बाजारात येता-जाता, गल्ली-बोळातल्या फूटपाथांवर, रेल्वे स्टेशनांवर, बस स्टॅंडांवर, गल्लीपासून दिल्लीपर्यंतची वर्तमानपत्रं, नियतकालिकांत सध्या एकाच प्रकारच्या पुस्तकाची चलती आहे...यश कसे मिळवावे, सुखी कसे व्हावे, यशस्वी होण्याचे शंभर उपाय, अपयशातून यशाकडे वगैरे वगैरे....!
ही पुस्तकं एवढ्या संख्येनं सगळीकडे मिळताहेत, खपताहेत, त्यावरून त्यात नक्कीच काहितरी "दम' असला पाहिजे. "नॉन-फिक्शन' पुस्तकंच हल्ली खपतात, अशी "रिऍलिस्टिक' माहितीही मिळाली. त्यामुळं आम्हीही काहितरी हृदयद्रावक, मनखोदक, बुद्धिभेदक, नेत्रविस्फारक, कल्पनारम्य, चक्षुचमत्कारिक लिहिण्यापेक्षा खर्रखुर्र आणि वास्तवाधारित लिहावं, असं वाटू लागलं....पण "यश कसं मिळवावं' अशा छापाचं काहितरी लिहायचं, तर स्वतःला किमान यश मिळालेलं असणं अपेक्षित किंवा अध्याहृत आहे, असं आम्हाला वाटलं. (अशी पुस्तकं लिहिणाऱ्या किती जणांना आधी आणि पुस्तकानंतर यश मिळालंय, देव जाणे! पण आमची आपली एक भ्रामक समजूत.) त्यामुळं तो प्रश्न मिटला. यशाचा आणि आमचा म्हणजे भुजबळ-शिवसेनेइतकाही संबंध नाही. मग लिहावं कशावर...?
मोठा खासा प्रश्न होता. मग आपला हातखंडा असलेल्या अपयशावरच काहितरी लिहावं असा कौल आमच्या सडक्या मेंदूनं दिला. भिकारगल्लीतल्या "कवडीमोल' प्रकाशनानं स्वतःहून प्रकाशनाची तयारी दाखवली आणि दहा रुपये सवलतीत एक प्रत आणि खपलेल्या दर तीन पुस्तकांमागे सव्वा रुपया असं भरघोस मानधन मंजूर झाल्यानंतरच आम्ही लेखणीला हात घातला.सध्या एकट्या सानिया मिर्झाचा सन्माननीय अपवाद वगळता सगळ्याच खेळांतले खेळाडू, कलाकार, मान्यवर, मंत्री, संत्री, मोसंबी, सगळ्या क्षेत्रांत यशस्वी होत असताना त्यांच्यासाठी "यश कसे मिळवावे' अशा प्रकारच्या पुस्तकांची काहीच गरज नाही, असे वाटून गेले. (असलीच, तर ती सचिन तेंडूलकरला असेल. पण तोही जाहिराती, हॉटेल व्यवसाय, पेज थ्री वगैरे क्षेत्रांत यशस्वी आहेच की!)
"यशाचाही कंटाळा येतो' अशा स्वरूपाचे कोणत्या तरी प्रसिद्ध व्यक्तीचे संतवचनही आमच्या कानावर पडले होते. त्यामुळं प्रत्येक यशस्वी व्यक्तीनं अपयशाची चवही थोडी चाखून बघायला हवी, असं आम्हाला वाटून गेलं. त्यामुळंच, "अपयशी होण्याचे 51 सोपान' अशा छापाचं पुस्तक लिहिलं, तर ते हातोहात खपेल, अशी मनोमन खात्री झाली. पण पुस्तकाला नाव काहितरी आकर्षक असावं, असं कुणीतरी सुचवलं. उदा. "इडली, ऑर्किड आणि मी', "ही श्रींची इच्छा' वगैरे. म्हणून मग आमचा "अंतू बर्वी' बाणा ऐनवेळी हात देऊन गेला. "अपयशी कसे व्हावे' यालाच समानार्थी असलेला आणि आम्ही स्वतः वारंवार अनुभवलेला "शेण कसे खावे,' हा वाक्प्रचार मदतीला धावून आला. पुस्तकाला शीर्षक तेच ठरलं.
या पुस्तकाची किंमत फारच वाजवी (कुणीतरी कानाखाली "वाजवी'ल!) असल्यामुळं आणि ते नाक्यानाक्यावर "गोवा, माणिकचंद'पेक्षाही सहज उपलब्ध असल्यामुळं त्यातल्या तपशीलाबद्दल फार काही देण्याचा मोह इथे टाळलाय. (विचारलंय कुणी?) तरीही, ही थोडक्यात झलक...
1. कुठलंही काम हाती घेताना आपल्याला हे बापजन्मात जमणार नाही, याची खात्री मनात बाळगावी.
2. असला-नसलेला उत्साह झटकून टाकून, प्रचंड नैराश्यानं आणि एरंडेल प्यायल्यासारखा (किंवा अलोकनाथसारखा म्हणा, हवं तर!) चेहरा करून कामाला नाइलाजानंच सुरुवात करावी.
3. थोडंसं जरी आपल्याला काम जमतंय, यश मिळतंय, असं वाटायला लागलं, की काहितरी कारणं काढून आपली कामाची दिशा बदलावी. नसलेल्या त्रुटींबद्दल तक्रारी करून काम देणाऱ्याला हैराण करून टाकावं.
4. कामात इंटरेस्ट वाटायला लागला असल्यास ताबडतोब काम थांबवावं. चहा किंवा लघुशंकेचं निमित्त करून कामातून मन काढून घ्यावं. उसना उत्साह गाळून टाकावा आणि नव्या नैराश्यानं पुन्हा कामाला हात घालावा.
5. एवढं करूनही कसंबसं एखादं काम पूर्णत्वाला गेलंच, तर अंतिम टप्प्यानंतर तरी ते कुणापर्यंत पोचणार नाही, याची काळजी घ्यावी.
6. शक्यतो त्याचा आणि आपल्या अयशस्वी कारकिर्दीचा तोंड फाटेस्तोवर अपप्रचार करावा.
7. कामात जाणुनबुजून काहीतरी त्रुटी ठेवाव्यात आणि त्यांवरच समाधान मानावे.
8. आपलं यश काम पूर्ण होण्यात नाही, तर ते अर्धवट राहण्यात, अयशस्वी होण्यात आहे, याची कायम जाणीव ठेवली, तर कधीच अपयश येणार नाही. (म्हणजे काय?)
9. एखाद्या वेळी यशस्वी होण्याची थोडीशीही धुगधुगी निर्माण झाल्यास, ताबडतोब केलेल्या कामाचा बट्ट्याबोळ करून टाकावा.
10. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, अपयश हे आपलं ध्येय आहे, हे पक्कं मनाशी ठेवावं.
----
सध्या माझं हे पुस्तक प्रचंड खपतंय.
हं...आता काही नतद्रष्ट समीक्षकांच्या पोटात या पुस्तकाचा अत्युच्च दर्जा खुपल्यामुळं आणि त्यांच्या डोळ्यांवर "यश कसं मिळवावं' वगैरे पुस्तकांचं यश असल्यामुळं त्यांनी माझ्या पुस्तकावर प्रचंड टीका केलेय. "लेखकाच्या अपयशाचं कारण सांगणारं पुस्तक' अशी शेलकी आणि सदाशिव पेठी विशेषणं त्यांनी लावल्येत, पण आम्ही फिकीर करत नाही....अपयशावर आमचा प्रचंड विश्वास आहे....!
तुम्हीही हे पुस्तक (कुठे मिळालंच, तर) जरूर वाचा आणि अभिप्राय कळवा.
काशीत गेलातच म्हणून समजा!
प्रतिक्रिया
31 Jan 2008 - 6:17 pm | विसोबा खेचर
आपल्या अभिजिता,
सुंदर ओळख करून दिली आहेस हो तुझ्या पुस्तकाची!
आवडली...!
तुम्हीही हे पुस्तक (कुठे मिळालंच, तर) जरूर वाचा आणि अभिप्राय कळवा.
काशीत गेलातच म्हणून समजा!
अगदी अवश्य वाचेन आणि अभिप्राय कळवेन. आणि अरे तशीही शेण खाण्याची मलाही आवड आहेच, तेव्हा तुझं हे पुस्तक मी नक्की वाचणार आणि शेण खाण्यात प्राविण्य मिळवणार! :)
आपला,
(शेण खाणारा!) तात्या.
31 Jan 2008 - 6:23 pm | विवेकवि
फारच छान..............
मिनु जोशी.
31 Jan 2008 - 6:49 pm | किशोरी
म्हणजे मी रोज शेण खाते हे मला आजच कळाले :))
ती पण एक कठीण कला आहे(आता लोकांना कोण सांगनार)
मस्त लिहीले आहे अभीजीतजी
पुस्तक फुकट मिळेल का?
31 Jan 2008 - 8:51 pm | ओल्डमंक
शेण कसे खावे? शक्य तो एकट्यानेच खावे. सगळ्यांनी मिळून खाल्ले की त्याला श्रावणी म्हणतात.
31 Jan 2008 - 10:12 pm | llपुण्याचे पेशवेll
अभिजितजी,
आपण हे पुस्तक लिहून शेण खाणार्या समस्त लोकांचे पितळ उघडे पाडले आहे. मी पण नित्यनेमाने शेण खातो पण ते कसे हे मी कधीच कोणाला कळु दिले नाही. आपण मात्र आमचे हे धंद्यातील गुपीत एका दिवसात उघडे केलेत. याबद्दल मी रद्दड कोर्टात आपणावर दावा लावावा असा विचार करत आहे. :)
टीपः- लिखाण उत्तम आहे. आम्हाला आवडले. वरील सर्व अभिप्राय हा लोकाना दाखविण्यासाठी असून त्याचा विकल्प मनी धरु नये. मोफत प्रतीची अपेक्षा करत आहे. आपला उद्योगबंधु (शेण खाण्यातला) समजून मला पाठवावी. ;)
शेणखाऊशिरोमणी
-डॅनी
31 Jan 2008 - 10:25 pm | इनोबा म्हणे
चांगला लेख आहे.
अवांतरः प्रतिक्रीया लिहायच्या वेळी आम्ही नेहमीच शेण खातो... फारसे काही लिहीता येत नाही. तेव्हा एवढं शेण गोड मानून घ्यावे.
तेवढी प्रत पाठवता आली तर बघा हो!
आपला हावरट(शेण खायला)-इनोबा
31 Jan 2008 - 10:30 pm | बिपिन कार्यकर्ते
ह्या पुस्तकाची प्रत शोधायचा खूप प्रयत्न केला.... पण अपयश आले.
बाकी पुस्तकाची ओळख मात्र झकास आहे...
बिपिन.
1 Feb 2008 - 1:31 am | प्राजु
तुमचं हे पुस्तक न मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न करेन म्हणते.. :)))
म्हणजे बरोबर शेण खाले जाईल..
(आवांतर : विनोदी ढंगाचे लेखन आवडले.)
- प्राजु
1 Feb 2008 - 2:10 am | देवदत्त
सवडीने नीट वाचेन व प्रतिक्रिया लिहीन.
तूर्तास शीर्षकावरून एक विनोद आठवला तो लिहितो.
नवरा: काय हा स्वयंपाक बनवला आहे. त्यापेक्षा शेण चांगले.
बायको: देवा, काय म्हणावे ह्यांना आता. शेणाचीही चव घेऊन बघितली?
1 Feb 2008 - 11:50 am | प्रकाश घाटपांडे
हा तर शासकीय कामाचा मुलमंत्रच आहे.सहकार्यांच्या सुचनेनुसार याचे पाठांतर करुन तो जपण्याचा आम्ही खुपच प्रयत्न केला. पण आम्हाला त्यात अपयश आले. मग आम्हि अनिच्छेने कामाला अकाली सोडचिट्ठी दिली आनी त्याला स्वेच्छानिवृत्ती म्हणले. आता आम्ही लोकांना पेढे कसे खावे असा सल्ला देत फिरतो.
(श्रावणीत पंचगव्य खाल्लेला)
प्रकाश घाटपांडे
1 Feb 2008 - 1:57 pm | विसुनाना
'शेण कसे खावे' हे सांगणारा यशस्वी लेख.
(त्यामुळे स्वतः शेण खाण्यात लेखक अपयशी ठरल्याने त्याला शेण खाण्यात शेवटी यश आलेच! - म्हणजे काय? ;-) )
1 Feb 2008 - 2:42 pm | बेसनलाडू
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २०-२० सामन्यात आता या घडीला आपण जसे खातो आहोत तसे खावे. (भारत ३५ / ५, ७.२ षटके)
(समालोचक)बेसनलाडू
1 Feb 2008 - 3:20 pm | बेसनलाडू
पोट भरले
सर्वबाद ७४
(पोटभर)बेसनलाडू
1 Feb 2008 - 6:41 pm | आपला अभिजित
मित्रहो,
धन्यवाद!
असेच प्रेम राहू द्या.
त्यातूनच नव्या लेखनाची उर्मी (मातोंडकर नव्हे!) मिळेल.
-आपला,
अभिजित पेंढारकर.