चॉकलेट

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
13 Jun 2016 - 11:26 pm

पक्याला वाईट सवय. स्टेशनवर घेऊन जायचा मला. आगगाड्यांचा खडबडाट नुसता. गर्दी म्हणजे नुसती चेंगराचेंगरी. थांबलेल्या मालगाड्या बघण्यात काय हशील? स्लीपर कोचात जावून झोपणं, असले उद्योग त्याचे. एकदा एसी डब्यातून हाकललं आम्हाला, साल्या झाडूवाल्याने, छ्या.

चकमक चकमक रात्र होती.
अशीच खडबडत एक रेल्वे आली. थांबली. आणि निघून गेली.
जगाचं ओझं पाठीवर वाहीलेला माणूस दिसला. अगदीच थकलेला. माझ्या शेजारी येऊन बसला. म्हणजे बाकड्यावर.
मी सिगारेट काढली. अन उगाचच्या उगाच त्याला माचीस मागितलं. हे पक्याचे आवडते उद्योग. पण आज तो कुठे उलथलाय?
तो टकलू माणूस माझ्याकडे भांबावून बघतच राहिला. साल्या माचीस मागितलं रे. जाऊंदे सोड.

तर तो टकलू माणूस. त्याने एक उंची सिगार काढली. पेटवली. आन बसला वढत. च्यायला.
तलप आली की काय काय करावं लागतं. सरळ उठून स्टेशनच्या बाहेर आलो. डबडं विकत घेतलं. अन बसलो फुकत पानपट्टीवरंच.
काळ्या काळ्या अंधारात पांढरा पांढरा धूर. पॉश कारगाड्या, रिक्षा, टॅक्सी अन बरंच काही. आता एक कटींग भेटला तर काय धमाल कीक बसेल.

एकाएकी काळ्या केसाळ हातानं मानकुटंच पकडलं. खोकलोच.
"चलय चल, साल्या भुरट्या" म्हणून लांबड्या दांडक्यानं फटके मारले पिंडरीवर. मग वढतच घेऊन गेला मला ठेसनात.
रेल्वे स्टेशनमध्येच एक पोलीस स्टेशन होते. हे म्हणजे ठेसणातच येक ठेसण हुतं. च्यायला काय पण. म्हायीतच नव्हतं. दिसलंच नाही.

तर तो टकलूसुद्धा मागून येत होता. हे एक नवीनच लचांड.

वर पंखा गरगर फिरत होता.

"विनिस्पेक्टर सायेब, मी काय ह्यांची ब्याग घेतली नाही, आस्सा उठून गेलतो, फुल मोकळा, बिडी फुकायला, इच्चारा"
खुर्चीवर बसलो तरी केसाळ हवालदारानं माझं गचुरं धरलंच हुतं. अट्टल चोर सापडल्याच्या आनंदात इनिस्पेक्टर साहेब तंबाखू मळून खात होते.

"रिमांडवर घ्या ह्यला, सालटंच काढतू ह्येचं"
च्यायचा घोडा. आता मिरचीची पुड. बर्फाची लादी. वर पुन्हा येसूर.

"आपुन बऱ्या बोलानं सगळं बोलाय तयार हाय सायेब, आपुन दाखवतो ती ब्याग कुठाय"
इनिस्पेक्टर हलका हसला आन म्हणाला "चल, हितंच आसंल कुठतरी ठेसनात, दाखव"

चकमक चकमक रात्रीचं आम्ही फलाटावर आलो. केसाळ हातात मानगुट अडकलेलंच. हातात दावं गुंडाळलेलं. ह्यांच्याकडं बेड्यासुध्दा न्हायीत. दळींद्रे साले.
नशीब गर्दी नव्हती. नाहीतर तुटून पडली असती.

टकलू आणि मी ज्या बाकड्यावर बसलो तिथं आलो. तिथं एक माणूस बसला होता. मी उगाचच्या उगाच म्हणलो "चित्तूर". तसा तो आम्हाला बघत उठला आणि थराथरा कापत निघून गेला. च्यायची. ही पक्याची सवय. तो असल्यावर मज्जा असते.

"चित्तूर मजी?" काळा रेडा गुरकावला.
"आसंच आपला टाईमपास" काळा रेडा क्षणभर येडाच झाला. त्याला अजून येडा केला असता पण त्यानं मला बदडला असता.

"हे बघा विनिस्पेक्टर साहेब, त्या तिथं पक्या बसला हुता, त्या ताराच्या कुपनाच्या ढोबळ्यात"
"बरं" इनिस्पेक्टरनं ढोबळ्यावर ब्याटरी मारली.
"आपुन पायानं सुटकेस म्हागं सारली, हे आपल्याला कबूल, पण पक्यानं मागच्या मागं उचलली"
"बरं" इनिस्पेक्टरनं ढोबळ्याच्या तारा वर उचलल्या.
"तवा आपुनबी हितून सटाकलो, आन टपरीवर वाट बघत बसलो"
"चल हिकडून चल" इनिस्पेक्टर ढोबळ्यातून पलिकडं गेला. मग आम्हालाबी जावं लागलं. ब्याटरीनं झाडं झुडपं बघत, पाला उचकाटत, वेटींग रुमच्या खिडकीखालून आम्ही रस्त्यावर आलो.

"आता लास्टंचं इचारतू, पक्या कुठाय?" इनिस्पेक्टरनं लास्टंचं विचारलं. काळ्या हवालदारानं दांडकं दाबून धरलं.
मी गुमान देवळाकडं हात दाखवला, "गणपतीम्हागं आमचं भेटायचं ठरलं हुतं"

रातीचे नऊ दहा तरी वाजले असतील. साला टकलूबी आमच्याबरोबर होता. मग चमचम चांदण्या बघत आमची वरात देवळाकडं.

"तू पलिकडून जा ह्यला घीऊन, मी हिकडच्या साईडनं येतो, शेट तुम्ही थांबा गेटवरंच" इनिस्पेक्टरनं सूचना दिल्या. काळ्या रेड्यानं त्याच्या हातातलं दावं ढिलं सोडलं. पळता कसं येईल त्याला.

जवा देवाळाच्या मागं गेलो. तेव्हा मी हळूच म्हणालो "चित्तूर" . अंधारात पक्या धूम पळाला. हातात कायतर होतं त्याच्या. बहुतेक ब्यागेसारखंच कायतरी. मग मला सोडून दोघे पक्याच्याच मागं सुसाट पळाले.
"ही चित्तूरची काय भानगड हाय?"
काळा रेडा "काय म्हायीत" म्हणून पळंतच राहिला.

च्यायला, मला एकटंच सोडून दोघे पळालेसुद्धा. बरोबर हाय म्हणा, ब्याग मिळाल्यावर आमचं काय काम?

मागं एकदा चित्तूरलापण असंच झालतं. सुरुवात वेगळी असली तरी एंडीग मात्र सेम होतं.

पण आता मी ठरवलंय. तलप आली असताना चोरी करायची नाही. केली तर अर्ध्यावर सोडायची नाही. सोडली तर टपरीवर बिड्या फुकत बसायचं नाही.
कारण प्रत्येक वेळी पक्या भेटलंच असं नाही.

विचार करत करत मी स्टेशनवर निवांत चालत आलो. वेटींगरुमच्या खिडकीजवळ झुडपात गेलो. पालापाचोळा दूर केला. खड्ड्यातली ब्याग हातात घेतली. आणि पाण्याच्या टाकीकडं निघालो. पक्या माझी वाट बघत तिथंच येऊन बसलेला असणार.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

13 Jun 2016 - 11:33 pm | किसन शिंदे

हेहेहे, भारी एकदम

प्रचेतस's picture

13 Jun 2016 - 11:42 pm | प्रचेतस

लै भारी लिहिता राव तुम्ही.

प्रचेतस's picture

13 Jun 2016 - 11:42 pm | प्रचेतस

लै भारी लिहिता राव तुम्ही.

आनंद कांबीकर's picture

13 Jun 2016 - 11:51 pm | आनंद कांबीकर

तुमी डोळ्यांम्हवरं रेलवीठेसनच हुभा केलं!
एकदम झक्कास!

रातराणी's picture

14 Jun 2016 - 12:03 am | रातराणी

भारी चित्तूरकथा!

टवाळ कार्टा's picture

14 Jun 2016 - 1:20 am | टवाळ कार्टा

भारी

चांदणे संदीप's picture

14 Jun 2016 - 6:35 am | चांदणे संदीप

काही अनुभव?

Sandy

जव्हेरगंज's picture

14 Jun 2016 - 6:59 am | जव्हेरगंज

या स्टेशनवर ;)

चांदणे संदीप's picture

14 Jun 2016 - 7:48 am | चांदणे संदीप

लै दांडगे आण्भव हैत आपले! वडील रेल्वेत पोलिस आन मी एकेकाळचा "लाईनब्वॉय!" ;)

Sandy

संजय पाटिल's picture

14 Jun 2016 - 6:55 am | संजय पाटिल

आवडली.....
पण चॉकलेट चा अर्थ कळला नाय...

जव्हेरगंज's picture

14 Jun 2016 - 11:36 am | जव्हेरगंज

ch

पोलिसांना जे देउन पळाला ते...
इंग्रजीत त्याला तुरी म्हणतात...

संजय पाटिल's picture

17 Jun 2016 - 12:58 pm | संजय पाटिल

आयला... आसं हाय व्हय!!!

कविता१९७८'s picture

14 Jun 2016 - 7:20 am | कविता१९७८

मस्त,पण शीर्षक 'चित्तुर' असायला हवे होते

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2016 - 7:50 am | डॉ सुहास म्हात्रे

भारी !

नाखु's picture

14 Jun 2016 - 8:02 am | नाखु

(हसवून)आम्हाला....

फलाटावरचा नाखु

निशाचर's picture

15 Jun 2016 - 2:45 am | निशाचर

खरं आहे, प्रत्येक वेळी पक्या भेटलंच असं नाही.

भरत्_पलुसकर's picture

15 Jun 2016 - 4:14 am | भरत्_पलुसकर

भारीये !

सौन्दर्य's picture

15 Jun 2016 - 5:20 am | सौन्दर्य

एकदम भन्नाट, खिळवून टाकणारी कथा, आवडली. फक्त एकच गोष्ट नीटशी कळली नाही, (कदाचित माझ्या समजण्यात चूक होत असेल)

सुरवातीपासून म्हणजे - 'पक्याला वाईट सवय. स्टेशनवर घेऊन जायचा मला' ते 'तो टकलू माणूस माझ्याकडे भांबावून बघतच राहिला'पर्यंत भाषा शुद्ध वाटते मग अचानक बदलते. हे मुद्दाम आहे की काही कारणाने ?

जव्हेरगंज's picture

16 Jun 2016 - 10:54 am | जव्हेरगंज

कितीही शुद्ध लिहायचा प्रयत्न केला तरी आमची न्याच्युरल अशुध्द स्टाईल आडवी येते. त्याला ईलाज नाही :(

तुमच्या लिखाण पद्धतीला लाख सलाम...!
एक प्रश्न उभा करता, दोन वाक्य त्याच्च्या उत्तरासाठी वाचावेत तर लगेच एक प्रश्न टॉर्च पाडुन उभाच की?
अर्ध्यावर ठेवुन पुढं निघावंच लागेल इतका तुफान रंगवलेला प्रसंग...
मग सगळं मागं राहतं अन नायक कामयाब झालेला असतो... प्रश्न/चिंता गळुन पडतात.
-----
जबरा फ्यान

पिंगू's picture

15 Jun 2016 - 5:58 pm | पिंगू

चाकलेट भारीयं....

सिरुसेरि's picture

15 Jun 2016 - 6:00 pm | सिरुसेरि

छान लिहिली आहे . कथा व्हिजुअलाइज होताना डोळ्यासमोर कथानायक म्हणुन नवाजुद्दीन सिद्दीकी येत होता .

प्रथमेश परब चालतय. नवाजुद्दीन लै सिनीअर झाला.
बाकी कथा म्हणून एक नंबर परफेक्ट. नेहमीप्रमाणेच.

किसन शिंदे's picture

15 Jun 2016 - 8:08 pm | किसन शिंदे

अगदी अगदी..

मलाही वाचताना डोळ्यासमोर नवाजच येत होता.

मी-सौरभ's picture

15 Jun 2016 - 6:02 pm | मी-सौरभ

मस्तयं

बाबा योगिराज's picture

15 Jun 2016 - 6:13 pm | बाबा योगिराज

लै झ्याक. मस्त. परत एकदा आवड्यास.

सोत्रि's picture

15 Jun 2016 - 7:40 pm | सोत्रि

झक्कास!

- (चॉकलेटी) सोकाजी

पिशी अबोली's picture

16 Jun 2016 - 9:05 am | पिशी अबोली

आवडली.

नीलमोहर's picture

16 Jun 2016 - 9:56 am | नीलमोहर

चित्तूर परवलीचा शब्द दिसतोय पण त्याला अजून काही अर्थ आहे का?

लेखातच हाय कि, चित्तूर ला पण आधी असं झालेल. मला तर चित्तूर चन्नम्मा एक्स्प्रेस आठवली.

जव्हेरगंज's picture

16 Jun 2016 - 10:49 am | जव्हेरगंज

एक प्रश्न :
ब्याग झुडपात कोणी लपवली?

confirmation द्या.

(background ला घडलेली स्टोरी अनेकांच्या लक्षात आलेली नसावी )

सुबक ठेंगणी's picture

16 Jun 2016 - 12:15 pm | सुबक ठेंगणी

आत्ता गोष्ट (परत) परत वाचली. ही Split personality disorder ची केस तर नाही ना?
पक्या आण हा कथेतला चोर हे एकच तर नव्हेत?

आनंद कांबीकर's picture

18 Jun 2016 - 12:39 am | आनंद कांबीकर

मस्तच!
जव्हेरभौ चॉकलेट द्यायची शक्कल भारीच

ब़जरबट्टू's picture

4 Jul 2016 - 9:50 am | ब़जरबट्टू

आवडले ना राव... :) एक नंबर...