स्वप्नदेशातून आले साथ देण्या सूर हे
ऐकुनी माझे तराणे लाजणे तव चूर हे
पाहिले मी…तू दिला होता इशारा मंदसा
स्पर्श माझा धीट होता का धपापे ऊर हे?
रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे?
लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे
आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना
कामनांचे अश्व धावे अंतरी चौखूर हे
काय सांगू काय केले हाल त्यांनी आमचे
पाहिले लाजून प्रणयीं अन सुखाचे पूर हे
मैत्रिणींचे गूज आहे गोकुळाने ऐकले
लाजता राधा कळे की श्याम नाही दूर हे
-----------------------------------------------
संपादनः
'पाहिले लाजून....' ही ओळ नंदनच्या सूचनेप्रमाणे बदलली आहे.
-----------------------------------------------
प्रतिक्रिया
27 Jan 2009 - 6:37 am | नंदन
गझल, आवडली.
रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे?
लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे
- क्या बात है!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
27 Jan 2009 - 10:13 am | घाटावरचे भट
असेच म्हणतो.
28 Jan 2009 - 12:45 am | सर्किट (not verified)
हाच शेर सर्वात आवडला, पण त्यात "ते आणि हे" आवडले नाही. आणखी छान होऊ शकेल.
-- सर्किट
28 Jan 2009 - 1:16 am | चतुरंग
रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे?
लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे
भन्नाट कल्पना!! जियो संदीप!!!
चतुरंग
27 Jan 2009 - 10:03 am | दवबिन्दु
आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना
वाचुन छान वाटल.
27 Jan 2009 - 11:39 pm | प्राजु
आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना
कामनांचे अश्व धावे अंतरी चौखूर हे
हा शेर सगळ्यांत आवडला..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Jan 2009 - 12:48 am | विसोबा खेचर
मैत्रिणींचे गूज आहे गोकुळाने ऐकले
लाजता राधा कळे की श्याम नाही दूर हे
वा व्वा! लै मस्त!
तात्या.