पुणेकर मित्र मैत्रिणिंनो,
दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी तातडीने ४० लेखनिकांची (स्क्राईब्ज) आवश्यकता आहे.
२३, २४, २६ आणि २७ ऑगस्ट ह्या तारखांना दुपारी १२ ते १ आणि २ ते ३, तर २४ ऑगस्टला दुपारी २ ते ४ अशा परिक्षांच्या वेळा आहेत. लेखनाचे माध्यम मराठी असून लेखनिकांसाठी वयाची अट नाही.
ज्यांना शक्य होणार असेल, त्या इच्छूक मंडळींनी कृपया तातडीने माझ्याशी संपर्क साधावा. वेळापत्रक, शाळेचा पत्ता, इतर लेखनिकांचे संपर्क आणि काही आवश्यक जुजबी माहिती, इत्यादी तपशील प्रत्यक्ष बोलून आणि वैयक्तिक संपर्कातून देता येतील.
परिक्षार्थींना प्रश्न वाचून दाखवणे, त्यांनी दिलेले उत्तर मराठीमध्ये उत्तरपत्रिकेत लिहिणे असे साधारण शालेय पातळीवरील लेखनिकांच्या मदतीचे स्वरूप आहे. ह्या वयोगटासाठी केवळ वाचणे आणि लिहिता येणे ह्या कौशल्यांची गरज आहे.
इच्छूक लेखनिकांनी परिक्षाकेंद्रावर स्वतःच जायचे आहे आणि ह्या सेवेचा कोणताही मोबदला नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी. शासनाकडून अशा लेखनिकांसाठी काही नगण्य मोबदला दिला जातो, तो हवा असल्यास आपापल्या पातळीवर प्रयत्न करण्यास हरकत नाही.
लेखनिकांची विविध वयोगटांसाठी, विविध परिक्षांसाठी आणि विविध गावांमध्ये वरचेवर आवश्यकता असते. परिक्षेच्या प्रकारानुसार लेखनिकांच्या मदतीच्या स्वरुपात बदल होतात. ज्यांना वरील कालावधीसाठी शक्य नाही, मात्र इतर वेळी कधी ते उपलब्ध होऊ शकणार असतील, तरीसुद्धा संपर्क साधावा. त्यांच्या मदतीचा खुप उपयोग होऊ शकेल.
अनेक आवाहने करूनही अजूनही पुरेसे लेखनिक उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. ह्यासंदर्भात काही उपयुक्त सल्ले आल्यासही बरे होईल.
मनःपुर्वक धन्यवाद.
प्रतिक्रिया
19 Aug 2016 - 1:31 am | आदूबाळ
या उपक्रमाचे Corporate Social Responsibility या स्वरूपात पॅकेजिंग केल्यास कॉर्पोरेट क्षेत्राकडून बरीच मदत मिळू शकेल.
तुमच्या कार्याला शुभेच्छा.
19 Aug 2016 - 5:17 am | मराठमोळा
योग्य सल्ला.
केवळ एक शंका. ह्या परिक्षा ब्रेल वापरून नाही का होऊ शकत? ब्रेल देवनागरीसाठी देखील उपलब्ध आहे असे वाचले होते. की पुरेशी साधने उपलब्ध नाहीत?
शुभेच्छा!!
19 Aug 2016 - 9:37 am | क्षमस्व
एक काम करू शकाल।
प्रत्येक कॉलेजमध्ये MBA च्या डिपार्टमेंट ला CSR कम्पलसरी आहे।
आणि त्यांना नाव मोठं करण्यासाठी अशा संधीची आवश्यकता असतेच।
ते तुम्हला स्तुडेन्ट देऊ शकतात।
आणि त्यांचा लिखाणाचा स्पीडही जबरा असतो।
19 Aug 2016 - 9:50 am | डॉ सुहास म्हात्रे
+१
असेच म्हणतो.
कॉलेजेसच्या व्यवस्थापनाशी सहकार्यकरार केल्यास ही व्यवस्था कायमस्वरूपी व विश्वासू होऊ शकेल.
19 Aug 2016 - 9:50 am | पिशी अबोली
मला खरंच शक्य नाहीये, पण बाकी कुणी करणार असेल तर बघते सांगून.
एक शंका अशी आहे, की या परीक्षांसाठी लेखनिक पेपर देणाऱ्याच्या इयत्तेपेक्षा एक इयत्ता खाली असावा असा नियम असल्याचं आठवतं. तसं काही नाहीये का?
19 Aug 2016 - 11:01 am | सई कोडोलीकर
पिशी अबोली, बरोबर, तसा नियम विद्यापिठीय परिक्षांसाठी आहे, बाकी नाही.
CSR अॅक्टिव्हिटीचा उपयोग बँकांच्या ऑनलाईन भरती परिक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. त्यावेळी फार मारामारी होते. मॅथ्स, लॉजिकल स्किल्स ह्या विषयांच्या तयारीसाठी ब्रेलमध्ये काहीही उपलब्ध नाही. अंध विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात गणित सातवीच्या पातळीपर्यंतच आहे. त्यामुळे पदे उपलब्ध असूनही ह्या विद्यार्थ्यांना त्या कसोट्या पातळ्या ओलांडणे मुश्कील ठरते. ही झाली केवळ विषयाशी संबंधीत बाजू, बाकी कुठून कुठून महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून पुण्या-मुंबईतल्या परिक्षा केंद्रांवर पोचणे, लॉजिस्टिकल अडचणी आणखी गंभीर आहेत. मुलींचे हाल तर विचारू नका :-(
मराठमोळा, ब्रेलमधील साहित्याच्या उपलब्धतेला दुर्दैवाने अजूनही मर्यादा आहेत. गेल्या एप्रिलमध्ये संगणक विषयाच्या पेपरच्या दिवसापर्यंत ब्रेलमध्ये ते पाठ्यपुस्तक आलं नव्हतं! मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांच्या परवानगीनं आम्हीच सर्वांनी मिळून आमचं सामान्य ज्ञान वापरून तो पेपर लिहिला.
आमची आपापलीच बनवलेली एक टीम आहे, मी सगळ्यांसमोर हे सल्ले ठेवते.
आम्ही हे वैयक्तिक पातळीवर करतो, कोणत्याही संस्थेशी संलग्न नाही. प्रत्येक जण आपापला व्याप सांभाळूनच हे करत आहे. आणि लाँग टर्म उपायासाठीच सल्ल्याचं सूतोवाच केलं होतं, तो हेतू साध्य होतोय :-)
शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आम्ही आर्ट्स कॉलेजेसच्या आणि विद्यापीठाच्या मराठी डिपार्टमेंटला आणि इतर शाळांच्या मुख्याध्यपाकांना संपर्क करणार आहोत. नोकरी करणा-या लोकांपेक्षा शिकणा-या लोकांना ही वेळापत्रकं सोयीची ठरू शकतात, शिवाय त्यांना भाषेचा सराव असतो.
सर्वांना मनापासून धन्यवाद.
19 Aug 2016 - 11:22 am | आतिवास
स्तुत्य उपक्रम.
वयाने मोठे असलेल्या लोकांना अशा कामांत सामील होण्यासाठी वेळ आणि उत्साह असतो काही वेळा. पण त्यांना लिहिण्याची फारशी सवय राहिलेली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते.
सीएसआरसाठी प्रपोझल लिहिण्यात काही मदत हवी असेल तर मला व्यनि करा. (मदत आराखडा लिहिण्यासाठी, प्रत्यक्षात पैसे मिळणं ही वेगळी बाब.)
19 Aug 2016 - 11:30 am | यशोधरा
सई, खूप चांगलं काम करते आहेस.
19 Aug 2016 - 11:54 am | क्षमस्व
खरंच खूप स्तुत्य काम आहे।
19 Aug 2016 - 1:35 pm | एस
अतिशय कौतुकास्पद!
19 Aug 2016 - 1:52 pm | नि३सोलपुरकर
खरंच खूप स्तुत्य काम आहे।
19 Aug 2016 - 5:11 pm | सई कोडोलीकर
आतिवासताई, ह्या परिक्षांची व्यवस्था झाली की नक्की संपर्क करते. आणि आलेल्या बाकी सर्व सूचनाही नीट आखणी करून कशा अंमलात आणायच्या ते ठरवता येईल. सगळ्यांची मोठी मदत होतेय _/\_
19 Aug 2016 - 5:40 pm | मुक्त विहारि
भाग घ्यायला खूप आवडले असते.
पण सध्या आमचे दिवस बर्याच प्रमाणात अनिश्चित प्लॅनिंग मध्ये जात असल्याने, नक्की असे काहीच सांगू शकत नाही.
उपक्रमाबाबत जाणून घ्यायला मात्र नक्कीच आवडेल.
माझे मोबाईल नंबर व्यनिने पाठवत आहे.
19 Aug 2016 - 7:22 pm | जावई
या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल नक्कीच!
19 Aug 2016 - 7:48 pm | रुपी
स्तुत्य उपक्रम!
एक सुचवू का? तुम्ही एखादा संपर्क क्रमांक इथेच लेखात दिलात तर? म्हणजे मिपासदस्य नसलेल्या लोकांपर्यंत हा दुवा पोहचवून कुणी मदत करणारे असतील तर तुमच्या ग्रुपला संपर्क करु शकतील? कारण आता फारच कमी दिवस आहेत.
19 Aug 2016 - 9:47 pm | सई कोडोलीकर
व्यनित नंबर पाठवला आहे तुम्हाला.
22 Aug 2016 - 8:38 pm | सई कोडोलीकर
आवश्यक तेवढे लेखनिक मिळाले आहेत, सर्वांच्या माहितीसाठी कळवत आहे.
पुनश्च सर्वांना धन्यवाद.
22 Aug 2016 - 8:57 pm | यशोधरा
ओह, बरं झालं, चांगली बातमी.
22 Aug 2016 - 8:39 pm | सई कोडोलीकर
परिक्षा संपल्यानंतर संपर्क करते.