लंडनवारी:
पूर्वतयारी
छोटालं गाव आणि मोठालं शेत
कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
लंडन झू, मादाम तुसाँ आणि बकिंगहॅम पॅलेस
याचसाठी केला होता सारा अट्टाहास!
बिगबेन, ग्रीनिच आणि टॉवर ब्रिज
ब्लॉग दुवे:
पूर्वतयारी
छोटालं गाव आणि मोठालं शेत
कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
लंडन झू, मादाम तुसाँ आणि बकिंगहॅम पॅलेस
याचसाठी केला होता सारा अट्टाहास!
बिगबेन, ग्रीनिच आणि टॉवर ब्रिज
मॅन्चेस्टर वरून यायला त्या दिवशी मला जवळपास अकरा वाजले. कोण जाणे कशी पण मी बुकिंग केल्यापेक्षा अर्धा तास पुढच्या ट्रेनची तिकिटं मला मिळाली आणि वेळापत्रक कोलमडलं. पण मागील भागात म्हटल्याप्रमाणे, 'कायपण' चालेल अशी ती गोष्ट होती त्यामुळे विशेष त्रास झाला नाही. रात्री सात आठ नंतर मात्र युरोपातले गल्लीबोळ अंमळ एकाट वाटतात. तशी भीती काहीही नाही पण तरी नकळत नजर भिरभिरत राहते आणि पावलं पटापट पडायला लागतात. एकदा स्वित्झरलँडलाही आम्ही असेच उशीरा (म्हणजे साडेसात) आमच्या बी अँड बी वर परत येत होतो तेंव्हा स्टेशन वरून चक्क दिसणार्या त्या घरी पोचेपर्यंतही आम्हाला तो एकाटपणा जाणवला. आजूबाजूला घरं होती पण तिथे कुणी राहतं तरी का असा प्रश्न पडावा इतपत अंधार आणि शांतता. हा एक फरक मात्र प्रकर्षाने जाणवतो भारतात आणि बाहेर, आणि तेंव्हाच फक्त कधीकधी गजबज हवीहवीशी वाटते.
पुढच्या दिवशी आमचा अजेंडा होता बिगबेन, पार्लमेंट हाऊस (लांबून. फक्त फोटोपुरतं), पुढे ग्रीनिच, आणि मग टॉवर ऑफ लंडन आणि टॉवर ब्रिज.
लंडनमधे देखण्या इमारती पावलोपावलीच आहेत. पण पार्लमेंट हाऊस आणि बिगबेनची वास्तू मात्र विशेष आहे. पिवळा-सोनेरी रंग असलेल्या या इमारतीला हाउसेस ऑफ पार्लमेंट किंवा पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर म्हटलं जातं. ही इमारत १८४० - १८८० मधे बांधली गेली. याच्या आत एक वेस्टमिन्स्टर हॉल नावाचा भलामोठा हॉल आहे जो त्या आगोदर बांधला गेला. थेम्स नदीच्या उत्तर काठावर असलेल्या या पॅलेसला आम्ही सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास पोचलो. वेस्टमिन्स्टर ला उतरून थोडंस चाललं की समोरच तुम्हाला हाउसेस ऑफ पार्लमेंट, बिगबेन आणि वेस्टमिन्स्टर ब्रिज दिसायला लागतात. दिसायला म्हणजे, इतक्या भव्य गोष्टी तुम्ही देखल्या-न देखल्या करूच शकत नाही. उभ्याच राहतात तुमच्यासमोर त्या.
वेस्टमिन्स्टर ब्रिज आणि लंडनची ओळख असलेली रेड बस
बिग बेन, हाउसेस ऑफ पार्लमेंट निरखत निरखत आम्ही नॉर्थ बँक म्हणजेच उत्तर काठावरून थेम्सच्या बाजूबाजूने चालत होतो. 'मोठं मोठं घड्याळ' मुलाला दाखवत असताना अचानक एक म्हातारी बाई आमच्या जवळ आली. काळा डगला घातलेली, भुर्या केसांची ती बाई 'पे फॉर द हॉस्पिटल! पे फॉर द हॉस्पिटल' असं म्हणत होती आणि समोरच्या एका हॉस्पिटलकडे बोट करत होती. प्रथम तिने मला एक कागदी गुलाबाचं फूल देऊन ते वाक्य म्हटलं. मी 'नो थँक यू' म्हणालो. ती पुन्हा तेच म्हणाली. या वेळी ती माझ्या अजून जवळ येऊन हे बोलली. तोंडातून कसलातरी दर्प आला आणि मी मागे होत पुन्हा थँक यू म्हणालो. मग ती बाजूला उभ्या असलेल्या माझ्याबायकोकडे वळली आणि तिला काही कळायच्या आत तिच्या गालांची पापी घेतली. बायकोही चमकून मागे झाली. मी तिला खुणेने मुलाला घेऊन लांब व्हायला सांगितलं. आणि पुन्हा ती बाई माझ्याकडे वळली. मग मात्र आवाज चढवून मी मोठ्याने 'आय सेड थँक यू. प्लीज!' असं म्हणालो. मग काहीतरी पुटपुटत माझ्याकडचं ते कागदी फूल परत घेऊन ती बाई लांब गेली. हे सगळं जेमतेम ३० सेकंदात झालं. ती बाई इतक्की किळसवाणी होती की पुढची पंधरा मिनिटं बायको फोटोत हसतच नव्हती. 'तिने माझी पापी घेतली! शी! किती घाणेरडी बाई होती ती!.... इत्यादी.
लंडन आय
थेम्सचे, लंडन आय चे, अर्थातच बिगबेन, हाउसेस ऑफ पार्लमेंटचे फोटो काढून आम्ही वेस्टमिन्स्टर पिअर वरून ग्रीनिच ला जाणारी बोट पकडली. सुंदर स्वच्छ बोटीच्या लोअर डेकमधे आम्ही बसलो. तसंही ऊन फार होतं, आणि लोअर डेक मधे आत खान-पानाची सोय होती त्यामुळे आम्ही लोअर डेकलाच पसंती दिली. मुलगा झोपला होता त्यामुळे आम्ही मस्त कॉफी, मफिन वगैरे घेऊन बसू असं म्हणून एका टेबलावर सामान ठेवलं. मी कॉफी आणतोय इतक्यात मुलगा उठला होता. टेबलवर बसून हे बघ ते बघ चालू होतं. माझं लक्ष टेबलवर गेलं आणि मला काहीतरी ओलं दिसलं. निरखून बघितल्यावर कळलं की मुलाचा प्रोग्रॅम झाला होता. डायपर असूनही हे कसं झालं या विचाराने हायपर न होता आम्ही शिस्तीत कॉफी वेगळ्या टेबलवर ठेवली आणि साफसफाई ला लागलो. टिशू आणले, शिवाय टॉवेल होताच. हे सगळं होतंय तोच आमच्या लक्षात आलं, 'पँट कुठेय पण आपल्याकडे बदलायला?' आमच्या रोजच्या बॅगेत दोन टीशर्ट असायचे कारण सांडायची, उलटी व्हायची शक्यता विचारात घेतलेली होती. डायपर असल्याने पँटही घ्यावी लागेल असं गावीच नाही त्यामुळे आता पेच उभा राहिला होता.
बोटीच्या आतली व्यवस्था
ग्रीनिच पर्यंत फक्त डायपरवरच, आणि शालीने लपेटून मुलाचा प्रवास झाला. पण ती शाल काही तो ठेवून घेईना पायांवर. मग ग्रीनिचच्या टूरिस्ट इन्फॉर्मेशन डेस्कवर जाऊन मी 'इज देअर अ शॉप निअरबाय व्हेअर आय कॅन गेट क्लोथ्स फॉर द किड्स?' असं विचारलं. काउंटरवरच्या बाईने 'अं... वेल...' असं म्हटलं पण जवळच एक किड्स शॉप आहे असं सांगितलं. मग आम्ही ग्रीनिचमधल्या त्या किड्स शॉप मधून १३ पाउंडाला एक पँट घेतली. नंतर झालेला उलगडा असा की ती मेड इन इंडिया होती. तर अशा प्रकारे लेसन ऑफ द डे, 'मुलाचा कपड्यांचा एक संपूर्ण संच सोबत बाळगणे' शिकून आम्ही ग्रीनिच भटकंतीला सुरुवात केली.
कटी सार्क नावाची ही बोट ग्रीनिच बंदरावर तुमचं स्वागत करते
ग्रीनिचबद्दल विशेष काय लिहिणे? सगळ्यांनाच ते माहित असेल. मेरिडियन लाईन म्हणजेच पृथ्वीचं मुख्य रेखावृत्त या शहरातून जातं. जगाची प्रमाणवेळ 'जीएमटी' म्हणजेच ग्रीनिच मीन टाईम ही या शहराची वेळ असते. इथे असलेलं नॅशनल मॅरिटाईम म्युझियम, वेधशाळा (रॉयल ऑब्झर्वेटरी) हे बघण्यासारखं आहे. पण आम्ही ते विशेष निवांतपणे बघू शकलो नाही कारण मुलगा त्याला तिथे फारसं गम्य नसल्याने कावायला लागला.
ग्रीनिच टाऊन अतिशय सुरेख वाटलं मला. छोटंस, कॉम्पॅक्ट, आणि लाइव्हली
ग्रीनिच बंदर
नॅशनल मॅरिटाईम म्युझियम
म्युझियमचा परिसर. इथूनच एक चढाची वाट रॉयल ऑब्झर्वेटरीकडे जाते
ग्रीनिचवरून दिसणारी स्कायलाईन
कार्यक्रम लवकर आटपता घेऊन डीएलआर म्हणजेच चालकरहित ट्रेनने आम्ही टॉवर हिल ला आलो. टॉवर हिल हे टॉवर ब्रिज व टॉवर ऑफ लंडनला जाण्यासाठी जवळचं स्टेशन आहे. मग टॉवर ब्रिजच्या जवळ मोकळं धावता खेळता आल्यावर मुलाची कळी खुलली. आम्हीही निवांत बाकावर बसून गप्पा मारल्या, खादाडी केली आणि मग टॉवर ब्रिजचे अंधारातले फोटो काढून परतीच्या ट्रेनमधे बसलो.
लंडन वॉल
टॉवर ब्रिजची कमान
संधिकाली या अशा
टॉवर ब्रिज
द शार्ड - युरोपातली चौथ्या क्रमांकाची उंच इमारत
दीड एक तासाचा लांब प्रवास करून अक्सब्रिजला पोचलो आणि एका हॅपनिंग डे ची अखेर झाली. पुढच्या दिवशी आम्ही जवळच असलेल्या एका निसर्गरम्य ठिकाणी जाणार होतो.
प्रतिक्रिया
26 Oct 2016 - 12:30 pm | महासंग्राम
पहिला फोटो पाहून जेम्स बॉण्ड च्या 'स्पेक्टर' ची आठवण झाली... बाकी फोटो आणि लिखाण जबरदस्त .... बाकी सुवर्णदुर्ग पाहिलात का तिथला ???
27 Oct 2016 - 11:17 am | वेल्लाभट
नाही पाहिला सुवर्णदुर्ग :( पण वाचलेलं त्याबद्दल.
26 Oct 2016 - 12:39 pm | खेडूत
मस्त!
एक जुनी आठवण..
27 Oct 2016 - 11:18 am | वेल्लाभट
धन्यवाद :) सुरेख फोटो
27 Oct 2016 - 11:43 am | अजया
मस्त वर्णन.सुरेख फोटो.
28 Oct 2016 - 5:29 pm | निशाचर
मस्त चाललीय भटकंती! फोटो भारी आहेत, विशेषतः शेवटचा.
आधीचे भाग वाचायचे आहेत; पण तेही छान असणार असं या भागावरून वाटतंय.
29 Oct 2016 - 1:20 am | रेवती
छान चाललिये सफर.