अंधार भीषण पसरला होता. भयाण वारा सुटला होता.
उंच उंच माडी
अन बाहेर मी उभा
मी दारावर टकटक केले. मंद दिवा जळत होता. त्याचा प्रकाश फटीतून बाहेर पडत होता. मी वाट बघितली.
कुंपनाजवळून जात खिडकीखाली उभा राहिलो. टाचा उंचावून आत बघितलं. काहीच हालचाल नाही.
मग पायरीवर बसून राहिलो. एक विडी शिलगावली. पुन्हा एकदा धुळीची वर्तुळं.
मी उठून पुन्हा टकटक केलं. यावेळी जरा भीतीच वाटली. मग उभा राहिलो तसाच. बोचऱ्या थंडीनं अंगावर शिरशिरी आली. पाऊस पडणार आज.
दार अजूनही बंदच. आता काय?
टपोरे थेंब कोसळत राहिले. गढूळ पाण्याचे झरे खळाळू लागले. माडीभोवती तळं साचलं. अंग चोरुन मी पायरीवर निजलो. अगदी दरवाज्याला खेटून. पाऊस केसात ओघळला. पांघरुनात झिरपला. मग चपलेत जाऊन विरघळला. जगणं चिंबाट झालं. आजही.
मी पुन्हा उठून टकटक करायच्या आतच दरवाजा करकरत उघडला.
"थोडीशी ऊब मिळंल काय?"
निथळता पाऊस घेऊन मी घरात गेलो.
"तिकडे" तिनं हात दाखवून बसायची खूण केली.
एक उबदार टॉवेल दिला केस कोरडे करायला.
"पाणी" मी मागितलं.
हुडहूडी भरली होती. तिनं धडाडून चुलकांड पेटवलं. दया आली असावी माझी. हात शेकल्यावर बरं वाटलं.
गिचगिच कपडे काढून टाकले एकदाचे, अन लवंडलो भुईवर चुलीच्या धगीत. निखारे जळत राहिले. अंधार भीषण पसरला.
मध्यरात्री तिनं एक गोणपाट आणून दिलं. अन पेटवून दिलं चुलकांड पुन्हा एकदा. ऊब मला भेटत राहिली रात्रभर.
पाऊस ओसरला होता. सकाळचं तापट उन अंगावर आलं. मग उठून बसलो पायरीवर. विडी शिलगावली. अन अचानक मागचा दरवाजा आठवला. मी उठून टकटक केलं. दरवाजा बंदच होता. मग चिखलातून पाय काढत मी त्या बंगल्याच्या बाहेर पडलो.
प्रतिक्रिया
12 Jun 2016 - 6:59 pm | बोलघेवडा
वर्णन फार सुंदर करता तुम्ही!!
पण शेवटी टोटल काही लागत नाही ब्वा !!!
13 Jun 2016 - 10:01 pm | पीशिम्पी
यात सर्व काही आल
>>
पाऊस ओसरला होता. सकाळचं तापट उन अंगावर आलं. मग उठून बसलो पायरीवर. विडी शिलगावली. अन अचानक मागचा दरवाजा आठवला. मी उठून टकटक केलं. दरवाजा बंदच होता.
12 Jun 2016 - 7:10 pm | प्रचेतस
कल्पनेने उब निर्माण करण्याची कल्पना आवडली. :)
12 Jun 2016 - 8:37 pm | किसन शिंदे
कल्पना आवडली. बिरबलाच्या खिचडीची गोष्ट आठवली.
13 Jun 2016 - 10:24 pm | स्पा
काहीही बरं आठवतं?
13 Jun 2016 - 10:31 pm | किसन शिंदे
सर, तुम्ही जर ती गोष्ट लक्षपूर्वक वाचली असेल तर कल्पनेतली उब हा त्या कथेचाही मुख्य गाभा होता हे नक्कीच समजेल. आणि गोष्ट वाचलीच नसेल तर जाऊद्या..
13 Jun 2016 - 1:46 pm | रातराणी
छानच!
13 Jun 2016 - 2:04 pm | पद्मावति
मस्तं!
13 Jun 2016 - 3:57 pm | नाखु
उब (दारा)तली कथा !
नितवाचक नाखु
13 Jun 2016 - 4:05 pm | कविता१९७८
मस्त , मनी वसे ते स्वप्नी दिसे
14 Jul 2016 - 3:10 am | निखिल निरगुडे
सुरेख लिहिलंय...
14 Jul 2016 - 1:54 pm | चिनार
खल्लास म्हणजे खल्लासचं लिहिता तुम्ही जव्हेरभौ !!
14 Jul 2016 - 1:59 pm | बोका-ए-आझम
मस्तच आहे कथा! अशा अमूर्त कथा या तुमच्या कथा वाचून आवडायला लागल्या.
14 Jul 2016 - 2:38 pm | अंतरा आनंद
थोडक्यात बरंच काही सांगणारया तुमच्या कथा नेहमीच आवडतात. ही सुद्धा आवडली.