लंडनवारी - भाग २ - छोटालं गाव आणि मोठालं शेत

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
1 Oct 2016 - 1:38 pm

लंडनवारी: पूर्वतयारी - छोटालं गाव आणि मोठालं शेत

डिस्क्लेमरः लंडनवारीच्या पूर्वतयारीचा भाग वाचून सहाजिक असं मत होताना दिसलं की हा लाईव्ह ब्लॉग आहे आणि प्रवास होत जाईल तसं त्याचं वर्णन येणार आहे. तसा माझा मानस होता खरं तर. आणि म्हणूनच पूर्वतयारीचा भाग मी लगेच लिहिला. परंतु पुढे प्रवासात लिखाणाला वेळ मिळाला नाही त्यामुळे यापुढील भाग हे मी प्रवासानंतर लिहिलेले असतील. तरी या गैरसमजाबद्दल क्षमस्व.

आणि हे खास मिपाकरांसाठी की लंडनस्थित मिपाकरांना भेटण्याचा विचार माझ्या मनात होता परंतु ट्रीपचा निश्चित आराखडा नसल्याने, मुलाला घेऊन किती कुठे फिरता येईल याबद्दल साशंकता असल्याने आणि शेवटच्या क्षणापर्यंत कार्यालयीन कामात व्यग्र असल्याने तो मनसुबा प्रत्यक्षात आला नाही. तरी एकदोघांना व्यनि केले आणि त्यांच्याकडून सुयोग्य माहिती मिळाली हे नमूद करेन. पुढील वेळी भेटीच्या योजनेला प्राधान्य नक्की.

ब्लॉग दुवे: पूर्वतयारी - छोटालं गाव आणि मोठालं शेत

थेट विमानप्रवास असल्याने एक बरं होतं, की मधे उतरा, वेळ काढा हा प्रकार नव्हता. तो असता तरी पाय मोकळे करता येणं वगैरे फायदे असतात, बट थेट जेट इज ऑलवेज ग्रेट. आणि पुढे लंडनला नातेवाईकांकडेच जायचं होतं त्यामुळे अकोमोडेशन नावाचा मोठा प्रश्न उद्भवणारच नव्हता. संध्याकाळी सहा सातच्या सुमारास टर्मिनलमधून बाहेर आलो आणि तापमानातल्या दहाबारा डिग्रीच्या फरकाने सुखावलो. अगदी पाऊस पडून गेल्यासारखी हवा झाली होती. विमानातल्या अपुर्‍या झोपेमुळे रात्री झोप लागायला त्रास झाला नाही.
1
लंडनची पहिली सकाळ उजाडली. घड्याळ बघितलं तेंव्हा समजलं की आठ वाजलेत. एरवी हॉर्नचे आवाज किंवा तत्सम गोष्टींनी झोप उडते. इथे खिडकीतून बघितलं तर रस्ता निवांत होता. एखाद दुसरी गाडी निघत होती थोड्या थोड्या वेळाने इतकंच. रस्त्यावर मॅपलच्या झाडाची थोडीफार पानं गळून पडलेली होती, घरांच्या अंगणातल्या फुलझाडांवर रंगीबेरंगी फुलं फुलली होती, एकदम पिक्चर परफेक्ट चित्र होतं. मग गप्पा, गोष्टी आणि आज काय करायचं? या विषयावर चहाचे घोट घेत चर्चा करत बसलो.
2
सुरुवातीच्या दिवशी नुसतंच जवळपास भटकून आलो. अक्सब्रिज हायस्ट्रीट वर फेरफटका, मॉलमधली टेहळणी, आणि अर्थातच खादाडी अशा अजेंड्याने पहिला दिवस संपला. मुलाला मानवेल अशी थंडी होती, शिवाय स्वेटर, जॅकेट, कानटोपी असा कडेकोट बंदोबस्त आणलेलाच होता. त्यामुळे तशी चिंता नव्हती. फक्त प्राममधे जखडलेल्या अवस्थेत राहण्याची सवयच आम्हाला नसल्याने सारखी त्यातून खाली उतरायची धडपड होत होती. लर्निंग ऑन डे वन असं होतं की लंडनमधे प्रचंड चालायला लागत असल्याने प्रामशिवाय काही खरं नाही हे जरी खरं असलं, तरी त्या प्राममधे बसूनही काही खरं नाही याची कल्पना पुढील प्रवासात ठेवणे.
3
अक्सब्रिजपासून पुढे वर बेकन्सफील्ड नावाचं एक गाव आहे. या गावात जगातील पहिलं मॉडेल व्हिलेज उभं केलेलं आहे. एखाद्या संपूर्ण गावाची छोट्या आकारातील प्रतिकृती असलेलं हे मॉडेल व्हिलेज बेकन्सकॉट नावाने ओळखलं जातं. आमच्या लंडनवारीच्या दुसर्‍या दिवशीचं हे पहिलं आकर्षण होतं.
4
गुडघाभर उंचीची घरं, हाताच्या बोटाएवढी माणसं, छोटाली ट्रेन, अशा गावातून फिरताना कमालीचं सही वाटलं. इथे एक अन एक गोष्ट इतकी बारकाईने केलेली आहे की चकित व्हायला होतं. चर्चबाहेर उभ्या असलेल्या फादरच्या चेहर्‍यावरचे भाव, एखाद्या माणसाच्या कोटाला पडलेल्या चुण्या बिल्डिंगवरच्या पाट्या, पॅलेसबाहेरच्या गाड्या अशा प्रत्येक गोष्टीत प्रचंड बारकावे टिपलेत. अगदी त्या खेळण्यातल्या ट्रेनचा आवाजही खर्‍या ट्रेनसारखा 'धिधिक धिधिक.... धिधिक धिधिक' असा येतो; मोटरवर आहे म्हणून बिनाआवाज किंवा कुई.... असा आवाज वगैरे नाही. परफेक्शन. ते बघताना खरंच एखाद्या गावातून फेरफटका मारतोय की काय असं वाटतं.
5
6
7
8
9
10
11
12
त्या मिनिएचर व्हिलेजमधे छानपैकी भटकून झालं. तिथेच एक प्ले एरिया होता. त्यात मग आमच्या मिनिएचरला खेळायला नेलं. घसरगुंडी, बोगदा, इत्यादी ठिकाणी मनसोक्त खेळल्यावर आम्ही बेकन्सकॉटवरून निघालो. डेस्टिनेशन: ऑड्स फार्म, हाय विकम्ब.
13
नेटवर लंडन अ‍ॅट्रॅक्शन्स बघताना एखाद्या लोकल फार्मला विझिट करणं हा पर्याय बर्‍याच जणांनी सुचवलेला दिसला. ही फार्म्स म्हणजे मोठाली शेतं असतात पण विशेषकरून तिथे असलेले प्राणी हा आकर्षणाचा भाग असतो. गायी, शेळ्या, मेंढ्या, डुकरं, कोंबड्या अशी प्राणीसंपदा तुम्हाला या फार्म्सवर जवळून बघता येते. आपल्याकडेही गोठे, कुकुट पालन केंद्र वगैरे असतात पण आज म्हटलं तर सहज जाऊन हे विश्व बघता येईल अशा जागा आपल्याजवळ नसतात. त्यामुळे लंडनला लोकल फार्म विझिट आम्ही करायची ठरवली होती.
14
लांबच्या लांब पसरलेली हिरवळ, त्यावर मुक्त चरणार्‍या अजस्त्र गायी, मेंढ्यांचे कळप, हे बघणं फारच छान वाटलं. इथेही प्रत्येक बाबतीतली टापटीप लपत नव्हती. कोंबड्यांची अंडी घेण्यापासून ते गायीचं दूध काढण्यापर्यंत कामं तुम्हाला इथे बघता, काही करताही येतात. परत इथेही विरंगुळा म्हणून मुलांना, मोठ्यांना खेळता येतील असे खेळ ठेवलेले आहेत. एकंदरित पूर्ण दिवस व्यतीत करता येईल अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. आम्ही मात्र काही तास तिथे होतो.
15
भरपूर मजा करून, दमून, आम्ही घरी परतलो. आणि लंडन भटकंतीचा दुसरा दिवस आटपला.

प्रतिक्रिया

अजया's picture

1 Oct 2016 - 1:49 pm | अजया

वा.छान भटकंती.

आदूबाळ's picture

1 Oct 2016 - 1:58 pm | आदूबाळ

Uxbridge?? काय राव!

विशाखा राऊत's picture

1 Oct 2016 - 6:57 pm | विशाखा राऊत

तेच ना... हे अगदी माझ्या घराजवळ येवुन माहित नसल्यासारखे झालेय

पद्मावति's picture

1 Oct 2016 - 2:24 pm | पद्मावति

क्या बात है! खुप मस्तं.

विवेकपटाईत's picture

1 Oct 2016 - 7:09 pm | विवेकपटाईत

मस्त आवडले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Oct 2016 - 7:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं भटकंती !

स्रुजा's picture

1 Oct 2016 - 7:58 pm | स्रुजा

हा ही भाग छान ! थोडे मोठे भाग टाका ना. कुझिन्स पण लिहा.

रेवती's picture

1 Oct 2016 - 8:19 pm | रेवती

छान चाललिये सहल.