आताही प्रेम तसेच आहे का?
**********
नवे होते प्रेम जे
वर्षांपूर्वी काही
सांग आहे आताही
ते तसेच का?
भेटतो रोजच तुला
सकाळ-संध्याकाळी
काळीज प्रत्येकवेळी
धडधडते का?
सदाचा तोच तंटा
भांडून झाल्यावरती
होतो खालीवरती
जीव तसाच का?
तुझ्यासाठी झुरत
नाही पूर्वीसारखा
तरी नाही पारखा
प्रेमाला मी
आहे माझी खात्री
असशील माझ्यासाठी
घट्ट होतात गाठी
ओढल्या तरी
**********
(वाचलेल्या कवितेचा एम् पी ३ दुवा)
Get this widget | Track details | eSnips Social DNA
प्रतिक्रिया
28 Jan 2009 - 10:01 am | धनंजय
ही कविता साधी गद्यासारखी- बोलगीतासारखी - वाचल्यास छंदाची लय आपोआप येईल
लय जुळवण्यासाठी असे - म्हणजे नेहमीप्रमाणे - वाचावे -
नवे होते प्रेम् जे । वर्षांपूर्वी काही । सांग् आहे आताही । ते तसेच् का?
भेट्.तो रोजच् तुला । सकाळ्-संध्याकाळी । काळीज् प्रत्येक् वेळी । धड्.धड्.ते का?
सदाचा तोच् तंटा । भांडून् झाल्यावर्.ती । होतो खालीवर्.ती । जीव् तसाच् का?
तुझ्यासाठी झुरत् । नाही पूर्वीसार्.खा । तरी नाही पार्.खा । प्रेमाला मी
आहे माझी खात्री । अस्.शील माझ्यासाठी । घट्ट होतात् गाठी । ओढ्.ल्या तरी
हे आधी चवथे आणि शेवटचे कडवे होते :
नाही. ती रोमांच- । बेसब्.रीची कात्री । नाही - इत्.की खात्री । वाट्.ते मला.
28 Jan 2009 - 10:37 am | सर्किट (not verified)
पहिल्यापेक्षा छानच आहे.
ओढल्या "तरी" वर आक्षेप आहे. गाठी ओढल्या तर घट्टच होतात. मग "तरी" कशाला ?
(माफ करा: मी मिसळपावावरील अनेक कवि किरडूंना "सहमत, +१" असे उगाचच म्हणत असतो. लोकभावना सांभाळायला हवी. (वा र लो, असे प्रतिसाद बघा, आणि ठरवा.) काहीही झाले तरी फ्यान-आऊट सांभाळायचा असतोच ना ? पण धनंजयने चोखट असावे असे राहून राहून वाटत असते, त्यामुळे जरा तिखट टिका तुमच्यावर. बाय द वे, ज्यांच्यावर कधी माधी चुकून तिखट टिका केली होती, त्यांनी त्या टिकेवरती घृणा व्यक्त केली. त्यांचे काय हरवले हे त्यांना कळत नाही, हे स्पष्ट आहे.)
-- सर्किट
28 Jan 2009 - 8:32 am | नंदन
आवडली. वाचून 'ती न आर्तता उरांत, स्वप्न ते न लोचनी'ची आठवण होणे अपरिहार्यच.
रोमांच- बेसबरीची कात्री म्हणजे नीट समजले नाही.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
28 Jan 2009 - 8:33 am | मुक्तसुनीत
बेसबरी = बे-सब्री (उर्दू ? फार्सी ?)
28 Jan 2009 - 8:39 am | धनंजय
सबूर धरता येत नाही - बेसबुरी. बेसबुरी आणि रोमांच या भावनांच्या अतिरेकी ओढाताणीमध्ये नवे प्रेमात पडलेल्याची घालमेल होत असते.
28 Jan 2009 - 8:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भेटतो रोजच तुला
सकाळ-संध्याकाळी
काळीज प्रत्येकवेळी
धडधडते का?
चार ओळी माझ्याच आहेत :) प्रेमभावनेची उलघाल लै भारी. आवडली कविता !!!
नाही. ती रोमांच-
बेसबरीची कात्री
नाही - इतकी खात्री
वाटते मला.
अधोरेखीत शब्दांनी सुंदर कवितेची हानी होते का ? चिंतन चालू आहे :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
28 Jan 2009 - 8:40 am | सर्किट (not verified)
हानी नक्कीच होते. बेसबरी ऐवजी "ब्लॅकबेरी" वापरले, तर प्रेम कमी होण्याची कारणे अचानक कळतात.
(मिशेल ओबामा सध्या बराकच्या दोन व्यसनांशी झगडते आहे: मार्लबोरो, आणि ब्लॅकबेरी.)
-- सर्किट
28 Jan 2009 - 8:48 am | धनंजय
काव्यालंकाराच्या दृष्टी हानी झाली असू शकेल, विचार करतो आहे.
पण प्रेम कमी झाले नसावे असे वाटते. (कसे मोजावे हे माहीत नाही. खात्री एका पारड्यात आणि रोमांच दुसर्या पारड्यात - कुठले पारडे भारी आहे?) प्रेम बदलले नक्कीच आहे.
28 Jan 2009 - 8:57 am | सर्किट (not verified)
सदाचा तोच तंटा
भांडून झाल्यावरती
होतो खालीवरती
जीव तसाच का?
धनंजय,
ही वरच्या कडव्यातली संकल्पना भन्नाट आहे. (सदाचा तंटा असूनही, तसाच दरवेळी जीव वरखाली होतो, वगैरे.) फक्त संकल्पनाच नाही तर आता आम्हा उभयंतांच्या परस्परसंबंधाविषयी विचार केल्यास वास्तव आहे, असे दिसते. ह्यानंतर, जे कडवे येते, ते ह्यापेक्षाही भन्नाट असायला हवे. पण ते तसे नाही. (प्राडॉ आणि मी म्हटल्याप्रमाणे.) वर घेऊनच जायचे असल्यास शेवटपर्यंत वर न्या. हे असे रोलर कोस्टरसारखे दणकन आपटू नका.
(ता. क. फक्त काव्यालंकाराच्या दृष्टिकोनातून हानी नाही, एकंदरीत साहित्याच्या दृष्टिकोनातून हानी आहे.)
-- सर्किट
28 Jan 2009 - 9:17 am | चतुरंग
धनंजय, कवितेचा विचार उच्चच आहे. पहिल्या ३ कडव्यात तो सहजगत्या वरवर गेलाही आहे.
परंतु पहिली ३ कडवी ज्या तर्हेने ह्या प्रेमाची, त्यातल्या भांडणांची, जीवांच्या उलघालीची, रोमांच-बेसबरीची स्पंदने दाखवतात तितकेच शेवटचे कडवे एकदम अनपेक्षितपणे कविता पंक्चर करते!
(चढत्या भाजणीच्या थ्री कोर्स मील नंतर फक्कड स्वीट डिश डेझर्ट म्हणून येण्याऐवजी अचानक भेळपुरी समोर आली तर कसे वाटेल तसे काहीसे!)
चतुरंग
28 Jan 2009 - 9:24 am | प्राजु
खरंच शेवटच्या कडव्यात एकदम चुकल्यासारखे होते आहे. वरच्या पूर्ण कवितेच्य मानाने हे कडवे खटकते आहे.
विचार खूप सुंदर..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Jan 2009 - 10:02 am | धनंजय
विचाराधीन आहे.
थोड्या घाईत कविता लिहायची संपवली. एकदोन दिवस स्व-संपादनाच्या डब्यात ठेवायला हवी होती. शेवटचे कडवे "अब्रप्ट" आहे. कदाचित मला जे म्हणायचे आहे, ते म्हणायला त्याहून अधिक जागा देणे आवश्यक आहे.
***बदल केला आहे***
28 Jan 2009 - 9:40 am | मुक्तसुनीत
प्रस्तुत कवितेच्या कवीबद्दल आदर आहे ; म्हणूनच कविता माझ्यापर्यंत पोचलेली नसलली तरी त्याबद्दल बोलण्याचा प्रमाद करत आहे.
कविता ही वृत्त्तात नीटशी बांधली गेलेली नाही. म्हणजे केवळ तांत्रिकदृष्ट्याच बांधली गेली आहे हे कवीच्या दुसर्या पोस्ट मधे स्पष्ट होते. कवितेच्या अभिव्यक्तीशी , शैलीशी , नादाशी , तिच्यातल्या (अभावाने असणार्या) अंतर्गत तालाशी व्यक्तिशः मला कुठेही तादात्म्यभाव साधता आला नाही.
रही बात आशयाची. हां, इथे थोडे नावीन्य आहे. स्नेहभावातली अपरिचयादवज्ञा , "तेहि नो दिवसा: गता:"च्या जातीची हुरहूर, या सगळ्यातला जो अनामिक, अव्यक्त असा भाव आहे त्याला वाचा फोडण्याचा हा प्रयत्न समजू शकतो. पण ... एकूण बांधणीच्या एकात्मतेअभावी , द बेबी वॉज डीओए.
असो. कवीच्या ठायी असणार्या अंगभूत समजूतदारपणापायीच इतकी तीव्र प्रतिक्रिया लिहिण्याचा प्रमाद करत आहे.
28 Jan 2009 - 10:26 am | धनंजय
असा आहे :
(एम पी ३ दुवा)
(वृत्त काटेकोरपणे बांधले आहे असे मला वाटते.)
(येथे चिकटवलेले विजेट का बरे दिसत नाही?)
Get this widget | Track details | eSnips Social DNA
28 Jan 2009 - 3:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धनंजय,
काव्यवाचनातल्या मैफीलीत एखादी सुंदर कविता गोड आवाजात ऐकायला जशी मजा येते, तोच आनंद आपल्या कवितेने आणि आवाजाने दिला.
( अवांतर : वर एका प्रतिसादात सर्किट म्हणतो त्या प्रमाणे..कविता आवडली, सहमत आहे, किंवा +१, असे म्हणून कवितेला दाद देऊन पुढे जाता येते. पण जे वाटलं ते तुम्हाला नाही बोलणार तर कोणाशी बोलणार, म्हणून तो प्रपंच. बाकी, येऊ दे अशाच सुंदर कविता )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
28 Jan 2009 - 12:25 pm | विसोबा खेचर
हम्म! बरी वाटली कविता. तितकिशी खास नाही..
तात्या.
28 Jan 2009 - 1:07 pm | रामदास
मी चौथे कडवे असे वाचून पाहीले
तुझ्यासाठी झुरत
नाही पूर्वीसारखा
तरी नाही पारखा
प्रेमाला मी.
आहे माझी खात्री
पाचवे आहे असेच वाचले.खात्रीच्या पुनरुच्चाराने मजा आली.
कविता आवडली.
28 Jan 2009 - 1:17 pm | सहज
एकाच कवितेवर बर्याच जणांनी खात्री केल्याने आता ते तितके पवित्र वाटत नाही. जाउ दे नवी कविता येउ दे लवकर.
धनंजय टच नाही वाटला कवितेत. :-(
बाकी अमेरिकेतले प्रेम एका वर्षात खात्री द्यायला सांख्यिकी शास्त्री काय म्हणतात? ;-)
28 Jan 2009 - 5:02 pm | लिखाळ
कल्पना सुंदर मांडणी ठाकठीक.
शेबटच्या कडव्यातली कल्पना चांगली. ताणले तर तुटते..पण (दोरीला गाठ असेल तर) गाठ मात्र ताणल्याने घट्ट होत जाते असा अर्थ नीट शब्दबद्ध झाला असे वाटले नाही.
पुलेशु
-- लिखाळ.
28 Jan 2009 - 11:12 pm | विसोबा खेचर
कविता तिच्याजागी ठीकच आहे, छान आहे परंतु तर धन्याशेठसारख्या जिनीयसकडून इतक्या सामान्य वकुबाची कविता अपेक्षित नव्हती. हीच कविता मी किंवा अन्य कुणा कामचलाऊ कवीने केली असती तर गोष्ट वेगळी होती! :)
आपला,
(घन्याशेठचा फ्यॅन) तात्या.
29 Jan 2009 - 1:22 am | चित्रा
यात नक्की काय सामान्य वाटले?
असो. छान कविता. कवितावाचनही आवडले.
29 Jan 2009 - 8:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>यात नक्की काय सामान्य वाटले?
तात्या, कोणतीच कविता सामान्य नसते असे वाटते ! मात्र काही वाचकांना ती सामान्य वाटू शकते तर काहींना उच्च !
ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर बरे वाइट अवलंबून असते (मेलो आता ) :)
-दिलीप बिरुटे
29 Jan 2009 - 8:10 am | विसोबा खेचर
मात्र काही वाचकांना ती सामान्य वाटू शकते तर काहींना उच्च !
करेक्ट! किंवा आपण असंही म्हणू शकता की माझ्यासारख्या सामान्य वाचकांना सामान्य वाटू शकते आणि असामान्य वाचकांना असामान्य वाटू शकते! ;)
आपला,
(सामान्य!) तात्या.
ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर बरे वाइट अवलंबून असते (मेलो आता )
हा हा हा! :)
आपला,
(आकाराने मोठ्या परंतु मठ्ठ डोक्याचा अरसिक) तात्या.
29 Jan 2009 - 8:12 am | विसोबा खेचर
यात नक्की काय सामान्य वाटले?
ते सांगता येणार नाही. परंतु त्यातले सामान्यपण जाणवले मात्र जरूर!
कवितावाचनही आवडले.
सहमत. धन्याच्या वाचनात छान नाट्यमयता असते..
तात्या.
29 Jan 2009 - 9:14 am | रामदास
मला मात्र एक वेगळेच गाणे आठवले.
विषयांतर झाल्यास माफी असावी.
29 Jan 2009 - 9:24 am | धनंजय
अर्थात "बदलले तरी ते वेगळे प्रेमच आहे," अशा काही आशयाची माझी कविता आहे.
"अंतरीच्या गूढ गर्भी"मध्ये मात्र निराश परिस्थितीचे काळजाला हात घालणारे वर्णन केले आहे.