फ्रॅन्झ काफ्का.....
३ जुन १९२४ रोजी फ्रॅन्झ काफ्काचा त्या काळातील असाध्य रोगाने म्हणजे टी.बीने मृत्यु झाला.
अजून एका महिन्याने त्याचा ४१वा वाढदिवस साजरा झाला असता.
त्याच्या मृत्युनंतर सापडलेल्या अनेक चिठ्याचपाट्यात त्याने त्याच्या जिवलग मित्राला, मॅक्स ब्रॉडला लिहिलेली पत्रे सापडली. त्यातील एकात तो लिहितो –
‘‘ माझ्या सर्व लिखाणात लिखाण म्हणावे अशी काहीच लिखाणे आहेत. द जजमेंट, द स्टोकर, मेटॅमॉरफॉसिस, पिनल कॉलनी, कन्ट्री डॉक्टर व एक कथा... हंगर आर्टिस्ट... मी जेव्हा ही माझी म्हणावीत अशी पुस्तके/कथा आहेत असे म्हणतो त्याचा अर्थ असा होत नाही की ती छापली जावीत अशी माझी इच्छा आहे. खरे तर ती या भुतलावरुन कायमची नष्ट झाली तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल. आता ती अस्तित्वात आलीच आहेत तर कोणाला ती वाचायची असतील किंवा जवळ बाळगायची असतील तर मी त्याला अडविणार नाही.....’’
या यादीतील ‘मेटॅमॉरफॉसिस’ या एका कथेनेच त्याला जगप्रसिद्ध केले व साहित्याच्या क्षेत्रात त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले. वरील पत्रात त्याने ब्रॉडला त्याची सगळी हस्तलिखिते न वाचता जाळून टाकण्याची विनंतीवजा आदेश दिला होता. तसाच आदेश त्याने त्याच्या एका मैत्रिणीला, डोरा डिमँटला दिला होता व तिने त्याचे कागद जाळण्यास सुरुवातही केली होती नशिबाने ब्रॉडने तो मानला नाही म्हणून तो खजिना जगाला खुला झाला. ब्रॉड लिहितो, ‘त्या काळात फ्रँझने लिहिलेला कागदाचा कपटाही मी जपून ठेवत असे. जाळण्याचा प्रश्नच नव्हता.’ तसे त्याने फ्रॅन्झ काफ्काला १९२३ साली केव्हातरी एका भेटीत तसे स्पष्टच सांगितले होते.
फ्रॅन्झ काफ्कावर त्याच्या वडिलांचा चांगला/वाईट खूपच प्रभाव होता. वडील-मुलगा यांच्यातील नाते व त्यातून उद्भावणाऱ्या संघर्षाचे सावट त्याच्या मनावरुन कधीच गेले नाही. वडिलांबद्दल वाटणारे कुठल्याही मुलाला वाटणारे प्रेम व आदिम काळापासून चालत आलेली दोन नरांमधील इर्षा याच्या कात्रीत सापडलेली त्यांची मने हा एक त्याच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय असावा. किंबहुना त्या नात्यामधे त्याला विशेष रस असावा असे वाटते. सप्टेंबर २२ आणि सप्टेंबर २३ १९१२ या दोन दिवसात त्याने एका तंद्रीमधे "द जजमेंट' ही गोष्ट लिहून काढली. त्याबद्दल तो लिहितो, ‘सलग आठ तास बसून मी मनाच्या एका धुंद अवस्थेत ही कथा लिहून काढली. खरे लिखाण अशा प्रकारेच होते याची आता मला खात्री पटली आहे. जेव्हा तुमचे मन व शरीर तुमच्यापुढे उघडे होते तेव्हाच तुमच्या हातून खरे लिखाण हो़ऊ शकते..... या कथेत वडिलांनी रचलेले कुभांड या वाक्याने त्याच्या कोंडलेल्या भावनेचा स्फोट झालेला आपल्याला जाणवतो...या कथेनंतर काफ्काचा कथाकार म्हणून आत्मविश्वास खूपच वाढलेला दिसतो कारण लगेचच त्याने नंतर मेटॅमॉर्फॉसिस लिहिली......
फ्रॅन्झ काफ्काच्या ९० व्या पुण्यतिथीनिमीत्त त्याच्या द जजमेंट या कथेचा मराठी अनुवाद करत आहे.... आत्ताच्या पिढीला ही आवडेल का नाही हे सांगता येणार नाही. मी कॉलेजमधे असताना आम्ही काफ्कावर चर्चा करायचो. नंतर नंतर हे वेड कमी होत गेलए....कदाचित फ्रँझ काफ्काच्या लिखाणाचा प्रभाव कोणाच्या लिखाणावर आहे हे कळल्यावर ते निदान ही कथा वाचतील तरी......
आल्बर्ट कामू, गॅब्रिएल गार्शिया, जॉं पॉल सार्त्र ही काही नावे ज्यांच्यावर काफ्काच्या लिखाणाचा प्रभाव आढळतो.
काही तज्ञांच्या मते काफ्का SPD चा (शिझॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डर) एक रुग्ण होता. यात माणसाला वैराग्य, एकलकोंडेपणा, भावनिक थंडपणा, इ. ही त्याची लक्षणे आहेत. मला वाटते माणसाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हातरी माणूस याचा शिकार होत असावा... त्यावेळी काफ्काची काही वाक्ये न आठवली तर नवलच...उदा तुमच्या आसपासची जवळची माणसे जेव्हा अशी का वागतात हे जेव्हा तुम्हाला प्रयत्न करुनही उमजत नाही...तेव्हा...
‘‘माझ्या मेंदूत हे जग (सर्व अनुभवासकट) कोंबलेले आहे. त्यापासून मेंदूच्या ठिकऱ्या न होता कशी सुटका करुन घ्यायची हा खरा प्रश्न आहे.....
जेव्हा तुमच्यावर जबरदस्ती केली जाते तेव्हा..
‘‘माझ्या या चार भिंतीमधे मला एखाद्या तुरुंगात कोंडलेल्या विस्थापितासारखे वाटत आहे..... माझे कुटुंबीय मला परके वाटतात आणि त्यांची भाषा मला समजत नाही, उमगत नाही.... आणि माझ्या मनाविरुद्ध ते मला त्यांच्या अनाकलनीय कर्मकांडामधे जबरदस्तीने सामील करुन घेतात......’’
पूर्वी मेटॅमॉरफॉसिसचे भाषांतर केले होते....सापडल्यास तेही इथे टाकण्याचा मानस आहे....तोपर्यंत अलविदा.....
जयंत कुलकर्णी
निवाडा
ले. फ्रॅन्झ काफ्का
अनुवाद : जयंत कुलकर्णी.
वसंतऋतूतील एका रविवारची सकाळ. नदीकाठी मोडकळीस आलेल्या घराच्या रांगेत व्यापारी असलेल्या जॉर्ज बेंडेमानचे घर होते. नदीकाठी वसलेली ती घरे इतकी एकसारखी होती की दाटीवाटीने एकामेकांस घट्ट चिकटलेल्या घरांमधे कुठले घर कुठे संपत होते आणि दुसरे कुठे चालू होत होते हे समजणे कठीण. अशाच एका घरात, पहिल्या मजल्यावरील त्याच्या खोलीत जॉर्जने त्याच्या परदेशी असलेल्या एका जुन्या मित्राला पत्र लिहून नुकतेच हातावेगळे केले होते. त्याने ते शांतपणे तंद्रीत एका लिफाफ्यात घातले. लिखाणाच्या टेबलावर कोपरे टेकवून त्याने आपल्या हनुवटीला आधार दिला व खिडकी बाहेर नजर टाकली. नदी, त्यावरील पूल, त्यामागच्या टेकड्या व पलिकडचा किनारा व त्यावरील हिरवळ त्याला स्पष्ट दिसत होती.
खरे तर ते बघताना त्याचे डोळे बघण्याचे काम करत होते पण त्याच्या मनात त्याच्या मित्राबद्दल विचार चालला होता. त्याचा हा मित्र काही वर्षापूर्वी घराला कंटाळून रशियाला पळून गेला होता. सेंट पिटर्सबर्गमधे त्याचा धंदा बऱ्यापैकी चालत होता पण दुर्दैवाने गेली काही वर्षे मात्र त्याच्या धंद्याला उतरती कळा लागली होती. नेहमीप्रमाणे तोही कोणी भेटत नाही अशी सतत तक्रार करीत असे. प्रथम तो जेव्हा परत आला तेव्हा त्याने दाढी वाढविली होती खरी पण जॉर्जला त्या दाढीमागचा त्याचा चेहरा सहज ओळखू आला होता. त्याचा रशियातील त्याच्या जमातीच्या वसाहतीबरोबर तितकासा संबंध नसल्यामुळे व रशियन कुटुंबाबरोबर तो विशेष मिसळत नसल्यामुळे त्याच्या त्या भागात ओळखीपाळखी कमीच होत्या. या सगळ्यामुळे स्वारीने कायमचे अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतला होता.
आता अशा पळून गेलेल्या माणसाला कोण पत्र लिहिणार? त्याची कींव करणारी बरीच माणसे होती पण मदत करणारे कोणीही नव्हते. त्याला कोणीतरी परत बोलवेला का ? मित्रांची मदत घेऊन तो परत स्थिरस्थावर होईल का ? पण त्याला तसा सल्ला दिला तर त्याचा पराभव झाला आहे हे त्याच्या तोंडावर सांगण्यासारखे झाले असते. परत इतरेजण तो पैसे उडवून परत आला आहे अशी टवाळी करण्यासही कमी करणार नाहीत कारण खरे काय ते फक्त त्याच्या मित्रांनाच माहिती असणार! कदाचित त्याला येथे परत आणणे शक्य होणार नाही. तोही म्हणाला होताच, की त्याच्या देशाशी त्याची नाळ आता तुटली आहे. रशियामधे त्याच्याकडे परका म्हणूनच पाहिले जाते हे जरी खरे असले तरी तो आता परत येण्याचा विचार करु शकत नाही हेही तितकेच खरे. समजा त्याने मित्रांचा सल्ला मानला व तो परत आला आणि जर तो येथे काही कारणांनी राहू शकला नाही तर ? आता रशियामधे तो या देशाचा नागरिक आहे असे सांगू शकत होता. इथे जर रहायचे नाही असे ठरविल्यावर त्याची अवस्था न घर का न घाटका अशी होणार नाही कशावरुन ? त्याची सध्याची अवस्था पाहिल्यास येथे तो धंद्यात यशस्वी होण्याची तशी शक्यता कमीच होती. या सगळ्या कारणांमुळे त्याच्याशी पत्रव्यवहार करताना त्याच्या मनाचा विचार करुनच इकडच्या बातम्या लिहाव्या लागत. त्याला येथे येऊन आता तीन वर्षे झाली होती. यासाठी त्याने कारण दिले होते की रशियामधे सध्या अस्थीर राजकीय वातावरण असल्यामुळे त्याला तेथून हलणे शक्य नाही. पण हजारो रशियन युरोपमधे भटकत होते हेही तितकेच खरे होते. या तीन वर्षात जॉर्जच्या घरातही बऱ्याच घटना घडून गेल्या होत्या. दोन वर्षापूर्वी त्याची आई वारल्यावर तो व त्याचे वडील असे दोघेच घरात रहात होते. अर्थात ही बातमी त्याने त्याच्या मित्राला कळविली होती. त्याचे सांत्वनपर आलेले पत्र इतके कोरडे होते की जॉर्जला वाटले बहुदा आपले दु:ख अंतरामुळे त्याच्यापर्यंत न पोहोचता मधेच विरले असावे. त्यानंतर मात्र जॉर्जने धंद्यात नीट लक्ष घालून बरीच प्रगती साधली होती. कदाचित त्याची आई असताना त्याला वडिलांच्या जुनाट कल्पनांप्रमाणे धंदा करावा लागला असेल म्हणून त्यांची प्रगती कुंठली असावी. आई गेल्यावर मात्र वडिलांनी हळुहळु धंद्यातून लक्ष काढून घेण्यास सुरवात केली व ते खुपच मवाळ झाले. अर्थात त्यांनी पूर्ण लक्ष काढून घेतले होते असे म्हणता येणार नाही कारण नशिबाने धंदा आता जोरात चालला होता. नोकरांची संख्या दुप्पट झाली व उलाढाल पाचपट झाली होती. पुढची प्रगती आता दृष्टिक्षेपात होती.
पण जॉर्जच्या या मित्राला त्याच्या या प्रगतीबद्दल काहीच माहिती नव्हती. जॉर्जची आई जेव्हा वारली तेव्हा त्याच्या सांत्वनपर आलेल्या पत्रात त्याने जॉर्जला रशियात स्थायिक होण्याचा सल्लाही दिला होता. त्यावेळी त्याने जॉर्जच्या फायद्याची जी आकडेवारी सादर केली होती त्यापेक्षा जॉर्जची आत्ताची सांपत्तिक स्थिती खूपच चांगली होती. हे सगळे असताना त्याच्या मित्राला वाईट वाटेल, असुया वाटेल म्हणून जॉर्ज मित्राला स्वत:च्या प्रगतीबद्दल लिहिण्याचे टाळत आला होता. आणि आत्ताही ते सगळे घडून गेल्यावर त्याला लिहायचे हे काही त्याला बरोबर वाट नव्हते.
आजही जॉर्जने त्या पत्रात इकडच्या तिकडच्या गप्पा हाणल्या होत्या उदा. रविवारी निवांत क्षणी सगळ्या जुन्या आठवणी कशा जाग्या होतात इ.इ.... जॉर्जला या मित्राच्या मनात ज्या काही गावाबद्दलच्या पूर्वीपासून चांगल्या वाईट कल्पना होत्या त्याला धक्का लावायचा नव्हता. मागील तीन पत्रात त्याने स्वत:च्या ठरलेल्या लग्नाचा उल्लेखही अत्यंत त्रोटक शब्दात केला होता जेणे करुन त्या बातमीकडे त्याचे विशेष लक्ष जाणार नाही आणि गेलेच तर त्याच्या लक्षात राहणार नाही. खरे तर त्याचा एक महिन्यापूर्वीच फ्रेडा ब्रॅन्डेनफिल्ड नावाच्या एका मुलीशी साखरपूडा झाला होता. फ्रेडा एका सधन कुटुंबातील मुलगी होती. जॉर्जने आपल्या मैत्रिणीला आपल्या या मित्राबद्दल बरेच काही सांगितले होते. विशेषत: त्यांच्या पत्रव्यवहारातून त्यांच्यात जे एक नाते तयार झाले होते त्याबद्दल.
‘म्हणजे तो आपल्या लग्नाला येणार नाही तर ! पण मला तुझ्या सर्व मित्रांबद्दल जाणून घेण्यास निश्चितच आवडेल’’ फ्रेडा म्हणाली.
‘अगं मला त्याला त्रास द्यायचा नाही. मी आग्रह केल्यावर तो कदाचित येईलही पण त्यासाठी त्याला एवढ्या मोठ्या खर्चात टाकावे असे मला वाटत नाही. शिवाय येथे आल्यावर आपल्या संसाराकडे पाहताना त्याला आसूया वाटून तो निराश होईल. ही निराशा दूर न होताच जर तो रशियाला परत गेला तर तेथे तो परत फारच एकटा पडेल. एकटा ! समजतयका मी काय म्हणतोय ते ?
‘पण त्याला दुसऱ्या कोणाकडून आपल्या लग्नाबद्दल कळणार नाही कशावरुन ?’’
‘शक्य आहे. तसे झाले तर ते टाळताही येणार नाही. पण ज्या प्रकारचे आयुष्य तो जगतोय त्यावरुन त्याला ही बातमी इथून कळेल याची शक्यता जवळजवळ नाहीच.’’
‘‘तुला जर असले मित्र असतील तर लग्न तरी कशाला ?’
‘हंऽऽऽऽऽ त्यासाठी आपल्या दोघांनाही जबाबदार धरावे लागेल. पण आता असले विचार करण्यास फार उशीर झालाय असे नाही वाटत तुला ?’’ त्याच्या चुंबनाने गुदमरुन जाताजाता तिने एक वाक्य टाकलेच. ‘‘काहीही असले तरी मला हे विचित्रच वाटते.....काहीतरी चुकतय !’ क्षणभर त्याला वाटले काय होणार आहे त्याला कळवले तर ! पण दुसऱ्याच क्षणी तो मनाशी म्हणाला,
‘जाऊ देत. मी हा असा आहे. आणि त्याच्यासाठी मी स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. काय व्हायचे आहे ते होईल...’
पण त्या रविवारी त्याने लिहिलेल्या पत्रात त्याने ही बातमी त्याच्या मित्राला खालील शब्दात दिलीच.
‘पत्राचा शेवट करण्यासाठी मी एक खास बातमी राखून ठेवली आहे. मी फ्राऊलिन फ्रेड ब्रॅन्डेनफिल्डशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेडा चांगल्या सुसंस्कृत घरातील आहे. तू रशियाला गेल्यानंतर ती आपल्या गावात आली त्यामुळे तुला ती माहीत असण्याची शक्यता नाही. तिच्याबद्दल मी सवीस्तर नंतर केव्हातरी सांगेन पण तुला सांगतो, मी सुखाच्या अत्युच्च शिखरावर आहे. इतके दिवस तुला एक मित्र होता पण आता तुला एक सुखी मित्र आहे असे समज. शिवाय फ्रेडा तुझीही एक चांगली मैत्रीण होईल याची मला खात्री आहे. ती लवकरच तुला पत्र लिहिणार आहे. एका ब्रह्मचारी पुरुषाला एखादी ओळखीची, सुस्वभावी स्त्री मैत्रीण म्हणून मिळणे किती महत्वाचे आहे हे मीही जाणतो. मला तू येथे आम्हाला भेटण्यास येऊ शकत नाहीस याची कल्पना आहे पण मला वाटते सगळ्या अडचणींवर मात करुन तू माझ्या लग्नास हजेरी लावशील. अर्थात तू येण्याचा मनापासून प्रयत्न करशील याची मला खात्री आहे पण शेवटी तुझा व्याप सांभाळून जे योग्य वाटेल ते तू कर.’’
हे पत्र हातात घेऊन जॉर्ज लिखाणाच्या टेबलावर खिडकीबाहेर बघत बराच वेळ बसला होता. रस्त्यावरुन चाललेल्या एका ओळखीच्या माणसाने त्याच्याकडे पाहून हात हलविला पण जॉर्जने तंद्रीत नुसता हात हलविल्यासारखे केले. शेवटी त्याने ते पत्र खिशात टाकले व एक अरुंद बोळ पार करुन तो त्याच्या वडिलांच्या खोलीत आला. गेले कित्येक महिने तो इकडे फिरकलाही नव्हता. तशी त्याला या खोलीला भेट देण्याची आवश्यकता नव्हती कारण वडिलांना तो रोजच धंद्याच्या ठिकाणी भेटत असे. दुपारचे जेवणही एका ठरलेल्या खानवळीत ते एकत्रच घेत असत. संध्याकाळी मात्र ते त्यांना पाहिजे तसा वेळ घालवीत. अर्थात सध्या जॉर्ज त्याच्या मित्रांबरोबर बाहेर जात असे किंवा त्याच्या वाग्दत्तवधूला भेटण्यास जाई. नाहीतर मग ते दिवाणखान्यात आपापली आवडती वर्तमानपत्रे वाचत बसत. हा दिवाणखाना मात्र दोघात एकच होता.
त्या रविवारी स्वच्छ सूर्यप्रकाशातही त्याला ती खोली अंधारी वाटली. साहजिकच आहे. एका मोठ्या भिंतीने सगळा प्रकाश अडविला होता. कोपऱ्यातील एकुलत्या एक खिडकीपाशी त्याचे वडील वर्तमानपत्र चाळीत बसले होते. भिंतीवर त्याच्या आईच्या आठवणींनी गर्दी केली होती. दृष्टीदोष असल्यामुळे त्याच्या वडीलांनी ते वर्तमानपत्र थोडेसे बाजूला धरले होते. कोणाला वाटले असते ते आडून त्यांच्याकडेच पहाताएत. टेबलावर एका बशीत बरीच न्याहरी उरली होती. त्यांनी काही विशेष खाल्लेले दिसत नव्हते.
‘अरे व्वा जॉर्ज का ! ये! ये!’’ खुर्चितून उठत त्यांनी त्याला अभिवादन केले. चालताना त्यांचा गाऊन विलग झाला व त्यांच्या पायात आला.
‘‘ अजूनही किती धिप्पाड वाटतात हे !’’ जॉर्ज मनात म्हणाला.
‘‘इथे असह्य्य अंधार आहे !’’ जॉर्ज तक्रारीच्या सूरात म्हणाला.
‘‘हं पुरेसा अंधार आहे खरा इथे......’
‘आणि शिवाय तुम्ही खिडकीही लावली आहे....’
‘हंऽऽऽऽऽऽऽऽ मला तेच बर्ं वाटतं.....’
‘बाहेर किती मस्त हवा आहे....’जॉर्जने आपले मागचेच तुणतुणे पुढे वाजविले व तो खुर्चीवर बसला. त्याच्या वडिलांनी टेबलावरील काचेच्या ताटल्या उचलल्या व एका कपाटावर ठेवल्या. त्यांच्या हालचालीकडे पहात जॉर्ज म्हणाला,
‘मी तुम्हाला सांगायला आलोय की मी माझ्या लग्नाची बातमी सेंट पिटर्सबर्गला पाठवतोय.’ पुराव्यादाखल त्याने ते पत्र खिशातून थोडेसे बाहेर काढले व परत आत सारले.
‘सेंट पिटर्सबर्गला ?’’
त्यांच्या नजरेला नजर देत जॉर्ज म्हणाला ‘ हो ! माझ्या मित्राला !’ कार्यालयीन वेळेत ते किती वेगळे भासतात ! एक पाय दुसऱ्यावर टाकून बसण्यातही किती भारदस्तपणा आहे....’ तो मनाशी पुटपुटला.
‘‘हं हो ! मित्राला ! तुझ्या मित्राला !’’ शेवटच्या शब्दावर जोर देत ते म्हणाले.
‘‘बाबा ! खरेतर त्याचा विचार करुन मी त्याला ही बातमी सांगणारच नव्हतो पण कोणाकडून तरी कळण्यापेक्षा मीच सांगितलले बरे म्हणून कळवतोय ! तुम्हाला माहीत आहे किती विचित्र माणूस आहे तो.’
‘मग आता तुझा विचार बदललेला दिसतोय !’’
‘‘हो ! मी बराच वेळ यावर विचार केला. तो जर माझा खरा मित्र असेल तर माझ्या आनंदाने तोही आनंदी होईल. मग मात्र मला ही बातमी त्याला सांगितल्याविना रहावले नाही. पण हे पत्र पोस्टात टाकण्याआधी मला तुम्हाला त्याची कल्पना द्यायची होती.’
‘जॉर्ज’’ जॉर्जच्या वडिलांनी दंतहीन जबडा फाकवत त्याला हाक मारली. ‘ शांतपणे ऐक. तू माझ्याकडे आलास ते नुसते हे सांगण्यास नाहीतर त्याबद्दल बोलायला. हा तुझा मोठेपणा आहे, मान्य. पण तू मला काही सांगितले नाहीस तरी चालेल. मला काही जून्या आठवणी उकरुन काढायच्या नाहीत. तुझ्या आईच्या मृत्युनंतर इथे माझ्या मनाविरुद्ध कितीतरी गोष्टी घडल्या. माझी स्मरणशक्ती आता मला दगा देत चालली आहे. शिवाय तुझ्या आईच्या मृत्युने मी खचलोय. पुढे कदाचित मी त्या गोष्टी सांगेनही किंवा सांगणारही नाही. आपल्या धंद्यात मी आता लक्ष घालत नाही तरीपण काही गोष्टी मला समजत नाहीत असा तू ग्रह करुन घेऊ नकोस. कितीतरी महत्वाचे निर्णय तू मला न विचारता घेतोस. त्यापुढे हे पत्र म्हणजे फडतूस बाब आहे. आता मला खरंखरं सांग कशाबद्दल बोलायचे आहे तुला ?’
‘सेंट पिटर्सबर्गला खरेच तुझा मित्र आहे का ?’’
जॉर्ज ते ऐकून अवघडला व उठला.
‘मित्रांचे जाऊदेत बाबा. माझ्या वडिलांना अशा हजार मित्रांची सर येणार नाही. मला काय वाटते सांगू ? तुम्ही तुमच्या प्रकृतीची हेळसांड करता. मी मनापासून बोलतोय ! पण तुमच्या वाढ्त्या वयाची काळजी घेतलीच पाहिजे. धंद्यात मी तुमच्याशिवाय काही करु शकत नाही याची तुम्हाला कल्पना आहे. पण या धंद्यामुळे तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत असेल तर मी उद्या तो कायमचा बंद करतो. पण त्याने काही होणार नाही. आपल्याला तुमची जीवनपद्धती बदलली पाहिजे. आणि हा बदल टोकाचा हवा. तुम्ही बाहेर एवढा उजेड असतान येथे असे अंधारात बसता. न्याहरीला तुम्ही नीट खाता की नाही कोणास ठाऊक ! बाहेर ताज्या हवेत तुम्हाला इतके बरे वाटेल पण तुम्ही इथे या टेबलापाशी कोंदट हवेत स्वत:ला कोंडून घेता. हे असे नाही चालणार. मी आजच डॉक्टरला बोलावून घेतो. ते म्हणतील तसे करु. मला वाटते तुम्ही माझ्या खोलीत रहायला जा. मी येथे येतो. तुमच्या सगळ्या वस्तू मी त्या खोलीत हलवितो. तुम्हाला खोली बदलली आहे असे वाटणारच नाही. पण आत्ता तुम्ही जरा आराम करा. मी तुम्हाला कपडे बदलण्यात मदत करतो. नाहीतर, तुम्ही जर माझ्या खोलीत जाण्यास तयार असाल तर माझ्याच बिछान्यावर झोपा ना ! तेच बरं होईल !’
जॉर्ज वडिलांच्या अगदी जवळ उभा होता व याच्या वडिलांनी हनुवटी श्रांतपणे छातीवर टेकवली होती.
‘जॉर्ज ! ‘ त्यांनी खालच्या आवाजात, न हलता, त्याला हाक मारली. जॉर्जने ते ऐकताच जमिनीवर गुडघे टेकून आपले कान त्यांच्या जवळ आणले. त्यांच्या मोठ्ठाल्या डोळ्यातून विस्फारलेली बुबुळे त्याच्यावर रोखली होती. त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याला ती स्पष्ट दिसत होती.
‘जॉर्ज ! तुझा कोणीही मित्र सेंट पिटर्सबर्गला नाही ! थापा मारतोस आणि आता मलाही ? तुझा मित्र पिटर्सबर्गला कसा असेल ?’
जॉर्जने वडिलांना सावरले व त्यांच्या खांद्यावरुनन गाऊन मागे सरकवला.
‘जरा आठवा ! तीन वर्षापूर्वी तो आपल्याला जाण्यापूर्वी भेटायला आला होता. मला आठवतंय, प्रथम तुम्हाला तो विशेष आवडायचा नाही. मी त्याला दोनदा तुमच्यासमोर आणायचे टाळले. पण मी तुमचे वागणे समजू शकतो. माझा मित्रही तसाच विचित्र होता. पण नंतर तुमची चांगली गट्टी जमली. तुम्ही माझ्या मित्राचे नीट ऐकून घेत आहात त्याच्याशी गप्पा मारताय हे बघून मला तुमचा किती अभिमान वाटला होता तेव्हा. जरा आठवा ! प्रयत्न केलात तर आठवेल तुम्हाला. तो आपल्याला रशियन क्रांतीच्या हकिकती सांगायचा. त्याने पाद्रीची एक गोष्ट सांगितली होती बघा ! तो किव्हला असताना एका रस्त्यावर दंगलीत सापडला होता. तेव्हा त्याने वर पाहिले तर एका गच्चीत एक पाद्री उभा होता ज्याने हातावर चाकूने क्रॉस काढला होता व त्या रक्तबंबाळ पंज्याने तो दंगलखोरांना शांततेचे आवाहन करत होता. ही गोष्ट तुम्हीच दोन तीन वेळा सांगितली आहे.’’
तोपर्यंत जॉर्जने त्याच्या वडिलांना परत बसते केले होते व त्यांचा लोकरीचा पजामा काढला होता. त्यांच्या अंतर्वस्त्रांची अवस्था पाहताच त्याला स्वत:चीच शरम वाटली. त्यांचे कपडे स्वच्छ ठेवण्याची त्याचीच जबाबदारी होती. त्याने ते कपडे वेळेवर बदलायला हवे होते. मनोमन तो खजील झाला. फ्रेडाचा विचार मनात येताच त्याचे डोळे बारीक झाले. त्याने अजून वडिलांबद्दल फ्रेडाशी चर्चाच केली नव्हती. ते दोघेही आजाणतापणे ते एकटेच शेजारच्या खोलीत राहतील असे गृहीत धरुन चालले होते. त्याने जागच्याजागीच वडिलांना त्याच्याबरोबर ठेवायचा ठाम निर्णय घेऊन टाकला. हा निर्णय अधिच घ्यायला हवा होता. ‘उशीर झाला’. तो मनाशी म्हणाला.
त्याने वडिलांना आधार देत त्यांच्या बिछान्यापाशी नेले. अडखळत चालताना त्याला जाणवले की त्याच्या वडिलांनी त्याच्या घड्याळाची साखळी मुठीत धरली आहे. बिछान्यावर वडिलांना ठेवताना तर त्यांनी ती साखळी त्यांच्या मुठीत इतकी घट्ट आवळली की जॉर्जला त्यांना बिछान्यावर ठेवता येईना. पण त्यांना बिछान्यावर ठेवल्यावर मात्र सगळे सुरळीत झाले. त्यांनी स्वत:चे पांघरुण स्वत:च ओढून घेतले. जॉर्जकडे पाहतांना आता त्यांच्या डोळ्यात ओळखीची चमक दिसू लागली.
‘आठवला ना तुम्हाला तो माझा मित्र आता ?’ जॉर्जने विचारले.
‘माझ्या पायावर नीट पांघरुण आहे ना ? त्यांनी विचारले जणू त्यांना त्यांचे पाय दिसत नव्हते.
‘बिछान्यात तुम्हाला बरं वाटतय अस्ं दिसतय !’
‘माझे पांघरुण ठीक आहे ना ?’ जॉर्जच्या वडिलांनी परत एकदा विचारले. त्यांना त्यांच्या प्रश्र्नाचे उत्तर पाहिजे होते.
‘काळजी करु नका ! मी नीट खोचले आहे.’ जॉर्जने पांघरुन त्यांच्या पायाखाली खोचून उत्तर दिले.
‘नाही ! खोटे बोलू नकोस’ असे म्हणून त्यांनी किंचाळत सर्वशक्तीनिशी ते पांघरुण अंगावरुन भिरकावून दिले. त्याच तिरीमिरीत ते बिछान्यावर ताठ उभे राहिले. तोल सावरण्यासाठी त्यांनी एक हात छताला लावला.
‘तुला माझ्यावर कायमचे पांघरुण घालायचे आहे. होय ना ? पण लक्षात ठेव त्याला अजून बराच वेळ आहे. माझ्या अंगात अजून पुरेशी शक्ती आहे लक्षात ठेव ! प्रश्न उरला तुझ्या मित्राचा ! हो मला चांगलाच आठवतोय तो ! माझा मुलासारखाच होता तो. म्हणून तर तू त्याच्याशी गेले तीन वर्षे खेळ करीत होतास की काय ? नशीब देवाने बापांना मुलांना ओळखण्याची ताकद दिली आहे. तुला काय वाटते, मला त्याच्याबद्दल वाईट वाटत नाही ? आणि म्हणून तू स्वत:ला कामात बुडवून टकले होतेस ? साहेब कामात आहेत, त्यांनी कोणालाही आत सोडू नका असे सांगितले आहे.....हे सगळे तुला त्याला खोटीनाटी पत्रे लिहावयास संधी मिळावी म्हणूनच ना ? आता तुला वाटते आहे की तो आता इतका चिखलात रुतला आहे की तू त्याच्या डोक्यावर आरामात पाय ठेऊन पलिकडे जाऊ शकतोस होय ना ? हे सगळे झाल्यावर आता लग्न करायचा विचार ! व्वा ! छान !’’
वडिलांनी रचलेल्या या कुभांडाने जॉर्ज चकित झाला.
त्याचा रशियातील मित्र जो वडिलांना आता चांगलाच आठवू लागला होता त्याच्या कल्पनेत भराऱ्या घेऊ लागला. रशियाच्या अवाढव्य पसरलेल्या जमिनीवर हरवलेला तो.....तुटलेल्या लुटलेल्या रिकाम्या दुकानाच्या दारात उभा असलेला तो... खळकन फुटलेल्या काचेच्या तुकड्यात उभा असलेला तो.... तुटलेले आरसे, कोसळत असलेल्या भिंतीला टेकून उभा असलेला तो..... का गेला तो रशियाला ? त्याने स्वत:लाच प्रश्न विचारला.
‘माझ्याकडे लक्ष दे ! ’ त्याचे वडील ओरडले आणि सवयीनुसार जॉर्ज पुढे धावणार तेवढ्यात तो थबकला.
‘तिने भुरळ घातली की तू भुललास. असे म्हणताना त्यांनी तमाशात नाचणाऱ्या बाईसारखे हविर्भाव केले. ते करताना त्यांनी त्यांचा कुडता वर उचलला. एवढा की त्याला त्यांच्या मांडीवरची युद्धात झालेली जखम स्पष्ट दिसली. तू आईला विसरलास, मित्राला रशियात टाकलेस व मला म्हाताऱ्याला या बिछान्यात टाकलेस. आता तू तिच्याशी लग्न करण्यास मोकळा. पण मी अजून ठणठणीत आहे ! ठणठणीत ! असे म्हणून त्यांनी त्यांचे पाय लाथ घातल्यासारखे हवेत झाडले. कसल्याशा विचारांनी त्यांचे डोळे विचित्रपणे चमकत होते.
जॉर्जने वडिलांपासून शक्यतेवढ्या दूर एका कोपऱ्याचा आधार घेतला. काही काळापूर्वी त्याने त्या खोलीत होणाऱ्या प्रत्येक हालचाली बार्काईने पहाण्याचा निश्चय केला होता. हो ! उगच एखाद्या बेसावध क्षणी हल्ला व्हायला नको. या क्षणी त्याने विसरलेला निश्चय आठवला परंतू त्या दृष्टीने काही हालचाल करण्याआधीच तो ते विसरला. कमी दिसणाऱ्या माणसाची सुईच्या अग्रातून दोरा ओवताना जशी अवस्था होते तशी त्याची अवस्था झाली होती.
‘पण तुझ्या मित्राचा विश्वासघात झालेलाच नाही हे लक्षात ठेव ! बोटांनी सुरी खुपसल्याचा आविर्भाव करत त्याचे वडील किंचाळले. ‘मी होतो ना येथे त्याचा प्रतिनिधी म्हणून.’
‘‘जोकर’’ जॉर्जच्या तोंडून शब्द निसटले. त्याच क्षणी त्याला त्याच्या शब्दाने होणाऱ्या हानीचा अंदाज आला पण आता उशीर झाला होता.
‘हो ! हो ! चांगली उपमा आहे. नाहीतरी मी काय करु शकत होतो ? सांग ना मला. आणि उत्तर देताना तू माझा मुलगा आहेस हे विसरु नकोस. मी आणखी काय करु शकत होतो ? माझ्या अंधाऱ्या खोलीत ? माझ्या विश्वासघातकी नोकरांबरोबर कार्यालयात ? ज्याच्या हाडात एखाद्या रोगासारखे वृद्धपण मुरलेले आहे तो आणखी काय करु शकतो ? माझा मुलगा मी उभा केलेला धंदा चालवतोय, मिरवतोय, हसतोय आणि त्याच वेळी त्याच्या म्हाताऱ्या बापाचे तोंड चुकवतोय ! तुला काय वाटते माझे तुझ्यावर प्रेम नाही ? तुझ्यावर ? जो माझ्याच रक्तामासाचा आहे ?
आता ते पुढे झुकतील ‘जॉर्जने विचार केला. जर ते पडले तर मात्र पंचाईत होईल.’ हे विचार त्याच्या मनातून सळसळत गेल आणि त्याचे वडील पुढे झुकलेच पण पडले नाहीत. जॉर्ज त्यांना सावरण्यास पुढे आला नाही हे पाहताच ते परत सरळ झाले.
‘‘दूर हो माझ्यापासून ! गरज नाही मला तुझी. तुला काय वाटले तुझ्या अंगात मला सावरण्याइतकी शक्ती आहे ? पण माझ्यात अजूनही तुझ्यापेक्षा जास्त ताकद आहे. तुझ्या आईने तेवढी ताकद मला दिली आहे. मी तुझ्या मित्राशी संपर्क त्याचमुळे साधला आणि तुझी गिऱ्हाईके ही इथे माझ्या खिशात आहेत.
‘म्हाताऱ्याच्या आतल्या बंडीलाही खिसे आहेत’ जॉर्ज मनातल्यामनात म्हणाला. पण त्याला खात्री होती की असा टोमणा वडिलांना मारणाऱ्याचा जगात तिरस्कारच झाला असता. क्षणभरच हा विचार त्याच्या मनात चमकून गेला आणि तो ते विसरला सुद्धा.
‘‘तुझ्या बायकोला तू इथे घेऊन ये बघ मी तिची काय अवस्था करतो ते. हो ! तुझ्या समोर !’’ ते ऐकताच जॉर्जचा चेहरा पांढराफटक पडला. त्याच्या वडिलांनी तो ज्या कोपऱ्यात अंग चोरुन बसला होता त्याकडे फक्त एक नजर टाकली.
‘तू मला आज तुझ्या लग्नाची बातमी तुझ्या मित्राला सांगू का म्हणून विचारायला आला आहेस पण मुर्ख मुला, त्याला ही बातमी आधीच माहीत आहे. त्याला सगळेच माहीत आहे. म्हणूनच तो इतकी वर्षे इकडे फिरकला नाही. मीच त्याला लिहित होतो. तू माझ्या येथून कागद व पेन जप्त करायला विसरलास ! तुला जे माहिती आहे त्याच्या पेक्षा त्याला शतपटीने माहिती आहे. तुझी पत्रे तो एका हाताने न वाचता चुरगाळत होता तर दुसऱ्या हाताने मी लिहिलेली वाचत होता. समजले ?...
‘‘शतपटीने कशाला हजार पटीने म्हणा की !’’ जॉर्ज हेटाळणीच्या स्वरात म्हणणार, पण त्याचे ते शब्द घशातच थिजले.
‘गेली कित्येक वर्षे मी मी तुझ्या असल्या प्रश्नाची वाट पहात होतो. दुसरे काही मला सुचतच नव्हते. मी वर्तमानपत्रेही वाचत नव्हतो. हे बघ’’ असे म्हणून त्यांनी जॉर्जच्या अंगावर एक वर्तमानपत्र फेकले. एक जुने वर्तमानपत्र ज्याचे नावही त्याला माहीत नव्हते.
‘‘कधी मोठा होणार तू ? तुला वाढविताना तुझी आई मेली, मित्र रशियात सडतोय....अणि माझी अवस्था तू बघतोच आहेस.
‘‘म्हणजे तुम्ही यासाठी माझी वाट बघत होता तर !’’ जॉर्ज किंचाळला.
‘‘हे शहाणपण तुला आधीच सुचले असते तर बरे झाले असते. पण आता त्याला काही महत्व उरले नाही’’ मग आवाज चढवून ते म्हणाले,
‘‘आता तुला तुझ्याबरोबर इतर जगाचे अस्तित्वही लक्षात आले असेल. आत्तापर्यंत तुला स्वत:पलिकडचे जग माहीत नव्हते. एखाद्या लहान मुलाप्रमाणे. हो होतास तू तसा मान्य ! पण आता तुला सैतानाने पछाडले आहे म्हणून नीट कान देऊन ऐक, ‘‘मी तुला पाण्यात बुडून मरायची शिक्षा देतो. शाप देतो.’’
जॉर्जला कधी एकदा त्या खोलीतून बाहेर पडतोय असे झाले होते. बाहेर पळत येताना त्याला त्याचे वडील पलंगावर पडतानाचा आवाज आला, मात्र त्याने त्याचा वेग अजून वाढविला. घसरगुंडीवरुन घसरावे तशा तो त्या पायऱ्या उतरला. उतरताना तो मोलकरणीवर आदळणारच होता...‘ अरे देवा’ ती किंचाळली व तिने आपले तोंड पदराने झाकून घेतले पण तो तेवढ्यात तेथून बाहेर पडला होता. पुढच्या दरवाजातून त्याने सरळ नदीची वाट पकडली. एखाद्या भुकेलेल्या माणसाने मिळालेली भीक हातात घट्ट पकडावी तसे त्याने पुलाचा कठडा हातात पकडला. एखाद्या कसरतपटूसारखा त्याने एक झोका घेतला. एके काळी त्याचा हा खेळ त्याच्या पालकांचा अभिमानाचा विषय होता म्हणा ! कठड्यामधून त्याला दिसले की पुलावरुन एक बस जाणार आहे व त्या बसच्या आवाजात नदीत काही पडल्याचा आवाजही कोणाला येणार नाही.
बसचा आवाज जवळ येऊ लागला तसे त्याच्या तोंडातून अस्पष्ट शब्द उमटू लगले; आई बाबा, माझे तुमच्यावर ह्रद्यापासून प्रेम होते आणि आजही आहे.’’ असे म्हणून त्याने त्याचे हात कठड्यावरुन सोडून दिले.
त्याच वेळी वाहनांचा एक मोठा लोंढा त्या पुलावरुन जात होता.........
जयंत कुलकर्णी
या लिखाणाचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन....
प्रतिक्रिया
15 May 2015 - 12:58 pm | मराठी_माणूस
फ्रॅन्झ काफ्का च्या माहीती बद्दल धन्यवाद.
ह्या कथेचे मर्म उलगडुन सांगाल का ?
15 May 2015 - 1:59 pm | जयंत कुलकर्णी
http://courses.washington.edu/freudlit/Judgment.Notes.html
15 May 2015 - 2:32 pm | अन्या दातार
अप्रतिम कथा. पुभाप्र
15 May 2015 - 5:48 pm | मोहनराव
+१
15 May 2015 - 6:48 pm | राही
आपला हा उपक्रम आवडला आहे . या निमित्ताने प्रतिभावंत परदेशी लेखकांचे दर्शन होते आहे, नव्याने ओळख होते आहे.
काफ्का बद्दल एक छोटीशी माझी आठवण. काफ्काचे 'फेर्वांड्लुंग' मुळातून वाचता यावे म्हणून काही काळ जर्मन शिकण्याचा खटाटोप एकेकाळी केला होता.
जज्मेंट ची ओळख आवडली.
15 May 2015 - 7:14 pm | चुकलामाकला
अनुवाद आवडला. काफ्काची ही कथा पूर्वी वाचली तेव्हा कळली नव्हती . तुम्ही दिलेल्या लिन्कमुळे थोडीशी कळली. :)
पण मेटामॉर्फॉसिस अफलातुन आहे.
पु.भा.प्र.
15 May 2015 - 8:59 pm | सानिकास्वप्निल
फ्रॅन्झ काफ्काची माहिती व कथेचा अनुवाद आवडला.
द जजमेंट मिळवून नक्की वाचेन .
धन्यवाद.
17 May 2015 - 7:53 am | शिव कन्या
या सगळ्या अस्तित्व वादी , absurdist विचारवंतांची आणि बौद्ध तत्वांची सांगड नवीन पिढीला समजेल अशा भाषेत लिहिणे गरजेचे आहे.
17 May 2015 - 9:08 am | पिंपातला उंदीर
निव्वळ अप्रतिम काका
7 Sep 2016 - 1:21 pm | पैसा
सुरेख अनुवाद. काफ्का ची माहितीसुद्धा इंटरेस्टिंग आहे.
7 Sep 2016 - 2:32 pm | नीलमोहर
मेटामॉर्फॉसिस पण खतरनाक आहे, तीही साधारण अशीच कथा, मात्र फॅन्टसी मिसळलेली,
त्यातही त्याचे कुटुंबाबरोबरचे कॉम्प्लेक्स नाते दाखवले आहे,
काफ्काचे इतर लिखाण वाचण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते बरंच क्लिष्ट आणि अगम्य वाटल्यामुळे राहून गेलं,
8 Sep 2016 - 10:47 am | सानझरी
तुम्ही हा अनुवाद सरळ जर्मन भाषेतून केला की इंग्रजीतून?
अनुवादाचा अभ्यास म्हणून मुळ जर्मन, इंग्लिश आणि तुमचा हा मराठीतला लेख वाचुन काढला. 'अनुवाद कसा असवा' याचा हा लेख म्हणजे उत्तम नमुना. असेच लिहीत रहा.
8 Sep 2016 - 2:57 pm | जयंत कुलकर्णी
अरे व्वा ! जर्मन भाषा येणार्या वाचकानी दिलेला हा प्रतिसाद मी मोलाचा मानतो. मी इंग्रजी भाषेतूनच अनुवाद केला आहे...
धन्यवाद ! अर्थात मला वाटते जर्मन समाजजिवन व भाषा ही मराठीला तशी जवळची असल्यामुळे अजाणता हा अनुवाद जर्मनभाषेच्या जवळचा झाला असावा..... माहीत नाही... :-)
8 Sep 2016 - 4:27 pm | सानझरी
अनुवाद कसा करावा\असावा याचा अभ्यास करण्यासाठी मी काही Dual-Language Books घेतले होते. ते वाचल्यावर कळलं की अनुवाद करणं प्रचंड अवघड काम आहे. शब्द वाचुन ते आपल्याला कळणं वेगळं आणि ते दुसर्या भाषेत उतरवणं वेगळं.
बहुतेक वेळेला अनुवादाचा अनुवाद केला की त्यातलं मर्म हरवतं पण इथे तसं काही झालं नाहिये. उत्तम अनुवाद.
तुम्हाला दंडवत.
-अनुवाद करण्यास सदा घाबरलेली सानझरी