"कोसला"विषयी खूप काही ऐकून होतो. विकत घ्यायचे मनात होते. पण शनिवारी (दि. ११-जून-२०१६) दुपारी माझ्या मोठ्या भावाच्या घरी पोहोचलो. तिथे सोफ्यावर कोरेकरकरीत "कोसला" दिसले. दादाने नुकतेच मागवले होते. शनिवारी संध्याकाळपर्यंत काही कामांमुळे वेळ मिळाला नाही. संध्याकाळी "कोसला" हातात घेतलं. रात्रीचं जेवण घेतल्यानंतर थोड्या गप्पा झाल्या आणि "कोसला"वर झडप घातली. त्याआधी दादाला 'कसे आहे' म्हणून विचारले. त्याने सुरुवातीची काही पाने वाचली होती आणि नंतर त्याला वेळ मिळाला नाही. तो म्हणाला "तू वाच आणि ठरव. वाटल्यास घरी घेऊन जा. वाचून संपलं की परत आणून दे." मी शनिवारी रात्री सुरुवात केली आणि रविवारी संध्याकाळी पाच पर्यंत वाचवून संपवलं. रविवारी जरा एक-दोन कामांनिमित्त बाहेर जायला लागलं. थोडा वेळ गप्पांमध्ये गेला. अन्यथा अजून थोडं आधी संपलं असतं. असो.
"कोसला" हे भालचंद्र नेमाडे या 'ज्ञानपीठ पुरस्कार' विजेत्या लेखकाचं पहिलं पुस्तक. कादंबरी खरं तर. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी हे पुस्तक १९६३ मध्ये जेमतेम पंधरा दिवसात लिहून पूर्ण केलं. देशमुख आणि कंपनीने हे पुस्तक प्रकाशित केलं तेव्हापासून या पुस्तकाच्या चोवीस आवृत्ती आणि अनेक पुनर्मुद्रणं प्रकाशित झाली आहेत. मराठी साहित्यात "कोसला" हे मैलाचा दगड ठरलं आहे. "कोसला"वर पीएचडी करणार्यांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय "कोसला"चा साहित्यिक धांडोळा घेणारी आणि त्याचं साहित्यिक मुल्य मोजू पाहणारी जवळपास १०० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. देशमुख आणि कंपनीने नेमाडेंना त्याकाळी त्यांची ही पहिलीच कादंबरी असूनदेखील वि. स. खांडेकरांना मिळायचे तेवढे मानधन दिले होते. "कोसला"ने त्याकाळी वाचकांना वेडं केलं होतं. अजूनही प्रकाशनानंतर त्रेपन्न वर्षांनी "कोसला"ची मोहिनी पूर्णपणे उतरलेली नाही.
या माहितीपैकी बरीचशी माहिती मी आधी ऐकलेली होती आणि म्हणूनच मी शक्य तितक्या लवकर "कोसला" वाचून संपवलं. मला "कोसला" कसं वाटलं याला खरं म्हणजे काहीच अर्थ नाही. "कोसला"ने जो इतिहास रचायचा होता तो कधीच रचला आहे. तरीही इतक्या गाजलेल्या कलाकृतीचा अनुभव कसा होता हे सांगीतल्याशिवाय चैन पडणार नाही म्हणून थोडं धाडस करतोय. मला "कोसला" कसं वाटलं हा या लेखातला एक भाग आहे. "कोसला"ची निर्मितीप्रक्रिया आणि त्यामागची कारणमीमांसा ही मला जास्त आवडली. तीदेखील विशद करण्याचा थोडा प्रयत्न करतो.
"कोसला"ची कथा बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे. पांडुरंग सांगवीकर हा नायक खान्देशातल्या एका अगदी लहान खेड्यातून पुण्यात फर्गसन महाविद्यालयात बीएचं शिक्षण घ्यायला येतो. त्याची कौटुंबिक, सामाजिक, आणि वैचारिक पार्श्वभूमी फर्गसन महाविद्यालयाच्या एकूण संस्कृतीपेक्षा अगदीच निराळी! पुण्यातली जगण्याची पद्धत त्याच्या गावातल्या जगण्याच्या संकल्पनेपेक्षा अगदीच भिन्न! पांडुरंग सांगवीकर या बदलांना कसा सामोरा जातो; अपयशाचा शिक्का कपाळी बसल्यानंतर पुन्हा गावात जाऊन पांडुरंग काय काय अनुभवतो आणि त्या अनुभवांना कसा सामोरा जातो; आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक घटनेविषयी, परिस्थितीविषयी, विचाराविषयी त्याच्या मनात अगदी खोलवर कुठ्ल्याप्रकारचे सूक्ष्म तरंग उठतात आणि तो एक स्वतंत्र विचार करू शकणारी व्यक्ती म्हणून प्रत्येक प्रसंगात कसा वागतो याचं मनस्वी चित्रण म्हणजे "कोसला" ही कादंबरी होय. हे कथासूत्र आता बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे.
मला व्यक्तीश: "कोसला" रटाळ वाटलं. अगदी मैलाचा दगड वगैरे माहित असूनदेखील माझ्या एकूण वाचण्याच्या प्रक्रियेवर फारसा फरक पडला नाही. कधी कधी एखाद्या कलाकृतीचं किंवा व्यक्तीचं नावाजलेपण मनात ठेवून आपण त्या कलाकृतीकडे किंवा व्यक्तीकडे पाहतो आणि अशा वेळेस त्या मनातल्या पूर्वकल्पनेमुळे आपण त्या कलाकृतीचा किंवा व्यक्तीचा आपल्याला वैयक्तिक पातळीवर आलेला अनुभव नीटपणे जोखू शकत नाही. शिवाय आधीच्या मोठेपणाचं ओझं असतांना "आपल्याला काय वाटलं हे खरं कसं सांगायचं? बाकी रसिक आपली मापं काढतील" वगैरे दडपण असतंच. अगदी अशा प्रलोभनांना बळी पडून आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची असं ठरवूनदेखील मला "कोसला" रटाळ वाटलं. विचारांचं मुक्त, जसं आहे तसं, विचार जसे मनात येतील तसे असं मुद्दाम म्हणून दिलेलं रूप म्हणून जरी "कोसला"कडे बघायचं म्हटलं तरी मला "कोसला" वाचतांना आनंद मिळाला नाही. "कोसला" माझ्या हृदयाचा ठाव घेऊ शकलं नाही. खरं म्हणजे मी देखील फर्गसन महाविद्यालयातच शिकलो; तिथल्या वसतिगृहात राहिलो; पुण्यातून माझ्या खान्देशातल्या गावाकडे जात राहिलो; अकरावी (विज्ञान) मध्ये नापास झालो; त्यानंतर एक वर्ष गावात राहिलो. "कोसला"मधले बरेचसे अनुभव मी देखील घेतले. मला "कोसला" खूप जास्त भावायला खूप जास्त वाव होता. तरीदेखील "कोसला" मला तितकं आवडलं नाही. "कोसला"ला कुठलाच सुसूत्र प्रवाह नाही. अर्थात, सुसूत्रता टाळणे हा लेखकाचाच विचार होता. "कोसला"मध्ये निश्चित अशी कथा नाही. त्यामुळे बरेच अनाकलनीय किंवा मूळ विषयाला धरून नसलेले संदर्भ खूप मोठ्या प्रमाणात येत राहतात. अर्थात हे ही ठरवूनच. कादंबरीचा आवाका आणि पोत मुद्दाम तसाच ठेवलेला आहे. हे मान्यच. पण मला कुठेतरी हे बेताल भरकटणे आणि भरकटल्यानंतर मूळ मुद्द्यावर लवकर न येणे किंवा अजिबातच न येणे हे कादंबरीचा रटाळपणा वाढवते असे वाटले. उदाहरणार्थ, चार-पाच पाने नायकाने फक्त उंदीर मारण्याच्या प्रयत्नांना वाहिलेले आहे. नायकाला उंदरांचा भयंकर राग असतो. हा राग समजू शकतो पण तो थोडक्यात प्रभावीपणे मांडता आला असता. डायरीची तारीखवार पाने तशीच अनाकलनीय. एका तारखेवर "बुंदीचे लाडू आणि रव्याचे लाडू" तर एका तारखेखाली फक्त अ ची बाराखडी आहे. तारखेखालचा बहुतांश सगळाच मजकूर उदाहरणार्थ अनाकलनीय वगैरे आहे. कित्येक घटनांच्या वर्णनातून लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे हेच कळत नाही.
नायकाचे टोकाचे विचार अगदीच समजू शकतात पण घर जमीनदोस्त करून टाकण्याची इच्छा होणे, वडिलांना अरे-तुरे करून त्यांच्याशी भांडणे, त्यांचा खून करण्याची इच्छा होणे, वगैरे भाव कुठल्या कोनातून पटण्यासारखे किंवा समर्थन करण्यासारखे वाटतात हे कळत नाही. नायक सधन घरातला असतो. त्या काळात त्याला व्यवस्थित जगता येईल इतके आणि लागेल तेव्हा पाहिजे तितके पैसे वडील पाठवत असतात. मद्रास हॉटेलमध्ये जाऊन नायक खूप खाऊ शकत असतो आणि भकाभका सिगारेटी फुंकू शकत असतो. घरी आई-वडील, आजी, बहिणी असे सगळे असतात. एवढं सगळं व्यवस्थित असतांना हे अतिभयंकर टोकाचे विचार कशासाठी हा प्रश्न वारंवार पडत राहतो. जीवाची इतकी तगमग, घालमेल कशासाठी? मग केवळ सनसनाटी निर्माण करावी म्हणून तर लेखक असे लिहित नसेल असेही वाटून जाते. विचारांमध्ये आणि ते विचार निर्भीडपणे मांडण्यामध्ये इतका पारदर्शकपणा असतांना झगडू गड्याचे गायब होणे, त्याचे अपत्य नायकाच्या वडीलांनी सांभाळणे वगैरे यातून नायकाला नेमके काय म्हणायचे आहे हे मात्र गुलदस्त्यात राहते.
कथेचं एक वेळ जाऊ द्या पण संपूर्ण कादंबरीत निरर्थक वाटणारे असंख्य उतारे आहेत. 'उदाहरणार्थ', 'वगैरे', 'हे एक थोरच', 'हे एक भलतंच' हे शब्द किंवा उद्गार असंख्य वेळा अकारण येत राहतात. लिखाणात उगीच घुसडलेले हे शब्द किंवा उद्गार काही काळानंतर 'भंपक' वाटायला लागतात. "उदाहरणार्थ हे कोसलाचं व्यवच्छेदक लक्षण आहे" असं काहीसं मलपृष्ठावर ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव लिहितात. म्हणजे नेमकं काय मला अजिबातच उदाहरणार्थ कळलेलं नाही.
बाकी पाच वर्षाच्या बहिणीचा देवीमुळे झालेला करुण मृत्यू, त्यामुळे नायकाला झालेलं दु:ख, घरच्यांचा आलेला संताप, सिंहगडावर केलेली पायपीट, वेताळटेकडीवर दिव्याचे रहस्य शोधण्यासाठी केलेले धाडस, मेस सांभाळण्यात नायकाला आलेले अनुभव, गावातल्या गरीब लोकांची मानसिकता असे बरेचसे भाग बऱ्यापैकी अंगावर येतात. या व अशा अजून काही भागांमध्ये नायकाच्या हृदयाची तगमग भाषेचे कुठलेही अलंकार न वापरता अंगावर शहारा आणते.
मी जे वाचलं त्या "कोसला"च्या शेवटी लेखकाचं २०१३ मध्ये लिहिलेलं परिशिष्ट आहे. त्यात "कोसला"च्या निर्मितीची कथा आहे. साठच्या दशकात लेखकाच्या म्हणण्यानुसार मराठी साहित्यावर ब्राह्मणी पद्धतीच्या लेखनाचा पगडा होता. अलंकारिक भाषा, कृत्रिम कथावस्तू, कृत्रिम कथामांडणी, अतिशय गोड किंवा अतिशय रडक्या लिखाणाचा तो जमाना होता. वाचकांना अशा प्रकारच्या लिखाणाचा कंटाळा आला होता. त्यातच लेखकाचे देशमुख आणि कंपनीच्या रा. ज. देशमुख यांच्याशी सख्य जुळते. घरगुती गप्पांमध्ये लेखक देशमुख आणि त्यांच्या पत्नी यांच्या जवळ "कादंबरी लिहिणं काही विशेष नाही; मी आरामात चांगली कादंबरी लिहू शकतो" असं म्हणतात. देशमुख लेखकाला आव्हान देतात की तू कादंबरी लिहून दाखवच. लेखक पेटून उठतो आणि एक अतिशय वेगळा आकृतीबंध असलेली कादंबरी लिहून काढतो. तीच ही "कोसला". झपाटल्याप्रमाणे सिगारेटी ओढत लेखकाने "कोसला" अक्षरश: पंधरा दिवसात पूर्ण केली. अलंकारिक भाषा, भावनिक वर्णनं, एका प्रवाहात बांधलेली कथा, कथेमध्ये नेहमी आढळणारी सुसूत्रता अशा रुढार्थाने कादंबरी यशस्वीरीत्या रचण्याच्या पद्धतीला छेद देत लेखकाने ही निराळीच कादंबरी रचली.
एका अपयशी विद्यार्थ्याचे अगदी मनापासून आलेले हे प्रामाणिक आणि वास्तवदर्शी अनुभवकथन असे वर्णन लेखक "कोसला"चे करतात. नायकाच्या प्रश्नांना वाचक आपले प्रश्न समजतात. "कोसला"च्या जन्माची ही कहाणी सुरस आणि खूपच हृदयस्पर्शी आहे. एकंदरीत "कोसला"ने भारावून वगैरे जाण्याची जी माझी अपेक्षा होती ती मात्र फोल ठरली. अर्थात, वाचक "कोसला"शी कुठल्या पातळीवर आणि कसा जोडला जातो यावरदेखील "कोसला" आवडणं किंवा न आवडणं अवलंबून आहे. त्यामुळे "कोसला" आवडलेल्या वाचकांविषयी आदर आहेच. मी पुन्हा वाचेन का? शक्यता आहे. विशेषत: "कोसला"च्या जन्माची कथा (परिशिष्ट - ८-१० पाने) मला फारच आवडली. "कोसला"मधला काही भाग मला नक्कीच आवडला. एवढं तर मी दुसऱ्यांदा नक्कीच वाचू शकेन.
प्रतिक्रिया
14 Jun 2016 - 7:09 pm | समीरसूर
@ सौरा
आपण "कोसला" आवडण्य़ाचं अतिशय नेमकं आणि पटण्यासारखं कारण दिलेलं आहे. आपल्या दृष्टीकोनातून विचार करता हे कारण पटलं. उगीच भारंभार शब्दांचा पसारा नाही; अगम्य अशी थिअरी नाही. आपला प्रतिसाद आवडला.
15 Jun 2016 - 1:51 pm | पुंबा
धन्यवाद. कारण अहो कुणाला काय आवडावे हे एखादी थीअरी सांगू शकेल असं खरच वाटत नाही. इन्जिनीअरींगला दुसर्या वर्षात असताना कोसला वाचलेली तेव्हा थोडी तिरपागडी वाटलेली पण तेव्हा पण मनूचा म्रुत्यू त्यानंतरचे अजिंठ्याला गेल्यानंतरचे स्वगत आणि शेवटची २०-२५ पाने खूप आवडलेली.. त्यानंतर लगेचच गारंबीचा बापू वाचली ती कथेच्या बाबतीत अतिशय सशक्त, जीव मोठा आणि विलक्षण पात्रे यांनी भरलेली. मात्र तेव्हा जाणवलेलं की आपल्याला दोन्ही अनुभव आवडले. जे विश्व उभे करण्याची लेखकाची मनिषा होती ते करणे त्यांना शक्य झाले आहे. कथा हा विचार संगण्याचा एक मार्ग केवळ. बाकी जे दाखवायचं आहे ते खरोखर तितके भव्य असेल तर कथा हा भाग गौण असावा असे मला वाटते.
14 Jun 2016 - 6:13 pm | पुंबा
अवांतरः प्र. ना. संतांच्या लंपनवर चर्चा झाली आहे का इथे मिपावर? असल्यास कोणी धागा देऊ शकेल काय?
14 Jun 2016 - 8:19 pm | धनंजय माने
१९७३ वेळा सुमी म्हटली धागा काढ पण म्हटलं आपणच म्याड ठरू मग नाही काढला.
14 Jun 2016 - 8:22 pm | आदूबाळ
आता काढताय धागा की हवळ पेंटरला पाठवू?
14 Jun 2016 - 8:25 pm | धनंजय माने
आता हुंब सारखं आठवत च नै काही.
खूपच दिवस झाले वाचून १४०९५ तरी!
15 Jun 2016 - 9:55 am | राजाभाउ
हा हा हा. उदाहरणार्थ, हे थोरच.
15 Jun 2016 - 1:35 pm | पुंबा
काढा की... तुम्ही पण धागा काढण्यात नंबर एक.. मिपाला नकादु समजा आणि काढुन सोडा..
14 Jun 2016 - 8:53 pm | जेपी
उगाच "खोसला का घोसला"` आठवला..!
14 Jun 2016 - 10:42 pm | धनंजय माने
कोसला बद्दल ची इथली उदाहरणार्थ सखोल चर्चा वाचून मिपा हे एक थोरच संस्थळ आहे असं वगैरे वाटून गेलं.
14 Jun 2016 - 10:42 pm | धनंजय माने
कोसला बद्दल ची इथली उदाहरणार्थ सखोल चर्चा वाचून मिपा हे एक थोरच संस्थळ आहे असं वगैरे वाटून गेलं.
14 Jun 2016 - 11:36 pm | वगिश
तुम्ही औषध द्या नाहीतर ७० रुपये तरी द्या. नवे धोतर घ्यायचे आहे.
15 Jun 2016 - 10:20 am | आतिवास
समीरसूर यांचं कोसलाबदद्लचं हे मत अनेकदा ऐकायला मिळतं.
मी कोसला वयाच्या सतरा-अठराव्या वर्षी होस्टेलमध्ये रहात असताना वाचली. तेव्हापासून कोसला प्रचंड आवडली, संग्रहात आहे आणि पुन्हापुन्हा वाचली जाते. आजही कोसला आवडते.
अगदी दोन आठवड्यांपूर्वी बँकॉकमध्ये 'रिक्लाइनिंग बुद्ध' पाहतानाही मला आठवला तो पांडुरंग सांगवीकर :-)
प्रतिसादातून झालेली चर्चा आवडली. जव्हेरगंज, आदूबाळ, मारवा, बोका-ए-आझम, कानडाऊ योगेशु, नीलमोहर, सौरा यांचे प्रतिसाद आणि एकूण चर्चा उद्बोधक वाटली.
15 Jun 2016 - 10:30 am | समीरसूर
नाही हो; मी "कोसला" पहिल्यांदाच वाचलं. याआधी कधीच वाचलं नव्हतं. आणि मिपावर "कोसला"विषयी "कोसला" न वाचताच मी मत दिल्याचं खरंच आठवत नाही. म्हणून तर मिळाल्यावर अधाशासारखं वाचून काढलं. आणि तसं न वाचताच मी "कोसला"विषयी जर खरंच 'हे' मत 'अनेकदा' दिलं असेल तर क्षमस्व! ते चुकीचं आहे.
तसे याच लेखात "कोसला" न आवडलेले प्रतिसाद बरेच आहेत. :-)
15 Jun 2016 - 11:00 am | आतिवास
अनेक लोकांकडून नेमकं असंच मत ऐकायला मिळत - असं म्हणायचं होतं. तुम्ही वारंवार हे मत मांडता असा अर्थ अभिप्रेत नव्हता. गैरसमज होऊ शकेल असं ध्यानात आलं नाही. क्षमस्व.
15 Jun 2016 - 11:04 am | समीरसूर
अर्रर्रर्र...गैरसमज झाला. सॉरी. नो प्रॉब्लेम! :-)
15 Jun 2016 - 10:39 am | समीरसूर
"अर्थात, वाचक "कोसला"शी कुठल्या पातळीवर आणि कसा जोडला जातो यावरदेखील "कोसला" आवडणं किंवा न आवडणं अवलंबून आहे. त्यामुळे "कोसला" आवडलेल्या वाचकांविषयी आदर आहेच. मी पुन्हा वाचेन का? शक्यता आहे. "
हे मी मूळ लेखात म्हटलेलं आहेच. "कोसला" ज्यांना आवडली त्यांच्या मताचा आणि आवडीचा आदर आहेच. फक्त ज्यांना ती आवडली नाही त्यांचा मताचा आणि आवडीचा अनादर होऊ नये एवढीच माफक अपेक्षा. :-)
15 Jun 2016 - 11:03 am | गणामास्तर
फक्त ज्यांना ती आवडली नाही त्यांचा मताचा आणि आवडीचा अनादर होऊ नये एवढीच माफक अपेक्षा. :-)
हॅ हॅ हॅ. .भलत्याच अपेक्षा ब्वॉ तुमच्या.
बाकी, एखाद्याला जर 'कोसला' आवडली नाही तर कसा तो वाचक अत्यंत सुमार दर्जाचा आहे आणि आपण काही तरी वेगळे,प्रगल्भ वाचक आहोत हे लोकांना समजणार कसे? अगम्य (निरर्थक?) शाब्दिक बुडबुड्यांतून हे शाबित करायचा प्रयत्न करणे हे एक थोरंच !
15 Jun 2016 - 11:33 am | आबा
कोसला माझ्या आवडत्या कादंबऱ्यापैकी एक आहे. कोसला संपल्यावर जाणवनारी मेलँकाँली इतर रोमँटीक शोकांत कादंबऱ्यांपेक्शा वेगळी आहे.
कोसला वाचल्यानंतर काही वर्षांनी सँलींजरचीं "कँचर इन द राय" वाचनात आली, या दोन्ही कादंबऱ्यांचा घाट आणि काही प्रमाणात कथावस्तु सारखीच वाटली.
15 Jun 2016 - 11:33 am | आबा
कोसला माझ्या आवडत्या कादंबऱ्यापैकी एक आहे. कोसला संपल्यावर जाणवनारी मेलँकाँली इतर रोमँटीक शोकांत कादंबऱ्यांपेक्शा वेगळी आहे.
कोसला वाचल्यानंतर काही वर्षांनी सँलींजरचीं "कँचर इन द राय" वाचनात आली, या दोन्ही कादंबऱ्यांचा घाट आणि काही प्रमाणात कथावस्तु सारखीच वाटली.
15 Jun 2016 - 11:33 am | आबा
कोसला माझ्या आवडत्या कादंबऱ्यापैकी एक आहे. कोसला संपल्यावर जाणवनारी मेलँकाँली इतर रोमँटीक शोकांत कादंबऱ्यांपेक्शा वेगळी आहे.
कोसला वाचल्यानंतर काही वर्षांनी सँलींजरचीं "कँचर इन द राय" वाचनात आली, या दोन्ही कादंबऱ्यांचा घाट आणि काही प्रमाणात कथावस्तु सारखीच वाटली.
15 Jun 2016 - 11:33 am | आबा
कोसला माझ्या आवडत्या कादंबऱ्यापैकी एक आहे. कोसला संपल्यावर जाणवनारी मेलँकाँली इतर रोमँटीक शोकांत कादंबऱ्यांपेक्शा वेगळी आहे.
कोसला वाचल्यानंतर काही वर्षांनी सँलींजरचीं "कँचर इन द राय" वाचनात आली, या दोन्ही कादंबऱ्यांचा घाट आणि काही प्रमाणात कथावस्तु सारखीच वाटली.
15 Jun 2016 - 1:44 pm | राजाभाउ
जॉन लेनीन ला मारल्या नंतर तो खुनी पोलीस येइ पर्यंत तिथेच थांबला व तो "कॅचर इन द रे" हे पुस्तक वाचत होता असे वाचल्याचे आठवते. काय आहे हे पुस्तक ? याबद्दल लिहा वाचायला आवडेल.
15 Jun 2016 - 3:31 pm | आबा
त्यातला प्रोटँगोनिस्ट सुद्धा सांगवीकरासारखा निरर्तकतेचं तत्वज्ञान बनवू पाहणारा आहे. काँलेज संपेपर्यंत खिन्नतेकडे होत जाणारा त्याचा हळूहळू पण निश्चित स्वरूपाचा प्रवास सँलींजरने दाखवला आहे. सांगवीकर गावाकडे जाऊन राहतो तसा भाग कँचर मध्ये नाही, हा मला कँचरचा प्लस पाँईंट वाटतो. प्रत्येक कथेला क्लोजर देण्याची भारतीय सवय यामागे असावी (ऊदा. "टैक्सी ड्रायव्हर" या सिनेमाचे भारतीय वर्जन "प्रहार"). कथानक असं यात नसल्याने जास्त लिहीणं अवघड आहे, परंतु कँचर हे एक चांगलं पुस्तक आहे.
बाय द वे,
लेननचा किस्सा माहीत नव्हता
20 Jun 2016 - 6:31 pm | राजाभाउ
धन्यवाद. कँचर वाचलं पाहिजे.
15 Jun 2016 - 1:56 pm | हेमन्त वाघे
आधुनिक मराठी साहित्याचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृस्ठीकोनातून विचार करता असे वाटते कि , कोसला सारखी कादंबरी समाज विन्मुखतेच्या मनोवृत्तीतून एका विशिस्त मनोगन्दातून निर्माण होणार्या पलायनवादी स्वप्न रंजनातून निर्माण झाली आहे .समाजाला अकरणात्मकतेच्या स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानातेकडे जाताना असल्या कलाविहीन कादंबर्या प्रतीविरोधी ठरतील .
- Consciousness consists of supercharged electrons of quantum energy. “Quantum” means a deepening of the spatial. We exist as bio-electricity.
15 Jun 2016 - 3:45 pm | धनंजय माने
ओ, अहो पाया पडतो पण असलं काही बोलू नका ओ!
15 Jun 2016 - 4:09 pm | पुंबा
हे भयंकर अश्लिल आहे उदाहरणार्थ..
15 Jun 2016 - 4:17 pm | स्वामिनी
आता वाचन सुरु आहे. सर्व पुर्वग्रह वगैरे दुर थेउन वाचणार आहे. पण उत्सुकता वाधली.
15 Jun 2016 - 5:04 pm | समीरसूर
लगेच आपला अभिप्राय द्यावा ही विनंती! :-) तीनशे पानांची आहे फक्त. १-२ दिवसात संपायला हरकत नाही. आपल्याला काय वाटले हे इथे सांगायला विसरू नका फक्त! तेवढीच जरा उदाहरणार्थ गंमत वगैरे... ;-)
15 Jun 2016 - 5:54 pm | सिरुसेरि
--" कोसला आवडणे न आवडणे हे व्यक्तीसापेक्ष आहे. "---------
+१००
असेच एक उदाहरण आठवले ते म्हणजे "चितळेंची बाकरवडी आवडणे न आवडणे हे व्यक्तीसापेक्ष आहे."
18 Jun 2016 - 8:40 pm | विजय नरवडे
कोसला मला उदाहरणार्थ प्रचंड वगैरे आवडली.
मी बऱ्याच वेळा वाचली.