लंडनवारी - भाग ७ - रायस्लिप लिडो आणि ऑक्सफर्ड स्ट्रीट

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
19 Nov 2016 - 8:03 am

लंडनवारी:
पूर्वतयारी
छोटालं गाव आणि मोठालं शेत
कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
लंडन झू, मादाम तुसाँ आणि बकिंगहॅम पॅलेस
याचसाठी केला होता सारा अट्टाहास!
बिगबेन, ग्रीनिच आणि टॉवर ब्रिज

रायस्लिप लिडो आणि ऑक्सफर्ड स्ट्रीट

ब्लॉग दुवे:
पूर्वतयारी
छोटालं गाव आणि मोठालं शेत
कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
लंडन झू, मादाम तुसाँ आणि बकिंगहॅम पॅलेस

याचसाठी केला होता सारा अट्टाहास!
बिगबेन, ग्रीनिच आणि टॉवर ब्रिज
रायस्लिप लिडो आणि ऑक्सफर्ड स्ट्रीट

लंडन अ‍ॅट्रॅक्शन्स चा तुम्ही गूगलवर शोध घेतलात तर कदाचित रायस्लिप लिडो ही जागा तुम्हाला दिसायची नाही. पण एखाद्या ठिकाणी स्थायिक असलेल्या माणसांना या अशा अप्रचलित रत्नांची बरोब्बर माहिती असते. बिग-बेन, टॉवर ब्रिज आणि ग्रीनिच अशा भरभक्कम प्रोग्रॅमनंतर दुसर्‍या दिवशी हलकं-फुलकंच काहीतरी हवं होतं. रायस्लिप लिडो वॉज जस्ट परफेक्ट.

'काय आहे रायस्लिप लिडो?' असं विचारल्यावर माझा भाऊ मला सांगत होता. 'एक तलाव आहे, आणि त्याच्या काठावर कृत्रिम बीच तयार केलेला आहे. समुद्रासारखी वाळू टाकून एक मोठा बीचसदृश भाग बनवलेला आहे. शिवाय हा तलाव व त्याच्या आसपासचा एकून ६० एकरचा निसर्गरम्य परिसर आहे.' आम्ही गाडी पार्किंगमधे लावली. गार, मंद वारा, मोकळा गवताचा गालिचा, कडेला गर्द झाडी, आणि मधोमध तलाव हा सगळा परिसर बघूनच एक वेगळा तजेला आला.

1

इथे एक हॉटेलही आहे जिथे ब्रेकफास्ट, स्नॅक्स, चहा-कॉफीची झकास सोय होते. आम्ही ब्रेकफास्ट करूनच आलो असल्याने निवांत फेरफटका मारायला सुरुवात केली. इतका प्रचंड भाग असूनही एकही कोपरा दुर्लक्षित दिसत नव्हता. हे सगळ्या लंडनचंच वैशिष्ट्य असल्याचं जाणवलं होतं. कुठल्याश्या कोपर्‍यात असलेल्या बाकाबाजूलाही डस्ट्बिन असणं, 'या ट्रॅकवर कुणीही जात नसावं' असं म्हणताच चार पावलांनी तिथे एखादा मॅप किंवा साइनबोर्ड दिसणं ही काही उदाहरणं.

a
a

इथला तलाव अतिशय सुरेख आहे. काठावर ठिकठिकाणी बदकं असतात. इथे कुठल्या कुठल्या जातीची बदकं आहेत यांचाही तक्ता लावलेला आहे. मी सरसकट सगळ्यांना बदक म्हणत असलो तरी त्यांची नावं वेगवेगळी आहेत. इतकंच नव्हे तर प्रत्येक बदकाला टॅगिंग केलेलं आहे.

a
aa

माझा भाऊ आणि मुलगा यांची इथे भारी गट्टी जमली होती. पकडापकडी, बदकांना हात लावणं, खायला देणं, चक्रात बसणं, झोपाळा, घसरगुंडी... नुसतं बागडणं चालू होतं. मी माझी बायको व बहीणही गप्पा मारत होतो, सायकल चालवत होतो. एकंदर मजा मजा चालू होती. हा दिवस असाच व्यतीत केला.

aa

पुढच्या दिवशी आम्ही थोडंफार शॉपिंग करायचं म्हणून ऑक्स्फर्ड स्ट्रीट ला जायचं ठरवलं.

aa

ऑक्सफर्ड स्ट्रीट एक अतिशय गजबजलेला रस्ता असून तिथे सोव्हिनियर्स, आणि इतर बर्‍याच गोष्टींची दुकानं आहेत. थोडक्यात फेरफटका मारण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी उत्तम जागा आहे. आम्हाला नेमकं हेच हवं होतं. त्यामुळे आवरून-खाऊन आम्ही ऑक्सफर्ड स्ट्रीटला जायला निघालो.

a
aa

ट्यूबने जायची आता व्यवस्थित सवय झाल्यामुळे मजा येत होती. ऑयस्टर कार्ड पंच करा, जिना/लिफ्ट ने प्लॅटफॉर्मवर जा, मेट्रोपॉलिटन लाईन, जुबिली लाईन, सेंट्रल लाईन सगळं सवयीचं वाटायचं. मुलालाही कुकगाडीत बसायचं म्हटलं की त्याचा चेहरा खुलायचा. आम्ही प्राम घेऊन सगळीकडे अगदी लीलया फिरत होतो. फक्त अधेमधे प्राममधे बसून सहाजिकच मुलाला कंटाळा यायचा. मग थोडं कडेवर घे, थोडी चालीचाली कर असं आमचं फिरणं चालायचं.

aa

ऑक्सफर्ड स्ट्रीट जरा अंमळ गजबजलेलाच भाग आहे. त्यामुळे तिथे मात्र प्राममधे मुलाला ठेवून चालणं जरा जिकिरीचं होत होतं. मग त्याला कडेवरच घेऊन मार्ग्रक्रमण सुरू केलं. इथे एक 'लश' नावाची आरोग्य आणि सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानाची शृंखला आहे. तिथे अप्रतिम हँडमेड साबण मिळतात. तिथे आम्ही बराच वेळ घालवला. पुढे असंच विंडो शॉपिंग करत करत संध्याकाळचा पीक अवर संपेस्तोवर आम्ही ऑक्सफर्ड स्ट्रीट ला होतो.

aa

लंडनमधले अवघे तीन दिवस उरले होते. 'आता अजून काही घ्यायचं बाकी नाही राहिलंय ना?...' आटपाआटपीकडे रोख असलेला प्रश्न पडला. पण लगेच 'अजून तीन दिवस आहेत. आरामात' असं म्हणून आपलीच समजूत काढली आणि बरीटो खात आम्ही पुन्हा अंडरग्राउंडच्या दिशेने निघालो.

प्रतिक्रिया

अजया's picture

19 Nov 2016 - 3:55 pm | अजया

मस्त सुरु आहे लेखमाला. पुभाप्र

इशा१२३'s picture

19 Nov 2016 - 8:45 pm | इशा१२३

मस्त!पुभाप्र.

इशा१२३'s picture

19 Nov 2016 - 8:45 pm | इशा१२३

मस्त!पुभाप्र.

वेल्लाभट's picture

19 Nov 2016 - 11:23 pm | वेल्लाभट

धन्यवाद अजयाताई व इशा

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2016 - 12:08 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं सफर !

हे सगळ्या लंडनचंच वैशिष्ट्य असल्याचं जाणवलं होतं. कुठल्याश्या कोपर्‍यात असलेल्या बाकाबाजूलाही डस्ट्बिन असणं, 'या ट्रॅकवर कुणीही जात नसावं' असं म्हणताच चार पावलांनी तिथे एखादा मॅप किंवा साइनबोर्ड दिसणं ही काही उदाहरणं.

+१००

लंडन हे असं शहर आहे की अंडरग्राऊंडचा नकाशा व इंग्लिश वाचता येण्याइतके त्या भाषेचे ज्ञान एवढ्याच भांडवलावर, कोणालाही न विचारता, केवळ जागांच्या व रस्त्यांच्या नावांच्या पाट्या पहात, आपल्या गंतव्याला पोचणे कठीण नाही.

विशाखा राऊत's picture

20 Nov 2016 - 2:58 am | विशाखा राऊत

लिडो बेस्ट आहे.. मला बरेच जवळ असल्याने समर मध्ये खुप वेळा जाणे होते. फुल्ल पॅक असते पार्किंग आणि बस सुध्दा.
एकदम मस्त ठिकाण. कॅफे बेस्ट आहेत. ट्रेनची सफर केली की नाही?
ऑक्सफर्ड स्ट्रिट सध्या एकदम गजबजलेले असते. डिसेंबर शॉपिंग आणि लाईटस बघायची एक वेगळीच मज्जा असते. :)

अभिजीत अवलिया's picture

21 Nov 2016 - 12:21 am | अभिजीत अवलिया

मस्त आहे ही जागा.