किशोर कुमार ची गाणी आणि शास्त्रीय संगीत

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
26 Jul 2016 - 2:09 am

मला व्यक्तिशः रागदारीतलं काहीही कळत नाही. हे माझं दुर्दैव! इच्छा असूनही इतक्या वर्षांमध्ये वेळ काढू शकलो नाही ही एक खंत आहे, आणि उर्वरित आयुष्यात जमेल अशी शक्यता अति-धूसर आहे. पण तरीही जमेल तशी माहिती गोळा करीत रहातो, कधीतरी वाचेन या आशेवर!

पूर्वी मिपावर संस्थापक तात्यांना विनंती केली होती की रागदारीवर आधारित हिंदी-मराठी चित्रपट संगीतावर एक लेखमाला लिहा, त्यांनी 'बघू' म्हणत टाळलं. चंद्रकांता, स्वरगंगा, पी. सरकार ही काही संस्थळं. (पूर्वी आसावरी नावाचं एक चांगलं संस्थळ होतं ते आता सापडत नाही.)

असंच शोधत असतांना श्री. राजन पर्रीकर यांच्या पूर्वी पाहिलेल्या संस्थळाला पुन्हा भेट दिली. तेंव्हा किशोर कुमारने गायलेल्या काही गाण्यांचा उल्लेख पाहिला. मी बरीच वर्षे ऐकत आलो आहे की किशोर कुमार म्हणे शास्त्रीय संगीत शिकलेला नव्हता, पण आर डी ने त्याच्याकडून मेहेबूबा मधलं मेरे नैना सावन भादों किंवा कुदरत मधलं हमें तुमसे प्यार कितना अशी रागांवर आधारित गाणी गाऊन घेतली.

(यांतल्या 'मेरे नैना' च्या विषयी एका जुन्या कॅसेटवर कुणा निवेदकाकडून [कोण ते याक्षणी आठवत नाही, कुणीतरी ज्येष्ठ संगीतकार होते] ऐकलेला किस्सा असा होता: रेकॉर्डिंगच्या वेळी म्हणे जेंव्हा आर डी ने त्याला सांगितलं की राग शिवरंजनी वर आधारित गाणं म्हणायचंय, तेंव्हा किशोर म्हणाला होता की 'ते राग वगैरे माहीत नाही, लता दीदींना आधी गाऊ देत, मी तसंच म्हणून दाखवतो की नाही बघ'...आणि तो निवेदक पुढे म्हणतो की "The rest is history.")

तर बरेच दिवस हा भुंगा डोक्यात आहे की हे नक्की सत्य आहे का? म्हणून 'किशोरची रागदारीवर आधारित गाणी आहेत का' असा शोध घेतला. या दुव्यानुसार हे खालील संकलन. यातील बहुतांश गाणी मला आवडतात आणि आनंद देतात. या शोधानंतर किशोर कुमार शास्त्रीय संगीताबाबत अगदीच अनभिज्ञ होता असं मानणं कठीण वाटतं.

दिल्ली का ठग मधलं ये राते ये मौसम नदी का किनारा (राग किरवानी):

आराधना मधलं कोरा कागज़ था ये मन मेरा (राग पहाडी):

एक राज़ मधलं पायल वाली देखना (राग मारूबिहाग):

खामोशी मधलं वो शाम कुछ अजीब थी (राग कल्याण):

प्रेम पुजारी मधलं फुलोंकी रंग से (राग पहाडी):

दूर का राही मधलं बेकरार दिल तू गाये जा (राग किरवानी):

अमर प्रेम मधलं चिंगारी कोई भडके (राग भैरवी):

अमर प्रेम मधलंच कुछ तो लोग कहेंगे (राग खमाज़):

गँबलर मधलं दिल आज शायर है (राग भैरवी):

लाल पत्थर मधलं गीत गाता हूं मैं (राग किरवानी):

शर्मिली मधलं कैसे कहे हम प्यार ने हम को (राग तिलंग):

शर्मिली मधलंच खिलते हैं गुल यहां (राग भीमपलासी):

ये गुलिस्तां हमारा है मधलं गोरी गोरी गांव की गोरी रे (राग तिलंग):

हरे रामा हरे कृष्णा मधलं कांची कांची रे (राग भुपाली):

एक बार मुस्कुरा दो मधलं सवेरे का सूरज तुम्हारे लिये है (राग कल्याण):

अनामिका मधलं मेरी भीगी भीगीसी पलकों पे रह गये (राग किरवानी)

चोर मचायें शोर मधलं घूंगरू की तरह (राग झिंझोटी):

आप की कसम मधलं ज़िंदगी की सफर में गुज़र जाते हैं जो मुकाम (राग बिहाग)

उलझन मधलं अपने जीवन की उलझन को कैसे मैं सुलझाऊं (राग अहिर भैरव):

आंधी मधलं इस मोडसे जाते हैं (राग कल्याण):

हेराफेरी मधलं दरबार में उपरवाले की (राग मालकंस):

अनुरोध मधलं आप के अनुरोध पे (राग कल्याण):

घर मधलं आप की आंखों मे कुछ (राग केदार):

कस्मे वादे मधलं मिले जो कडी कडी (राग भैरवी):

देस परदेस मधलं ये देस परदेस (राग शंकरा):

गोलमाल मधलं आनेवाला पल जानेवाला है ( राग किरवानी) :

गौतम गोविंदा मधलं इक ऋतू आये इक ऋतू जाये (राग भैरव):

बेमिसाल मधलं किसी बात पर मैं किसी से ख़फां हूं (राग भैरवी):

नमक हलाल मधलं पग घुंगरू बांध के (राग दरबारी कानडा):

आपस की बात मधलं तेरा चेहेरा मुझे गुलाब लगे (राग कल्याण):

दर्द का रिश्ता मधलं यूं नींद से वो जान-ए-चमन जाग उठी है (राग श्याम कल्याण)
:

झुमरू मधलं किशोर ने गायलेलं कोई हमदम ना रहा हे गाणं राग झिंझोटी वर आधारित आहे, पण त्याच्या बरीच वर्षे आधी अशोक कुमारने जीवन नैया चित्रपटासाठी हे गाणं म्हंटलं होतं.

अशोक कुमार यांच्या आवाजात हे गाणं ऐकण्याआधी त्यांनी सुरूवातीला किशोर विषयी सांगितलं आहे तेही ऐका:

किंचित वेगळं: वर निर्देशिलेल्या पर्रीकरांच्या संस्थळावर किशोरने बागेश्री रागातलं सुहाना गीत चित्रपटासाठी बाजे बाजे बाजे कही रे बांसुरियां हे गाणं ऐकायला मिळालं, चित्रपट प्रदर्शित झाला नाही.

तर सुहृदहो, मला एका दिवसात सापडलेल्या रागदारीवर आधारित किशोरकुमारच्या काहीच गाण्यांचं हे संकलन आहे (आणि हे फक्त संकलनच आहे, त्याला वैयक्तिक कुठलीही अभ्यासाची बैठक नाही याची acute जाणीव मला आहे!). यात जमेल तशी भर घाला.

आणि हो, इथे शास्त्रीय संगीत जाणणारी आणि चित्रपट संगीतातही रुची राखणारी बरीच दिग्गज मंडळी आहेत, तेंव्हा त्यांनी एकत्र येऊन एक शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट संगीताविषयी सोदाहरण लेखमाला लिहावी अशी मनापासून विनंती आहे!

संगीतविचार

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

26 Jul 2016 - 2:24 am | पिवळा डांबिस

अतिसुरेख संकलन.
आमच्याकडून भर वगैरे नंतर यथाशक्ती घालू पण आधी तुम्ही दिलेल्या गाण्यांबद्दल दाद देतो!!!
क्या बात है! वा!!

स्मिता.'s picture

26 Jul 2016 - 2:50 am | स्मिता.

हा धागा म्हणजे माझ्यासाठी तरी खजिनाच आहे!
आधीच ओतप्रोत भरलेल्या या खजिन्याच्या पेटीत आणखी भर पडणार या आशेने आनंद द्विगुणित झालाय :)

>>शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट संगीताविषयी सोदाहरण लेखमाला
चित्रपट संगीताला धरुन शास्त्रीय्स संगीताचा आस्वाद घेणे म्हणजे काठाला धरून समुद्र पोहु पाहण्या सारखे आहे.
शा.संगीताची खरी प्रचिती घ्यायची असेल तर आधी काठ सोडून सागरात प्रवेश करावा,
यमनावर आधारित हिंदी चित्रपटाची गाणी शोधण्यापेक्षा यमनच का नाही ऐकत लोक्स? ऐकून पहा तेही आवडेल. सुरुवात तर करा.

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Jul 2016 - 7:17 am | माम्लेदारचा पन्खा

तो शास्त्रीय संगीत शिकला नव्हता ह्याचा त्याच्या आयुष्यात तसूभरही फरक पडला नाही.....खरी गंमत तर त्या गोष्टी करून दाखवण्यात असते ज्या गोष्टी तुम्हाला कधीही करून दाखता येणार नाहीत असे इतर लोक म्हणतात .....याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे किशोरदा !

स्पा's picture

26 Jul 2016 - 7:20 am | स्पा

नीटसे कळले नाही

रागदारीवर आधारीत गाणे म्हणजे?

प्रत्येक गाणे हे कुठल्या ना कुठल्या रागात असतेच, कधी कधी लिबर्टी म्हणुन संगितकार एखादा रागाच्या बाहेरचा स्वर घेतो. चित्रपट संगीतात हे चालून जाते
चित्रपट इतिहासातली ६०% गाणी यमन रागातली आहेत

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jul 2016 - 8:02 am | अत्रुप्त आत्मा

अॉ... , अचं जालं तल!

चांदणे संदीप's picture

26 Jul 2016 - 8:01 am | चांदणे संदीप

सुरेख संकलन बहुगुणी सर!
आपल्यालाही राग-बिग काही येत नाही! ;)

धाग्याची वाखू साठवून ठेवतो कारण इथे काही वेळाने बरेच माहितीपूर्ण आणि रंजक प्रतिसाद येतील अशी खात्री वाटते.

Sandy

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jul 2016 - 8:04 am | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम माहिती धाग्याबद्दल धन्यवाद .

बहुगुणी's picture

26 Jul 2016 - 8:37 am | बहुगुणी

क्षमस्व, पहिल्याच चित्रफितीत चुकीचा दुवा पडलाय, हा योग्य दुवा आहे.

निल्या१ आणि स्पा: माझ्या लेखनात (म्हणजे माझं म्हणणं मांडण्यात) मी कमी पडलो हे स्पष्ट आहे, परत येईन तेंव्हा आधिक खुलासा द्यायचा प्रयत्न करीन.

मंडळी: धागा टाकून पळून जात नाही पण कामामुळे दोन-एक दिवस येता येईलच असं नाही म्हणून पोच देतोय फक्त. आतापर्यंतच्या प्रतिसादकांचे आभार.

किशोर कुमारची गाणी व शास्त्रीय संगीत या मथळ्याखाली विचार करताना एक वेगळा विचार मांडतो. भारतीय संगीतात आर सी बोराल पंकज मलिक ते ए आर रेहमान पर्यंत सर्व संगीतकारानी एक राजमार्ग म्हणून शास्त्रीय संगीत व लोकसंगीताचा वापर सर्रास केलेला आहे. त्यात काही संगीतकारानी परकीय संगीतातील ढापूगिरीला प्रतिभेची जोड देत अप्रतिम गीते बनविली आहेत. पण प्रामुख्याने संगीतकारांचा भर मी वर सांगितल्या प्रमाणे राग व लोकसंगीतावर राहिलेला आहे. आता शास्त्रीय संगीत व राग यात थोडा फरक आहे. रागावर आधारित गीतात फक्त त्या रागाचे स्केल पाया म्हणून वापरले जाते. पण शाश्त्रीय हा शब्द वापरल्यावर मुरक्या ताना खटके, गमक , सरगम इत्यादि. लालित्यपूर्णता आणणारी मूलभूत अलंकरणे येतात. उदा. कुहू कुहू बोले कोयलिया हे लता रफीचे गीत, फुल गेंदवा ना मारो हे मन्नाडे यांचे गीत, मधुबनके राधिका हे रफीचे गीत ऐकले की जे अनुभवास येते ते शास्त्रीय संगीत व मतवाली नार ठूमक टूमक चली जाय, हे मुकेशचे गीत , पग घुगरू बांध मीरा नाची थी हे किशोरदाचे गीत शास्त्रीय संगीतातील अलंकारिक तेचा अनुभव देण्यात कमी पडतील तरीही ती श्रवणीय आहेत कारण रागाच्या स्केलशी ती ईमान राखून आहेत. रफी , लता मन्नादा ,आशा हे चार गायक असे आहेत की जे पहिल्या गटात बसू शकतात. त्याना मोठे यश १९६९ पूर्वी मिळाले आहे त्याचे रहस्य त्या गटातील गीते त्या काळी लोकांच्या आवडीत बसत होती. आराधनाने सर्व पालटले. गीतांची ठेवण बदलली व हरकती मुरक्या कमी झाल्या इतक्या की अमिताभ, डॅनी शत्रूघ्न सिन्हा असे नट ही गाउन गेले.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jul 2016 - 9:11 am | अत्रुप्त आत्मा

मननीय प्रतिसाद.

सपे-पुणे-३०'s picture

3 Aug 2016 - 9:49 am | सपे-पुणे-३०

देव आनंद साठी रफी आणि किशोर दोघांनीही गाणी गायली आहेत, त्यांत हा फरक लगेच कळतो.
आर. डी. बर्मन नी ' तुम बिन जाऊं कहाँ ' हे गाणं दोघांकडूनही गाऊन घेतलं आहे. त्यातील रफीचं गाणं जास्त लक्षात राहतं .

नाखु's picture

26 Jul 2016 - 8:54 am | नाखु

संकल्न आणि माहीती उप्युक्त..

राग माहीत नाही फक्त येतो...

जी गाणी काही आठवणी जागवतात्/जोपासतात आणि मनात घर करून राहतात त्यात किशोरदांची गाणी जास्त आहेत.

विविध भारती श्रोता नाखु

लाल टोपी's picture

26 Jul 2016 - 9:00 am | लाल टोपी

अप्रतिम धागा बहुगुणी सर!
एक खजिनाच उघ डून दिला आ हे
एक भर..
जिंदगी सफर मे गुजर जाते है जो मकाम
चित्रपट आप की कसम
राग बिहाग
Jindagi ke safar Me

किसन शिंदे's picture

26 Jul 2016 - 9:20 am | किसन शिंदे

अप्रतिम धागा. वर स्पाने म्हटल्याप्रमाणेच बोलतो. हिंदी चित्रपटातली बहुतांश गाणी ही रागदारीवर आधारीत आहेत. गाण्याच्या बाजानूसार त्या त्या रागात गायकाकडून गाऊन घेणे हे संगीतकाराचे खरे कसब. किशोरदा शास्त्रीय संगीत शिकले नव्हते तरी त्याने फारसा फरक पडला नाही, त्यांची सगळीच गाणी अफाट आहेत.

सतिश गावडे's picture

26 Jul 2016 - 9:45 am | सतिश गावडे

छान लेख.

मला व्यक्तिशः रागदारीतलं काहीही कळत नाही.

माझंही असंच आहे. मात्र या लेखाने थोडंफार कळेल. तुम्ही दिलेली गाणी निवांत ऐकेन.

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Jul 2016 - 9:58 am | ज्ञानोबाचे पैजार

मला शास्त्रिय संगितातले काहिही कळत नाही हे सर्वप्रथम कबुल करतो.

पण बहुगुणींसारखाच एक दर्दी मित्र आहे जो किशोरवरही तेवढेच जीवापाड प्रेम करतो. त्याने एकदा अशा गाण्यांची यादी बनवली होती. त्यातलीच काही गाणी खाली चिकटवत आहे. कोणता राग आहे याची माहिती जाणकारांनी सांगावी. त्या वेळी ते लिहुन घेतले नव्हते.

तुम आगये हो नुर आ गया है - आंधी
करवटे बदलते रहे सारी रात हम - आप की कसम
तेरे मेरे मिलन की ये रैना - अभिमान
छोटीसी ये दुनिया पहेचाने रास्ते - रंगोली
कांची रे कांची रे - हरे रामा हरे कृष्णा
प्रिये प्राणेश्वरी - हम तुम और वो
जीवन के सफर मे राही - मुनिमजी
आज मदहोश हुवा जाये रे - शर्मिली
देखा एक खाब - सिलसिला
कोई हसिना जब रुठ जाती है तो - शोले

त्याने त्या वेळी जवळजवळ १०० गाण्यांची यादी बनवली होती.

पैजारबुवा,

पैसा's picture

26 Jul 2016 - 10:16 am | पैसा

सुरेख धागा! किशोरकुमारचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची गाणी ऐकून आपणही गाऊ शकतो असे साध्या लोकांनाही वाटू शकेल. त्याच्या कॉप्या इतक्या गायकांनी केल्या तशा मन्नाडे च्या नाही सापडणार.

पण तरी किशोरकुमार कधीही बेसूर वाटला नाही. अगदी चतुरस्त्र गायक. किशोरकुमारने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नाही असे वाचायला मिळते. शोध घेतल्यावर त्याचे मामा धनंजय बॅनर्जी हे शास्त्रीय संगीत गायक होते असा उल्लेख सापडला. अधिकृत शिक्षण नसले तरी काही प्रमाणात संगीताची ओळख मामाकडून मिळणे शक्य वाटते. उपजत स्वरज्ञान तर त्याला होतेच.

चौकटराजा's picture

26 Jul 2016 - 3:19 pm | चौकटराजा

किशोर कुमार कधीही बेसूर ना वाटण्याचे प्रमुख कारण असे की सुरेल पणात ज्यांचे स्थान अद्वितीय आहे अशी लता, बालगंधर्व व के एल सैगल यात किशोरने लहान असताना पासून सैगलाना आपले सांगितिक गुरू मानले होते. अशोक कुमार व किशोर यांच्यात सुमारे १८ वर्षाचे अंतर होते. अशोककुमारांची मित्रमंडळी सैगलचे एक गाणे म्हटले की लहानग्या किशोरला एक रूपयाचे नाणे बक्षिस देत असल्याची आठवण ऐकलेली आहे.

पद्मावति's picture

26 Jul 2016 - 10:41 am | पद्मावति

सुरेख लेख!

सुबक ठेंगणी's picture

26 Jul 2016 - 11:43 am | सुबक ठेंगणी

माझ्यापुरतं म्हणायचं तर संगीत ही ऐकण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे. शास्त्रीय की सुगम वगैरे मी फार विचार करत बसत नाही.
धाग्यातल्या गाण्यांच्या दुव्यांमुळे धागा मात्र बहुगुणी नक्कीच आहे.
वाखुसा.

चंपाबाई's picture

26 Jul 2016 - 11:55 am | चंपाबाई

गाणे शास्त्रीय रागावर आधारीत असणे व शुद्ध शास्त्रीय संगीत या भिन्न गोष्टे आहेत.

हटा सावन की घटा .. हे शिवरंजिनीत आहे. पण म्हणुन वा वा ! शिवरंजिनी काय सुंदर गायलाय ! असे म्हणता येत नाही.

शास्त्रीय संगीतातील सरगम , आलाप , तान इ असतील तर ते गाणे काही अंशी शास्त्रीय गायन ठरु शकेल.

श्रीखंडात पाणी घातलं की पियुष होतं. पण म्हणुन पियुष म्हणजे श्रीखंड नव्हे.

....

कूरुंदवाडी पलुस्कर व कुरुंदवाडी श्रीखंड खाणारी हावरट चंपी.

तिमा's picture

3 Aug 2016 - 11:39 am | तिमा

अशी एकदम लोकांची चंपी करु नका हो बिनपाण्याने. शास्त्रीय आणि रागावर आधारित गाणी, हे दोन्हीही ऐकायला तितकीच मजा येते.

गाणे शास्त्रीय रागावर आधारीत असणे व शुद्ध शास्त्रीय संगीत या भिन्न गोष्टे आहेत.

जे कुठल्याच रागात नाही अशा एखाद्या चित्रपट गीताचे नाव द्या :)

कारण आपल्या रागांचे शोध लागताना त्यात रंजकता प्रथम अनुभवास आली. अभ्यासकानी त्याची कारणे शोधून वर्गीकरण केले.
कला पाहिली जन्मा आली शास्त्र नंतर. भारतीय संगीताचे वैशिश्ट्य असे रंजकतेचा विचार अधिक सखोल झाला असल्याने वर्ज्यावज्य पणाचे नियम आपल्या संगीतात जास्त आहेत. पाश्च्यात्य संगीतातही मूड या नावाने राग आहेत. डिसटर्बिंग कॉर्ड ही कल्पना तिकडेही आहे. सर्वच कॉर्ड सारख्या रंजक नाहीत.किरवाणी हा दक्शिण भारतीय राग आहे पण तो लेबानन च्या संगीतातही आपल्याला आढळेल व भूपाली जपानातील संगीतात. फक्त रागावर आधारित आहे असे आपण स्थूलपणे म्हणतो जेंव्हा त्यात सरळ सरळ ठराविक स्वरसंगति दिसत असतात.

उडन खटोला's picture

26 Jul 2016 - 3:48 pm | उडन खटोला

आती क्या खंडाला
किंवा
कभी कभी अदिति जिंदगी मे युहि
किंवा
रॉक ऑन मधलं गाणं

संदीप डांगे's picture

26 Jul 2016 - 4:37 pm | संदीप डांगे

प्रत्येक गाणं कुठल्या तरी रागात येतंच. वरील गाणीही...

शास्त्रीय संगीत म्हणजे रागदारी, बाकीचं सगळं रागाबाहेर असं नसतं. विशिष्ट पद्धतीने मांडलेल्या सुरांचे आकृतिबंध म्हणजे राग. प्रत्येक आकृतिबंधाचा अभ्यास करून वर्गीकरणासाठी नवे दिली आहेत. तुम्ही आम्ही ओरडतो बोलतो तेही कुठल्यातरी रागात बसलाच. कोणी गेल्यावर बायका ज्या सुरात रडतात तोही एक आकृतिबंध म्हणजे रागच.

शास्त्रीय संगीत व राग आधारित गाणी यात गोंधळ होऊ नये.

स्पा's picture

26 Jul 2016 - 4:46 pm | स्पा

हेच लिहायला आलेलो

बहुगुणी's picture

3 Aug 2016 - 3:07 am | बहुगुणी

स्पा: माझा मूळ गोंधळ 'शास्त्रीय संगीतावर आधारित नसलेली गाणी आहेत का' हा नव्हता तर 'किशोर कुमारला शास्त्रीय संगीताची अजिबात जाण नव्हती हे गृहीतक खरं आहे का' इतकाच होता. तो चौरासाहेबांच्या सैगल यांच्याविषयीच्या माहितीने आणि पैसाताईंच्या खालील खुलाश्याने दूर झाला.

शोध घेतल्यावर त्याचे मामा धनंजय बॅनर्जी हे शास्त्रीय संगीत गायक होते असा उल्लेख सापडला. अधिकृत शिक्षण नसले तरी काही प्रमाणात संगीताची ओळख मामाकडून मिळणे शक्य वाटते. उपजत स्वरज्ञान तर त्याला होतेच.

निल्या१:
चित्रपट संगीताला धरुन शास्त्रीय्स संगीताचा आस्वाद घेणे म्हणजे काठाला धरून समुद्र पोहु पाहण्या सारखे आहे. शा.संगीताची खरी प्रचिती घ्यायची असेल तर आधी काठ सोडून सागरात प्रवेश करावा, यमनावर आधारित हिंदी चित्रपटाची गाणी शोधण्यापेक्षा यमनच का नाही ऐकत लोक्स? ऐकून पहा तेही आवडेल.
अगदी खरंय, आणि वेळ मिळेल तेंव्हा शुद्ध शास्त्रीय संगीत ऐकतोही, आणि त्यातल्या खूपश्या 'जागा' (अगदी "कळत" नसल्या तरी) आवडतात असंही वाटतं, पण आपल्याला नेमकं काय आणि का आवडलं हे कळायलाही वेळ आणि साधना कमी आहे याची जाणीव होते. "देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी" असा काहीसा प्रकार! डबडं बांधूनही ज्यांना विहिरीतही पोहता येत नाही अशा माझ्यासारख्या जीवांनी समुद्रात उडी मारणं म्हणजे नाका-तोंडात पाणी जाणं आहे, आणि तसं ते गेलंही आहे बरेचदा, म्हणूनच माझ्याकडून प्रयत्न अर्धवट सोडले गेले आहेत! जेंव्हा जमेल तेंव्हा पुन्हा प्रयत्न नक्कीच करणार आहे, पण तोपर्यंत हात धरून कुणा गुरूने 'या रागातल्या या सुरावटीवर या गाण्याचा हा भाग आधारित आहे' हे सांगितलं तर मनापासून आवडेल.

या धाग्यावर नवीन काही प्रतिसाद आले नाहीत म्हणजे धागा थंडावला आहे, तेंव्हा प्रतिसाद देऊन तो वर आणावा की नाही अशा द्विधा मनस्थितीत होतो, पण मी खुलासा देईन असं म्हंटलं होतं म्हणून हा लेखनप्रपंच. यानंतर या विषयाशी संबंधित आणखी माहिती देणारे प्रतिसाद आले तर तेही चांगलंच.

चौकटराजा's picture

3 Aug 2016 - 7:57 am | चौकटराजा

माझ्या वडिलाना शास्त्रीय संगीतात रस होता. पण आम्हा मुलाना हे काय आ उ गाणे आहे असे वाटे. तेरा चौदा व्या वर्षापर्यन्त शंकर जयकिशन व ओ पी नय्यर यांच्या गीतांच्या प्रेमात पडण्याला आरंभ झालेला होताच.घरी रेडिओ आल्यानंतर सकाळी साडेसात वाजता संगीत सरिता हा कार्यक्रम नियमितप॑णे ऐकू लागलो व समजू लागले की आपल्याला आवडणारी गाणी ही रागातील रंजकतेचा वारसा घेऊन आलेली असतात. मग सात स्वर सप्तक,थाट , राग आरोह अवरोह, सरगम तान इ अंगे सुगम संगीताला गोडवा आणतात हे कळू लागले. म्हणजे प्रवास काठावरून सुरू झाला .

राग हे जगात सर्व संगीतात आहेत. त्याचे नियम भारतीय संगीतात अधिक सखोल इतकेच. म्हणून आपल्याला बडे गुलाम अलींची ठुमरी ऐकताना कम सप्टेंबर चे टायटल गीतही आवड्ते. ख्याल गायकी हा प्रकार मात्र फक्त भारतीय व कर्नाट्क संगीतातच आहे.

निल्या१'s picture

8 Sep 2016 - 11:56 pm | निल्या१

प्रतिसादाबद्दल आभारी आहे. ऐकत रहा हळू हळू समुद्रही कमी वाटायला लागेल.ऐकताना समजलेच पाहिजे असा काही नियम नाही.शास्त्रीय संगितात काही ही न कळणारे पण प्रचंड आवड असणारे पण लोक आहेत.
मी सुद्धा आधी फक्त ऐकत होतो. नंतर शिकायला सुरुवात केली. शिकण्याने टेक्निक्ल गोष्टी कळतात.
समुद्र किना-यालगतच्या रस्त्यावर गाडी चालवून आनंद मिळवण्यासाठी गाडी कशी चालते, इंजिनातले भाग माहित असण गरजेच नाही अगदी तस. ऐकत रहा. फक्त ऐकत रहा.

अत्रन्गि पाउस's picture

3 Aug 2016 - 6:44 am | अत्रन्गि पाउस

जिंदगी के सफर मे ... ह्या गाण्यात शेवटच्या कडव्या आधी संतूर च्या तुकड्या वर वर बिहाग -यमन- बिहाग असा एक अतिसुरेख प्रयोग आरडी ने केलाय तो जरूर ऐका ....
बाकी चौरा म्हणतात ते बरोबर आहे ...ह्यावर एक स्वतंत्र धागा कधीं वेळ मिळाला कि ....

मुक्त विहारि's picture

3 Aug 2016 - 11:21 am | मुक्त विहारि

वाखूसा

गॅरी ट्रुमन's picture

4 Aug 2016 - 10:45 am | गॅरी ट्रुमन

आज ४ ऑगस्ट. किशोर कुमारची ८७ वी जयंती. त्या निमित्ताने मला आवडणारे किशोरदाचे 'मेरे नैना सावन भादो' हे अप्रतिम गाणे इथे शेअर करत आहे. मला मगरीच्या पचनसंस्थेविषयी जितकी माहिती आहे तितकीच माहिती शास्त्रीय संगीत, राग वगैरे गोष्टींविषयी आहे. त्यामुळे मला या गाण्याचा राग कोणता वगैरे काही सांगता येणार नाही. पण एक गोष्ट नक्कीच सांगतो. या गाण्यात किशोरदाच्या आवाजातली खोली आहे ती अगदीच अनबिटेबल आहे.हे गाणे गावे ते केवळ किशोरदानेच. इतर कोणालाही असे गाता येणे शक्य नाही.

चंपाबाई's picture

4 Aug 2016 - 10:47 am | चंपाबाई

राग शिवरंजिनी

स्वाती दिनेश's picture

5 Aug 2016 - 8:37 pm | स्वाती दिनेश

धागा, वाचते आणि गाणी ऐकते आहे.
स्वाती

बाजीगर's picture

5 Aug 2016 - 9:53 pm | बाजीगर

सरजी सरबत चांगलं झाल तर त्याचा आनंद घ्या.साखर किती घातली,लिंबं कुठल्या झाडाची वगैरे वगैरे मध्ये तो कुशाग्र मेंदू नका शिणवू .शिवरंजनी की ऐसी की तैसी म्हणाला होता किशोरकुमार.

बाजीगर's picture

5 Aug 2016 - 9:55 pm | बाजीगर

you said it !!