उघडली गवाक्षे फिरू लागली धरा
तुज पत्र लिहाया झाले मी आधिरा
टिचकीने एका ताव मिळे लिहाया
@च्या गोलात पत्ताही दडे नेमका
टपटपली अक्षरे उलगडती भाव मनीचे
अक्षरेही घेती आकार रंग निराळे
मज भासे ते ते लिहिले विद्युत डाकी
टिचकीने एका क्षणात तुजला धाडी
पावली लगोलग मज रे पोच पावती
भासली जणू रे तुझीच ही सावली
या कृती जरी असती यांत्रिक
तावातिल शब्द सुवासिक मंत्रित
मी मंत्रमुग्ध अन धुंद भान गंधित
तुज होईल का रे आशीच ही लागण
उघडली गवाक्षे फिरू लागली धरा
तव पत्र पहाया झाले मी अधिरा
प्रतिक्रिया
18 Jan 2008 - 1:35 am | प्राजु
अनिला,
खूप छान लिहीलि आहेस कविता...
वेगळी आहे एकदम.
आवडली.
प्राजु.
18 Jan 2008 - 8:55 am | विसोबा खेचर
'क्लीक' ला 'टिचकी' हा शब्द कवितेत अगदी चपखलपणे बसल्याचे पाहून गंमत वाटली! :)
'ताव', 'विद्युत डाक' हे शब्द आवडले!
अवांतर - तावाप्रमाणेच 'रीम' हा शब्दही कवितेत आला असता तर मजा आली असती! :)
असो, सुंदर कविता...!
अजूनही अश्या कविता येऊ द्यात, शुभेच्छा!
आपला,
(ई-जगतातला) तात्या.
18 Jan 2008 - 9:18 am | अनिला
४ साला आधी माझा मुलगा एम्.एस. करायला आला तेव्हा सुचलेली आहे. कच्ची तयार होतीच.आणि मिसळपाव वर हेच शब्द पाहून लिहावी वाट्ली. धन्यवाद बरेका, खूप खूप
18 Jan 2008 - 11:33 am | सहज
विरोपाची पोचपावती/उत्तर लगेच मिळाल्यावरचा आनंद काही औरच ना? :-)
अजून वाचायला आवडतील तुमच्या कविता.
18 Jan 2008 - 9:55 am | संजय अभ्यंकर
अतिशय सुन्दर कविता!
संजय अभ्यंकर
18 Jan 2008 - 8:27 pm | चतुरंग
'विद्युत डाकी' शब्द भावला मनी
काव्य वाचुनी मोद दिसे आननी
'ताव' काढुनि 'टिचकी' मी मारितो
प्रतिकाव्ये मी प्रतिक्रिया ही देतो
चतुरंग
26 Jan 2008 - 9:49 am | सुधीर कांदळकर
काळानुरूप मराठी भाषेत नवीन भर पडायलाच पाहिजे. ती देखील कवितेत. सोन्याहून पिवळे.
गवाक्षे
टिचकीने आणि
विद्युत डाकी
शब्द फार आवडले. पैकी फक्त टिचकी हा शब्द ठाऊक होता.