कोल्हापूरला ८ ने मारून गटातून विजयी म्हणून बाहेर पडलो त्यामुळे जरा मस्त वाटत होत, पण त्याचबरोबर दीप्ती आणि दादा अजूनही येताना दिसत नव्हते म्हणून काळजी वाटत होती. सोलापूरला काढू शकू असा विश्वास असल्यामुळे दिप्तीला आज आराम द्यायचा असं आम्ही ठरवलं आणि चहा घेण्यासाठी म्हणून स्टेडियम मधून बाहेर आलो. काल घरी फोन लागला नव्हता म्हणून चहानंतर घरी फोन करायचा असं ठरवलं. चहा घेतानाच लांबून दादा आणि दीप्ती दिसले. तिच्या हाताला बँडेज वैगरे नव्हतं. अंकूने दोघांना चहासाठी टपरीवर आणलं.
" वाचली रे पोरगी.. "
" म्हणजे ? काय झालं ?"
" अगं.. म्हणजे मोठी इंज्युरी नाहीये... मला वाटलं प्लास्टर वैगरे होतंय की काय... पण तसं काही नाहीये.. बस हात सांभाळावा लागणार आहे... ह्यापुढे आयुष्यभर खांदा बांधून खेळायचं.. "
" नशीब... अजून काय म्हणाले डॉक्टर ?"
" अजून काही नाही.. गोळ्या दिल्या आहेत.. दुखायला लागला तर मॉलिश, मसाज काहीही करायचं नाही... स्प्रे किंवा बाम किंवा ऑइन्टमेन्ट लावायचं बास "
" सुटले यार मी आज... मला वाटलं गेला माझा खांदा... तिथे पोचेपर्यंत मला बोटं हलवायला देखील त्रास होत होता.. " दीप्तीच्या चेहऱ्यावर सुटल्याचे भाव दिसत होते.
" मग ग? "
" काही नाही... काही नाही.. हे बघ... सगळं ठीक आहे आता "
" हं.. तरी तू आज आराम कर.. तसही आपण सोलापूरला काढू..."
" दीदी नको ना गं.. उतरू दे न मला.. "
" दीप्ती सांगितलंय तेवढं ऐक.. बाकीच्या मुली खेळातील तू आज आराम करायचा आहेस.."
चहा घेऊन आम्ही परत ग्राउंडच्या दिशेने चालायला लागलो. मला घरी फोन करायचा होता. मी दादांना विचारलं. दादांनी परवानगी दिली आणि लवकर यायला सांगितलं. मी आणि योग्या फोन करायला थांबलो. ह्यावेळी पटकन फोन लागला. फोन पप्याने उचलला.
" हॅलो... "
" पप्या मी बोलतेय"
" हा मग बोल ना.. मी बोलतेय.. मी बोलतेय म्हणून ढोल काय पिटतेस... "
" चूप रे तू... आई आलीय का ?"
" नाही.. आज तिला ऑफिसमध्ये उशीर होणार आहे.. बाबा पण नाहीयेत... आजी पण कुठे तरी बाहेर गेलीय... मी आहे.. अजून काय हवंय?"
" बरं.. तू काय करतोयस ?"
" तुला काय करायचंय ? काय हवंय ते बोल लवकर.. बाय द वे तुझी ब्लू शॉर्ट्स मी घेतली.. "
" पप्या तिला तू हात लावणार नाही असं म्हणाला होतास... कधी तरी स्वतःचे कपडे वापर ना.. ठेव माझी शॉर्ट्स.. नाहीतर आल्यावर बघ तुझं काय करते ते.. "
"ए.. जास्त भाईगिरी दाखवू नकोस.. तू आल्यावर इथे एक गम्मत असणार आहे.. ती जर तुला आत्ता समजायला हवी असेल तर..."
"........ "
" शीट... तू माझे सगळे कपडे ढाप असेच... हं.. दिली.. कॉलेजच्या मॅचला मला देत जा फक्त... बोल आता काय ते"
" गुड गर्ल... तो सुनो.. रेवा डार्लिंग... तुम्हारे वापस आतेही अगले दिन बडबड कासव उर्फ काकाश्री और उनकी बहन मतलब सतीश की माँ यहाँ पधारनेवाले है... "
" काय ? तुला कोणी सांगितलं ?"
" देवाने मला पण दोन कान दोन डोळे आणि तुझ्यापेक्षा जास्त अक्कल दिली आहे"
" कशाला रे ते येणार आहेत ?"
" मुंबईत बर्फ पडतं का ते बघायला ? फालतू प्रश्न विचारू नकोस.. असं मला आई म्हणाली जेव्हा मी तिला हाच प्रश्न विचारला.. "
" बरं.. बघू आता काय ते.. बाकी ठीक ना सगळं"
" हो बाकी सगळं ठीक "
" चल ठेवते फोन. सांग आईला फोन आला होता ते.. बाय.."
" बार बाय.. बाय द वे.. मॅच नीट खेळ हा... हात पाय मोडून घेऊन नकोस.. नाहीतर सासूबाईंना काय दाखवणार तू ? मोडके हात आणि मोडके पाय.. ही ही ही.. "
" ऐ.. चूप.. चल ठेव फोन.."
आता काय हे नवीन नाटक? मला भिरभिरल्यासारखंच झालं. का हे लोक मागे लागले आहेत ? मी एवढे सरळ सांगून पण समजले नाही का त्यांना? माझा चेहरा बघून काहीतरी झालंय एवढे योग्याला समजले. तिने चौकशी करून माहिती काढायचा प्रयत्न केला पण मी दाद लागू दिली नाही. नाही तर ह्या ११ जणींनी मला पिडलं असतं आणि दादांचं लेक्चर मिळालं असतं ते वेगळंच. मी मुद्दाम वेगळाच विषय काढून गप्पा मारत स्टेडियम मध्ये जाऊ लागले. तिथे गेल्यावर दादांनी दीप्तीच्या जागी संजूला खेळवा असं सांगितलं. आम्ही त्याला हो म्हणून समोर चालणाऱ्या मॅच बघत राहिलो. पप्याने सांगितलेल्या गोष्टीमुळे अस्वस्थता आली होती. ही गोष्ट अशी होती की कोणाला सांगूही शकत नव्हते आणि सहनही करता येत नव्हती. मॅच झाल्यावर सगळ्यांबरोबर परत घरी फोन करायचा असं ठरवलं आणि सगळं लक्ष समोर चाललेल्या मॅचवर केंद्रित करायचा प्रयत्न करत राहिले. जवळ जवळ दोन तासांनी आम्ही उठलो जरा हात-पाय मोकळे करून हळूहळू वॉर्मअपला सुरुवात केली. सुरू झालेल्या मॅचनंतर आमची मॅच होती. सोलापूरची टीम देखील वॉर्मअपला उतरली. तिसरा पुकार ऐकल्यावर शिस्तीत नेहमीसारखं ग्राउंडवर गेलो.
गटातल्या मॅच संपून क्वार्टर फायनलची मॅच सुरू झाल्यामुळे ह्या सामान्यापासून प्रेक्षकांसाठी ओळख परेड असणार होती. दोन्ही संघ टच लाईनवर उभे राहिले की पाहुण्यांशी ओळख करून देताना माइकवरून त्या त्या खेळाडूचे नाव घेतले जाते. एखाद्या ओळीत खेळाडूची ओळख प्रेक्षकांना करून दिली जाते. अशा वेळी ती खेळाडू दोन्ही हात उंचावून सगळ्यांना अभिवादन करते. ही ओळख परेड संपली आणि आम्ही ७ ची कव्हर फिरवू लागलो. तुप्याला पम्मीचा टर्न दिला होता. ह्यावेळेस टॉस आम्ही जिंकलो. त्यामुळे आम्ही ग्राउंड घेतलं. सोलापूरची रेडर रेडसाठी आली. कव्हर नाचवून तिने बोनस घेतला. आमच्यकडून पहिली रेड रूपाने केली. रूपालाही सहज बोनस मिळाला. त्यांच्या पुढच्या रेडला रेडरच लक्ष नाहीये हे दिसल्यावर मी कॉर्नरवरून सुटले आणि डॅश दिला. अजून १ पॉईंट आम्हाला मिळाला. आता रेडला दीदी गेली. स्टेपिंग करत असतानाच तिचा पट काढला. परत मॅच इक्वल झाली. सोलापूरने टाईमआऊट घेतला. आम्ही मॅच स्लो करायची ठरवलं आणि त्यांनी फास्ट. त्यांना लीड घ्यायची घाई होती. त्यांच्या सगळ्या रेडर राईट असल्यामुळे आम्ही आमचे राईटचे पॉकेट टाईट ठेवले होते पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. ना त्यांना ना आम्हाला. सगळ्या रेड त्यांचा नील जात होत्या. मात्र आमच्या रेडर्सना पॉइंट्स, बोनस मिळत होते त्यामुळे आमच्याकडे ७ चा लीड आला होता. हाफ टाईमला स्कोर ३- १० होता. हाफ टाईमला आम्ही दीदी आणि रुपाला विश्रांती देऊन अंकु आणि गीताला उतरवले. हाफ टाईमनंतर ७ मिनिट गीता, संजू, रेश्मा सतत रेड करतील आणि नंतरचा वेळ मी,जागु आणि योग्या रेड करू असं ठरवलं. हाफ टाईमच्या ७ मिनिटांनी स्कोर ६-२४ होता. गीता आणि संजूला मस्त पॉईंट होते. त्यामुळे १८चा लीड आला. आता मॅच हातातून गेली आहे असं जेव्हा सोलापूरच्या टीमला वाटलं मग अनुभव येण्यासाठी त्यांनी त्यांच्या लहान मुलींना उतरवले. आम्हीही मग एक पाऊल मागे घेत आमच्या बाकीच्या लहान मुलींना उतरवून आमच्या प्लेस त्यांना दिल्या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी जागू आत राहिली आणि आम्ही सगळ्या बाहेर बसलो. मग मात्र दोन्ही बाजूच्या लहान मुलींनी तुफान खेळ करायला सुरुवात केली. आलटून पालटून भट्ट्या लागत होत्या स्कोर सतत बदलत होता पॉइंट्स वर खाली होत होते. ह्या लहान मुलींच्या खेळाला मात्र सांगलीकरांची भलतीच दाद मिळाली. मॅच संपली तेव्हा स्कोर ३०-५४ असा होता. वनसाईड मॅच झाली होती पण मॅच बघणार्यांना आणि खेळणाऱ्यांना खूप मज्जा आली होती. आता उद्या ठाण्याची टीम सेमी फायनलला होती. एक सेमी फायनल मुंबई x ठाणे आणि दुसरी सेमी फायनल नाशिक x पुणे अश्या असणार होत्या.
आम्ही ग्राउंडच्या बाहेर आलो. सगळ्या लहान मुलींना खेळायला मिळाले म्हणून त्या जाम खुश दिसत होत्या. आम्ही कपडे घालून तयार होत असताना
" रेवा.. तुला एक गोष्ट सांगायची आहे.." रूपा म्हणाली.
" काय झालं ? "
" इथे नको रूमवर जाताना सांगते.. "
" अग बोल ना... "
" इथे नको... "
" बरं... पण नक्की सांग... " असं म्हणत मी शूज घालत असताना माझ्या हाताला काही तरी लागलं. मी ते पाहिलं आणि गपचूप खिशात ठेवलं. उगाच सगळ्यांसमोर नको उघडायला म्हणून... पण त्यात काय आहे हे बघण्याची उत्सुकता होती. कारण जे कोणी ते ठेवलं होत ते जाणूनबुजून ठेवलं होत.
आम्ही मेसच्या दिशेने चालायला लागलो. जसा खेळाचा विषय डोक्यातून बाजूला झाला तसा परत घरच्या विचारांनी मेंदूचा कब्जा घेतला. आता कोणत्या भाषेत त्यांना सांगू मलाच कळत नव्हते. बर ह्या विषयावर बोलू तरी कोणाशी? काही तरी करून त्यांची समजूत घालण्यासारखी काहीतरी स्ट्रॅटेजी बनवायला हवी. त्याच विचारातच मेसमध्ये जेवलो आणि रूमवर जाऊ लागलो. आज उशीर झाल्यामुळे आणि काल सगळ्यांनी घरी फोन केले असल्यामुळे उद्या सकाळी घरी फोन करूया असे ठरले. गटा-गटाने आम्ही चालत होतो पण एकमेकींशी बोलण्यासाठी आम्ही दोघी मुद्दाम मागे राहून हळूहळू चालत राहीलो.
रूपाने हळूच एक कागद काढला आणि मला दाखवला. त्यावर ' I LOVE YOU RUPALI तू खूप सुंदर दिसतेस. मला तू आवडली आहेस. तुला सांगलीची सून व्हायला आवडेल का ? जर तुझं उत्तर हो असेल तर उद्या तू वेगळा ती शर्ट किंवा कपडे घाल. मी तुला भेटेन. तुला मी आवडलो तर आपल्या दोघांच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आपण लग्न करू.' खाली लिहिलेले होते. ' तुझाच आणि तुझाच .... '
मी रूपाकडे पाहिलं आणि माझ्या खिशातली चिठ्ठी काढली आणि वाचली आमची नाव सोडली तर बाकी चिठ्ठी सेम होती. मी माझी चिठ्ठी तिला वाचायला दिली. तिने ती वाचली आणि आम्ही खदाखदा हसायला लागलो आणि येता येता मजनूकडून मुहदिखाई कशी घ्यायची याचा प्लॅन ठरवला... जागू आणि तुप्याला प्लॅनमध्ये सामील करून काय कसं करायचं हे ठरवलं पण बाकीच्या गॅंगला ही गोष्ट सांगूया की नको हा निर्णय काही होत नव्हता. बघू वेळ येईल त्याप्रमाणे वागायचे असे ठरवले. उद्या सकाळी पाहिलं काम जागू आणि तुप्याला हो गोष्ट आणि ठरवलेला प्लॅन सांगणे.
क्रमशः
एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954
एक संघ मैदानातला - भाग ७ http://www.misalpav.com/node/35989
एक संघ मैदानातला - भाग ८ http://www.misalpav.com/node/36014
एक संघ मैदानातला - भाग ९ http://www.misalpav.com/node/36071
एक संघ मैदानातला - भाग १० http://www.misalpav.com/node/36205
एक संघ मैदानातला - भाग ११ http://www.misalpav.com/node/36256
एक संघ मैदानातला - भाग १२ http://www.misalpav.com/node/36281
एक संघ मैदानातला - भाग १३ http://www.misalpav.com/node/36300
एक संघ मैदानातला - भाग १४ http://www.misalpav.com/node/36406
एक संघ मैदानातला - भाग १५ http://www.misalpav.com/node/36536
प्रतिक्रिया
5 Jul 2016 - 4:34 pm | कविता१९७८
मस्त
5 Jul 2016 - 4:38 pm | एस
हाहाहा! ह्ये मजनूचं अवलाद लईच कान्फिडण्ट दिसतंय ब्येनं!
पुभाप्र.
5 Jul 2016 - 4:42 pm | धनंजय माने
ख्याक!
या मालिकेची दखल का घेत नाहियेत?
6 Jul 2016 - 3:19 pm | नाखु
खेचाखेची आणि पकडी चालत असल्याने प्रतिसादात ती सोय (पक्षी वाव) नाही म्हणून असेल कदाचित.
खखो वाचकच जाणोत
5 Jul 2016 - 4:57 pm | नाखु
थोडक्यात सामना फक्त मैदानावरच नाही तर घरी पण चालू आहे. कथानायिका घरच्या "कव्हरला" कसे तोंड देते त्याची उत्सुकता लागली आहे.
पु भा प्र
5 Jul 2016 - 5:08 pm | बोका-ए-आझम
घरच्या कठीण मॅचमध्ये काय होतं त्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. आपल्याकडे मुलींना जरा हुंदडू देत नाहीत xxx!
5 Jul 2016 - 6:38 pm | शलभ
मस्तच..:)
5 Jul 2016 - 8:30 pm | असंका
हा हा हा...कहर!!
मस्त लवकर लिहिलंत...त्याबद्दलही धन्यवाद!
पुभाप्र...
5 Jul 2016 - 8:43 pm | मुक्त विहारि
पुभाप्र.
6 Jul 2016 - 7:22 pm | वगिश
मजा आली
6 Jul 2016 - 11:14 pm | सोनुली
+1
7 Jul 2016 - 6:37 am | संजय पाटिल
हा हा हा मस्त आहे
मजनूकडून मुहदिखाई काय मिळाली हे वाचण्यास उत्सूक.......
7 Jul 2016 - 7:21 am | सुधीर कांदळकर
लहान मुलींना उतरवणे आवडले. झकास.
7 Jul 2016 - 8:22 am | क्रेझी
मस्त टर्न आहे शेवटी :) :) मजनू हा हाहा :) पुढचा भाग लवकर टाका हं
7 Jul 2016 - 7:56 pm | डश
मस्तच !!
7 Jul 2016 - 7:57 pm | अदि
मी पण कॅप्टन होते कबड्डीची. खूप धमाल केलिय. शि बि आय, मालिका झकासच् चाल्लिय. और आने दो..