YZ असे विचित्र टायटल का असा प्रश्न टायटल बघून रसिकांना पडू शकतो आणि ते योग्यही आहे कारण YZ हे दोन लेटर्स एका मराठी शिवीचा अपभ्रंश आहेत ज्याचा एक अर्थ साध्या शब्दांत होतो "बावळट". कल्पक लेखक क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांचे हि जगावेगळी हिंमत दाखवल्याबद्दल अभिनंदन आणि नंतर या टायटलचे समर्पक एक्सप्लेनेशन कथेत दिल्याबद्दल कौतुक. कधी कधी जाणवणारी एक मानसिक सणक जेंव्हा "किक" या नावाने हिंदीत येते आणि आमचेच मराठी लोक उचलून धरतात तेंव्हा आम्ही मराठी जनांनी असा प्रयत्न करायला काय हरकत आहे? असाच काहीसा विचार या जोडीने केला असेल आणि जन्माला आला YZ. काय नि कसे हे बघण्यासाठी सिनेमा बघावा कारण YZ चे कारण यावर अख्खी कथा उभी आहे सिनेमाची.
अबब\गजानन कुलकर्णी (सागर देशमुख) या एका लग्नाळलेल्या वराची कथा तीन अभिनेत्र्यांच्या कोनाने फिरून शेवटी संपते म्हणजे YZ . सागर देशमुखच्याच साथीने अक्षय टाकसाळे उर्फ बत्तीस याने ज्या यशस्वीपणे कथा पेलून दाखवलेली आहे त्यासाठी त्याचे विषेश कौतुक. मला वाटते हा अक्षयचा पहिलाच प्रयत्न असावा आणि जर पहिलाच असेल तर मराठी चित्रपट सृष्टीत एका उत्तम अभिनेत्याचे आगमन झाल्याचे तो सिद्ध करतो.
या तीन जरी अभिनेत्र्या असल्या तरी लेखक क्षितिज पटवर्धन याने व्यवस्थित कथा मांडलेली आहे जेणेकरून रसिकांचा उत्साह टिकून राहावा. प्रत्येक भिन्नलिंगी व्यक्ती हा लग्नासाठी बायको किंवा नवरा शोधताना एक विशिष्ट अपेक्षा आपल्या मनाशी निर्माण करीत असतो. मग जे प्रपोजल्स येतात ते आपल्या मनाशी निर्माण केलेल्या अपेक्षांशी ताडून त्या प्रतिमेला शोधण्याचा प्रयत्न करतो. लव्ह मॅरेज नावाच्या कल्पनांत नशिबवानाना हि प्रतिमा गवसलेली असते आणि अरेंज मॅरेज वाले हि प्रतिमा शोधताना जी प्रतिमा भेटते त्याच व्यक्तीत आपल्या मनातील प्रतिमा शोधतात. खूप मोठी कल्पना आहे हि पण लेखक क्षितिज पटवर्धन याचे खरोखर कौतुक कारण त्याने एका नाटकवाल्याच्या शिताफीने कथेची मांडणी केलेली आहे. मला माहित नाही कि क्षितिज नाटक लिहितो का ते पण नसेल तर त्याने नक्की लिहावे कारण त्याला प्रसंगानुरूप कथेची अंतरात्मा वळवण्याची हातोटी गवसलेली आहे माझ्यामते.
समीर विद्वांस हे YZ चे दिग्दर्शक. त्यांचे या कठीण कल्पनेला तीन तासांच्या तुटपुंज्या वेळात लेखकाच्या साथीने प्रेक्षकांच्या गळी उतरवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.वास्तविक बघता इतकी कठीण कल्पना आहे हि कि प्रेक्षक कन्फ्युज होण्याची पुरेपूर संधी आहे\होती. पण तरीही समीरजीनी हिमतीने हि कल्पना यशस्वीपणे पेलून दाखवली. कोठेही बोट दाखवता येणार नाही या दुर्मिळ व्यवस्थितपणे.
ऋषिकेश-सौरभ आणि जसराज हे तीन संगीतकार चित्रपटाला लाभलेत. दोन गाणे अन तीन संगीतकार. यातील जसराज हे नाव पंडित जसराज यांचे असावे अशी मला दाट शंका आहे कारण केतकी माटेगावकर आणि स्वप्नील बांदोडकर यांचे 'प्रियकरा' हे गाणे पूर्ण अस्खलित संस्कृतमध्ये आहे. शाकुंतल या नाटकातील कालिदासाच्या नाटकातील हे गाणे असल्याचा संदर्भ मला नेटवर फिरताना सापडला. या अस्खलित संस्कृत मधील गाण्यासाठी केतकी अन स्वप्नील या दोघांचेही विशेष अभिनंदन कारण त्या दोघांनीही हे गाणे समर्पकपणे पेलून दाखवले.
सागर देशमुख याने साकारलेला गज्या हा व्यक्ती आपल्याला रोजच्या जीवनात भेटणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीत कुठे-ना-कुठे लपलेला आढळतो. पण आपल्यातील भावनांना वाट मोकळी करून देणारा गज्या हा शेकडोंपैकी एखादाच असतो. 'लोक काय म्हणतील' या कन्सेप्ट खाली बाकी आपल्याला दिसणारे शेकडो गज्या दबून जातात. हि लेखकाला अपेक्षित कल्पना मला पटली अन आवडली म्हणून मी दिग्दर्शन-क्षितिज पटवर्धनची लेखणी अन मुख्य म्हणजे केतकी व स्वप्नीलचे एकमेव अस्खलित संस्कृत मधील गाणे यासाठी चित्रपटाला साडेतीन (3 1/2) * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
प्रतिक्रिया
20 Aug 2016 - 10:46 pm | माम्लेदारचा पन्खा
पूर्वार्ध उत्तरार्धापेक्षा जास्त उल्हासित वाटला....सागर देशमुख ३३ चा वाटत नाही...गाणी श्रवणीय....अक्षय टाकसाळे मस्तच !
20 Aug 2016 - 10:47 pm | पद्मावति
छान आहे परीक्षण. चित्रपट पाहायला नक्की आवडेल.
20 Aug 2016 - 10:50 pm | एस
परीक्षण नेहमीप्रमाणेच उत्तम.
20 Aug 2016 - 11:12 pm | मुक्त विहारि
परीक्षण आवडले...
21 Aug 2016 - 12:55 am | समीर_happy go lucky
सगळ्यांचे धन्यवाद
21 Aug 2016 - 11:42 am | क्षमस्व
आवडलं।
22 Aug 2016 - 4:04 pm | जगप्रवासी
चित्रपट पाहिला पण तितकासा आवडला नाही. कथा म्हणावी तशी पकडचं घेत नाही. सागर देशमुख स्वतःच्या कोषातून बाहेर निघेल आणि काहीतरी छान पाहायला मिळेल असं पूर्ण चित्रपट पाहत असताना वाटलं पण काही घडतच नाही, चित्रपट एका संथ लयीत चालत राहतो त्यामुळे रटाळवाणा वाटतो. त्यातल्या त्यात अक्षयने चांगलं काम केलं आहे आणि "प्रियकरा" गाणं उत्तम आहे.
22 Aug 2016 - 4:05 pm | जगप्रवासी
अरे हो सांगायचं राहून गेलं, परीक्षण छान प्रकारे लिहलंय.
22 Aug 2016 - 9:26 pm | समीर_happy go lucky
धन्यवाद
22 Aug 2016 - 5:06 pm | गॅरी ट्रुमन
मलाही हा चित्रपट विशेष आवडला नाही. सुरवातीला "क्विन" मध्ये दाखविले आहे त्याप्रमाणे नायक एकदम कात टाकेल असे वाटले होते. पण तसे होताना दिसले नाही.आणि सई ताम्हनकरला दोन वेण्या असलेली एकदम बोअर भूमिका तितकीशी सूट झाली नाही असे वाटले. पूर्वार्धामध्ये थोडे तरी हसायला आले होते पण उत्तरार्ध मात्र अगदीच रटाळ आणि कंटाळवाणा वाटला.
चित्रपट विशेष आवडला नाही पण परिक्षण नक्कीच आवडले.
22 Aug 2016 - 9:26 pm | समीर_happy go lucky
धन्यवाद
22 Aug 2016 - 6:00 pm | सूड
परिक्षा वैगरेच्या गोंधळात बघायचा राहून गेला. आता बघायला मिळेल का ही शंका आहे.
22 Aug 2016 - 9:27 pm | समीर_happy go lucky
अजूनही सुरु आहे कदाचित चालतोय बऱ्यापैकी, ट्राय करा टायमिंग जुळवण्याचा
23 Aug 2016 - 1:53 pm | पैसा
चांगले परीक्षण. एकदा बघायला सिनेमा ठीक दिसतो आहे.
23 Aug 2016 - 5:31 pm | स्वाती दिनेश
चांगले.
ह्यातील संगीतकारांपैकी जसराज हा जसराज जोशी नावाचा तरुण आहे.
स्वाती