मक्केतील उठाव २

हुप्प्या's picture
हुप्प्या in जनातलं, मनातलं
2 Oct 2016 - 2:28 am

या आधीचा भाग

इस्लाम स्थापन झाल्यापासून किंबहुना त्याआधीही मक्का हे शहर हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. प्रत्येक मुसलमानाला अशी धर्माज्ञा असते की आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करावी. त्यामुळे प्रत्येक धार्मिक मुस्लिम आयुष्यात एकदा तरी ही तीर्थयात्रा करतोच. सौदी अरेबियाकरता मक्का हे एक प्रतिष्ठेचे स्थान आहे. जगभरातील मुस्लिमांनी पवित्र मानलेल्या जागेची व्यवस्था बघण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्याचे पावित्र्य टिकवणे हे त्यांचे ते कर्तव्य मानतात. अर्थात ह्या यात्रेमुळे सौदी सरकारला मोठा महसूलही मिळतो. इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या यात्रेकरूंना त्यांचे सगळे धार्मिक कार्यक्रम व्यवस्थित पार पाडता यावेत म्हणून सौदी सरकारने १९६० च्या आसपास मोठे प्रकल्प हाती घेतले. त्या सुमारास महंमद बिन लादेन हा माणूस आपल्या स्थापत्य शास्त्रातील कौशल्य, सौदी घराण्यावरील निष्ठा आणि प्रामाणिकपणा ह्यामुळे राजघराण्याचा लाडका होता. त्याला मक्केच्या शाही मशिदीचे काम दिले गेले. हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि जोखमीचा प्रकल्प होता. यात्रेच्या वेळेस होणारी गर्दी विचारात घेऊन दहा लाख लोक एकाच वेळेस त्या मशिदीत मावतील इतका तिचा आकार ठरवला गेला होता. एका वेळेस एक लाख लोक वाहून नेता येतील इतक्या क्षमतेचे सरकते जिने त्यात अंतर्भूत होते. अशाच मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृहे बनवली होती. कित्येक अब्ज डॉलरचा हा प्रकल्प अन्य कामांसारखा महम्मद बिन लादेनने चोखपणे पूर्ण केला. ही मशीद म्हणजे सौदी राज्याचा एक मानबिंदू होती आणि आहेही.

हा महम्मद बिन लादेन म्हणजे ओसामा बिन लादेन ह्या कुप्रसिद्ध अतिरेक्याचा बाप. मूळ येमेनचा हा अशिक्षित पण कमालीचा हुशार माणूस आपल्या कामाच्या जोरावर राजघराण्याशी कुठलेही नाते नसताना त्यांच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून गेला.

२० नोव्हेम्बर १९७९, मक्केच्या शाही मशिदीचा इमाम पहाटे उठून नेहमीप्रमाणे सकाळच्या नमाझाची तयारी करत होता. हजची यात्रा नुकतीच संपली होती पण तरीही पन्नास एक हजार भाविक मशिदीत उपस्थित होते. नव्या मुस्लिम वर्षांचा, खरे तर एका नव्या शतकाचा (हिजरी सन १४००) पहिला दिवस असल्यामुळे तो ह्या शाही मशिदीत साजरा करायला आणि पुण्य मिळवायला मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. पण आज ह्या भाऊगर्दीत शेकडो अतिरेकीही बेमालूमपणे सामील होते. योजनाबद्ध पद्धतीने कुणाला शंका येणार नाही अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने ते मशिदीत आले होते. कुणी बायकामुलांसमवेत आले होते. कुणी दोनचार दिवस आधी येऊन धडकले तर कुणी आदल्या रात्री. बहुतेक दहशतवादी सौदी नागरिक होते पण काही काळे अमेरिकन, पाकिस्तानी, इजिप्तचे हेही होते. ह्या मशिदीत अनेक शवपेट्याही आणलेल्या होत्या. अनेक मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की मेलेल्या माणसाकरता मोठ्या मशिदीतल्या इमामाने प्रार्थना म्हटली तर मृताला पुण्य आणि स्वर्ग मिळतो. ह्या प्रथेमुळे अनेक शवपेट्या मशिदीत कायमच येत असतात. पण त्यातल्या काही पेट्यात आज मृतदेहाऐवजी बंदुका आणि दारुगोळा भरलेला होता. सुरक्षा रक्षक ह्या पेटयांकडे फार लक्ष देत नाहीत हे हेरून दहशतवाद्यांनी त्यांचा शस्त्रास्त्रे मशिदीत पोचवण्याकरता ह्या मार्गाचा वापर केला होता.

पहाटेची प्रार्थना साधारण सव्वापाचला संपली. आणि ती संपताच ठरल्याप्रमाणे एका दहशतवाद्याची बंदूक कडाडली. यात्रेकरूंनी दचकून आवाजाच्या दिशेने पाहिले तर एक तरुण बंदूक झाडताना दिसला. जगभरातून आलेले यात्रेकरू. काहींना वाटले की सौदी राजाने नवीन वर्ष साजरे करण्याकरता गोळीबार केलाय बहुतेक. पण जे स्थानिक, जाणते होते त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मक्केच्या पवित्र शाही मशिदीत अशा प्रकारे बंदूक उडवायला वा अन्य शस्त्र बाळगायला साफ मनाई होती हे त्यांना व्यवस्थित माहीत होते. त्यामुळे काहीतरी भयंकर घडते आहे ह्याची त्यांना जाणीव झाली. आवाज ऐकून मशिदीचे सुरक्षा रक्षक धावून आले. पण त्यांच्या हातात निव्वळ काठ्या. तरी काही धीर एकवटून त्या रायफलधारी तरुणाकडे धावले. त्या तरुणाने तात्काळ दोघा तिघाना गोळ्या घालून जागीच संपवले. हे पाहताच उरलेले रक्षक पळून गेले. मग त्या अतिरेक्यांचा म्होरक्या प्रकट झाला. त्याचे नाव जुहेमान अल ऊतेबी. ४३ वर्षांचा हा सौदी नागरिक होता. फार उंच नाही पण डोळे भेदक. मोकळे वाढलेले कुरळे केस आणि वाढलेली दाढी ह्यामुळे उग्र दिसणारा. कडवा धार्मिक मुसलमान. डोक्याभोवती एक हिरवा पट्टा गुंडाळलेला. तीन बंदूकधारी दहशतवादी त्याच्या बरोबर होते. गर्दीतून वाट काढत तो झपाट्याने इमामाच्या दिशेने झेपावला. तो इमाम एका खरोखर मृतदेह असणाऱ्या उघड्या शवपेटीसमोर उभा राहून प्रार्थना म्हणत होता. चाहूल लागून त्याने पाहिले तेव्हा त्याला जुहेमान दिसला. मग त्याला पटकन ओळख पटली. काही दिवसापूर्वी आपल्या इस्लामवरील लेक्चरला पुढे बसलेला हाच तो! पण जुहेमानाला त्यात काही रस नव्हता. त्याने घाईघाईने इमामाला ढकलून मायक्रोफोनचा ताबा घेतला. इमामाने रागाने तो माईक परत घ्यायचा प्रयत्न करताच एका दहशतवाद्याने कट्यार काढून त्याच्यावर उगारली. इमामाने माजघर घेतली. हे पाहणारे चरकले. आपल्या चपला बूट घेऊन ते मशिदीच्या बाहेर पडले आणि मुख्य फाटकाकडे धावू लागले. पण एक्कावन्नच्या एक्कावन्न फाटके मोठ्या बंदोबस्ताने बंद केली गेली होती. दारात बंदूक परजणारे भयंकर दिसणारे दहशतवादी राखणीला होते.
धीर येण्याकरता कुणीतरी अल्ला हु अकबराचा घोष सुरु केला. हळूहळू तो इतका मोठा झाला की पूर्ण मशिद त्या आवाजाने भरून गेली. यथावकाश तो घोष कमी होताच जुहेमानने ध्वनीवर्धकात अरबी भाषेत दोन तीन आज्ञा सोडल्या. त्या ऐकताच दहशतवाद्यांपैकी काही मशिदीच्या मिनारांकडे धावले. मशिदीभोवती सात मिनार होते. त्यावर चढून अतिरेक्यांची टेहळणी करायची आणि अचूक वेध घेऊन गोळीबार करण्याची योजना होती. मशिदीचे मिनार हे मशिदीसारखेच भव्य. २५-३० मजली इमारतीइतके उंच. त्यातून दूरवरच्या हालचाली दिसू शकत होत्या. जर कुणी पोलीस, बंदूकवाला वा सैनिक जवळपासही आला तर त्याला कुठलाही विचार ना करता ताबडतोब ठार मारायचे अशा ह्या अतिरेक्यांना सूचना दिलेल्या होत्या. बाकीच्या दहशतवाद्यांनी सर्व फाटकाजवळ आपली छावणी उभारली. मशिदीतले गालिचे गुंडाळून त्यांच्या आडोश्याने आपले मशीनगनचे ठाणे उभारले. काही धडधाकट भाविकांना धमकावून दारुगोळा मिनारांच्या वरच्या खोलीत न्यायला भाग पाडले गेले.

इकडे यात्रेकरूंमध्ये प्रचंड खळबळ माजली होती. नक्की काय चालले आहे हेच कळेनासे झाले. पण दहशतवादी तयारीत होते. मूळ पाकिस्तानी असणाऱ्या एका दहशतवाद्याने भारतीय, पाकिस्तानी आणि बांगला देशी यात्रेकरूंना एका बाजूला घेऊन उर्दूत समाजावायला सुरवात केली. आफ्रिकेच्या एका अतिरेक्याने इंग्रजीत सांगायला सुरवात केली. सगळ्यांना प्रथम सभ्यपणे पण ऐकले नाही तर रायफलच्या दस्त्याच्या फटके देऊन खाली बसवले. मग अधिकृत अरबी भाषेच्या जाणकार असणार्‍या एका अतिरेक्याने माईकवर बोलायला सुरवात केली. " मक्का, मदिना आणि जेद्दा हे आता आमच्या ताब्यात आहेत!". नंतर तासभर हा अतिरेकी बोलत होता. इस्लामच्या इतिहासात अशी एक भविष्यवाणी सांगितली गेली आहे की कधीतरी आपला प्रेषित पुन्हा एकदा अवतरेल. तो इस्लामचे उत्थान करेल. पण त्याआधी एक भयंकर युद्ध होईल ज्यात दोन्ही बाजूचे श्रद्ध आणि अश्रद्ध मारतील आणि शेवटी इस्लामच जगावर राज्य करेल. ह्या नव्याने आलेल्या प्रेषिताला माहदी असे म्हटले जाते. ह्या दहशतवाद्यांनी असा दावा केला की आमच्याकडे हा माहदी आहे. आणि आता आम्ही सगळ्याचा ताबा घेणार आहोत. ह्या भाषणाने प्रचंड खळबळ माजली. मक्का शहरात जिथे जिथे ते ऐकू गेले तिथे शुकशुकाट झाला. लोकांनी दुकाने बंद केली.

अशा प्रकारे एक अत्यंत रक्तरंजित, हिंसक आणि क्रांतीकारक हल्ल्याची सुरवात झाली.

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

ज्योति केंजळे's picture

2 Oct 2016 - 2:41 am | ज्योति केंजळे

इस्लामच्या इतिहासात अशी एक भविष्यवाणी सांगितली गेली आहे की कधीतरी आपला प्रेषित पुन्हा एकदा अवतरेल.तो इस्लामचे उत्थान करेल. पण त्याआधी एक भयंकर युद्ध होईल ज्यात दोन्ही बाजूचे श्रद्ध आणि अश्रद्ध मारतील आणि शेवटी इस्लामच जगावर राज्य करेल.

आयसिस चा नविन खलिफा असच काहितरी बोलत असतो.

हुप्प्या's picture

2 Oct 2016 - 7:24 am | हुप्प्या

माह्दी आणि त्याचे पुनरागमन हे अत्यंत वादग्रस्त विषय आहेत. एक तर कुराणात हा उल्लेख नाही. कुठल्याशा हदीसमधे हे म्हटलेले आहे. त्यातही मोघम शब्द वापरल्यामुळे त्याचे अनेक अर्थ लावले जातात.

अहमदिया पंथाच्या श्रद्धेप्रमाणे माहदी आधीच आलेला आहे आणि तो म्हणजे अहमदिया पंथाचा संस्थापक मिर्जा गुलाम अहमद हाच तो माहदी. आणि असे मानण्यामुळे ह्या पंथाला धर्मभ्रष्ट समजले जाते. पाकिस्तानात त्यांना मुस्लिम मानण्यालाही विरोध आहे.
आयसिसचा म्होरक्याही तसे म्हणत असल्यास त्यात आश्चर्य वाटायला नको.

https://en.wikipedia.org/wiki/Mahdi

यशोधरा's picture

2 Oct 2016 - 9:50 am | यशोधरा

पुढे?

जव्हेरगंज's picture

2 Oct 2016 - 7:19 pm | जव्हेरगंज

मस्त!

वाचतोय.

पुभाप्र!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Oct 2016 - 10:19 am | अत्रुप्त आत्मा

+१

गामा पैलवान's picture

3 Oct 2016 - 2:13 am | गामा पैलवान

हुप्प्या,

इस्लामी जगतात प्रवाद आहे की १४०० वर्षांनी कयामतीचा दिन उजाडेल. ही १४०० वर्षे हिजरी की सौर ते माहित नाही.

आ.न.,
-गा.पै.

राजाभाउ's picture

3 Oct 2016 - 11:10 am | राजाभाउ

मस्त !!! पुभाप्र.

स्वाती दिनेश's picture

3 Oct 2016 - 12:18 pm | स्वाती दिनेश

भाग वाचले, माहितीपूर्ण धागा. वाखुसा. परत शांतपणे वाचते.
स्वाती

अत्रुप्त आत्मा's picture

3 Oct 2016 - 12:37 pm | अत्रुप्त आत्मा

सदर लेखमाला पूर्ण झाली की तिचे पुस्तकरूप यावे, अशी मनापासून इच्छा आहे .

नरेश माने's picture

5 Oct 2016 - 10:52 am | नरेश माने

पुढील भागाच्या प्रतिक्षेत......

प्रसाद_१९८२'s picture

5 Oct 2016 - 11:02 am | प्रसाद_१९८२

पुढील भागाच्या प्रतिक्षेत......
+१००

वटवट's picture

5 Oct 2016 - 3:08 pm | वटवट

पुढील भागाच्या प्रतिक्षेत......
+१०००००

टर्मीनेटर's picture

6 Oct 2016 - 10:00 am | टर्मीनेटर

जबरदस्त...पुढे वाचायला नक्कीच आवडेल....लवकर येउद्यात पुढचा भाग.

असंका's picture

7 Oct 2016 - 12:55 pm | असंका

कमालीचं लिहिलंयत...

पुभाप्र...

श्रीगुरुजी's picture

7 Oct 2016 - 2:39 pm | श्रीगुरुजी

लवकरात लवकर पुढचा भाग लिहावा.