‘ख्याल गायन का प्रस्तुतीकरण’ या विषयावर इथे बिलासपुर ला वसंतराव देशपांडे यांचे शिष्य पं. प्रभाकरराव देशकरांनी कार्यशाळा घेतली होती...त्या निमित्ताने त्यांच्या भेटीचा योग आला...धागा एकच-वसंतराव देशपांडे...कार्यशाळे नंतर मी पंडित देशकरांना सविस्तर पत्र लिहिलं होतं...हेच ते पत्र-
रा.रा. प्रभाकर रावांना
माझा स.न.
त्या दिवशी कार्यक्रमानंतर मी खरंच आनंदून गेलो होतो. एकाच दिवशी यमन, अल्हैया बिलावल, मुल्तानी, मधुवंती, शंकरा...ऐकायला मिळणं...सगळंच कसं कल्पनातीत होतं. काफी मधील टप्प्याच्या चार ओळी (हा टप्पा मी मालिनी राजुरकरांचा ऐकलाय, इथल्या कार्यक्रमांत त्यांनी म्हटला होता. संगीताची जादू कशी असते याचं प्रात्यक्षिकच जणूं त्या दिवशी मला मिळालं होतं, सुरवातीला यमन व आणखीन एका रागानंतर श्रोते थोडेसे बोर झालेले होते म्हणूनच तो राग संपताच काही लोक घरी जायला उठले, मी शेवटच्या बाकावरचा श्रोता. मी बघितलं लोक उठून निघायच्या तयारीत होते, इतक्यांत स्टेजवर मालिनी ताईंनी आलाप घेतला अन सरळ साद घातली-
‘ओ मियां जाने वाले...’
खरं सांगताे श्रोते अक्षरश: दचकून परत वळले, स्टेज कडे बघूं लागले अन पुन्हां सावरून बसले ते अगदी शेवट पर्यंत. म्हणून तुम्हीं त्या दिवशी साद दिली तेव्हां पटकन मालिनी ताईंची ती मैफल आठवली.)
या शिवाय कार्यशाळेत सामिल झालेल्या बिलासपुरच्या लहान मुलांनी म्हटलेले राग...जणूं ‘सोने पे सुहागाच.’ त्यातल्या त्यांत माझे आवडते गायक वसंतरावांबद्दल आपण किती आपुलकी नं बोलला, ते सगळं मला अायुष्यभर पुरेल.
शतकाच्या पहिल्या वर्षी म्हणजेच 2001 साली गणपती उत्सवांत अकोल्याचे संजय पत्कींची मैफल अशीच रात्री 10 ते पहाटे तीन वाजे पर्यंत फुलली होती. त्यांत त्यांनी देखील अशीच चिजांची बरसात केली होती.
मिडिल स्कूल मधे (1978-79 साली) असतांना एके दिवशी रेडियोवर ऐकलेल्या ‘मान अब मोरी बात...’ व नंतर ‘बिंदिया ले गई हमारी रे मछरिया...’ या बंदिशींनी मनात अक्षरश: घर केलं. गायकाचं नाव सांगितलं गेलं-डॉ. वसंतराव देशपांडे. महाराष्ट्रियन असल्यामुळे वसंतरावांची नाट्यगीते भरपूर ऐकलेली होती. अापल्या वसंतरावांचा हा अंदाज देखील मला आवडला. या बंदिशी नागपूर आकाशवाणीवर ऐकायला मिळाल्या. नंतर त्यांचा मधुकंस ‘दरस मोहे राम...’, मारवा ‘ये मदमाती चली दामिनी सी दमकत...’ राज कल्याण ‘हमारी अरज सुनो...’ एेकला, सगळ्याच चिजा ग्रेट होत्या. यांच्या मुळेच रागदारी कार्यक्रम नियमित ऐकायची सवय जडली. मग त्यांत माणिक वर्मांचा भटियार ‘गिनत रही...’ द्रुत मधे ‘पिया मिलन के काज सखी री सुन...’, ‘अकेली मत जईयो राधे जमुना के तीर...’, केजी गिंडेंचा अल्हैया बिलावल ‘कवन बटरिया गईलाे...,’ या व अशा कितीतरी बंदिशी ऐकल्या.
याच दरम्यान आमच्या इथे गणपती उत्सवांतील एका कार्यक्रमांत चित्रा मोडक यांचा मालकौंस ऐकला.
‘नंद के छैला धीट लंगरुवा,
आवत-जावत कर पकरत है,
गारी दूंगी...
कवन गांव को मनहरवा ठाडे क्यूं...’
मागे वळून बघतांना लख्ख पणे हीच बंदिश आठवते...याच बंदिशीने जादू केली होती...किती गोड कल्पना आहे
‘येता-जाता हाथ पकडतो...शिव्या देवूं कां...’
मन रमलं त्यांत. या नंतर रेडियो वर गिरिजा देवी, लक्ष्मीशंकर, निर्मला देवी, रसूलन बाई, बेगम अख्तर यांनी म्हटलेली ठुमरी-दादरा देखील भरपूर ऐकल्या. या चिजा ऐकतांना मन कसं तृप्त होत असे, त्या भावना शब्दांत बांधणं कठिण आहे.
विशेषकरुन या तीन बंदिशींचा गोडवा वर्णनातीत आहे...
पहिली
‘मोरे सैंयाजी उतरेंगे पार,
नदिया धीरे बहो न...’
दूसरी
‘मोरा सैंया बुलाए आधी रात,
नदिया बैरी भई...’
तीसरी
‘एहि ठैंया मोतिया हिराय गई रामा,
कहवां मैं ढूंढूं...’
मी हिंदीभाषी क्षेत्रांत राहणारा असल्यामुळे महाराष्ट्रियन गायकांच्या हिंदी उच्चारांमुळे देखील त्या बंदिशींबद्दल आपुलकी वाटायची. आणि त्यांचं अनुकरण करायची अनिवार इच्छा व्हायची.
म्हणजे कसं, तर माणिक ताई भटियार मधे तार सप्तकांत पोचतांना म्हणतात ‘बिरहन मै तो फिरत हूं बावरी, आए न सजन हमरे द्वार...’
(मै वर अनुस्वार पाहिजे-मैं)
तसंच
अकेली मत जईयाे...मधे
‘जमुना के तीर गौवे चरावत बासुरी बजाते कान्हा...’ उच्चारतांना स्पष्टपणे जाणवतं की एक अहिंदी भाषी कलाकार चीज म्हणतंय.
(बासुरी मधे बांसुरी हवं)
पण त्या उच्चारात इतका गोडवा अाहे की नकळत तसंच गाण्याचा मोह होतो. वसंतरावां बद्दल देखील हीच गोष्ट लागूं होते, असं मला वाटतं.
या शिवाय इतर कलाकार होतेच की. नोकरी लागल्यावर पहिली कैसेट डीवी पलुस्करांची आणली. त्यातील ‘चलो मन गंगा जमुना तीर...’, ‘जब जानकीनाथ सहाय...’ व इतर छोट्या-छोट्या चिजा बहारदार होत्या.
इतकं सगळं असतांना मला वसंतरावांच्या ध्वनीफीती कुठेच सापडल्या नाहीत. इथे बिलासपुरला तर शक्यच नव्हत्या. जबलपुरला विनीत टाकीजच्या लायनीत असलेल्या एचएमवी च्या डीलर कडे ‘नटभैरव’ मिळाला, तेव्हां त्या दुकानदाराने सांगितलं-
‘वसंतरावजी की दो ही कैसेट उपलब्ध हैं-एक तो यही, दूसरी में ‘मारुबिहाग’ है.’ झालं, त्या मारुबिहाग चा शोध सुरू झाला. मधल्या काळात तो मारुबिहाग टीवी वर प्रत्यक्ष वसंतरावांकडूनच एेकायला मिळाला.
‘उन ही से जाए कहो,
मोरे मन की बिधा...
दरस बिना कछु न सुहावे,
अखियन नींद न आए
गुणवंता...’
व द्रुत ची बंदिश
‘ऐ मैं पतिया लिख भेजी,
तुम्हरे कारण जुग सी
बीतत मोरी रतिया...
जा रे जा कगवा
इतना मोरा संदेसवा लीजो जाए,
दरस मन जोहत अतिया...
मैं पतिया...’
ही नुसती पूर्ण बंदिश म्हटली तरी अापलीच पाठ थोपटून ध्यायची अनिवार इच्छा होते. कारण मनाला नकळत वसंतरावां सारखीच बंदिश म्हणण्याचा आनंद मिळालेला असतो. बरेचदा वाटलं की वसंतरावांना प्रत्यक्ष बघण्यांत शताधिक पटींनी आनंद मिळाला असतां.
बरं... न मिळो ध्वनीफीती, पण त्यांच्याबद्दल काही माहिती...तर ती देखील कुठे सापडेना. आपल्या अावडत्या गायकाबद्दल काहीच माहिती नाही. पुढे एकदा लहान भाऊ नागपुरहून परततांना पुलंचं एक पुस्तक घेऊन आला. त्यांत वसंतरावांवर लेख होता. तेव्हां पहिल्यांदा माहिती मिळाली.
एकदा इथे रेलवे महाराष्ट्र मंडळात शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम असल्याची माहिती मिळाली, कलाकाराचं नाव सांगितलं नव्हतं. संध्याकाळी गेलो, साइकिल ठेवतांना बाहेरच मारुबिहाग चे स्वर ऐकू आले-
‘उन ही से जाए कहो...’.
मला वाटलं कार्यक्रमाला उशीर दिसतोय, मंडळवाल्यांनी वसंतरावांची कैसेट लावलीय. आत गेलो तर कार्यक्रम सुरू झालेला होता. नंतर कळलं की ते चंद्रकांत लिमये होते. इंटरवेल मधे भेटलो तर ते म्हणाले की मी फक्त पंडितजींच्या चिजाच म्हणतो. संजीव अभ्यंकरांच्या रुपात पं. जसराज माहीत होते पण वसंतराव देखील डुप्लीकेट रुपात सापडतील यावर सहज विश्वास बसला नव्हता.
तिलकनगरच्या राममंदिर मधे मुंबईची कलाकार कल्याणी पांडेचा कार्यक्रम होता. मध्यंतरानंतर स्टेजवर तिने स्वर लावले. आणि हाल मधे आमच्या ग्रुप मधे कुजबुज सुरु झाली-कुठला राग आहे...? सगळे भातखंडे संगीत महाविद्यालयाचे छात्र. तिने स्वर लावल्या पासून इकडे माझ्या कानांत स्वर घुमूं लागले-
‘दरस मोहे राम...’
मी सहज म्हटलं-मधुकंस असावा.
त्यावर शेजारी बसलेला माझा दक्षिण भारतीय मित्र म्हणाला-
‘क्या बात करते हो, मधुकंस नहीं है...’.
नंतर रीतसर बडा ख्याल ‘देहो दीनदयाल...’ सुरू झाला...आणि इकडे त्याला वरुन लाइन क्लीयर मिळाला की ‘मधुकंस’ च आहे. तर तो म्हणाला-
‘क्यूं झूठ बोलते हो यार की संगीत नहीं समझता, तुम्हें कैसे पता की ‘मधुकंस’ है...?
मी म्हटलं-
‘मला खरंच माहीत नाही की स्टेजवर सुरू असलेला राग ‘मधुकंस’ आहे. तिने घेतलेल्या आलापी वरुन मला दुसरया कुणाचा आलाप आठवला, त्याचं नाव मला माहीत होतं तेच मी तुला सांगितलं...’
जबलपुरला असाच एकदा श्याम टाकीज जवळ असलेल्या कैसेटच्या दुकानात मी प्रश्न केला-
‘वसंतराव देशपांडे की कोई कैसेट है क्या...?’
उत्तर अनपेक्षितपणे मागून आलं-
‘हां है...लेकिन अमेरिका में...!’
म्हणजेच वसंतराव हातात येऊन पुन्हां निसटले होते. या ट्रिप मधे मी जबलपूरहून इंदौरला गेलो, तिथून मंडलेश्वर ला. ज्या वकील साहेबांकडे उतरलो होतो त्यांच्या संग्रहात वपु काळेंनी घेतलेली वसंतरावांची दीर्घ मुलाखत होती-‘मराठी संगीत नाटकांची वाटचाल...’. परततांना नागपूरला बर्डी चौकावरील एका दुकानात ती कैसेट मिळाली. दीनदयाल नगरला मावशी कडे ही कैसेट ऐकत असतांनाच कुणीतरी आले. ते म्हणाले-वसंतरावांची कैसेट दिसतेय. मी सांगितलं मला डॉक्टर साहेबांचा मारवा, मधुकंस हवाय, कुठेच मिळत नाहीये. ते गूढ हसत म्हणाले-मज जवळ आहे ती रेकार्ड. तू कैसेट करवून घे, पण मला देखील एक कैसेट हवीय. ते चिकेरुर काका होते. मुलाखातीची कैसेट ते घेऊन गेले व मला वसंतरावांच्या दोन्हीं चिजा मिळाल्या. ती एलपी घेऊन संध्याकाळी मी लक्ष्मीभुवन चौकावर गेलो. तर कुणीच त्या एलपी ची कैसेट करुन द्यायला तयार झालं नाही. सगळे म्हणाले-एलपी सोडावी लागेल. दुसरया दिवशी सकाळी मला परत निघायचं होतं. मी निराश झालो.
परततांना शंकर नगर चौकाच्या पहिले उजव्या हाताशी पहिल्या मजल्यावर एक रेकार्डिंग सेंटर दिसलं. शेवटचा प्रयत्न म्हणून तिथे गेलो. तिथे एक बाई होत्या. पहिले त्या देखील एलपी सोडावी लागेल म्हणाल्या. नंतर तयार झाल्या. त्यांच्या कलेक्शन मधे माणिक वर्मांचा ‘भटियार’ व ‘अकेली मत जइयो राधे जमुना के तीर...’ चिजा मिळाल्या. रिकार्डिंग सुरु असतांना खिडकीतून सहज खाली रस्त्याकडे लक्ष्य गेलं, तिथे एक गृहस्थ साइकिल धरुन आमच्या खिडकीकडे बघत उभे होते. माझ्या लक्षात आलं वसंतराव नेमकं तार सप्तकांत शिरत होते. ते गृहस्थ बराच वेळ गाणं ऐकत उभे होते. नंतर मागे बघत-बघत निघून गेले. त्या दुकानात मी पोचलाे तेव्हां तिथे कॉलेजची दोन मुलं बसलेली होती. मी दिलेली एलपी लावतांच वसंतरावांचा आवाज घुमूं लागला, तशी ती दोघं नाकं मुरडत ‘ताई हम आते हैं...’ म्हणत निघून गेली. मी तिथे असे पर्यंत ती परतली नव्हती.
खूपच बोर झाला असाल न हे सगळं वाचून...नाही कां...! पण मला कसं हलकं वाटतंय. अहो वसंतरावांबद्दल आपण त्या दिवशी जे काही सांगितलं, त्याच्याच शोधात तर मी होतो. मला कसं हायसं वाटलं.
तुमच्याशी वसंतरावांबद्दल आणखीन बोलायचं होतं, त्यांचं गाणं तुम्ही सादर केलेल्या चिजांमधे मला दिसलं होतं. गुरुच्या काही गोष्टी प्रत्येक शिष्या मधे तंतोतंत उतरतात. याला शिष्य देखील चुकवू शकत नाही, (ती मात्रा कमी-जास्त होऊ शकते) असं मला वाटतं. तुम्ही माझ्या नानांच्या (आईच्या वडिलांच्या) ओळखीच्या मंडळींपैकी एक, तुम्हांला मी काय सांगू शकणार म्हणां. पण ही जवळीक साधून माझं मन मी आपल्या समोर मोकळं करु शकलो, एवढं मात्र खरं.
अहो वसंतरावांच्या गोष्टी त्यांच्या इष्ट मित्रां साेबतच तर होऊ शकतील ना...!
त्या दिवशी संस्कार भारती वाला अनिल जोशी आला होता. मी त्याला धन्यवाद दिला की तुझ्या मुळे मला इतका सुश्राव्य कार्यक्रम ऐकायला, अनुभवायला मिळाला. तो सांगत होता की दिल्लीला संस्कार भारतीच्या बैठकीत तुम्ही चक्क टेबलावर ठेका धरुन गाणं म्हटलं होतं. खरं सांगतो त्याक्षणी मला त्याचा हेवा वाटला. अहो...स्टेजवरचं गाणं निराळंच असतं पण पडद्यामागचा रियाज, ती रिहर्सल देखील महत्वाची असते. नाही कां...!
पत्र बरंच लांबलंय, तरी क्षमस्व.
माझं काही चुकलं असेल तर आपण माझे कान धरालच असा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण माझ्या नाना आजोबांचे मित्र म्हणजे माझे देखील आजोबाच नाही कां...!
-----------------
प्रतिक्रिया
18 Sep 2016 - 8:27 pm | रमेश आठवले
माझे अतिशय आवडते गायक. त्यांची फिरत, बढत, शब्दफेक आणि त्यांचे उर्दू हिंदी उच्चार लाजवाब .
18 Sep 2016 - 8:47 pm | संदीप डांगे
खूपदा सहमत,
18 Sep 2016 - 9:31 pm | चंपाबाई
छान
19 Sep 2016 - 10:12 am | महासंग्राम
वसंतराव माझे पण आवडते गायक, किंबहुना शा. संगीताची आवड त्यांच्या गाण्यामुळेच लागली. शास्त्रीय संगीतातले ओ कि ठो जरी कळत नसले वसंतरावांच गाणं ऐकतांना मन प्रसन्न होऊन जातं.
20 Sep 2016 - 4:58 pm | सिरुसेरि
सुंदर आठवणी .
--"पुढे एकदा लहान भाऊ नागपुरहून परततांना पुलंचं एक पुस्तक घेऊन आला. त्यांत वसंतरावांवर लेख होता. तेव्हां पहिल्यांदा माहिती मिळाली. "--
या लेखामधे वसंतरावांनी गायलेल्या "सुलतान शहरके यार" अशा एका चीजेचा उल्लेख आहे हे आठवले .
20 Sep 2016 - 6:01 pm | अमर विश्वास
वसंतराव ..माझे अतिशय आवडते गायक
लय-तालावर जबर्दस्त हुकुमत
"सुलतान शहरके यार" ही चीज नाही.. ते एक चित्रपट गीत आहे
20 Sep 2016 - 7:39 pm | रमेश आठवले
वसन्तराव यांची ही पेशकश ज्यांनी कोणी ऐकली नसतील त्यांनी अवश्य ऐकावी . साथीला झकीर हुसेन आहेत.
https://www.youtube.com/watch?v=TjkWXWdCvSM
21 Sep 2016 - 11:09 am | यशोधरा
वाखु साठवली.
21 Sep 2016 - 1:06 pm | सिरुसेरि
वसंतरावांनी गायलेली विविध प्रकारची अनेक गाणी आवडतात . "आज सुगंध आला लहरत", "खुश रहे सनम मेरा" , "लागी कलेजवा कटार","सुरत पियाकी" ,"या भवनातील गीत", "तेजोनिधी लोह गोल" ,"म्रुगनयना रसिक मोहिनी ", "इये मराठीचिये नगरी" , "मानिनी कण वाही हा वारा" ,"माझ्या कोंबड्याची शान" ,"माझं ठरल्यालं लगिन" ,"कानडा राजा पंढरीचा" , "धीर धरी " ," कर हा करी धरीला ","हि कुणी छेडिली तार "
22 Sep 2016 - 1:27 am | महामाया
‘खेलन आयो रे ब्रजराज कुंवर अबीर-गुलाल उडावत गात...’ ही राग जोगकौंस ची बंदिश आहे...तबल्यावर उस्ताद जाकिर हुसैन, मागे तानपुरयावर चंद्रकांत लिमये आहेत...
या बंदिशी मधे वसंतराव आपल्या पुरत्या रंगात दिसतात. विलंबित मधे-
‘धूम मची ब्रज में,
रंग की पिचकारी चली केसर की,
धूम मची...
ही बढ़त करतांना वसंतरावां सोबत जाकिर हुसैन ने जी धूम केली आहे त्याला तोड नाही. वसंतरावांच्या आवाजातील उतार-चढाव व तबल्याच्या लयकारी मुळे हा जोगकौंस आठवणीत कायम घर करून आहे.
वर्षभरापूर्वी भीमसेन जोशींचा मिया की तोडी-‘चंगे नैनों वाली कुडियां, सदारंग नी दे दियां सैनत...’आिण वसंतरावांचा जोगकौंस ‘खेलन आयो रे...’ या बंदिशी मिळाल्या...
‘चंगे नैनों वाली...’ या बंदिशी मधे साक्षात भीमसेन सांगताहेत की पाणीदार डोळे असलेल्या मुली बघतांना सदारंगच्या डोळयांना शांति मिळते...याच्यात ही सोबत जाकिर आहे...पंडितजींचे स्वर आणि जाकिर ची तारीफ...सुभानअल्लाह...
कितीतरी पारायणे झालीत...कारण या व इतर बंदिशी मोबाइल मधे साठवून ठेवल्यास आहेत...वेळ मिळताच ऐकताे, अनुभवतो...दुचाकी चालवताना सुद्धा...
‘चंगे नैनों वाली...’ बंदिश देखील अनुभवण्या सारखी आहे...