भारतीय आहाराला चौरस आहार मानले जाते. तुम्ही जर आपला आहार खोलवर जाउन पाहिला तर तुम्हाला असे दिसेल की, त्यात कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, ई. ह्याचे योग्य मिश्रण आहे. त्याबरोबरच आयुर्वेदात वर्णन केलेले व सणवाराला खाण्याचे पदार्थ पाहिले असता, त्या त्या ऋतूत मानवाला आरोग्यास मदत होइल असे पदार्थ सुचवलेले आहेत. इतका बारीक अभ्यास कोणत्या संस्कृतीत आहे?
विचार करा, जेव्हा "अग्री"कल्चर" हे एक कल्चर नव्हते, तेव्हाचा मानव खाद्यपदार्थ कोणते असावेत, कोणते नसावेत ह्याचा कसा निर्णय घेत असेल? अर्थातच प्रयोगातून आणि वेळ्प्रसंगी जीवाची किंमत मोजून तो ते शिकला असेल. आज लाखो वनस्पती भूतलावर असतांना आपल्याला ह्याचे ज्ञान झाले आहे की, काय खावे आणि काय खाउ नये. आपल्याला आज नेमके माहित आहे की कोणत्या भाज्या, धान्ये, औषधी वनस्पती, फळे, फळभाज्या खाव्यात; काय खाल्यावर बाधते, वगैरे. नुसतेच हेच नव्हे तर ते पदार्थ भाजून, उकडून, तळून, कच्चे कसे खायचे ह्याचेही ज्ञान झाले. ह्या ज्ञानामागे अनेक अज्ञात माणसांनी वेळप्रसंगी जीव गमावला असेल ह्याची कल्पना असणे आवश्यक आहे.
हे ज्या संस्कृतीत घडले नाही त्या संस्कृतीत मांसाहाराच्या वेगवेगळ्या पदार्थांपलिकडे त्यांची झेप गेली नाही. [मांसाहार वाइट की चांगला हा ह्या लेखाचा विषय नाही]. एस्किमोला समोर दिसतोय तो रेन्डियर; तो मांसभक्षी नाही; त्याला काय भ्यायचे; मग मारा त्याला आणि खा- हे ठरवायला काय डोके लागते?
शेती जेव्हा एक संस्कृती बनली, तेव्हा मानवाने समाजात कसे रहायचे ह्याचे ज्ञान मिळवले होते. अशावेळी, एखाद्या धान्याची लागवड कशी करायची ह्याचा विचार त्याने केला असेल व अग्रीकल्चर जन्माला आले असेल. धान्य साठवायचे कसे हे तो शिकला असेल. परंतू त्याही पुढे जाउन, भारतीय संस्कृतीत चौरस आहारचे मॉडेल ज्यांनी मांडले त्यांना नुसत्या अग्रीकल्चरच्याही वरचे ज्ञान असलेच पाहिजे.
२१ व्या शतकात जाउ पहाणाऱ्या मानवाला नुसते चवदार पदार्थ [ह्या एकाच गुणाला किंमत असलेले] खायची जेव्हा इच्छा होते तेव्हा तो स्वतःला "आधूनिक" समजतो असे दिसते. उच्च अशी भारतीय खाद्यसंस्कृती सोडून जगण्याला २१ व्या शतकात जाणे असे असेल तर ते चुकीचे आहे असे नाही का तुम्हाला वाटत? खरे म्हणजे काय खावे आणि कसे खावे ह्याचे साधे ज्ञानही आजच्या कित्येकांना नाही, कारण त्याने फूकट मिळालेले समृद्ध ज्ञान फेकून दिले आहे.
प्रतिक्रिया
2 Feb 2009 - 6:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लेखातला विचार थोडा पटला थोडा नाही पटला!
एस्किमोला समोर दिसतोय तो रेन्डियर; तो मांसभक्षी नाही; त्याला काय भ्यायचे; मग मारा त्याला आणि खा- हे ठरवायला काय डोके लागते?
वर्षांतले पाच ते दहा महिने सगळीकडे बर्फ असताना तिथे गहू, तांदूळ, डाळी, केळी, सीताफळं कशी खाणार (पूर्वी दळणवळणाची साधनं उपलब्ध नसतानाची गोष्ट!) हा मुद्दा संपूर्णपणे दुर्लक्षित आहे.
आपल्याकडेही ऋषी-मुनी मांसभक्षणही करत होतेच
आजच्या काळात जेव्हा घरातली कर्ती स्त्रीसुद्धा दिवसभर घराबाहेर राहून नोकरी करते, आणि घरात तिला कोणीही मदत करत नाही अशा परिस्थितीत जे बनवायला कष्ट कमी ते अधूनमधून खाल्लं जाणारच; फक्त चवदार आहे ते क्वचित कधीतरी खाल्लं जाणारच, नाही का? घरात बनवून त्यांतली सत्त्व जपण्याचा प्रयत्न करता येतो आणि केला जातोच.
ऋतूनुसार आपल्याकडेही आहार बदलतो, पण आपली, विशेषतः शहरांतली, जीवनपद्धती पूर्वीच्या मानाने खूपच बदललेली आहे; त्याच्याशी मिळताजुळता आहार असावा का याबद्दलही आपली मतं वाचायला आवडली असती.
(शेवपुरी आणि बटाटावड्यातले पौष्टीक गुण काय आणि किती असतील याच्या विचारात) अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
2 Feb 2009 - 6:26 pm | त्रास
"आजच्या काळात जेव्हा घरातली कर्ती स्त्रीसुद्धा दिवसभर घराबाहेर राहून नोकरी करते, आणि घरात तिला कोणीही मदत करत नाही अशा परिस्थितीत जे बनवायला कष्ट कमी ते अधूनमधून खाल्लं जाणारच; फक्त चवदार आहे ते क्वचित कधीतरी खाल्लं जाणारच, नाही का? घरात बनवून त्यांतली सत्त्व जपण्याचा प्रयत्न करता येतो आणि केला जातोच."
भाग १ मधे शोधाबद्दल जे विचार मांडले होते ते सर्व अशा गोष्टींसाठी आहेत.
2 Feb 2009 - 6:29 pm | त्रास
"ऋतूनुसार आपल्याकडेही आहार बदलतो, पण आपली, विशेषतः शहरांतली, जीवनपद्धती पूर्वीच्या मानाने खूपच बदललेली आहे; त्याच्याशी मिळताजुळता आहार असावा का याबद्दलही आपली मतं वाचायला आवडली असती."
असे करणे म्हणजे, moving from bad to worst.
2 Feb 2009 - 6:32 pm | त्रास
"आजच्या काळात जेव्हा घरातली कर्ती स्त्रीसुद्धा दिवसभर घराबाहेर राहून नोकरी करते, आणि घरात तिला कोणीही मदत करत नाही"
उद्याच्या भारतीय पुरुषांनी ऐदी बनू नये म्हणून आजच्या मुलांना स्वयंपाक करायला शिकवणे गरजेचे आहे.
2 Feb 2009 - 6:23 pm | त्रास
"एस्किमोला समोर दिसतोय तो रेन्डियर; तो मांसभक्षी नाही; त्याला काय भ्यायचे; मग मारा त्याला आणि खा- हे ठरवायला काय डोके लागते?
वर्षांतले पाच ते दहा महिने सगळीकडे बर्फ असताना तिथे गहू, तांदूळ, डाळी, केळी, सीताफळं कशी खाणार (पूर्वी दळणवळणाची साधनं उपलब्ध नसतानाची गोष्ट!) हा मुद्दा संपूर्णपणे दुर्लक्षित आहे."
तुमचा मुद्दा पटला. एस्किमोऐवजी दुसरे उदा घ्या. on a lighter side, why didn't they migrate to a better place? lazy. :-)
2 Feb 2009 - 6:32 pm | सहज
>इतका बारीक अभ्यास कोणत्या संस्कृतीत आहे?
चायनीज, जपानी, ग्रीक, रोमन/मेडीटरेनीयन सगळ्यांत चांगले सांगणारे पुर्वज होते हो.
तुमचा भारतीय योग, आयुर्वेदबद्दल आदर स्तुत्य आहे पण इतर लोक नुस्ती हाडकाड फोडणारी होती/आहेत असे का?
>२१ व्या शतकात जाउ पहाणाऱ्या मानवाला नुसते चवदार पदार्थ [ह्या एकाच गुणाला किंमत असलेले] खायची जेव्हा इच्छा होते तेव्हा तो स्वतःला "आधूनिक" समजतो असे दिसते.
जगभरच्या सर्वच लोकांना "चांगलेचुंगले" खायला आवडते. यात आधुनिक काय समजले नाही. मधे वाल्याचे आठवते की मनुष्याचा इतक्या वर्षाचा इतिहास बघता निसर्गापुढे टिकुन, इतकी प्रगती करण्याकरता जे अन्नपदार्थ अडाप्ट केले [बरेचदा खुप फॅट असलेले] त्याचा मोठा हात आहे.
2 Feb 2009 - 6:38 pm | त्रास
पुण्यात चीनमधे जाउन आलेले बरेच आहेत व तेथील त्यांच्या अनुभवाबद्दल अनेक गोष्टी माहीती आहेत. त्या ऐकून तुमच्या यादीतील चीनबद्द्ल असहमत.
2 Feb 2009 - 6:44 pm | विंजिनेर
आता मिपावर ३-४ हजार सभासद आहेत. त्यातले १० टक्के लोक घेतले तरी सहजरावांनी सांगितलेल्या सगळ्या संस्कृती एक-एक करून होउन जातील :) वर आणि
बाकी उरेल.
तेव्हा ष्टेप बाय ष्टेप सगळ्यांशी सहमत होण्यापेक्षा घाउकभावात एकदा काय ते होवुंन जावुदे ना :D.
2 Feb 2009 - 10:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुण्यात चीनमधे जाउन आलेले बरेच आहेत व तेथील त्यांच्या अनुभवाबद्दल अनेक गोष्टी माहीती आहेत. त्या ऐकून तुमच्या यादीतील चीनबद्द्ल असहमत.
त्याच चीनमधून पुण्यात आलेले लोकं इथलं जेवण जेवून काही दिवसात कंटाळतात.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
2 Feb 2009 - 6:46 pm | त्रास
"मधे वाल्याचे आठवते की मनुष्याचा इतक्या वर्षाचा इतिहास बघता निसर्गापुढे टिकुन, इतकी प्रगती करण्याकरता जे अन्नपदार्थ अडाप्ट केले [बरेचदा खुप फॅट असलेले] त्याचा मोठा हात आहे."
असेलही बरोबर. त्यामुळेच इतकी मजल मारता आली.
२१०९ साली हेच वाक्य मागच्या १०० वर्षात मात्र काय झाले याबद्दल कसे लिहिले जाइल त्याचा विचार करीत बसलो पण उत्तर मिळाले नाही.
2 Feb 2009 - 6:56 pm | सहज
भारतात सर्वात जास्त हृदयरोग रुग्ण आहेत कि असणार आहेत व मधुमेहाचे वाढते चिंताजनक प्रमाण या पार्श्वभुमीवर ह्या लेखाच्या निमित्ताने जागरुकता, चर्चा झाली तर उत्तम.
2 Feb 2009 - 7:09 pm | त्रास
मी स्वतः महिन्यातून एकदा मासे खातो. चोचले पुरवायला नाही तर, त्यातील अमिगो ऍसिड मिळवायला.
2 Feb 2009 - 7:01 pm | नितिन थत्ते
तेव्हाचा मानव खाद्यपदार्थ कोणते असावेत, कोणते नसावेत ह्याचा कसा निर्णय घेत असेल? अर्थातच प्रयोगातून आणि वेळ्प्रसंगी जीवाची किंमत मोजून तो ते शिकला असेल
काय खावे आणि काय खाऊ नये हे ज्ञान तर प्राण्यांनाही असते.
आपला पारंपरिक आहार समतोल आहे अशी समजूत मोठ्या प्रमाणात आढळते.
परंतु ज्याला आपण पारंपरिक आहार समजतो (भाजी, भात, वरण, कोशिंबीर, चटणी, ताक, तूप, लिंबू, पापड, पोळी वगैरे) तो काही सर्वसामान्य आहार नव्हता. ५०-६० वर्षांपूर्वीपर्यंत भात वरण्/आमटी इतकाच आहार असे. मी स्वतः ३५-४० वर्षांपूर्वी कोकणात आमच्या गावी जात असे तेव्हा आमच्या गावच्या घरी पोळी बनत नसे. माझे आजी आजोबा हे तेथील श्रीमंत म्हणता येतील असेच होते तरीही हेच जेवण बनत असे. आठवड्यात एखाद्या वेळी पोळी, कोशिंबीर, चटणी बनत असे. ही झाली जेवणाची गोष्ट. बाकी नाश्त्यालाही मऊ भातच असे.
भारतातील इतर प्रांतातही हीच परिस्थिती होती. दक्षिणेत आजही भात सांबार हेच जेवण असते. तथाकथित समतोल आहार हा गेल्या ३०-४० वर्षांमध्ये रूढ झालेला आहार आहे.
आपल्या पूर्वजांचे अनाठायी कौतुक आणि त्या अनुषंगाने 'इतरांना' कमी लेखणे नेहमीच बरोबर नसते.
अजून एक उदाहरण देत आहे. काही वर्षांपूर्वी कोलेस्तेरॉल च्या भीतीने लोक शेंगदाण्याच्या तेलाऐवजी सूर्यफुलाचे तेल वापरू लागले. परंतु नव्या संशोधनानुसार शेंगदाण्याचेच तेल चांगले असे आढळले आहे (मी या संशोधनाबद्दल वाचलेले नाही). यावर वैद्य असलेल्या माझ्या एका नातेवाइकाचे म्हणणे "बघा, आमच्या पूर्वजांना हे आधीच माहीत होते". वरवर पाहता त्यांचे हे म्हणणे बरोबर वाटते. पण थोडा अधिक विचार केला तर असे लक्षात येईल की आमच्या ज्या पूर्वजांना हे माहीत होते त्यांनी आपल्या इतर प्रांतातील बांधवांना हे ज्ञान दिलेले दिसत नाही. कारण दक्षिणेतील आणि पूर्वेकडील लोक मात्र पारंपरिक आहारात नारळाच्या/मोहरीच्या तेलाचा वापर करतात. तसेच शेंगदाण्याचे तेल चांगले हे ज्ञान महाराष्ट्राबाहेरील पूर्वजांना झालेले दिसत नाही.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
2 Feb 2009 - 7:13 pm | त्रास
म्हणूनच माझ्या लेखात आयुर्वेदाचा संदर्भ घेतला आहे. सध्या जे खातो ते योग्य आहेच असा माझा दावा नाहीच.
2 Feb 2009 - 7:18 pm | नितिन थत्ते
तसा दावा नसेल तर ठीक. पण लेखातील काही वाक्यातून उदा. "उच्च अशी भारतीय खाद्यसंस्कृती सोडून जगण्याला २१ व्या शतकात जाणे" वगैरे; तसा वास येतो.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
2 Feb 2009 - 7:40 pm | त्रास
१. http://en.wikipedia.org/wiki/Indian_food
२. http://en.wikipedia.org/wiki/Sattvic_diet
2 Feb 2009 - 7:37 pm | आनंद घारे
परंतु ज्याला आपण पारंपरिक आहार समजतो (भाजी, भात, वरण, कोशिंबीर, चटणी, ताक, तूप, लिंबू, पापड, पोळी वगैरे) तो काही सर्वसामान्य आहार नव्हता
अगदी बरोबर. मी लहानपणी लहान गावात राहिलेलो आहे. त्या वेळी दळणवळणाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे सुखवस्तू लोकांच्या घरीसुद्धा असे चौरस जेवण फक्त सणासुदीच्या मेजवानीत असे आणि त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत. त्या काळातील रोजच्या तथाकथित पारंपरिक आहाराच्या मानाने आज शहरातील लोक अधिक पौष्टिक जेवण खातात असा माझे निरीक्षण आहे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
2 Feb 2009 - 7:49 pm | अवलिया
दिव्य असे अमुची खाद्यसंस्कृती
खावुनी घरी हागण्यास दारी
हाय हाय एकविसावे शतक
बाहेर हादडुनी हागतात घरी :)
बाकी चवदार पदार्थ बदल म्हणुन खाण्यास हरकत नाही. घरचे तर रोजचेच असते.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
2 Feb 2009 - 9:11 pm | नितिन थत्ते
=)) =D>
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
4 Feb 2009 - 7:36 am | धनंजय
काय फॉर्मात!
2 Feb 2009 - 7:53 pm | त्रास
हा संदर्भ अनेकांना आवडेल-
http://doctor.ndtv.com/health/nutritivevalue.asp
१०० ग्राम शेंगदाणे आणि तेव्हढेच बदाम यांची तुलना करा.
आहार चौरस का असावा हे ही त्या चार्ट मधुन कळेल.
माझे इतकेच म्हणणे आहे की खातांना विचार करा.
2 Feb 2009 - 7:59 pm | शंकरराव
माझे इतकेच म्हणणे आहे की खातांना विचार करा.
अमान्य.. अपचन होउ शकते. .. वा आणखी काहीही..
खातांना शक्यतो शांतपणे विचार न करता खावे,
काय खायचे आहे त्याची निवड विचारपुर्वक करावी
शंकरराव
2 Feb 2009 - 8:01 pm | त्रास
तुम्ही ते वाक्य योग्य रितीने मांडले आहे. धन्यवाद.
4 Feb 2009 - 3:51 am | शोनू
जगभरात आहाराविषयी, लाइफ स्टाइल अन त्याचा तब्येतीवर होणार्या परिणामाविषयी कितीतरी संशोधन चालत आहे. वेगवेगळ्या देशातील, प्रदेशातील लोकांची खाद्य संस्कृती, गेल्या ५०-७५ वर्षात त्यात झालेले बदल, त्यांचे परिणाम या सगळ्याचा सखोल अभ्यास न करता इकडुन तिकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित निष्कर्ष लिहिलेत.
जपानमधल्या काही बेटांवर जगातले सर्वात जास्त दीर्घजीवी लोक आहेत. ८०-९० वर्षांच्या पलिकडे सुद्धा हे लोक एकटे दुकटे रहातात. घरची , स्वतःची कामे सांभाळतात, थोडा बागबगिचा ठेवतात. ग्रीस मधल्या बेटांवर रहाणार्यांबद्दल सुद्धा अशीच निरिक्षणं आहेत. चिनी जेवणात दूध, दुग्धजन्य पदार्थ अगदी अभावानेच आढळतात. जपानी जेवणात सुद्धा दूध जवळपास नाहीच. दोन्ही जेवणात सामिष पदार्थ असतातच. ग्रीक अन इतर मेडिटेरेनियन स्वैपाकात चीझ मुबलक. फ्रेंच जेवणात क्रीम, बटर मुबलक. पण या सर्व लोकांमधे सर्वसाधारणपणे रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह, स्थूल पणा असे "लाइफ स्टाइल" आजार अतिशय कमी प्रमाणात आहेत.
कुठल्याही समाजात स्थानिक भौगोलिक, सामाजिक परिस्थितीचा खाद्य संकृतीवर परिणाम होणे अपरिहार्य. जिथे जे पिकतं , मुबलक उपलब्ध असतं ते खाल्लं जातं. त्यात एक खाद्य संकृती श्रेष्ठ अन इतर कनिष्ठ असं मानणं काही श्रेयस्कर नाही.
4 Feb 2009 - 12:01 pm | त्रास
तुम्ही आता वरील विचार जसे लिहिले आहेत त्याच आत्मविश्वासाने मी लिहेले आहेत. जसे माझे विचार तुम्हाला एकांगी वाटतात तसे तुमचे मला वाटतात.
4 Feb 2009 - 12:05 pm | सहज
तुम्ही आता तुम्हाला अपेक्षित चौरस आहार कृपया लिहावा.
4 Feb 2009 - 12:18 pm | सुनील
फ्रेंच जेवणात क्रीम, बटर मुबलक. पण या सर्व लोकांमधे सर्वसाधारणपणे रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह, स्थूल पणा असे "लाइफ स्टाइल" आजार अतिशय कमी प्रमाणात आहेत.
याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचे रक्तवारुणीप्राशन!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
4 Feb 2009 - 4:40 pm | शंकरराव
शोनुजी ,
..... त्यात एक खाद्य संकृती श्रेष्ठ अन इतर कनिष्ठ असं मानणं काही श्रेयस्कर नाही.
अभ्यासपूर्ण प्रतिसाद, सहमत.
शंकरराव
4 Feb 2009 - 12:52 pm | साती
संस्कृती आणि आहार याबाबत शोनुशी सहमत.
आयुर्वेदात काही चुकीचे लिहिले आहे असे म्हणायचेच नाही किंबहुना आहाराबाबत लिहिलेले बरोबरच आहे.पण इतरही संस्कृतीत त्या त्या ठिकाणाच्या ऋतुमानाप्रमाणे योग्य आहार सांगितला आहे असे वाटते. एस्किमोने रेनडियरचे मांस खाणे हे ही तिथल्या वातावरणानुसार योग्यच.
सध्या आधुनिक वैद्यकशास्त्र मेडिटेरियन डाएट योग्य असे सांगत आहे.
अवांतर- आदरातिथ्य, भोजन, संस्कार यांबाबत केवळ आमचीच संस्कृती योग्य असे बर्याच जणांना वाटते पण बाकी संस्कृतींचा बारिक अभ्यास केल्यास चांगल्या गोष्टी सार्याच जुन्या संस्कृतीत आहे हे पटते.
अतिअवांतर-- आयुर्वेदिक काळात भारतात शेंगदाणा किंवा शेंगदाणा तेल होते का हो?
साती