न्यायालयाच्या पायरीवर....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
30 Jul 2016 - 10:21 pm

फ्रँझ काफ्काच्या एका कथेवर आधारीत....

न्याय...

सगळीकडे अंधुक प्रकाश पसरला होता आणि मोठ्या मुष्किलीने पुढचे दिसत होते. अतीश्रमाने त्याला चक्कर आली होती का त्या अंधारामुळे त्याला दिसत नव्हते हे त्याला कळत नव्हते. त्याला एकदा वाटत होते की तो एक उंच मिनारापाशी उभा आहे. त्या मिनाराला एक दरवाजा होता आणि त्याच्यावर पाच गरुडांचे पुतळे. मोठ्या डौलाने ते सोनेरी प्रकाश फेकत होते.

‘हं ऽऽऽ पोहोचलो एकदाचा !’’ तो मनाशी म्हणाला.

गेले कित्येक दिवस तो अखंड प्रवास करुन या न्यायगृहासमोर उभा ठाकला होता. त्याने एकदा दरवाजासमोर उभे ठाकलेल्या दरवानाकडे नजर टाकली आणि लगेचच चुकविली. त्याच्या डोळ्यात बारीक झालेल्या बहुल्यातून त्याला त्या दरवानाची प्रतिमा दिसली आणि त्याने पापण्या मिटल्या. त्याच्याकडे बघणे शक्यच नव्हते. तो दरवान होता की एखादा देवदूत ? तो तेथे दरवाजासमोर तेजाने तळपत उभा होता. त्याच्या कानाच्या पाळ्या खांद्यावर रुळत होत्या. त्याचे नेत्र विलक्षण तेजाने चमकत होते. त्या तेजानेच त्याचे डोळे दिपले होते. त्याच्या मस्तकावर चमकणारे शिरस्त्राण होते व खांद्यावर तीन ससाणे पंख फडकवत बसले होते. त्याचा पोषाख सोनेरी, चमकत होता तर पायात पोटरीपर्यंत असणारे बूट. त्यावर वेटोळे घातलेल्या सर्पांची नक्षी मनात धडकी भरवत होती. हा असला दरवान जर येथे उभा केला तर कोण मरायला न्याय मागायला येथे येईल ? असा विचार त्या बिचाऱ्याच्या मनात येताच जणू तो त्या दरवानाने ओळखावा तसे त्याचे रुप बदलले. तो दरवान एकदम सामान्य सैनिकासारखा दिसू लागला. आता त्याच्याकडे पाहताना त्याला जरा धीर आला. त्याने त्याच्याकडे आत जाण्याची परवानगी मागितली पण त्याने ती लगेचच नाकारली.

‘‘मी आत्ता तुम्हाला आत सोडू शकत नाही’’

‘‘मी थांबलो तर काही वेळाने आत जाऊ शकेन का ?’’ माणसाने विचार करुन विचारले.

‘‘ शक्य आहे ! पण आत्ता नाही हे निश्चित !’’ दरवान म्हणाला.

तो दरवाजा कधीच बंद होत नसे. दरवान बाजूला झाला. तो बाजुला झाल्याबरोबर त्या बिचाऱ्याने मोठ्या उत्सुकतेने आत नजर टाकली. ते पाहताच दरवानाने स्मीतहास्य केले.

‘‘ जर तुला आत काय आहे हे जाणून घ्यायची एवढीच उत्सुकता असेल तर माझा विरोध डावलून तू आत जाऊ शकतोस पण माझी शक्ती अमर्याद आहे हे लक्षात ठेव आणि मुख्य म्हणजे मी बरा असे अनेक दरवान एकामागून एक आत उभे आहेत. तिसरा दरवान तर इतका भयंकर आहे की मी सुद्धा त्याच्याकडे पाहू शकत नाही.''

कायद्याच्या दारात न्याय मिळविण्यात एवढ्या अडचणी येतील याची त्या बिचाऱ्याला कल्पनाच नव्हती. त्याला वाटले होते. कायद्याची दारे सर्वांसाठी सदासर्वकाळ उघडीच असतात अणि कोणीही त्याच्या दरबारात न्याय मिळविण्यासाठी जाऊ शकतो. त्याने त्या दरवानाकडे एक नजर टाकली आणि ताबडतोब कसलाही आततायीपणा न करण्याचा निर्णय घेतला.

‘‘थांबलेले बरे !’’ तो मनाशी म्हणाला.

तो दरवाजा, त्याच्या एका बाजूला तो भयंकर पण आता साधा दिसणारा दरवान व एका बाजूला तो बिचारा असे दृष्य अनेक दिवस दिसत होते. दिवसामागून दिवस सरले, महिन्यामागून महिने सरले, वर्षामागून वर्षे सरली. मोठ्या धीराने, तो आत सोडण्याची वाट पहात तेथे उभा असताना दरवान मात्र त्याला अनेक प्रश्न विचारीत असे. त्याच्याबद्दल माहिती घेत असे. अर्थात त्यात कसलीही आपुलकी नव्हती. परमेश्वराने त्रयस्थपणे प्रश्न विचारावेत तशी ती प्रश्र्नोत्तरे. प्रत्येक प्रश्र्नानंतर तो दरवान ‘तो त्याला आत्ता आत सोडू शकणार नाही’ हे पालुपद आळवीत असे. त्या बिचाऱ्याने जे काही बरोबर आणले होते, जे काही नंतर मागविले होते ते त्याने त्या दरवानाला देऊन देऊन संपविले. तोही मोठ्या मनाने ती लाच स्वीकारे पण तो हे त्याच्या सुखासाठी करतो आहे हे सांगण्यास विसरत नसे.

‘‘तुला तुझ्या प्रयत्नात काही कमी पडले असे वाटायला नको म्हणून मी हे स्वीकारतो आहे हे लक्षात घे !’’ तो म्हणे.

एवढ्या सगळ्या वर्षात त्या बिचाऱ्याने त्या दरवानावर त्याचे लक्ष इतके केंद्रीत केले होते की आत अजून दरवान आहेत याचा त्याला विसर पडला. जणूकाही या एकाच दरवानाने त्याला आत सोडल्यावर त्याला न्याय मिळणार होता. स्वत:च्या नशीबाला दुषणे देत बिचारा म्हातारा झाला. प्रथम मोठ्याने शिव्या देणारा, त्या दरवानाशी चर्चा करणारा आता स्वत:शी पुटपुटू लागला. दरवानाच्या पायांमधून सहजपणे येजा करणाऱ्या उंदरांनाही त्याने दरवानाचे मन वळविण्याची विनंती करुन पाहिली. शेवटी त्याची दृष्टी मंदावली. त्याला दिसेनासे झाले...जग खरेच अंधारे आहे की त्याची दृष्टी त्याला दगा देते आहे हे त्याला कळेनासे झाले. पण त्या उघड्या दरवाजातून बाहेर येणारा प्रकाशाचा उजेडही त्याला सहन हो़ईना. आता फार थोडा वेळ राहिला हे उमजून त्याच्या डोळ्यासमोर इतक्या वर्षाचे क्षण आणि क्षणिक आठवणी रुंजी घालू लागले. तेवढ्यात त्याच्या लक्षात एक गोष्ट आली. त्याने आजवर त्या दरवानाला एक प्रश्र्न विचारलाच नव्हता. त्याने क्षीणपणे हात उचलला व खुणेने त्या दरवानाला जवळ बोलावले. तो काय म्हणतो आहे हे समजण्यासाठी त्या दरवानाने त्याच्या ओठापाशी आपला कान लावला.

‘‘काय सांगायचय तुला ?’’

‘‘तुझी इच्छापूर्ती करणे कोणालाच शक्य नाही. तुझी हाव अमर्याद आहे. पण मला हे सांग इतकी वर्षे मी येथे आत सोडण्याची वाट पहात आहे पण न्याय मागण्यास येथे अजून कोणीच कसे आले नाही ? न्यायाची गरज तर प्रत्येक जिवास असतेच !’’

त्याचा अंतकाळ जवळ आलेला पाहून दरवान त्याला सत्य सांगण्याचे ठरवतो..

‘‘अरे बाबा येथे अजून कोणी कसे येणार ? हा दरवाजा फक्त तुझ्याचसाठी बनवलेला आहे. आता मी तो कायमचा बंद करणार आहे !’’

त्याच्या मिटायला लागलेल्या डोळ्यांच्या बाहुल्यात त्या मिटणार्‍या दरवाजाची प्रतिमा एकदा चमकून गेली.
त्याने आपले डोळे मिटले ते मिटलेच....

मूळ लेखक : फ्रँझ काफ्का.
स्वैर रुपांतर : जयंत कुलकर्णी...फार पूर्वी.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

30 Jul 2016 - 10:42 pm | लालगरूड

छान ..

+ १

खटपट्या's picture

31 Jul 2016 - 6:57 am | खटपट्या

खूप छान

अरुण मनोहर's picture

31 Jul 2016 - 7:47 am | अरुण मनोहर

आवडली!

कविता१९७८'s picture

31 Jul 2016 - 9:11 am | कविता१९७८

छान

जव्हेरगंज's picture

31 Jul 2016 - 10:16 am | जव्हेरगंज

कडक!!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Jul 2016 - 10:34 am | ज्ञानोबाचे पैजार

गोष्ट आवडली नाही.

बळेच काहितरी मोठे लिहायचे म्हणून लिहिल्यासारखी वाटली किंवा लेखकाला नक्की काय सांगायचे आहे ते स्पष्टपणे मांडता आले नसावे.

विशेषतः - न्यायाची गरज तर प्रत्येक जिवास असतेच,
हा दरवाजा फक्त तुझ्याचसाठी बनवलेला आहे

सारखी फसवी वाक्ये उगाच या कथेत पेरली आहेत असे वाटले.

अर्थात असे वाटण्याला माझ्याच काही मर्यादा कारणीभुत असतील याचीही मला जाणीव आहे.

पैजारबुवा,

अभ्या..'s picture

31 Jul 2016 - 12:19 pm | अभ्या..

पैजारमाऊलीना सहमत. मला शेवटपर्यंत कथेत बांधल्यासारखं झालं पण शेवटी काहीतरी गंडतंय, बहुधा माझे सर्वसामान्य संदर्भ कथेला जोडणे हे गंडतंय असे जाणवले.
बाकी अनुवाद उत्तम. अजून काफ्फका वाचायला आवडेल.

एस's picture

31 Jul 2016 - 12:37 pm | एस

+3

मलाही नाही कळली.

जव्हेरगंज's picture

31 Jul 2016 - 1:25 pm | जव्हेरगंज

‘‘अरे बाबा येथे अजून कोणी कसे येणार ? हा दरवाजा फक्त तुझ्याचसाठी बनवलेला आहे.

मला जे समजले ते असे.

न्याय हा मिळत नसतो, तो मिळवावा लागतो. या थीमवर बहुतेक ही कथा आधारीत आहे.
दरवाजा हे एक संधीच प्रतीक आहे.न्यायदेवतेनं नायकाला न्याय मिळवण्याची एक संधी दिली आहे. पण नायक त्या संधीचं सोनं करण्याऐवजी केवळ वाट पाहत बसला. अगदी आयुष्यभर. लढण्या झगडण्याची त्याची अजिबात तयारी नाही. आयुष्यभर संधी देऊनही नायक यशस्वी झालेला दिसत नाही. त्याच्या मृत्यूमुळे मिळालेली एकमेव संधीही न्यायदेवतेने काढून घेतली. आणि दरवाजा बंद झाला.

अर्थात हे माझे मत. अजून काही अर्थ निघत असल्यास जाणून घेण्यास उत्सुक.

सर्वसामान्य माणसाला system चा किंवा व्यवस्थेचा एकच पैलू दिसतो. इथे तो त्या दरवानाच्या स्वरूपात आहे. एक प्रकारे हा दरवान हे माणसाच्याच मनातल्या भीतीचं प्रतीक आहे. जर न्याय हवा असेल तर या भीतीच्या पलिकडे जावं लागेल. तसं जायची या माणसाची तयारी नाहीये. त्यामुळे तो system ला आव्हान देण्याऐवजी तिला शरण जातो आणि त्याचा तसाच शेवट होतो. System चा अर्थ भोवतालची परिस्थिती असाही घेतला जाऊ शकतो. जोपर्यंत त्याला बदलवण्यासाठी माणूस स्वतः पुढे येणार नाही आणि आपल्या भीतीवर मात करणार नाही तोपर्यंत ही व्यवस्था त्याचा फायदा घेत आणि त्याचं शोषण करत राहील.

बोका-ए-आझम's picture

31 Jul 2016 - 10:41 am | बोका-ए-आझम

ट्रायल, कॅसल, मेटामाॅर्फोसिस या त्याच्या कथा/कादंबऱ्या जबरदस्त आहेत. ही कथा तर सुंदरच आहे. इंग्लिशमध्ये ही कथा वाचल्याचं आठवतंय पण जयंतकाकांनी अनुवाद नेहमीसारखाच ओघवता आणि नेमका केलेला आहे. काका, काफ्काच्या एखाद्या कादंबरीचा अनुवाद करा की.

काफ्काच्या एखाद्या कादंबरीचा अनुवाद करा की.

+१

मारवा's picture

31 Jul 2016 - 2:06 pm | मारवा

रुपांतर आवडले नाही.

जयंत कुलकर्णी's picture

31 Jul 2016 - 2:22 pm | जयंत कुलकर्णी

परमेश्र्वराच्या दरबारातील न्याय कसा असतो याची झलक या कथेत दाखविली आहे....आणि तो म्हणजे प्रत्येकाचे नशीब असतो... असे काफ्काला म्हणायचे असावे. अर्थात ही कथा प्रत्येकाला वेगळा अनुभव देऊन जाते...

जयंत कुलकर्णी's picture

31 Jul 2016 - 2:22 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

पैसा's picture

1 Aug 2016 - 6:34 pm | पैसा

हम्म...

नमकिन's picture

1 Aug 2016 - 8:51 pm | नमकिन

कायदा पाळणारे मुर्ख ठरतात, असे तर म्हणायचे नसेल लेखकास.
कायम नियम व कायदा यास धरुन राहणारा सामान्य मानव मला यात वरील बोकोबाचे विवेचन वाचून वाटले, नाहींतर पहिले प्रयत्नात बंपर होता मला.
सरकारी अधिकारीच्या कक्षाबाहेर तिष्ठत बसलेली जनता आठवली, वर्षोंनुवर्ष.

राजाभाउ's picture

2 Aug 2016 - 11:41 am | राजाभाउ

मस्त आहे.