मात
देव बाजारचा भाजीपाला नाही रे
भाव तिथं देव ही संतांची वाणी
आचारावाचून पाहिला का कोणी
शब्दाच्या बोलांनं शांती नाही मनी
देव बाजारचा भाजीपाला नाही रे
देवाचं देवत्व आहे ठाई ठाई
मी-तू मेल्याविण अनुभव नाही
तुकड्या दास म्हणे ऐका ही द्वाही
देव बाजारचा भाजीपाला नाही रे
11 Nov 2016 - 9:58 pm | यशोधरा
ग्रामगीतेची ओळख आवडली.
12 Nov 2016 - 6:38 am | चित्रगुप्त
हल्ली फारश्या प्रचारात्/माहितीत नसलेल्या अश्या ग्रंथांची नव्याने ओळख करून देणे हे एक महत्वाचे काम आहे, आणि ते प्रत्यक्ष हाती घेणे हे थोरच. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
12 Nov 2016 - 11:51 am | मुक्त विहारि
@ वल्ली....
"मनीं नाही भाव म्हणे देवा मला पाव"
ह्या कवना बद्दल धन्यवाद.
13 Nov 2016 - 11:54 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्त यांची फर्माईश पूर्ण करत आहे भाग २ सादर करून. त्यात सामान्यपणे धार्मिक पोथी पुराणात फलश्रुती हा भाग आवर्जून असतो. ग्रामगीेतेची फलश्रुती काय असावी यावरील खरमरीत भाष्य संत तुकडोजी महाराजांच्या सडेतोड व्यक्तीमत्वाला शोभा आणते...