सौ. सौदामिनी दामले-वाडेकर-मुल्हेर-लीन
सत्य घटने वर आधारित एक मंत्रमुग्ध करणारा एकपात्री प्रयोग, सौ.सौदामिनी दामले-वाडेकर-मुल्हेर-लीन. सादरकर्त्या सौ. अमृता सातभाई, पुणे.
हे नाव जरी मला आधी माहीत नसले तरी या परदेशी भूमीवर मराठी नाटक बघण्याची संधी मिळणे हे काही साधे नव्हते. सगळी तयारी करुन आमची कार महाराष्ट्र मंडळ लंडन कडे धावायला लागली. नाटक संध्याकाळी ४ ते ६ असे होते, ते वेळेत सुरु झाले.
नाटक एका सत्य घटनेवर आधारित आहे. साधारण ४०-५० वर्षापूर्वीच्या पुण्यातील एक अतिशय धाडसी, मध्यमवर्गीय, बंडखोर व्यक्तिमत्वाची मुलगी कु. सौदामिनी दामले. आजोबांकडून धाडसी आणि स्वच्छंदी वागण्याचे बाळकडू मिळालेली सौदामिनी मुठा नदीच्या पुरात मुलांबरोबर उडी मारून पोहत जाते, हिमालयात ८ महिने सफर करते आणि नंतर अमेरिकेला जायचा ध्यास घेते. त्याकाळी GRE, TOFEL ची परीक्षा देवून फिलाडेल्फिया ला MS साठी admission मिळवते. आई-वडील लग्नाची अट घालतात मग त्यांच्या वाड्यातल्याच एका उच्चशिक्षित मुलाशी मधुकर वाडेकर शी पटकन लग्नाचा बार उडवून देतात आणि मग ती अमेरिकेला जाते. नवरा उच्चशिक्षित... नासा मध्ये मोठी नोकरी....मोठ्ठा पगार ! तीही शिक्षण पूर्ण करून वेगवेगळ्या कंपन्याची accounts ची कामे बघू लागते. पण अतिशय बुद्धिमान असलेल्या नवर्याला दारूचे व्यसन जडते आणि होत्याचे नव्हते होते. त्याला व्यसनातून बाहेर काढण्यासाठी ती आतोनात प्रयत्न करते पण अखेर आपले घरच यात उध्वस्त होत आहे असे लक्षात आल्यावर नवर्याला घटस्पोट देण्याचा धाडसी निर्णय घेते. त्यानंतर तिची स्वतःची एक मुलगी आणि दोन दत्तक मुले (शेजारी राहणार्या मराठी दाम्पत्याचा अचानक अपघातात मृत्यू होतो, त्यांची दोन मुले सौदामिनी दत्तक घेते) यांना मोठ्या हिमतीने अनेक वादळांना धैर्याने सामोरी जात वाढवते आणि आयुष्याला एका पानावरून पुढच्या पानावर नेते. त्यानंतर एका टप्प्यावर तिचे एका जर्मन माणसाशी (मुल्हेर) लग्न होते. ज्याचा नंतर त्त्यांच्याच घरी दुर्दैवी खून होतो. या सार्यातून ती तेवढ्याच हिमतीने परत उभी राहते. आयुष्यात इतके धक्के पचवून मुलांना सांभाळताना होणारी आर्थिक ओढाताण कमी करण्यासाठी ती accountancy बरोबरच बेकरी व्यवसायात घुसते. बेकारीच्या orders वेळेत पोचविण्यासाठी ती एक ट्रक विकत घेते. त्याकाळी फिलाडेल्फिया मध्ये ट्रक चालवणारी ती एकमेव महिला ठरते. याहीपुढे जावून ती तिच्या बोर्न अमेरिकन (लीन) माणसाबरोबरच्या तिसर्या लाग्नाबाबतचा खुलासा करते. या सगळ्यामध्ये ती तिच्या तीनही सासू-सासर्यांची (मराठी, जर्मन आणि अमेरिकन) तेवढ्याच आपुलकीने सेवा करत असते. वयाच्या बावन्नाव्या वर्षी नर्सिंगचा साडे तीन वर्षांचा कोर्स पूर्ण करून आता ती पुढचे सारे आयुष्य एक निष्णात नर्स म्हणून घालवत आहे. जिच्या आयुष्यावर हे कथानक आहे, या बाईंचे वय आज ६९ वर्षांचे आहे. कोणी सहजासहजी पेलू शकणार नाही असे असामान्य आयुष्य त्या जागल्या. हे करताना अनेक वेळा उन्मळून पडल्या. पण जगातील प्रत्येक स्त्रीला मिळालेल्या एका दैवी गुणावर अर्थात खचून न जाता पुन्हा नव्याने उभारी घेण्यावर विश्वास ठेवत त्या पुढे चालतच राहिल्या.
हे सारे चित्तथरारक कथानक हळू हळू प्रेक्षकांसमोर उलगडताना सौ अमृता सातभाई यांनी अभिनयाच्या अनेक छटा अतिशय सुरेखपणे पेलल्या. अकरा वर्षाच्या छोट्या मुली पासून, आई, वडील, आजोबा, स्वतःची लहान मुले, सासू, सासरे, अमेरिकेत त्यांना भेटलेली वेगवेगळी माणसे या साऱ्यांच्या भूमिकेत त्या खूप सहजतेने शिरत होत्या. एका भूमिकेतून हमसुन हमसुन रडत तेवढ्याच सहजतेने दुसर्या अतिशय आनंदी भूमिकेत शिरणे हे अभिनयाचे शिवधनुष्य ९५ मिनिटे त्यांनी खूप ताकदीने पेलेले. अप्रतिम पाठांतर, आवाजातील योग्य चढ उतार, अचूक शब्दफेक, body language या गुणांनी संपन्न अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनाचा अचूक ठाव घेतला. मी तर जणू मंत्रमुग्ध होवून ते सारे बघत होते. किती दिवसांनी इतकी सुंदर, गोड मराठी माझ्या कानांवर पडत होती.
या नाटकातील काही प्रेरणादायी वाक्य जी माझ्या अगदी काळजाला भिडली. त्यातीलच काही…….
१. "हा उभा हिमालय, या पर्वत रांगा, या झुळूझुळू वाहणाऱ्या नद्या, या केवळ नकाशात नक्षीकाम भरण्यासाठी म्हणून आहेत का? खुल्या दिलाने निसर्गाला भिडलेच पाहिजे, बसेल एखादा वादळाचा तडाखा जोरात, पण त्यातूनच नव्याने उभे राहण्याचे धैर्य मिळतेच कि, हा निसर्ग आपल्याला काय नाही शिकवत, चुकतात गणिते आयुष्याची कधी कधी, पण निर्णय घेण्याची क्षमता यातूनच तर मिळते."
२. प्रत्येक संकट हे एका नवीन संधीचे उगमस्थान असते.
३. आपण जेव्हा चालायला लागतो, तेव्हा रस्ता आपोआप तयार झालेला असतो. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जेव्हा आपण मनापासून प्रयत्न करतो, तेव्हा ती मिळणे हा आपला अधिकारच होवून जातो.
४. कोणत्या एका धर्मात सांगितले आहे म्हणून दारुड्या नवर्याला कवटाळत बसून मी हि त्याच्या सकट बुडून जाणे हे मी स्वतःवर अन्याय करण्यासारखे होते. मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे, माझ्या काही आकांक्षा आहेत. हे एकदाच मिळणारे आयुष्य समरसून जगणे हा माझा अधिकार आहे.
५. दत्तक घेतलेल्या मुलांची मी आई झाले खरी, याचा अर्थ त्यांनी मला आई म्हणून स्वीकारले होते म्हणून. आई होणं हा एक दैवी संकेत असतो. परमेश्वरानंच त्या मुलांसाठी माझी निवड केली होती. ती माझी जबाबदारी होती. पण त्यांच्या बरोबरच माझे स्वतःचे ही एक आयुष्य होते.
६. आज मी जे आयुष्य जगत आहे, जी माणसे जोडली आहेत, तेच माझ्याबरोबर कायम राहणार आहे. पैसा नाही.
७. जीवनात लहान मोठी वादळे येत राहणार, पण पुढे गेलेच पाहिजे, कारण माझे आजोबा सांगायचे, 'थांबला तो संपला'.
या प्रयोगानंतर मी त्यांना भेटायला गेले. आणि त्यांना मनापासून धन्यवाद दिले. मी आज अगदी भरून पावले होते. त्यांच्या बरोबर फोटो घेण्यासाठी मी एका आजोबांना माझा mobile दिला खरा पण त्यांना काही फोटो काढता आला नाही. असो पण पुण्यात जेव्हा कधी हा प्रयोग लागेल तेव्हा नक्की आवर्जून सार्यांनी बघायला जावा असाच आहे.
----अश्विनी वैद्य
प्रतिक्रिया
29 Sep 2016 - 4:50 pm | नाखु
करवून दिलीत.
स्तुत्य आणि प्रेरणादायी.
पुण्यात प्रयोग असल्यास बघेनच
29 Sep 2016 - 4:55 pm | रेवती
वाह! नाटकाची ओळख आवडली.
30 Sep 2016 - 6:49 pm | अश्विनी वैद्य
धन्यवाद...!
29 Sep 2016 - 5:14 pm | मारवा
अश्विनीजी सुरेख ओळख
आवडली
जमल्यास बघेन.
30 Sep 2016 - 6:49 pm | अश्विनी वैद्य
Thank you so much...!
29 Sep 2016 - 5:34 pm | आदूबाळ
हायला! जबरीच बाई दिसत्यात.
अशाच एक वेणू चितळे नावाच्या बाई दुसर्या महायुद्धात बीबीसी रेडियोच्या लंडनहून प्रसारित होणार्या मराठी सर्व्हिससाठी काम करीत. त्यांच्या बॉसच्या - जॉर्ज ऑरवेलच्या - तत्कालीन डायर्यांमध्ये वेणू यांचे गौरवपूर्ण उल्लेख आहेत.
30 Sep 2016 - 6:50 pm | अश्विनी वैद्य
अरे वा...भारीच...!
29 Sep 2016 - 5:43 pm | मारवा
इंटरेस्टींग आहे.
29 Sep 2016 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
अशी माणसं कोणत्यातरी वेगळ्याच मुशीतून बनवलेली असतात ! नक्कीच !!
29 Sep 2016 - 7:07 pm | पद्मावति
खूप छान ओळख करून दिलीत.
30 Sep 2016 - 6:51 pm | अश्विनी वैद्य
Thank you...!
29 Sep 2016 - 7:08 pm | अजया
फार छान ओळख करुन दिली आहे तुम्ही.
29 Sep 2016 - 7:19 pm | एस
वा! सौदामिनी दामलेंबद्दल मागे वृत्तपत्रात वाचले होते. तेव्हाच त्यांच्या लोकविश्लेषणतेबद्दल आश्चर्यमिश्रित कौतुक वाटले होते. संधी मिळताच नाटक पाहिले जाईल.
30 Sep 2016 - 3:18 pm | एस
कृपया 'लोकविलक्षणतेबद्दल' असे वाचावे. गूगल ऑटोकरेक्टमुळे तसे झाले. आय ब्लेम गूगल.
30 Sep 2016 - 6:55 pm | अश्विनी वैद्य
नातक नाटक खरच नक्कि नक्की बघा...एकपात्री प्रयोग असल्याने तर वेगळाच अनुभव वाटतो.
29 Sep 2016 - 9:08 pm | वरुण मोहिते
नक्की पाहिलं जाईल.
29 Sep 2016 - 9:16 pm | यशोधरा
सुरेख ओळख.
30 Sep 2016 - 2:28 pm | सिरुसेरि
छान माहिती . पुर्वी झी मराठीवर "सारे कळत नकळतच घडते" अशी एक मालिका होती . ती बहुदा याच नाटकावर आधारीत असावी .
30 Sep 2016 - 6:56 pm | अश्विनी वैद्य
धन्यवाद...!
30 Sep 2016 - 3:01 pm | पैसा
सुरेख ओळख! अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे यांचे.
3 Oct 2016 - 12:04 am | अश्विनी वैद्य
अगदी खरय...त्या बाईना भेटणे कधी जमेल माहित नाही...पण नाटकातून झालेली त्यान्ची ओळख थक्क करणारी वाटली.
2 Oct 2016 - 5:58 am | सुखीमाणूस
नाटक बघणार नक्की.
3 Oct 2016 - 12:04 am | अश्विनी वैद्य
नक्की बघा...!