महालक्ष्म्या

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
2 Sep 2010 - 5:43 pm

आमच्या मराठवाड्यात गणपतीपेक्षा जास्त महत्त्व गौरींचं. आमच्याकडे त्यांना गौराया किंवा महालक्ष्म्या म्हणतात. माझ्या लहानपणच्या आमच्या घरातल्या लक्षुम्यांच्या या आठवणी. मी आठनऊ वर्षांची असेन तेव्हाच्या.

अण्णांच्या नोकरीमुळे आम्ही लातूरला रहायचो. पण मुख्य देवघर मंजरथलाच. त्याला अण्णा हेडक्वार्टर म्हणायचे. गोदावरीच्या काठावर असलेल्या या छोट्याश्या क्षेत्रावरचे आमचे भटांचे घराणे. आजोबा म्हणजे जोशीबुवांचा गावात चांगलाच वचक. काका पण याज्ञिकी शिकलेले. पण शेती करायचे. अजूनही करतात. अण्णा आणि काका असे दोनच भाऊ. त्यामुळे आटोपशीर कुटुंब. शेती, गाईगोर्‍हे भरपूर...आजोबांचे पौरोहित्य उत्तम. त्यामुळे गावात आमचे कुटुंब सधन समजले जायचे. क्षेत्राचे गाव असल्याने बहुसंख्य कुटुंब ब्राह्मण. बाकी मराठा, भोई, कोळी अशी कुटुंबेही गावात सलोख्याने राहात असायची.

लक्षुम्यांसाठी मंजरथला जायचं म्हणलं की मला उड्या मारण्याएवढा आनंद व्हायचा. तर आम्ही लातूरहून बसने माजलगावपर्यंत यायचो. तिथे काका बैलगाडी घेऊन आलेले असायचे. रत्न्या-मोत्या ही देखणी खिल्लार बैलजोडी. बैलगाडीत खाली खूप आदळे बसू नयेत म्हणून कडबा पसरलेला. त्यावर जाड सतरंजी आणि त्यावर एक गादी. मी, आई, अण्णा नि विवेक सामान ठेवून आरामात पाय पसरून बैलगाडीत बसायचो. काका गाडी हाकायचे. पक्के रस्ते नव्हतेच. धडेल्धुम धडाम्धुम अशी गाडी चालायची. रस्त्यावरच्या खड्ड्यांनी आम्ही जागेवरच उडायचो. मला नि विवेकला फार मजा वाटायची. पुढे जेव्हा कच्चा रस्ता तयार झाला तेव्हा आम्ही ट्रॅक्टर मध्ये बसून मंजरथला जायचो. काही दिवसांनी बस सुरू झाली. ती तास दोन तास तरी लेट असायची. मग आम्ही वाट बघायचा कंटाळा आल्याने चालत १० किमी जायला किती वेळ लागेल असे हिशेब करत बसायचो.

आमच्या वाड्याला मोठ्ठे फाटक आहे. अगदी हत्ती जाण्याएवढे ! तिथेच दारात आम्हा चौघांना थांबवले जायचे. अम्मा म्हण्जे माझी आजी भाकरतुकडा ओवाळून टाकायची. फाटक ओलांडून आत आले की पहिल्यांदा गाईगुरांचे हंबरणे, गळ्यातल्या घुंगरांचा आवाज नि शेणामातीचा मन शांत शांत करणारा गंध यायचा. मी आधी वासरं किती आहेत ते मोजून घ्यायची. आजपर्यंत ६-७ वासरांपेक्षा कमी वासरे मी गोठ्यात बघितली नाहीत. गायी पण १२-१५ असतातच. गोठ्यानंतर ७-८ पायर्‍या चढून मुख्य वाडा. घरात कायम एक पाळलेला कुत्रा आणि ५-६ मांजरं ! आमचं गाव मार्जारक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असल्याने मांजर अशूभ मानत नाहीत. मोत्या नि ही मांजरं लगेच जवळ येऊन हुंगायला लागायची. असं मस्त वाटायचं. त्यांनी मला ओळखलं हे समजायचं. मग हात पाय धुवून देवाच्या पाया पडायचं. आजी,पणजी, आजोबा, काका नि काकू यांना नमस्कार करायचा. आणि मग जेवायला बसायचं. दूधातुपाचं जेवण जेवल्यावर मस्त झोप काढायची. नाहीतर चुलतभावंडांशी खेळत बसायचं.

आमच्या अंगणात मोठ्ठे कडुनिंबाचे झाड आहे. मी जाणार कळल्यावर आजोबा त्याला झोका बांधून घ्यायचे. उंच फांदीला सोल बांधून आणि एका बुटक्या फांदीला साखळदंड असलेला झोपाळा. मी कंटाळा येईपर्यंत झोके खेळत बसायची. मग थोडावेळ लहानग्या भावंडांना खेळव, मांजरींना जवळ घेऊन लाड कर, आजी, पणजीशी गप्पा मार असे उद्योग चालायचे. जेवणाची झाकपाक झाली की आई नि काकू लक्षुम्यांच्या फराळाचे पदार्थ बनवायच्या तयारीला लागायच्या. हे पदार्थ नैवेद्य म्हणून एका लोखंडी मंडपीला अडकवून लक्षुम्यांच्या डो़क्यावर टांगायचे असत. म्हणून त्याला फुलोरा म्हणायचे. या फुलोर्‍यात चकली, शेव, अनरसे, लाडू, पापडी आणि मैद्याची वळून तळलेली एक वेणीपण असायची. दोन दिवस मग खोल्यांमधून, अंगणात मस्त खमंग वास दरवळत रहायचा.

पावसाळी दिवस असल्याने गंगेला भरपूर पाणी असायचे. ( गोदावरीला गंगाच म्हणतात आमच्याकडे) एका ठिकाणी सिंधुफेणा नदी पण गंगेला येऊन भेटते तो संगम पण आमच्या गावात आहे. पाऊस नसेल तर या संगमावर आम्ही सगळी भावंड पोहायला जायचो. गंगेच्या पात्रापेक्षा खूप कमी पाणी असायचं इथे. त्यामुळे त्या खळखळ वाहाणार्‍या वाळू दिसेल इतक्या स्वच्छ पाण्यात डुंबायला खूप मजा यायची.

दुसरा एक कार्यक्रम असायचा देवळात जाण्याचा. घरापासून हाकेच्या अंतरावर गंगा नि अगदी समोर मुख्य ग्रामदेवता त्रिविक्रम मंदीर. त्रिविक्रमाला जाताना वाटीभर गहू सोबत घेऊन जायचे. तिथे देवापुढे ठेवायला. खूप प्रसन्न वाटायचे त्या आवारात. जुने हेमाडपंती देऊळ. गाभार्‍यात घुमणारा मंत्रघोष, लक्ष्मी-त्रिविक्रमाची शांत समईच्या प्रकाशात गंभीर आश्वस्त वाटणारी मूर्ती, सभामंडपातले कासव नि घंटा, प्रदक्षिणा मार्गावरचे तुळशी वृंदावन, मंदिराच्या चारी दिशांना असणार्‍या संरक्षक देवतांच्या मूर्ती.......सगळे सगळे खूप आपले वाटायचे. बडव्यांच्या घरातल्या पोरी, बोर्‍यांच्या घरातल्या पोरी अशा माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आत्ताच भेटणार्‍या मैत्रिणी जमायच्या. मग आम्ही खेळनपाणी खेळत बसायचो. दिवेलागणीला आजोबांची दणदणीत हाक ऐकू आली की या पोरी धुम पळून जायच्या. मी पण घरी परतायची. मग देवापुढे शुभंकरोति म्हणायचे. काकांकडून गीता, विष्णुसहस्त्रनाम, महिम्न असे काहीतरी शिकायचे... घोकत बसायचे. यातून बाकी सर्वांना सूट मिळायची. मी एकटीच हे सगळे करत असे. त्यामुळेच की काय मी घरात सगळ्यांची खूप लाडकी होते. नातवंडात सगळ्यात पहिली नि तीन पिढ्यांनंतर जन्मलेली मुलगी म्हणून मला सगळे जपायचे. तीन पिढ्या घरात मुलगीच नसल्याने मला कधीही घरात 'मुलींची' वागणूक मिळाली नाही. तू मुलगी आहेस म्हणून हे कर ते नको असे कधीच झाले नाही. कर्मठ भटांच्या घराण्यात हे एक नवलच !

हे सगळे होईपर्यंत धारा काढून व्हायच्या. माझ्या खास तपेलीत मला धारोष्ण दूध मिळायचं. अम्मा कालच्या दुधाचं विरजण लावताना लाल तापलेल्या दुधावरची थोडी साय आणि शिंपल्याने काढलेली खरवड माझ्या हातावर ठेवायच्या... ! पक्की मांजर होते मी ! दूध, साय, लोणी, तूप सगळे पोटभर खायची. रात्रीची जेवणं व्हायची. नि पाऊस नसेल तर लिंबाखाली बाजेवर अंथरूण टाकून दिवसभराच्या सुखाने थकून गाढ झोप लागून जायची.

सकाळी जाग यायची ती रप्पक रप्पक अशा सडा घातल्याच्या आवाजाने. अजून उजाडलेही नसायचे. पण सगळे घर, गोठा जागा झालेला असायचा. शेणाच्या गवर्‍या लावायला मला भारी आवडायचं. पणजी ते काम करायची तेव्हा मी मधे मधे करत बसे. मग घरी बनवलेले मंजन हातात घेऊन वतलासमोर( पाणी तापवण्याचा हंडा त्या चुलीतच रोवलेला असतो.चुलीचे तोंड नहाणीबाहेर नि हंडा मात्र नहाणीत अशा रचनेला वतल म्हणतात ) मस्त शेकत दात घासत बसायचे. राखुंडी,तुरटी, मीठ असं काय काय मिसळून ते स्वादिष्ट मंजन तयार केलेलं असायचं. दात घासून झाले की शेणानं शिंपलेल्या अंगणात रांगोळी काढायची. मन लावून तासभर रांगोळी काढत बसायचे मी. नंतर अंगणातल्या पारिजातकाची फुलं गोळा करायची. दूर्वा तोडायच्या. आघार्डा तोडायच्या. आणि काकू जवळ नेऊन द्यायच्या की काम झाले. मग पुन्हा दूध आणि न्याहारी. गंगेत डुंबणे नि देवळात खेळणे.

संध्याकाळी महालक्षुम्या येणार म्हणून पुन्हा झाडझूड व्हायची. सडा रांगोळी अधिक निगुतीनं केली जायची. नवे कपडे घालून लक्षुम्यांच्या स्वागताला तयार. दिवेलागणीला आई किंवा काकू एका ताम्हणात हळदी कुंकू पाण्यात कालवायच्या. या पाण्याचे मुख्य दारापासून देवघरापर्यंत हातवे द्यायचे. दोन हातव्यांच्या दोन्ही बाजूला रांगोळीने लक्ष्मीची पावलं असलेले शिक्के द्यायचे. हे करताना दर पावलाला एक प्रश्न विचारण्याचं काम माझ्याकडे असायचं. ' काय करतेस ? ' यावर उत्तर मिळायचं " सोन्याच्या पावलानं लक्ष्मी येते तिला हातवे देते". एक दोन वेळा असं झालं की तिसर्‍यांदा पुन्हा तोच प्रश्न विचारायचा मला भारी कंटाळा यायचा. पण आई ओरडायची, " अगं विचार की... " !

मग हंड्यावर हंडे ठेवून त्यावर साडी पोलकं नेसवून लक्षुम्यांचे दोन आणि त्यांच्या पिलवंडांचे दोन मुखवटे ठेवले जायचे. सगळ्या प्रकारचे खोटे दागिने, गजरे, हार यांनी या जेष्ठा कनिष्ठा सजायच्या. समोर धान्याच्या राशी ओतल्या जायच्या. खेळणी, फुलं यांनी सुंदर आरास केली जायची. लख्ख झालेल्या समया तेवायच्या.त्या प्रकाशात त्या मुखवट्यांचे डोळे सजीव भासायचे. घरादारात धूप नि उदबत्त्यांचा वास घमघमायचा. रात्री आरती व्हायची नि लक्षुम्या झोपायच्या.

दुसर्‍या दिवशी सकाळी मुगाची खिचडी नि येसर आमटीचा नैवेद्य. तोच सर्वांचा फराळ. बाकी पदार्थांचा फुलोरा तयार व्हायचा पण अजून ते खाण्यासाठी वेळ असायचा. काका सोवळे नेसून देवपूजेला बसायचे.काकू लक्षुम्यांच्या पूजेच्या तयारीला लागायची. आई नि आजी सैपाकाला लागायच्या. सवाष्ण ब्राह्मण यांना जेवणाचे आमंत्रण जायचे. सैपाकाचा एकदम थाट असायचा. सोळा भाज्या, सोळा चटण्या कोशिंबिरी, वडे, पापड, कुर्डया, पुरणपोळ्या, कढी, साखरभात, साधा भात, मसाले भात आणि खीर कानवला ! या सर्वांच्या वासांनी आम्ही पोरं सैपाकघराजवळच रेंगाळत रहायचो. पण सैपाक कडक सोवळ्यात चालेल याची आजोबा काळजी घ्यायचे. चुकून इकडे तिकडे हात लागला तर आई आजीला बोलणी खावी लागायची.

मुख्य पूजा सुरू व्हायची. ती बराच वेळ चालयची. मग आरत्या सुरू व्हायच्या. शेवटी नैवेद्य दाखवला की महलक्ष्म्या अशा खूष दिसायच्या !!! सवाष्ण ब्राह्मण आलेले असायचे.पाट मांडले जायचे. रांगोळी काढली जायची. उदबत्त्यांच्या घमघमाटात पंगत वाढली जायची. काकू नि काका वाढपाचे काम करायचे. ताटं वाढून झाली की काका सगळ्यांना गंध लावून नमस्कार करायचे. आम्हा पोरांची रांग पण नमस्कारासाठी गर्दी करायची. शेवटी हातात पाणी घेऊन संकल्प सोडला जायचा. भोजनमंत्र खणखणीत आवाजात व्हायचा नि जेवणं सुरू व्हायची. मन भरेपर्यंत जेवत रहायचो आम्ही. ताटात काही टाकायचे नाही हा दंडक होता. कोणी टाकलेच तर तो आलेला ब्राह्मण जरी असला तरी आजोबा त्याची व्यवस्थित कानउघाडणी करायचे. वर दक्षिणा देऊन नमस्कारही करायचे ! नंतर सगळे विड्याची पानं घेऊन गप्पा मारत थोडावेळ बसायचे. आम्हा पोरांनाही विडे खायला मिळायचे. मग आम्ही कोणाचे पान जास्त रंगते याची शर्यत लावायचो. मधूनच काका गोठ्यातल्या वासरांना चारा पाणी वाढून यायचे. शेतावर राबणारे गडी परतले की त्यांना ताजे वाढण दिले जायचे.

बायकांची पंगत व्हायची.झाकपाक केली जायची. कुत्र्या मांजरांना खायला मिळायचे नि दिवसभराचे थकले भागले घर विडे खात गप्पा मारत जागायचे. आम्ही पोरं तुडुंब जेवल्याने झोपून जायचो. तिसर्‍या दिवशी सकाळी सकाळी चटचट आवरून हजर असायचो. आज फुलोर्‍याचा फराळ ! मोठ्या ताटलीत शेव चिवडा, लाडू, अनरसे, करंजी, चकली असे पदार्थ यायचे. आम्ही तुटून पडायचो. दुपारी साधे जेवण नि संध्याकाळी हळदीकु़ंकू. गावातल्या झाडून सगळ्या बायका नटून थटून एकमेकींकडे हळदीकु़ंकवाला जायच्या. कोणाची आरास कशी, नवे दागिने, साड्या यांचे प्रदर्शन व्हायचे. उखाणे घेताना चेष्टामस्करी व्हायची, गावातल्या पणज्या, आज्या, सगळ्या यात सामील व्हायच्या. सगळ्या गावात जणू या गौराया हसतखेळत असायच्या. इथे कोणत्याही भेदभिंती नसायच्या.

रात्री पुन्हा निरोपाची आरती व्हायची. खीर कानवल्याचा नैवेद्य व्हायचा. लक्षुम्यांच्या पूजेचे धागे सोळा गाठी मारून घरातल्या लक्ष्म्यांच्या गळ्यात घातले जायचे. आम्हा पोरासोरांच्या हातात आठ गाठींचे धागे बांधले जायचे.

जड मनाने मुखवटे उतरवले जायचे. पेटीत सुरक्षित ठेवले जायचे. दागिने, सजावटीचे सामान काळजीपूर्वक कापडात बांधून ठेवले जायचे. समोरच्या धान्याच्या राशी घरातल्यांनीच खायच्या म्हणून लगोलग दळायला पाठवल्या जायच्या. आमची लातूरला परत निघायची वेळ जवळ यायची. फराळाच्या गाठोड्या बांधल्या जायच्या. सामान कपडे यांच्या पिशव्या भरल्या जायच्या. असा हा लक्षुम्यांचा सोहळा आठवत आम्ही पुन्हा बैलगाडीत बसायचो.

आता २० वर्षांत यात खूप खूप बदल झालेत. पण ते या लेखात नकोत. इथली गोडी अशीच ठेवते.

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

सुरेख. जुन्या आठवणी जागवणारे आणि मिपावर हल्ली येणार्‍या मोजक्या उत्तम लेखनापैकी एक.

असुर's picture

2 Sep 2010 - 6:33 pm | असुर

+१
लेखनासाठी!!
आठवणी फार जुन्या नाहीयेत पण एक वर्ष होऊन गेलं ना आता! :-)
आमच्या घरी हा कार्यक्रम जोरदार असतो बुवा.
माझ्या सगळ्या बहीणी जमून फार दंगा घालतात. गौरींची सजावट आणि व्यवस्था यात माझी एक बहीण इतकी एक्स्पर्ट आहे, की गेली कित्येक वर्षे या कामाला दुसरा कोणी हातच लावत नाही! आईला तुफान सोस आहे या सगळ्याचा, आणि माझ्या बहीणींना प्रचंड उत्साह!
हे सगळं आठवून गेलं याबद्दल तुमचे आभार!

--असुर

यशोधरा's picture

2 Sep 2010 - 6:35 pm | यशोधरा

सारखे एडिटू नये. आता नाही जमायचं. :)

संदीप चित्रे's picture

2 Sep 2010 - 9:29 pm | संदीप चित्रे

संग्रही ठेवण्यासारखा लेख आहे हा !

पुष्करिणी's picture

2 Sep 2010 - 5:55 pm | पुष्करिणी

सुंदर वर्णन.

भाऊ पाटील's picture

2 Sep 2010 - 5:56 pm | भाऊ पाटील

सुंदर ओघवते वर्णन.

अनामिक's picture

2 Sep 2010 - 6:04 pm | अनामिक

छान लेख मितान.
आमच्या घरी महालक्ष्म्या नाहीत, पण मामाकडे आहेत. मामा गावातच राहतात, त्यामुळे गौरी-गणपतीतले हे दिवस खूप मजेत घालवलेले आहेत. तुझा लेख वाचून खूप आठवणी जाग्या झाल्या. मडक्यावरच्या गौरी म्हणजे गम्मत नव्हे! खूप काळजीपुर्वक बसवाव्या लागतात. जमीनीवर चिखलाचे चुंबळ करून त्यावर पहिले मडके, त्यात धान्य भरायचे... त्यावर दुसरे पहिल्यापेक्षा लहान मडके, ते पोटाच्या जागी असल्याने त्यात सगळा फराळ ठेवायची मामी... ह्या मडक्यावर तिसरे धान्याने भरलेले आणि हात जोडलेले मडके ठेवायच्या आधी पहिल्या दोन मडक्यावर मिर्‍या पाडून साडी नेसवली जायची. तिसरे मडके सर्वात वर ठेवून त्यावर मु़खवटा चढवून साडीचा पदर डोके आणि हातावरून घेऊन कमरेच्या जागी खोचला जायचा. गौरी बसवणार्‍या मोठ्यांची खूप कसरत व्हायची त्यावेळी... पण एकदा का दोन्ही गौरी आणि त्यांची मुलं आपल्या घरात सज्ज झाले, आणि शेजारी तेवणार्‍या समईच्या प्रकाशाने त्यांचे चेहरे उजळले की काय प्रसन्न वाटायचं म्हणून सांगू! सोवळंपण खूप असायचं. दोन्ही मामाकडचे आणि आम्ही मिळून ११ भावंडं! मखर सगळे मिळून सजवायचो. केना, घेवडा, दुर्वा, फुलं, हार सगळ्यांची जय्य्द तयारी करायचो. दुसर्‍या दिवशी संध्याकाळ्च्या पुजेत सगळे भावंडं एकसुरात आरत्या म्हणत असू. सगळं वातावरण भारल्या जायचं. तिसर्‍या दिवशी गौरींना निरोप देववत नसे. आता फक्तं आठवणी राहिल्यात, पण तू लेख लिहून आठवणींना उजाळा दिलास म्हणून धन्यवाद!

सूड's picture

2 Sep 2010 - 6:09 pm | सूड

लिहीलेलं सगळं डोळ्यासमोर घडतंयसं वाटलं. अतिशय सुंदर लेखन.

मदनबाण's picture

2 Sep 2010 - 6:08 pm | मदनबाण

मितान तू मस्त लिहतेस... :) हा लेख सुद्धा आवडला. :)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

2 Sep 2010 - 6:11 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

....परत एकद nostalgic झाले.
माझे आजोळ्...आजी आजोबा..आणि ते घर्,,आम्ही डझनभर नातवंडे कसा धुमाकूळ घालत असु ना ते सारं सारं आठ्वलं.
छान लिहिल आहेस.

स्वाती२'s picture

2 Sep 2010 - 6:12 pm | स्वाती२

मस्त ग मितान!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2010 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा...! बहारदार आठवणी आणि तितकेच सुंदर लेखन.
और भी आने दो.

-दिलीप बिरुटे

मी-सौरभ's picture

2 Sep 2010 - 7:47 pm | मी-सौरभ

क ड क

पप्पुपेजर's picture

3 Sep 2010 - 7:59 am | पप्पुपेजर

एकदम बेस्ट

स्वाती दिनेश's picture

2 Sep 2010 - 6:25 pm | स्वाती दिनेश

सुरेख लिहिलं आहेस.
आमच्या खड्यांच्या गौरी आणि गौरीजेवणाच्या नेवैद्याला घावन घाटले.संध्याकाळी हळदीकुंकू. त्यामुळे थाट असा काही नाही, पण तरीही छान वाटते.
गणपतीचे दिवस जवळ आलेत याची चाहूल तुझ्या लेखाने दिली.
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

2 Sep 2010 - 6:35 pm | परिकथेतील राजकुमार

अप्रतीम !
नेहमीप्रमाणेच ओघवते, मनमोहक आणि झकाssssssssस लेखन.

असे सुंदर लेखन वाचले की वाचनखूण साठवता येत नाही ह्याचा पुन्हा पुन्हा संताप येतो :( निख्या वाचतोयस ना ?

अरुंधती's picture

2 Sep 2010 - 6:35 pm | अरुंधती

मितान, छानच लिहिले आहेस! अगदी गावातल्या घराचं, गौरायांचं आणि त्या स्वच्छंद दिवसांचं सुरेख चित्रण केले आहेस! आता मलाही हुरहूर लागली.... गौरायांच्या आगमनाची! :-)

सुनील's picture

2 Sep 2010 - 6:38 pm | सुनील

छान लिहिलं आहे!

धारोष्ण दुधाची चवच वेगळी. लहानपणी प्यालेल्या त्या दुधाची चव अजून ओठांवर आहे.

येसर आमटी म्हणजे काय?

सुनील,
मराठवाड्यात येसर हा एक आमटीचा प्रकार असतो. वेगवेगळ्या दाळी धुवून वाळवून भाजून काही मसाल्यांसोबत एकत्र दळून ठेवतात. थालीपिठाच्या भाजणीसारखाच हा प्रकार वर्षभर टिकतो. आमटी करताना हे पीठ पाण्यात कालवायचे आणि कांदा, लसूण किंवा नुसतीच हिंगजिर्‍याची फोडणी द्यायची. खमंग आमटी तयार :)
कोणत्याही मंगलकार्यात शिदोरी म्हणून मेतकूट आणि येसर यांचे पुडे देण्याची पद्धत आहे.

सुनील's picture

3 Sep 2010 - 12:52 am | सुनील

अरे व्वा! चटकन होणारा प्रकार.

मेघवेडा's picture

2 Sep 2010 - 6:42 pm | मेघवेडा

छान! आठवणींत रमून गेलेली कोपर्‍यात कागदपेन घेऊन लिहित बसणारी माया दिसली. :)

तेवढं ते महालक्ष्म्या नावाबाबत सांग ना जरा अजून.. गौरींना नाशिक-पुण्याकडे 'महालक्ष्म्या' का म्हणतात याबद्दल लहानपणापासून कुतूहल आहे. पण कुणीच समाधानकारक उत्तर दिलेलं नाहीये मला अजून.

असेच म्हणतो... मला इतर भागात महालक्ष्म्यांना 'गौरी' का म्हणतात ते माहिती करून घ्यायचेय.

स्वाती दिनेश's picture

2 Sep 2010 - 6:52 pm | स्वाती दिनेश

माझ्या माहितीप्रमाणे-
गौरी-पार्वती ,गणेशाची आई येते मुलाच्या मागे. म्हणून गौरी..
स्वाती

अनामिक's picture

2 Sep 2010 - 7:04 pm | अनामिक

हो, पण मग दोघी का? दोघी असल्याने, त्यांचा आणि गणपतीचा संबंध नीट समजला नाही. आणि त्यांच्या सोबत प्रत्येकीचे एकेक (किंवा कुणाकडे फक्तं एक) मुलही असते.

स्वाती दिनेश's picture

2 Sep 2010 - 7:13 pm | स्वाती दिनेश

ते दोघी ज्येष्ठा,कनिष्ठा असं कायसस आहे बुवा,
आमच्याकडे तर ७ खडे आणतात. आता ७ का? ते नाही माहित..
कदाचित एक पार्वती आणि बाकी सगळ्या तिच्या सख्या,दासी असतील.. असा आपला एक गेस.
स्वाती

मस्त कलंदर's picture

2 Sep 2010 - 8:07 pm | मस्त कलंदर

आमच्याकडे त्यांना गंगा-गौरी म्हणतात. यात एक अधिक सुंदर, उंच असते आणि दुसरी तिच्याहून अंमळ डावी. अगदी मुखवट्यांच्या गौरी करताना सुद्धा हे लक्षात ठेवून त्यांना उभे केले जाते. माझ्या मते, उजवी दिसणारी ती गंगा-तिचे स्थानही बहुधा उजव्या बाजूला असते आणि दुसरी ती गौरी.
याबाबतीतल्या एका आख्यायिकेबद्दल मी इतरत्र लिहिले होते, तेच इथे डकवतेयः

गौरी-गणपतीमधल्या गौरींची आल्याच्या दुसर्‍या दिवशी कानउघडणी होते. म्हणजेच त्या मुखवट्यांसमोर एक परात किंवा तत्सम भांडे पालथे घालून त्यावर उलथणे, लाटण्यासारख्या गोष्टी कराकरा वाजवायच्या. इतका तो कर्णकटू आवाज येतो की कधी एकदा कानउघडणी संपतेय असे होऊन जायचं. एकदा जाणतेपणी आईला ही प्रथा का म्हणून विचारलं. तर तिचे उत्तर होतं,
"गौरी शंकराशी म्हणजेच नवर्‍याशी भांडून माहेरी येते. ती आल्याच्या दिवशी तिला घरी असेल ती भाजीभाकरी खाऊ घालयची. दुसर्‍या दिवशी माहेरवाशीणीचं कौतुक म्हणून पुरणावरणाचं गोड खाऊ घालायचं. नि रात्री अशी कशी नवर्‍याशी भांडून निघून आलीस म्हणून कानउघडणी करायची. नि बाई, आता तुझे लग्न झाले. इथून पुढे जरी आलीस तरी तुझे माहेरपण तीनच दिवसांचे असे म्हणून तिसर्‍या दिवशी तिची परत रवानगी करायची.म्हणून गौरी फक्त तीन दिवस असतात."

त्याक्षणी वाटलं, की लग्न झालं म्हटलं की मुलगी इतकी का आई-बाबांना परकी होते? जर काही दुखलं खुपलं म्हणून शेवटचा आधार म्हणून ज्यांनी तळहाताच्या फोडासारखं जपलं, जे सगळ्यात जास्त आपल्याला ओळखतात त्या आईबाबांकडे यायचं, तेच जर असे दुसर्‍या दिवशी कानउघडणी करून तिसर्‍या दिवशी मुलीला हाकलून देणार असतील तर तिने आधारासाठी पाहायचे कुणाकडे?

तेव्हापासून मी निदान माझ्या घरातली कानउघडणीची प्रथा बंद करवलीय.

असुर's picture

2 Sep 2010 - 9:34 pm | असुर

>>>तेव्हापासून मी निदान माझ्या घरातली कानउघडणीची प्रथा बंद करवलीय.<<<
आमच्या घरीसुद्धा याच कारणासाठी ही प्रथा बंद आहे.

मितान's picture

3 Sep 2010 - 12:44 am | मितान

नवीनच ऐकलं हे कानउघाडणी वगैरे...

मेघवेडा, मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही.
एकूणच आपले सण कृषी संस्कृतीशी जोडलेले आहेत. भाद्रपदात पिकं जोमात असतात. दाणे भरायला सुरुवात झालेली असते.पाऊसपाणी चांगले असल्याने समृद्धीची आस अधिक तीव्र झालेली असते. तो आनंद व्यक्त करण्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यासाठी हा सण असावा. धान्याच्या राशींची पूजा त्याचसाठी. धान्य म्हणजे लक्ष्मी . म्हणून या महालक्ष्म्या.
अर्थात हे उत्तर समाधान करण्यासाठी दिलं नाही. हे मी स्वतःला दिलेलं उत्तर आहे. :)

+१
मायातै, एक नंबर! हे सहीसही पटण्याजोगं आहे.
आमच्याकडे उभ्या गौरी असतात त्यांच्या पोटात सुद्धा धान्यच भरलेले असते. गौरी विसर्जनानंतर हेच धान्य प्रसाद समजून बाकी धान्यात मिसळले जाते.

मेघवेडा's picture

2 Sep 2010 - 6:57 pm | मेघवेडा

हा हा, मग कुणी गौरींवर लेख लिहिला तर त्यांना विचारा.

प्रस्तुत लेखाची सुरूवातच लेखिकेने "आमच्या मराठवाड्यात गणपतीपेक्षा जास्त महत्त्व गौरींचं. आमच्याकडे त्यांना गौराया किंवा महालक्ष्म्या म्हणतात." अशी केलेली आहे. यावरून काय समजायचं ते समजा. :)

गणेशा's picture

2 Sep 2010 - 6:50 pm | गणेशा

जसे जड मनाने मुखवटे उतरवले जाय्चे, तसे जड मनाने शेवट वाचला .. वाटले संपुच नये हा लेख.
पुणे - मुंबईच्या धकाधकीच्या जीवणात गावाकडील असले दिवस पुन्हा आठवले ..
आपले मन .. तसे ते कायमच कोठे ही चटकन फिरुन येते.. आणि चटका लावुन जाते .. तसेच हा लेख वाचुन माझे मन ही काही काळ गावा कडे फिरुन आले ..

धन्यवाद
गणेशा

विसोबा खेचर's picture

2 Sep 2010 - 7:05 pm | विसोबा खेचर

छानच..

आहाहा!
एकदम माहेराची आठवण करून देणारा लेख!
लेखनशैली झकासच!
माझ्या माहेरीही ज्येष्ठा आणि कनिष्ठा अश्या गौरी असतात, शिवाय खड्यांच्याही असतात.
सासरी मात्र खड्यांच्या असतात.

रामदास's picture

2 Sep 2010 - 8:45 pm | रामदास

एक चांगला लेख वाचल्याचे समाधान मिळाले.

मधुशाला's picture

2 Sep 2010 - 8:56 pm | मधुशाला

छान सोपी आणि ओघवती भाषा...

प्रकाश घाटपांडे's picture

2 Sep 2010 - 9:06 pm | प्रकाश घाटपांडे

अत्यंत सुंदर लेख! स्मृतीविव्हल झालो. महालक्ष्मीच्या पावलाच्या रांगोळ्याचे ठसे जाणारे आणि येणारे सर्व घरात फिरवणे मी हौसेने करीत असे.चहावाल्या वहिनी आणि आई महालक्ष्मीची यथासांग पुजा व सजावट करीत. मी ही थोडी लुडबुड करीत असे.

चित्रा's picture

3 Sep 2010 - 3:28 am | चित्रा

अत्यंत सुंदर लेख!

असेच म्हणते..

प्रभो's picture

2 Sep 2010 - 9:48 pm | प्रभो

मस्त लेख...

लहान पणी (आणी मोठे पणीही) गौरी आगमनाच्या वेळेस चमच्याने ताटली वाजवून स्वागत करायचो ते आठवलं... :D तसेच मागे अवांतर टाकलेले गौरीच्या ताटाचे फोटो ही आठवले... :)

यावर्षी पहिल्यांदा गौरी-गणपती हुकणार माझं... :(

चिंतामणी's picture

2 Sep 2010 - 9:33 pm | चिंतामणी

डोळ्यासमोर चित्रपटासारखे सगळे दिसत होते.

पुण्या-मुंबईत रहाणा-यांना हे सुख कसे असते हे कसे क्ळणार असे वाटावयचे.

पण या लिखाणामुळे ते समजायला सोपे झाले.

चिंतामणी's picture

2 Sep 2010 - 9:33 pm | चिंतामणी

डोळ्यासमोर चित्रपटासारखे सगळे दिसत होते.

पुण्या-मुंबईत रहाणा-यांना हे सुख कसे असते हे कसे क्ळणार असे वाटावयचे.

पण या लिखाणामुळे ते समजायला सोपे झाले.

अर्धवटराव's picture

2 Sep 2010 - 9:36 pm | अर्धवटराव

लेख फार फार आवडला. माझ्या घरच्या महालक्ष्म्यांची आठवण आलि.
संस्कृती संस्कृती म्हणतात ति हिच का हो ??

"आता २० वर्षांत यात खूप खूप बदल झालेत. पण ते या लेखात नकोत. इथली गोडी अशीच ठेवते."
ह्म्म्म्म... बदल होतोय खरा. पण आपण जुन्यातलं सोनं ओळखुन ते टिकविण्याचा प्रयत्न अवश्य करुच.

(जय जगदंबे) अर्धवटराव.

इन्द्र्राज पवार's picture

3 Sep 2010 - 12:07 am | इन्द्र्राज पवार

अगदी आत्यंतिक अश्रद्ध व्यक्तीला 'मितान' चे हे लेखन दाखवावे आणि त्याच्या मतात पडत चाललेला फरक नोंदविला तर तो जाणवण्याइतपत प्रखर असेल, इतके सुंदर लेखन केले आहे लेखिकेने एका तितक्याच सुंदर प्रथेचे आणि तेही अत्यंत सहज ओघवत्या भाषेत.

"धडेल्धुम धडाम्धुम" हा गाडीचा आवाज तर भन्नाटच. आमच्या "हिटणी" (आता कर्नाटकात) गावाकडे म्हाईला जाताना पूर्वी असा वंगण न घातलेल्या गाडीचा आवाज असाच यायचा. आता मायबाप सरकारच्या कृपेने अगदी थेट देवळापर्यंत टार रोड झाल्याने 'नॉस्टॉलजीया'त गुंगणे इतपतच शक्य आहे. मितानचा हा लेख त्याच परंपरेतील, म्हणून लक्षणीय.

इन्द्रा

बेसनलाडू's picture

3 Sep 2010 - 1:45 am | बेसनलाडू

खूप सुंदर, संग्राह्य, पुनर्वाचनीय स्मृतीचित्र. फार आवडले.
(स्मरणशील)बेसनलाडू

मितन किती मंगल सुंदर आठवणी जपल्या आहेत तुम्ही. खूप आवडला तुमच्या बालविश्वाचा हा भाग.

नगरीनिरंजन's picture

3 Sep 2010 - 7:14 am | नगरीनिरंजन

अप्रतिम वर्णन! माझ्या आजीकडच्या महालक्ष्म्या आठवल्या!
लहानपणीचे ते दिवस आणि त्यांच्या आठवणी म्हणजे आयुष्यभर पुरणारा अमृतठेवा असतो नाही?

सुरेख समृद्ध लेखन वाचल्याचा आनंद झाला.

तुमच्या भावविश्वात सहल करून जुन्या काळातली, सधन घरातली ,जीवन शैली, प्रथा,रीतीरिवाज समजले.

एक वेगळीच दुनिया पाहायला मिळाली.

असेच छान छान लिहित रहा.

आता मलाही माझ्या माहेरची महालक्ष्मी कशी असायची हे सांगावेसे वाटत आहे.

पारुबाई, येऊद्या की तुमची पण लक्ष्मी ! वाचायला नक्की आवडेल :)

भरभरून दिलेल्या प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद. माझ्या भावविश्वाचा हा भाग तुम्हा सर्वांसोबत शेअर करताना मलाही खूप खूप आनंद मिळाला. :)

विसुनाना's picture

4 Sep 2010 - 4:55 pm | विसुनाना

भरभरून लिहिलं आहे. फारच छान!
प्रत्येक वाचकाला त्याच्या लहानपणातील सणा-समारंभांची आठवण करून देणारा लेख.

मिसळभोक्ता's picture

4 Sep 2010 - 9:04 pm | मिसळभोक्ता

विदर्भातही गौरींना महालक्ष्म्या म्हणतात.

आम्हीही हल्ली आम्च्या घरच्या महालक्ष्म्या "मागून घेतल्या" अहेत.

त्यामुळे आमच्या कुळाचाराच्या महालक्ष्म्यांनी हल्ली देशांतर केले आहे.

चिगो's picture

18 Sep 2010 - 12:05 pm | चिगो

अगदी लहाणपणीची आठवण करून दिलीत. पुर्वी आमच्याकडे महालक्ष्म्या म्हणजे दिवाळीपेक्षा मोठा सण !! महालक्ष्म्या यायच्या आधी त्यांच्या फराळाची तयारी सुरू व्हायची. त्यावेळी आम्ही मुलं तिथेच घुटमळत असायचो. मग दादी (आजी) आम्हाला फराळ उष्टा केला तर महालक्ष्म्या कशी शिक्षा करतात ह्याच्या गोष्टी सांगायची. त्यांच्या जेवणाच्या वेळी (दुसर्‍या दिवशी) आजोबा महालक्ष्म्या बसलेल्या खोलीची दारं-खिडक्या बंद करुन बाहेर थोडा वेळ पहारा देत बसायचे. ह्यावेळेत महालक्ष्म्या जेवायला येतात ही श्रद्धा ! नंतर त्यांच्या समोरचं प्रसादाचं ताट घरातल्यांनी संपवायचं.. गावातील लोक दर्शनाला येत व त्यांच्यासाठी जेवणाच्या पंगती उठत..
एका महालक्ष्म्यानंतर आमच्या घरात मजेशीर चोरी झाली. चोराने महालक्ष्म्यांच्या फराळाची चोरी करुन (आणि खाऊन) फक्त ५० रुपये चोरुन नेले.. कदाचित खाल्ल्या घरात चोरी कशी करावी आणि चौर्यधर्म ह्यांच्या कात्रीत सापडल्याने त्याने मधला मार्ग निवडला असेल..
.......... धन्स मितानतै. अशाच सुंदर लिहीत रहा ! महालक्ष्म्या तुम्हाला यश देवो !!

पलाश's picture

9 Feb 2015 - 5:59 pm | पलाश

अप्रतिम वर्णन !!!!
मुम्बईत बदली झालेल्या मूळच्या मराठवाड्यातल्या कुटुंबात हा सण अनुभवला आहे. आमच्या मानाने मराठवाड्यातले लोक परंपरा आजही संभाळतात असे मनापासुन वाटते. खरोखर एक पाहुणी म्हणून सुद्धा सहभागी व्हायला मला अतिशय आनंद वाटला. घरातील माणसांच्या चेहेर्‍यांवरचे भाव तर एकदा तरी अनुभवावेत असेच!!!

गिरिजा देशपांडे's picture

8 Sep 2016 - 3:17 pm | गिरिजा देशपांडे

खूप सुंदर लिखाण!!! आज महालक्ष्म्याच्या निमित्तानी हा धागा वर आणत आहे :)

सिरुसेरि's picture

8 Sep 2016 - 4:30 pm | सिरुसेरि

सुंदर लिखाण . गेले ते दिवस . राहिल्या त्या आठवणी .

सुंदर लेख! अनेक आठवणी जाग्या झाल्या.

सुंदर लेख! अनेक आठवणी जाग्या झाल्या.

अजया's picture

9 Sep 2016 - 10:39 am | अजया

आजच डोंबिवलीला येऊन गौरी सोहळा अनुभवते आहे खूप वर्षांनी.आणि तुझा हा लेख वाचला मितान.अतिशय प्रसन्न वाटलं वाचून.

रुस्तम's picture

12 Sep 2016 - 9:22 am | रुस्तम

पेण तालुक्यातील वाशी, वढाव (गावांची नावे) खारेपाट विभागात गौऱ्या (गौरीचा नवरा) बसावतात.

नूतन सावंत's picture

12 Sep 2016 - 9:57 am | नूतन सावंत

माझ्या माहेरीही गौरी येतात त्याच रात्री बारात बजता तिला घेऊन जायला,मुराळी म्हणून आलेल्या शंकराची स्थापना होते.दुसऱ्यादिवशी लेक जावयाचे लाड असतात.

नूतन सावंत's picture

12 Sep 2016 - 9:54 am | नूतन सावंत

सुरेख चित्रदर्शी लेख,मितान.पुढचा भाग लिहिला आहेस का?असेल तर दुवा नि नसेल तर त्याच्या प्रतीक्षेत.

डिट्टो वर्णन! आमच्याकडे पण महालक्ष्या अशाच हसत हसत येतात :)

अर्धवटराव's picture

12 Sep 2016 - 11:49 am | अर्धवटराव

नो मोबाइल नो टिव्हीचे ते दिवस... खरच किती गोड होते :)
तो गोडवा आजही जपता येईल... काळानुरूप बदल केले म्हणजे झाले.

स्मिता चौगुले's picture

12 Sep 2016 - 12:26 pm | स्मिता चौगुले

खूप छान लिहिले आहे.

पूर्वाविवेक's picture

13 Sep 2016 - 3:00 pm | पूर्वाविवेक

छान लिहिलं आहेस. माझे पण जुन्या आठवणींनी डोळे पाणावले.
आमच्याकडे कोकणात एकच गौर असते. फार कमी घरात ज्या दिवशी विसर्जन असते त्या दिवशी 'महालक्ष्मी' चा हा विधी असतो. आजोबा सकाळीच 21 प्रकारच्या पत्री गोळा करायला पाठवायचे. आजोबा मूकपणे गाठी बांधायचे. पूजा पूर्ण होईपर्यत एकही शब्द बोलायचे नाहीत पण आम्ही गडबड केली तर डोळे वटारून पहायचे.....अगदी हेच आठवलं आता.

सविता००१'s picture

13 Sep 2016 - 3:45 pm | सविता००१

फार सुरेख लेख. अगदी संग्राह्य.